Home वैभव इतिहास नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती.

इंग्रजांनी ‘ॲण्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सस’ ही संस्था मध्यभारतातील पुरातत्त्वीय साधनांचा अभ्यास आणि त्यांचे जतन करण्यासाठी स्थापन केली होती. त्या संस्थेच्या शिफारशीनुसार नागपूर येथील संग्रहालय 7 मे 1863 रोजी स्थापन करण्यात आले. संग्रहालयाच्या स्थापनेसाठी समिती निर्माण केली गेली होती. तीमध्ये नागपूरचे चीफ कमिशनर सर रिचर्ड टेम्पल, फादर रेव्हरंड हिस्लॉप, कॅप्टन पी. डॉट्स, कॅप्टन कॉब, कॅप्टन जे. अशब्रुनर हे व अन्य उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकारी यांचा समावेश होता. रिव्हेट-कॉरनॅक यांचेही संग्रहालयाच्या स्थापनेत योगदान होते. त्यांनी नागपूरजवळील जुनापानी येथील महापाषाण युगातील संस्कृती स्थळाचे सर्वेक्षण करून त्याचा नकाशा बनवला होता व शिळावर्तुळांचे उत्खनन केले होते. कॅप्टन कोब यांनी संग्रहालयाच्या इमारतीचे प्रारूप तयार केले. तत्कालीन मध्य प्रांतातील स्थानिक राजे, सरदार, जहागीरदार, मालगुजार यांनी त्यांच्याकडील दुर्मीळ आणि मौल्यवान वस्तू संग्रहालयात प्रदर्शित करण्यासाठी द्याव्यात म्हणून नागपूरचे मुख्य आयुक्त सर रिचर्ड यांनी नागपूर (1865) आणि जबलपूर (1866) येथे विशेष दरबार भरवले होते. संग्रहालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2013 साली साजरे झाले.

संग्रहालय समिती सदस्य सर रिचर्ड टेम्पल

स्वातंत्र्यकाळात ते ‘मध्यवर्ती संग्रहालय’ म्हणून ओळखले जाते. संग्रहालयाचा कारभार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य या विभागामार्फत पाहण्यात येतो. पुरातत्त्वशास्त्र संचालनालयात कार्यरत असलेले मयुरेश खडके हे संग्रहालयाचे क्युरेटर आहेत. तो त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्यांकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे. पक्षी विभागात काही पक्षी निसर्गात ज्या परिस्थितीत राहतात, तसे डायोरोमाच्या साहाय्याने दाखवले आहेत. त्यांत करकोचा, क्रौंच, माळढोक, बगळा, गिधाड, गरुड, बहिरी ससाणा, नीळकंठ, सुतार पिंगळा, घुबड, कोतवाल, सारस, बदक, पाणकावळा, चमचा, मैना, चिमणी, कावळा यांचा समावेश आहे. त्या सोबतच आशिया, युरोप आणि अमेरिका या खंडांतील पक्षी आहेत. त्यांच्या आतील मांस काढून त्यात भुसा भरून प्रक्रिया करून ते जतन केले आहेत. ते पक्षी कॅप्टन बकमफिल्ड यांनी संग्रहालयाला 1873 साली दिले.

प्राकृतिक इतिहास दालनात भूगर्भीय प्रारूपातील खनिजे, जीवाष्म, हाडे व निसर्ग इतिहासाशी संबंधित इतर वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. निसर्ग विज्ञान दालनामध्ये ‘डॉयनोसोरस सेप्टेनरी ओनलिस’ या विशाल डायनासोरच्या हाडाच्या अवयवांची प्रतिकृती आहे. डायनासोरचा शोध ब्रिटिश काळात चार्ल्स आल्फेड मेटली यांनी लावला. डायनासोरची हाडे मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या बडा-छोटा सिमला परिसरातून 1917 ते 1919 व 1933-1937 या कालावधीमध्ये गोळा केली. त्या डायनासोरचे मूळ अवशेष प्राकृतिक इतिहास दालन (लंडन) येथे प्रदर्शित आहेत. तर त्यांच्या काही प्रतिकृती या दालनात ठेवलेल्या आहेत. विशाल हत्तीच्या कवटी व हस्तिदंत, पेट्रीफाइड झाडांचे जीवाश्म, विविध अखनिज, कोरल अशा वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. त्यांतील बहुतांश नमुने मध्य भारताच्या भूप्रदेशांतून संकलित केले असल्याने त्या प्रदेशाची भौगोलिक व भूगर्भीय माहिती मिळते.

प्राचीन व ऐतिहासिक काळापासून अठराव्या शतकापर्यंतची पाषाणशिल्पे त्याच नावाच्या एका दालनात मांडलेली आहेत. त्यामध्ये हिंदू, जैन व बौद्ध धर्माशी निगडित कृती आहेत. त्या सोबतच गांधार कला आणि वाकाटक काळातील महत्त्वपूर्ण शिल्पे आहेत. गोंड व भोसले काळातील मूर्तीही प्रदर्शित केल्या आहेत.

शस्त्र दालनात ऐतिहासिक काळात युद्धात वापर होणाऱ्या विविध प्रकारांतील हत्यारे प्रदर्शित केली आहेत. त्यामध्ये मोगल, मराठा, शीख, ब्रिटिश व आदिवासी काळांतील शस्त्रे आहेत. शस्त्रांचा विकास कसा होत गेला हे त्या दालनातील संग्रह पाहून कळते. त्यामध्ये दगडी हत्यारे, छिलका हत्यारे, धनुष्यबाण, तलवारी, कट्यार, भाला, बंदुका, तोफा, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, ढाल, चिलखत, शिरस्त्राणे अशा शस्त्रांचा समावेश आहे. प्राणी, पक्षी व सरीसृप या दालनांत पक्षी, जलचर, सरीसृप पाहण्यास मिळतात. सस्तन प्राणी दालनात मांसाहारी व शाकाहारी प्रकारांतील विविध वन्यप्राण्यांचे आकर्षक प्रदर्शन डायरोमा सिनेरीमध्ये केले आहे. त्यात निरनिराळ्या प्राण्यांचा समावेश आहे. वाघ, गवा, बिबट्या, कोल्हा, वानर, हरीण, जंगली कुत्रा वगैरे प्राणी आकर्षक रीतीने त्यांच्या वातावरणात कल्पकतेने प्रदर्शित आहेत. त्याच ठिकाणी प्लाटिपस हा अतिशय दुर्मीळ व भारतात न आढळणारा सस्तन प्राणी असून, त्याची उत्पत्ती सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याची नोंद आहे. सरीसृप व सस्तन प्राणी यांच्या उत्पत्तीच्या काळातील एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही त्याचा उल्लेख करता येईल. तो प्राणी अंडी देतो आणि पिल्लांचे दूध पाजून पालन करतो. तो उद्विल, बदक व कोंबड्या वगैरे प्राण्यांच्या मिश्रणातून बनला असावा. संग्रहालयात दुर्मीळ जातींचे शाकाहारी व मांसाहारी अनेक जीव आहेत. जलजीव भागात नदी व समुद्रात मिळणारे मासे, शंख-शिंपले व प्रवाळ (कोरल) असे नमुने प्रदर्शित केले आहेत. तेथे फुलपाखरांच्या प्रजातीही बघण्यास मिळतात.

हस्तकला दालनाची रचना सेंट्रल हॉलमध्ये आहे. हस्तशिल्प दालनात भारतातील हस्तनिर्मित कलाकुसर मांडलेली असून त्यामध्ये धातू, हस्तिदंत, मेण, लाख, सिरॅमिक, सोपस्टोन, संगमरवर, शिंग, काष्ठ आणि टेराकोटा ही माध्यमे वापरून तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पितळी धातूच्या विविधोपयोगी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत – सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हस्तिदंताच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तींमधील कलाकुसर व सौंदर्य पाहण्याजोगे आहे. चिनी मातीची भांडी, भारतीय व विदेशी भांडी अशा वस्तूंचा समावेश आहे. सोप स्टोनच्या दगडी प्रतिमादेखील महत्त्वाच्या आहेत. लाकडी वस्तू, सोन्याचा मुलामा दिलेले अलंकृत दागदागिने, वस्त्रे इत्यादी आहेत.

शिल्पकला दालनात प्राचीन काळ (इसवी सन पहिले-दुसरे शतक) ते इसवी सनाच्या सतराव्या शतकापर्यंतची शिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्या कलेचा विशेष प्रभाव व प्रसार भारतात कुषाण काळात दिसून येतो. वाकाटकांनी विदर्भासह मध्य भारतात इसवी सन 250 ते इसवी सन 500 पर्यत राज्य केले. वाकाटक राजे कलेचे भोक्ते होते. त्यांनी विपुल प्रमाणात शिल्पकलेला प्रेरणा दिली. वाकाटकांची ठरावीक शिल्पे त्या दालनात प्रदर्शित केली आहेत. मध्य प्रदेशातील अत्यंत अलंकृत, सुंदर शिल्पे (बारावे शतक) त्याच दालनात प्रदर्शित आहेत. 

विदर्भात काही निवडक पुरातत्त्वीय उत्खनन झाले. त्यामध्ये मिळालेल्या काही नमुनावस्तू पुरातत्त्व दालनात आहेत. त्यात प्राचीन दगडी, तांब्याची व लोखंडी हत्यारे आहेत. त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका मानवी विकासात मानली जाते. दगडांची प्रागैतिहास काळातील हत्यारे महत्त्वपूर्ण आहेत. दगडी हत्यारांवरून मानवाने प्रगती कशी साधली याचे ज्ञान मिळते. तसेच, भारतीय इतिहास तीन हजार वर्षे मागे नेणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या हडप्पा व मोहोंजोदारो येथील उत्खननातून प्राप्त पुरावशेष तेथे प्रदर्शित आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी मानव किती प्रगत होता याची प्रचीती त्या पुरावशेषांद्वारे होते. त्याच प्रकारे प्राचीन विदर्भाची राजधानी कौडिंण्यपूर येथे होती. ते रूक्मिणीचे माहेर. तेथे पुरातत्त्व विभागाव्दारे केलेल्या उत्खननाचे अवशेष, कलाकुसरीच्या वस्तू, आभूषणे संग्रहालयात आहेत. सोबतच दुर्मीळ पोथ्या व प्राचीन राजवंशीयांच्या राजाज्ञा, दानाचे उल्लेख असलेले ताम्रपट, प्राचीन विदर्भातील व भारतातील नाणी व नाण्यांची छायाचित्रे प्रदर्शित आहेत. नगरधन उत्खननातून प्राप्त वस्तू, माहुरझरी येथील दगडी मनके व प्राचीन नाणी प्रदर्शित केली आहेत. मूळ हस्तलिखिते, मृदा-भांडी अशा महत्त्वाच्या वस्तू मांडून ठेवल्या आहेत.

आदिवासींची संख्या मध्यप्रांतात प्रामुख्याने दिसून येते. आदिवासी विदर्भातही गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांमध्ये विपुल प्रमाणात राहतात. त्यांचे सण, परंपरा, रूढी, चालिरीती, सामाजिक व धार्मिक पद्धतीचे अवलोकन महत्त्वाचे आहे. आदिवासी दालनात महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांतील गोंड, माडिया, कोरकु, बंजारा आदिवासींच्या दैनंदिन उपयोगाच्या, तसेच नृत्य व वादनाच्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. त्या द्वारे त्यांची जीवनशैली दर्शवण्याचा प्रयत्न आहे. त्या पाहून गतकालीन समाजाच्या एकंदर परिस्थितीवर प्रकाश पडतो. त्यांच्या सांस्कृतिक घटना- प्रसंगांची छायाचित्रेही आहेत. त्यांची शस्त्रे, शिकारीचे साहित्य, वस्त्रे, आभूषणे अशा वस्तू त्या दालनात बघण्यास मिळतात.

चित्रकला दालनात व्यक्तिचित्रे, रचनाचित्रे व निसर्गचित्रे यांचा समावेश आहे. काही लघुचित्रेही आहेत. मध्यवर्ती संग्रहालय हे चित्रकलेचे प्रदर्शन असणारे विदर्भातील एकमेव संग्रहालय आहे. तेथील चित्रकला दालनाची मांडणी, प्रकाश व प्रदर्शन (डिस्प्ले) व्यवस्था आधुनिक पद्धतीने केली आहे. संग्रहालयातील चित्रकला दालनात रझा, डिखोळे, गायतोंडे, बाबुराव पेंटर, दीनानाथ दलाल यांची चित्रे प्रदर्शित आहेत. त्यांत निसर्ग, व्यक्ती, अमूर्त, लघु, समूह व ऐतिहासिक चित्रे प्रदर्शित आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या दृश्यकला परंपरेचे प्रतिनिधित्व तेथे दिसते. त्यांमध्ये वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे, पुनरुत्थानवादी शैलीतील चित्रे, प्रसंगचित्रे, आधुनिक कलाप्रवाहातील सृजनात्मक रचनाचित्रे अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. काही स्थानिक चित्रकारांच्या कलाकृतीही तेथे प्रदर्शित आहेत.

संग्रहालयाच्या दक्षिणेकडील व्हरांड्यामध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळापर्यंतचे शिलालेख आहेत. त्यामध्ये मौर्यकालीन ब्राह्मी लिपीतील अभिलेखांव्यतिरिक्त वाकाटक, चालुक्य, परमार, सुल्तान वंश, गुलाम वंश इत्यादी राज्यकर्त्यांचे अभिलेख आहेत. संग्रहालयाच्या मोकळ्या जागेत विविध शिल्पे, मंदिरांचे अवशेष, उत्खननात प्राप्त अवशेष, व्हिक्टोरिया राणीचे भव्य पुतळे; त्याशिवाय विदर्भातील महापाषाणयुगीन संस्कृतीच्या शवाधानातून प्राप्त दगडाची शवपेटी अशा मोजक्या वस्तू आहेत. शवपेटीचा काळ तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे.

संग्रहालयात देशाचा इतिहास आणि संस्कृती यांवरील पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालयदेखील आहे. संग्रहालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2013 साली होते. त्या निमित्ताने ‘नागपूर हेरिटेज’ दालनाची निर्मिती करण्यात आली. नागपूर शहराच्या प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंतची संक्षिप्त माहिती तेथे आहे. नागपूर शहराशी संबंधित विविध घटक त्या दालनात पाहण्यास मिळतात.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीनिमित्त; तसेच, काही अभ्यासक आणि त्या गोष्टीत रुची असणारे लोक संग्रहालयाला भेट देत असतात. इंग्लंडहून जी वाघनखे येत आहेत ती याही संग्रहालयात येणार आहेत. त्यासाठी काही मानकांचे पालन करावे लागते. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्या करता संग्रहालय सध्या बंद आहे.

संग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मुलांना मातीकाम शिकवणे, किल्ले तयार करण्याचे शिबिर, मुलींसाठी लाठीकाठी, तलवारबाजी प्रशिक्षण, शिल्पकला प्रात्यक्षिके, चित्रकारांना आमंत्रित करून त्यांच्या कार्यशाळा अशा उपक्रमांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्येही ऑनलाईन उपक्रम राबवण्यात आले. ज्येष्ठ इतिहास संशोधकांच्या कार्यशाळांचे आयोजन संग्रहालयाद्वारे केले जाते. विविध विषयांच्या अनुषंगाने विशेष प्रदर्शनांचे, छंद प्रदर्शनांचेही आयोजन केले जाते.

(विराग सोनटक्के यांच्या ‘लोकमत’मधील लेखातून अधिक माहिती)

– वृषाली देशपांडे 9822225633 vrishali.pimprikar@gmail.com

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version