Home छंद निरीक्षण म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)

म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)

‘म्हण’ ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’. वा.गो. आपटे, द.ता. भोसले यांच्यासारख्या संस्कृतीच्या अभ्यासकांनी म्हणींचा खास अभ्यास केला आहे.

म्हणी या व्यंगचित्रांसारख्या असतात. त्यांत जीवनानुभवांचे अचूक, मार्मिकतेने केलेले मंथन सामावलेले असते. म्हणी या समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे, अंतरंगाचे दर्शन घडवतात. त्या सामाजिक व्यवहार घटकांचे प्रतिनिधित्व करतात, त्याच बरोबर त्यांवर टिप्पणी केलेली असते. या व्यवहारघटकांत पुढील बाबींचा समावेश होतो – प्रचलित समजुती, रूढी-परंपरा, रीतिरिवाज, श्रद्धा-अंधश्रद्धा, भल्याबुऱ्या वृत्ती-प्रवृत्ती, व्यंगे, इच्छाआकांक्षा, विकृती, धार्मिक समजुती, राहणीमान, आचारविचार, जीवनशैली, विचारशैली, वैचारिक पिंड, आवडीनिवडी, निखळ भावभावना, माणसांचे जगणे, वागणे, षड्रिपू, गुण-अवगुण, स्वभावविशेष, सुखदुःखे, माणसाची प्राकृतिक जडणघडण, निसर्ग, सण-उत्सव, समाजाची नैतिक जडणघडण, मानसिकता, स्थित्यंतरे, विचारधारा, आचार-व्यवहार, कालानुरूप झालेले वैचारिक बदल, त्यांना मिळालेली दिशा… मात्र म्हणी या नैतिकतेचा आव आणत नाहीत.

म्हणींचे रचयिते कोणी उच्च अभ्यासक वा महान विद्वान नसतात. त्या सर्वसामान्य माणसांच्या तशाच जीवनात सहज, स्वाभाविक घडत असतात. पंचतंत्र, जातककथा, रामायण-महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम दिसतातच ; शिवाय अनेक लोककथा-काव्याच्या स्वरूपात त्यांचे जतन झालेले आढळते. प्रचलित म्हणींवरून त्या प्रदेशातील लोकांची प्रतिभा, वाक्चातुर्य, स्वभावविशेष आणि व्यवहार यांची पारख होते. ग्रामीण भारतात म्हणींचा वापर संभाषणात आणि व्यवहारात पावलोपावली डोकावताना दिसतो. त्यांच्या गप्पाटप्पांत इरसाल, अस्सल, झणझणीत म्हणी ऐकण्यास मिळतात ! पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजा औरच असते ! त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे व्यवहारज्ञान ठसठशीतपणे जाणवत असते. बोलण्यात प्रसंगानुरूप चटकदार अशा तयार उक्तींचा वापर करणे ही बोलीची लकब मानली जाते. काही माणसे त्यात वाकबगार असतात. त्यातून भाषेचे भारदस्तपणही व्यक्त होते.

म्हणी वैविध्याने भरलेल्या व रंगतदार असतात. त्या भाषेला सौंदर्य आणि संपन्नता बहाल करतात. प्रचलित असलेल्या म्हणी उपहास, उपेक्षा, अतिशयोक्ती, कल्पनाविलास अशा अलंकारांनी कधी गांभीर्याने, तर कधी विनोदी, रंजक पद्धतीने ठसठशीतपणे व्यक्त होतात. म्हणींत आंतरिक लय, गेयता असते. म्हण म्हणजे उपमा-रूपक-विरोधाभास-यमक-अनुप्रास अशा भाषिक अलंकारांसोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार असतो. भाषेचा गोडवा म्हणींमुळे द्विगुणित होतो. मराठी भाषेत आहेत तितक्या म्हणी आणि वाक्प्रचार खचितच अन्य कोणत्या भाषेत आढळतील ! म्हणींची रचना बहुधा यमक, अनुप्रासाने युक्त अशा शब्दांत केलेली असते. जो परिणाम मोठ्या शब्दसमुच्चयाचा वापर करून साधला जात नाही तो परिणाम म्हण साधते – कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय चपखलपणे मांडण्याचे सामर्थ्य म्हणींत असते. म्हणी या प्रासयुक्त, ठसकेबाज, अंगभूत गेयता असणाऱ्या आणि रसाळ असतात. म्हणींना स्वतःचा डौल असतो. म्हणींतील शब्द काही वेळा ओबडधोबड असले तरी त्यांतील अर्थ मात्र उच्च दर्ज्याचा बोध देणारा असतो. म्हणींत असलेल्या अशा सुप्त-गुप्त गुणांमुळे तो वाङ्मयप्रकार अक्षय ठरतो. म्हणी सर्वसामान्यांच्या तोंडी चटकन रुळतात आणि भाषा प्रवाही, जिवंत ठेवतात. काही उदाहरणे पाहवी – ‘अक्कल नाही काडीची, म्हणे बाबा माझे लग्न करा’ (क्षमता नसताना एखाद्या बाबीचा हट्ट करणे), ‘अडली गाय अन् फटके खाय’ (अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला जास्त त्रास देणे), ‘अडाण्याचा गेला गाडा, वाटेवरची शेते काढा’ (मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो), ‘अन्नछत्रात मिरपूड मागू नये’ (गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो), ‘अपयश हे मरणाहून वोखटे’ (अपयश हे मरणापेक्षा भयंकर आणि लाजिरवाणे असते, ‘अप्पा मारी गप्पा’ (काही रिकामटेकडे चर्चेचे उगाच पाल्हाळ लावतात), ‘जी खोड बाळा ती जन्म काळा’ (जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाहीत), ‘थंडी वाजते म्हणून शेकोटी डोक्यावर घ्यायची नसते’ (कोणत्याही वस्तूचा उपयोग योग्य स्थानावरून करावा), ‘लग्न जमवणारा कितीही हुशार असला तरी हनिमूनला नेत नाही’ (नको त्या ठिकाणी सन्मानाची अपेक्षा करू नये), ‘घरावर हुरडा भाजू द्या, नाहीतर पाहुण्यांपुढे निजू द्या’ (घरावर हुरडा भाजण्याची परवानगी दिली तर घर जळते नि पाहुण्यांपुढे झोपण्याची परवानगी दिली तर इज्जत जाते), ‘पांगळी काम करायला अन् सतरा जण हातपाय धरायला’ (कामाचा वकूब किंवा अनुभव नसलेल्या व्यक्तीने ते काम करणे), ‘नगाऱ्याची घाय अन टिमकी तुझं काय?’ (जिथे भल्या-भल्यांचे कोणी ऐकत नाही तिथे सामान्य माणसाचे कोण ऐकणार?), ‘तुमचे लाडाचे अन् आमचे काय झाडाचे?’ (दोन शेजारणी त्यांच्या लेकरांवरून भांडत असतील तर पहिली दुसरीला उद्देशून बोलते).

म्हणी प्रायः स्त्रियांकडून मौखिक परंपरेने प्रसृत होतात. म्हणींमध्ये स्त्रीजीवनातील कन्या, प्रेयसी, पत्नी, माता, सासू, आजी अशी सर्व रूपे आढळतात. त्यांमध्ये निरामय प्रेम, वात्सल्य, ममता अशा भावभावना जाणवतात. म्हणींचा वापर स्त्रियांकडून अधिकतर होतो, म्हणून त्यांना स्त्रीधन असेही म्हटले जाते. बहिणाबाई चौधरींसारख्या प्रतिभावंत महिला त्यांच्या उत्स्फूर्त भाषासामर्थ्याने नवीन म्हणी निर्माण करतात. भारतीय परंपरेत स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. विशेषतः ग्रामीण जीवनात तर त्यांच्या हालांना पारावार नसतो ! ‘दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी’, ‘घटकंची फुरसत नाय न् दमडीची मिळकत नाय’, ‘आवडीने केला नवरा त्याच्या पायाला भवरा’, ‘नामटिळे नायकाचे घरी हाल बायकोचे’, ‘सासरी शिवरात्र माहेरी नवरात्र’, ‘घरच्या भयानं घेतलं रान वाटंत भेटला मुसलमान त्यानं घेतलं नाक-कान’, ‘लाखाची मत्ता काडीची सत्ता’, ‘हरबऱ्याच्या भाजीला हटावं किती म्हाताऱ्या नवऱ्याला नटावं किती’, ‘जन्मा आला हेला पाणी वाहता वाहता मेला’, ‘उतरंडीला नसेना का दाणा पण दादला असावा पाटील राणा’, ‘चाळीशी लोटली आशा खुटली’, ‘नगाऱ्याची घाई तिथे टिमकी तुझे काई?’, ‘बायको दुसरी फजिती तिसरी’ अशा म्हणींतून स्त्रियांचे दुय्यमत्व, एकटेपण, उपेक्षा, नवरेशाही, वाट्याला आलेले काबाडकष्ट आणि अवहेलना ही अवस्था व्यक्त होते.

विशेषतः आज्यांच्या अनुभवकथनातून म्हणींचे भांडार साकारले जाते. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ असे म्हणतात त्याप्रमाणे म्हणींच्या प्रयोगात लोकजीवन सुकर व्हावे ही अपेक्षा असते. म्हणी म्हणजे अनुभवांचे सार सांगणाऱ्या चटकदार, अर्थगर्भ अशा उक्ती होत. त्यातून पूर्वजांच्या भविष्यवेधी दूरदृष्टीचे दर्शन होते. जे सद्विचार पटवून देण्यासाठी खूप काळ-वेळ खर्च करावा लागतो त्या प्रबोधनाचे म्हणी हे ’लघुरूप’ होय. म्हणींचे रूप लवचीक असल्यामुळेच स्थलकालपरिस्थितीनुरूप अनुभव जिवंतपणे साकार करण्याचे सामर्थ्य त्यांत उरते.

महाराष्ट्रात ‘कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली’ ही म्हण लोकप्रिय आहे. ही म्हण अनेक भारतीय भाषांत अगदी त्याच प्रकारे आढळते. उदाहरणार्थ, हिंदीत ‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली’ तर भोजपुरीत ‘कहाँ राजा भोज, कहाँ भोजवा/लखुआ तेली’, गुजरातीत ‘क्यां गंगाशाह, क्यां गंगा तेली’, बंगालीत ‘कोथाय राजा भोज, कोथाय गंगाराम तेली’, राजस्थानी भाषेत ‘कठै राजा भोज, कठै गांगलो तेली’, बुंदेलखंडात ‘कां राजा भोज, कां डूंठा तेली’.

‘नाचता येईना, अंगण वाकडे… स्वैपाक करता येईना, ओली लाकडे’ ही म्हण बंगालीत ‘नाचते न जानले, उठानेर दोष’ अशी प्रचलित आहे. गुजराती मंडळी ती म्हण ‘नाचतां नहीं आवडे तो के आंगणुं बांकुं’ अशा प्रकारे वापरतात. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ अशा अर्थाच्या म्हणी इतर भाषांतही आढळतात. ती म्हण बंगालीत ‘बडे गाछेई झड लागे’ या शब्दांत, तर बुंदेलखंडी भाषेत ‘बडेई रूख पै गाज गिरत’ या शब्दांत प्रसिद्ध आहे. पोटदुखीवरील रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यावर एक म्हण प्रचलित आहे, ‘ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल’. म्हणजे कोणी उगाचच स्वत: होऊन चवीला तिखट लागणारा, जिभेला मिरमिरणारा ओवा मागण्यास वा खाण्यास जाणार नाही. ती म्हण हिंदीत ‘जिसका पेट दर्द करता है वहीं अजवाइन खोजता है’ म्हणून प्रसिद्ध आहे, तर बंगालीत तिचे रूप, ‘जार माथा मांगे सेई चून खोजे’ असे आहे. म्हणजेच, ज्याचे डोके फुटेल तोच चुना शोधेल.

मौखिक परंपरेने जपून ठेवलेल्या पूर्वजांच्या संचित ज्ञानाचा कोश असलेल्या म्हणींमधून माणसाच्या मार्मिकतेचे, रोखठोक स्पष्टपणाचे, फटकळपणाचे; तसेच, रांगडेपणाचेही दर्शन घडते. श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे जाणाऱ्या अनुभवांचे प्रकटीकरण म्हणींत असल्याने त्या समाजमनाचे अत्यंत उघडेवाघडे दर्शन घडवू शकतात. मराठीतील गावरान, असभ्य, शिष्ट समाजात उघडपणे न उच्चारले जाणारे शब्द असलेल्या म्हणी म्हणजे समाजाचे सत्य रूप आहे. सभ्य, शहरी आणि पांढरपेशा समाजात आणि आधुनिक युगात या गावरान बाजाच्या म्हणींचा वापर कदाचित मोठ्या प्रमाणावर होत नसेल; परंतु ग्रामीण भारतात शेलक्या शैलीत बोट ठेवणाऱ्या अस्सल गावरान चवीचा, झणझणीत खजिना असलेल्या म्हणी संभाषणात, व्यवहारात डोकावताना दिसतात. समाज मर्यादांचा भंग करणारे वाटत असणारे अशिष्ट शब्द झाकण्यासाठी फुल्याफुल्यांचा प्रयोग म्हणींत खूप ठिकाणी आढळतो.

मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेल्या काही म्हणींमध्ये प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार विविधता आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण आणि घाटावरील अनेक प्रांतिक, प्रादेशिक म्हणी एकत्रित स्वरूपात वाचण्यास मिळतात. म्हणी हा बोलींनी मायमराठीला दिलेला अमूल्य ठेवा आहे. बोलीभाषा मधाळ, डौलदार, काहीशा नखरेल, लडिवाळ आणि मार्दवयुक्त आहेत. बोलींत शिव्याही ओव्यांप्रमाणे सामावल्या जातात. ‘मेल्या, मायझया, रांड, वशाडपडला, खंय मराक गेल्लय’ असे शब्द बोलींमध्ये जिव्हाळ्याने, सहजपणे पावलोपावली उच्चारले जातात. बोलींत रुचिवैशिष्टये व वृत्तिवैशिष्टये आहेत. बोलीभाषांतील हेलांमधून जवळीक, अगत्य यांचा परिचय होतो. कोंकणी बोलीत एक ठसका, हेल काढून शब्दांना दिलेला हेलकावा असल्यामुळे भाषेची गोडी वाढते. त्या बोलीत मिठ्ठास आणि इरसाल म्हणींची पखरण आढळते. गोमंतकीय ही कोंकणीच्या जवळ जाणारी भाषा आहे.

बोलताना म्हणींचा सहज वापर करणे ही मालवणी बोलीची खास लकब होय. मालवणी भाषा ही मिठ्ठास, गोंजारणारी तेवढीच बिनधास्त आणि बोचरी आहे. कोणाचीही पत्रास न बाळगणाऱ्या मालवणी शैलीतील काही शब्द ग्राम्य असले तरी वाक्याचा नेमका अर्थ उमजण्यासाठी ते अपरिहार्य असतात. मालवणी माणूस वरून काटेरी आणि आतून मधाळ असतो, तशीच काहीशी त्याची भाषा आणि त्या भाषेतील म्हणी आहेत. मालवणी भाषेत घोळलेल्या ‘येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात’, ‘वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव’, ‘सरड्याची धाव वयपुरती’, ‘हळकुंडाच्या पदरात शेळकूंड’, ‘कोको मिटाक जाता मगे पावस येता’ या निवडक म्हणी आढळतात.   

वऱ्हाडी ही विदर्भातील बोली. ‘वऱ्हाड अन् सोन्याची कराड’ असे त्या प्रदेशाचे वर्णन केले जाते. ‘गोगलगायीच्या दुदाचं लोनी नस्ते निघत’, ‘हेला ना भादराव देवळा जोळ आन् पंगत ना द्याव गोदरी जोळ’, ‘शिदोळ कितीकई लांबला तरमा शेशनाग व्हत नसते’, ‘अंधारात तूप सांडलं तरमा सुगंद लपत नाई’, ‘वादीसाटी म्हईस कापू नोय’ या काही ‘वऱ्हाडी ठसक्याच्या’ म्हणी. ‘खाते कनगीले अन् गाते उरल्याले’, ‘निक्सू निक्सू खाये, त्याच्या घाटीत केस जाये’, ‘दिवस गेला गोठीमाठी, चांदन्यानं कापूस वटी’, ‘गोंडाचा जवाई अन् ताकासंगं शेव्या खाई’, ‘नखरा नखो-बोटी अन् सुरत खापरकुटी’, ‘सकवार सई अन् बोरातली अई’, ‘मनात नाई नांदनं अन् पोवाडे बांधनं’, ‘हिडग्याले देली गाय धावू धावू गोठानावर जाय’ यांसारख्या, विनोदी अंगाने व्यक्त होणाऱ्या, उपहास-उपरोधिक पद्धतीच्या वऱ्हाडी म्हणींनी त्या बोलीचे सौंदर्य टिकवून ठेवले आहे.

बदलत्या काळाबरोबर माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींकडून ’सोशल मीडिया’वर नव्या म्हणींचे पीक फोफावू लागले आहे. काही वेळा मूळ म्हणींच्या ठिकाणी आयटीचे तांत्रिक शब्द वापरून कॉर्पोरेट कल्चरमधील म्हणींचा आविष्कार दिसतो. ‘मायक्रोसॉफ्ट तिथं बग’, ‘आपलाच प्रोजेक्ट आणि आपलाच बग’, ‘प्रोजेक्ट रन केल्याशिवाय बग दिसत नाहीत’, ‘आपला तो टास्क, दुसऱ्याचा तो टाइमपास’, ‘रात्र थोडी न टास्कस् फार’, ‘चार दिवस डेव्हलपरचे, चार दिवस टेस्टरचे’, ‘कोडमध्ये नाही तर साइटवर कुठून येणार?’, ‘जैसा क्लायंट तैसा प्रोजेक्ट’, ‘इकडे बॉस तिकडे क्लायंट’, ‘ऐकावे कलीगचे, करावे बॉसचे’, ‘अॅप्रिसिएशन नको पण प्रोजेक्ट आवर’, ‘कंपनीत राहून मॅनेजरशी वैर’, ‘कंपनी मोठी काम छोटे’, ‘आधीच कामाचा कंटाळा त्यात नेट डाऊन’, ‘रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार’, ‘आपलाच कीबोर्ड नि आपलाच माऊस’, ‘विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर’, ‘उचलला पॉइंटर अन् लावला आयकॉनला’, ‘अतिशहाणा त्याचा फेसबुक रिकामा’, ‘मरावे परी फेसबुकरूपी उरावे’, ‘उचलली पोस्ट लावली वॉलला’ अशा एकाहून एक हटके म्हणी  मराठी आयटी क्षेत्रात आज मिरवत आहेत. करोनाकाळात एक नवीन म्हण सांगितली गेली, ‘आपली ती सर्दी आणि दुसऱ्याचा तो करोना !

पारंपरिक विनोदी म्हणींबरोबर आधुनिक विनोदी म्हणीही साहित्यप्रकारात समाविष्ट झाल्या आहेत. ‘पँटला नाही नाडी आणि पोरगं मागतंय गाडी’, ‘थोडक्यात नटावे अन् प्रेमाने भेटावे’, ‘अंधारात केलं अन् उजेडात आलं’, ‘लाखाशिवाय बात नाही अन् वडापावशिवाय खात नाही’, ‘अंगात नाही बळ अन् चिमटा घे‌ऊन पळ’ (दुबळा माणूस बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता छोटी खोड काढून पसार होतो) या काही इरसाल म्हणी हास्याची खसखस पिकवतात.

म्हणी आज भाषिक अवशेषरूपात राहिल्या आहेत. बदलती सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती; तसेच, बदलती जीवनशैली यांमुळे भाषेत व्यक्त झालेले हे अनुभवजन्य ज्ञान नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही !

 उषा रामवाणी – गायकवाड 7498380403 ramwaniusha@gmail.com
(महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक 2023, नागपूर आवृत्तीवरून उद्धृत)

About Post Author

3 COMMENTS

  1. छान माहिती.
    अहिराणी म्हणी पण खूप अर्थपूर्ण आहेत.

  2. माहीत नसलेल्या बोली भाषेतील म्हणी वाचतांना मजा आली.
    वेगळ्या विषयावर लेखन केल्याबद्दल लेखिकेचे आभार.
    जवळपास बावीसेक म्हणींचा वापर करून तयार केलेले एक मराठी गाणे मी WhatsApp वर ऐकले होते. तेही मजेदार होते. असो.
    धन्यवाद. संजीवनी साव.

  3. खूपच तपशीलवार आणि माहितीपूर्ण लेख! मनापासून आभार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version