Home संस्था आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

0

मी आणि माझा मुलगा; नव्हे आम्ही सारे कुटुंबीय ज्या समाजाच्या आधारे, ज्या मित्रांच्या मदतीने इथपर्यंतचा पल्ला गाठला, त्याचे स्मरण म्हणून- अंशमात्र उतराई व्हावे म्हणून यशाशक्ती काही कामे करत आलो आहोत.

मी स्वत: प्रतिकूल परिस्थितीतून शिकल्यामुळे व त्यावेळी अनेक मित्रांनी निरपेक्ष भावनेने आधार दिल्यामुळे, मला नोकरी लागल्यावर मी अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले. नोकरीच्या कालखंडात सुमारे तीस मुलांना वह्या, पुस्तके, कपडे, साबण, तेल, औषधपाणी, फी इत्यादीसाठी खर्च करून त्यांना पूर्णपणे स्वावलंबी बनवले, अनेकांना नोक-या मिळवून दिल्या. ते प्राध्यापक, शिक्षक व शासकीय नोकरीत आहेत. मी अनेकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

मी व माझी पत्नी, आम्ही दोघांनी मिळून 1984 पासून दरवर्षी एका मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. आजघडीला ( गेल्या तीन-चार वर्षांपासून) माझ्या डॉ.मुकुल या मुलाने दरवर्षी दोन मुलींना दरसाल पाच हजार रुपये याप्रमाणे मदत केली आहे. त्यांच्या सुट्टीच्या काळात त्यांना अर्धवेळ नोक-या मिळवून दिल्या आहेत. पंढरपूर येथे मुलींच्या वसतिगृहांसाठी पुढाकार घेऊन इमारत पूर्ण केली. त्याने स्वत: देणगी दिलीच, पण अनेकांना भेटून देणग्या मिळवल्या आहेत.

माझ्या मुलाने केलेली कामे थोडक्यात अशी –

1. तो मुलांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी अंधशाळा, मूकबधिर शाळा, नवरंग बालकाश्रम आणि वृद्धाश्रम यांना तो कमीत कमी पाच हजार रुपये व इतर गरजेच्या वस्तूंची भेटी देतो. मी व त्याने थंडीमध्ये ऎशी वृद्ध मंडळींना शाली दिल्या. मुलांची मोफत तपासणी केली. त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले. तनपुरे महाराजांनी चालवलेल्या वृद्धाश्रमात सत्तर वृद्ध आहेत.
2. अनाथाश्रमातील मुलांना गेल्या नोव्हेंबरमध्ये स्वेटर वाटप केले.
3. उन्हाळ्यात मुलांचे पाय भाजतात म्हणून सर्वांना स्लिपर्स घेऊन दिल्या. या मुलांवर मोफत औषधोपचार केले.
4. तो गरिबांचा डॉक्टर म्हणूनच तीन-चार तालुक्यांत परिचित झाला आहे. इथे व परिसरात ज्या ऑपरेशनला अठरा ते बावीस हजारांपर्यंत फी घेतली जाते, ती ऑपरेशन्स तो सहा हजारात करून देतो. गरीब रुग्ण हॉस्पिटलमध्ये कितीही दिवस राहिला तरी खोलीभाडे घेतले जात नाही. स्पेशल रूमसाठी मात्र चार्ज घेतला जातो.
5. आमचे हॉस्पिटल एस.टी स्टॅंडपासून जरा दूर आहे. रिक्षावाले पंधरा ते वीस रुपये घेतात. गरीब रुग्णांना हा बोजा पडू नये म्हणून त्याने पाच-सहा वर्षे एक गाडी रुग्णांची मोफत ने-आण करण्यासाठी ठेवली हेती. आता, खेड्यातील प्रत्येकाजवळ दुचाकी झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ही सेवा बंद केली आहे.
6. तो रुग्णसेवा धंदा म्हणून न करता धर्म म्हणून करतो. तो बाबा आमट्यां च्या आश्रमात जाणार होता. मीच येथील गरिबांसाठी त्याला पंढरपुरात थांबवले. शिवाय, पैसा हे त्याला अंतिम साध्य वाटत नाही. त्याच्यामागे तो लागत नाही. कारण त्यांच्या गरजा कमी आहेत व जीवनशैली आदर्शवत आहे. आता हे खाण्यापिण्याचे मौज-मजा करण्याचे वय असतानाही त्याने मांसाहार सोडला. चहा नाही, दूध नाही, मटन-मासे नाही. तळलेले खाणे नाही. मसालेदार नाही. कोणतेही व्यसन नाही. कच्या भाज्या-फळे व एक पोळी, थोडा भात असा त्याचा आहार. कोणत्याही क्लबात जात नाही. डॉक्टराच्या मटन-मद्याच्या पार्ट्यात सामील होत नाही. पहाटे उठून योगासने –प्राणायाम . रात्री घरच्या घरी व्यायाम असतो. मात्र मी आयोजित केलेल्या साहित्यकलाविषयक कार्यक्रमास अवश्य येतो. ह्यासाठी मदत करतो. वाचनाची आवड असल्याने वेळ मिळेल तसे वाचन करतो.
7. मी स्थापन केलेल्या जिव्हाळा सेवाभावी संस्थेला मी पुस्तकांचे मानधन, व्याख्यानांचे मानधन अशी दीड लाखाची देणगी दिली आहेत. मुकुलनेही स्वत:चे एकावन्न हजार दिले आहेत. या संस्थेच्या वतीने मी व माझे सहकारी अनेक सेवाभावी उपक्रम करतो. त्याच्या मदतीने-रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन पर्यावरणापोटी एक हजार झाडे लावणे, तीन-चार वाचनालये आम्ही चालवतो. खेड्यातील स्त्रियांच्या रक्तगट तपासणामध्ये सहभाग असतो. कोणतीही देणगी न घेता या वर्षापासून आम्ही बालवाडी व प्राथमिक वर्ग सुरू केले. मी स्वत: त्यासाठी वेळ देतो. एक आदर्श शिक्षण केंद्र व्हावे यासाठी आम्ही सारेजण प्रयत्नशील आहोत.

संपर्क – द.ता. भोसले, पंढरपूर, मोबाइल – 9422646855

About Post Author

Exit mobile version