महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या किनारी शंभरएक जलदुर्ग समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. त्यांतील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगरटेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. त्या समुद्रकिनाऱ्याच्या अंगाने जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली आहे. दुर्गांच्या त्या माळेतील एक रत्न म्हणजे पूर्णगड ! पूर्णगड हे छोटेखानी गाव आहे. अगदी छोटीशी वस्ती ! गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाचीच खाडी. रत्नागिरीहून निघालेली वाट या खाडीवरील पुलावरून राजापूर तालुक्यात शिरते.
मुचकुंदी नदी व पूर्णगड यांची एक गंमत आहे. पूर्वेला त्या नदीचीच खाडी आणि दक्षिण-पश्चिम बाजूला अथांग पसरलेला सिंधुसागर ! त्या दोन्हींच्या मध्ये एका छोट्या टेकडीवर पूर्णगड वसलेला आहे. गावात शिरले तरी पूर्णगड काही दिसत नाही. कोठल्याही गावकऱ्याला गडाबद्दल विचारावे तर तो एखाद्या घरामागे बोट दाखवत म्हणतो, ‘यो इथं मागू त्यों पूर्णगड !’ आणि असते तसेच ! त्या छोट्या वाटेने निघालो, की अगदी दहा मिनिटांत गडाच्या प्रवेशद्वारात प्रवासी हजर होतो. त्या दरवाज्यात येण्यापूर्वी डाव्या हाताला एक तळे, विहीर दिसते. दाराशी हनुमानाचे छोटेखानी मंदिर आहे. शेंदूर लावून चकचकीत केलेल्या त्या हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि गडकर्ते व्हावे !
तो दरवाजा शिवकाळात बांधल्या जाणाऱ्या गोमुखी पद्धतीचा आहे. गडाचा मुख्य दरवाजा तट-बुरुजांच्या आत लपवत बांधण्याची ही पद्धत. जेणेकरून शत्रूला गडाचा दरवाजा सापडूच नये ! पूर्णगडाच्या दरवाज्यावर मध्यभागी गणेश तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरले आहेत. गडाचा घेर आयताकृती असा आटोपशीर आहे. आत शिरताच डाव्या हाताला वृंदावन दिसते. ते स्मारक कोणातरी महत्त्वाच्या व्यक्तीचे असावे. त्यापुढे लगेच सदरेच्या इमारतीचे जोते दिसते. त्याशिवाय गडाच्या आत किल्लेदाराचा वाडा, दारुगोळा, धान्यकोठाराची इमारत यांचे अवशेष दिसतात. पण या साऱ्या इमारतींमध्ये पाण्यासाठी विहीर किंवा आड अशी कोठलीही सोय त्या किल्ल्यात नाही ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते. किल्ला बांधताना त्याच्यात पाण्याची सोय ही प्राधान्याने केली जाई. मग पूर्णगड त्याला अपवाद कसा ठरतो?
गडातील विविध वास्तू पाहत त्याच्या तटावर जावे. तेथे तटावर येजा करण्यासाठी जागोजागी जिने ठेवलेले आहेत. त्यांतील एका जिन्याने मुख्य दरवाज्याशेजारच्या ढालकाठीच्या बुरुजावर जाता येते आणि तटाबरोबर भोवतालचा मुलूख पाहता येतो. असे म्हणतात, की शिवरायांनी बांधलेला हा सर्वात शेवटचा किल्ला. त्यांनी हा किल्ला बांधला आणि दुर्गनिर्मितीला पूर्णविराम घेतला. म्हणून या गडाला पूर्णगड असे नाव मिळाले. तर काहींच्या मते, याचा छोटेखानी आकार, जणू पूर्णविरामाच्या ठिपक्याएवढा आहे. म्हणून हा पूर्णगड !
गडाला तटबंदी सहा बुरुजांची आहे. सर्व बुरूज व्यवस्थित आहेत. गडावर सात तोफा आणि सत्तर तोफगोळे असल्याची नोंद 1862 च्या एका पाहणीत आहे. पण सध्या गडावर एकही तोफ दिसत नाही. तोफा कोठे गायब झाल्या असाव्यात? तटावरून फिरताना भोवतालाकडेही लक्ष जाते. नारळी-पोफळीत झाकलेले पूर्णगड गाव, त्यापुढील मुचकुंदी नदीची पूर्णगड खाडी, तिच्यावरील तो रत्नागिरी-राजापूरला जोडणारा पूल आणि पश्चिमेचा अरबी समुद्र असा मोठा प्रदेश नजरेत येतो. हे सारे पाहत गडाच्या पश्चिम दरवाज्यातून बाहेर दर्यावर उतरता येते. त्या दरवाज्याच्या कमानीपासून तो विशाल जलाशय खुणावू लागतो. समुद्राचे दर्शन कोठेही मोहकच, पण त्याला असा सुंदर कोन मिळाला तर मग काय… ! वाळूचा किनारा, त्याभोवतीची नारळी-पोफळीची झालर, सुरूचे बन, क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला सिंधुसागर, त्यावर तरंगणाऱ्या छोट्यामोठ्या बोटी आणि या साऱ्या चित्रात दूरून सांगावा घेत येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र-फेसाळ लाटा ! किती वेळ, किती क्षण हे दृश्य दृष्टीत साठवावे ! अशा ठिकाणी कायमचे थांबून जावे असा मोह होतो ! शांत, निर्मनुष्य अशा त्या गडावर या कमानीखालीच समाधी लावावी आणि मनातील नदीला वाहू द्यावे !
– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@