मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत – त्यांचा चहा बंद करून त्यांचे दूध पिण्याचे प्रमाण वाढवणे, इतर दैनंदिनीही त्यानुसार आखणे या सर्व गोष्टी ‘लोकेषणे’चा भाग ठरल्या होत्या. करमरकर यांनी अंबाबाई तालमीत पत्नी व मुली यांना आखाड्यात उतरवले आणि वेताच्या मल्लखांब प्रशिक्षणाचे प्रयोग केले. वैद्य यांच्या कारकिर्दीतून स्फूरण घेऊन त्यांच्यासह महाराष्ट्रभरातील अंबादास वैद्य (अमरावती), शिवरामपंत दामले (पुणे), प्र.ल. काळे (मुंबई) या तिघांनी महाराष्ट्रीय आखाडा संस्कृतीला आधुनिक स्वरूप दिले.
बाळंभटदादा यांनी कुस्ती आखाडा संस्कृती (1805 व नंतर) पुनरुज्जीवित केली. तो दुसऱ्या बाजीरावाचा काळ होता. करमरकर यांनी त्या ‘महाराष्ट्रीय आखाडा संस्कृतीत महिलांच्या सहभागा’ची धुरा सांभाळली. त्यांनी ‘मल्लखांबाच्या संशोधना’ने महाराष्ट्रीय आखाड्यांना नवचैतन्य दिले. ‘मल्लखांब’ म्हणजे एक मानवाकृती खांब. पैलवान मल्लखांबाच्या साहाय्याने प्रत्यक्ष भिडू नसूनही कुस्तीच्या पकडींचा सराव करू शकतो याची जाणीव करून देणे हे त्या संशोधनाचे वैशिष्टय. बाळंभटांनी भारतभरच्या आखाड्यांवर शास्त्रोक्त काम करत ‘परकीय शक्तींविरुद्ध चीड’ असलेल्या युवकांना घडवणे हे आयुष्यभराचे व्रत मानले. बाळंभटांच्या त्या व्रताला उत्तर प्रदेशातही प्रतिसाद मिळाला आणि काशी, उज्जैन, मध्यप्रदेश व प्रामुख्याने गुजरात-बडोदा येथील शिष्य-प्रशिष्यांचे आखाडे निर्माण झाले. कर्नाटकातही आखाड्यांना आरंभ झाला. अशा तऱ्हेने कुस्तीच्या आखाड्यांचा विस्तार घडला. बाळंभट देवधर व त्यांचे शिष्य यांनी त्या खेळाचा प्रचार-प्रसार मल्लखांबाच्या माध्यमातून 1805 ते 1925 पर्यंत संघटित व विशिष्ट शिस्तीत केला. त्याच बरोबर, काही प्रशिष्य बडोद्याच्या माणिकराव आखाड्यातून प्रशिक्षित झाले, ते महाराष्ट्रभर पसरले.
म.द. करमरकर हेही बडोदा मल्लखांब आखाड्यामध्येच ‘शास्त्रोक्त तरबेज’ झाले होते. ते पेशाने वैद्य होते. त्या चौघांच्या पाठोपाठ पुढील काळात साताऱ्यातून भिडेगुरुजींचे शिष्य द.रा. परांजपे, विठ्ठल सोण हे पुढे आले. या सर्व क्रीडा संशोधक-अभ्यासक व क्रीडा संघटक मंडळींनी ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळा’ची स्थापना केली – त्यांची विविध अधिवेशने होऊ लागली. त्यांतून क्रीडा प्रबोधन घडत गेले. महिला धावणे, लंगडी अशा खेळांमध्ये थोड्याफार दिसू लागल्या, मात्र कोणीही ‘स्त्रियांच्या धाडसी खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभागी’ होण्यासाठी ठोस पुढे येत नव्हते. योगायोग असा, की अकराव्या ऑलिम्पिक सामन्यांचे निमित्त झाले. ते सामने 1936-40 च्या दरम्यान जर्मनीत बर्लिन येथे भरले होते. त्यावेळी मुंबईचे डी.एम. कल्याणपूरकर व अमरावतीचे नरडेकर यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके हिटलरसमोर सादर केली. त्यामुळे सर्वांचे लक्ष मल्लखांबाकडे आकर्षित झाले. मात्र कल्याणपूरकर यांनी महिलांना मल्लखांब शिकवण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. त्यांनी मल्लखांब करताना हात मजबूत असावे लागतात, सारे शरीर हातावर तोलावे लागते. महिला नेमक्या त्यात थिट्या पडतात, असा निष्कर्ष त्यावेळी काढला होता. पण करमरकर यांनी ते भ्रम दूर केले. त्यांनी कल्याणपूरकर डॉक्टरांची निरीक्षणे एक वैद्य म्हणून तपासून पाहणे आरंभले.
![-karmarkar-teaches-scientific-mangalagaur-to-his-wife-](https://thinkmaharashtra.com/wp-content/uploads/karmarkar-teaches-scientific-mangalagaur-to-his-wife--scaled.webp)
मल्लखांब या खेळाबद्दल समाजात गैरसमज टोकाचे होते. त्यामुळे मुलींचा मासिक धर्म नष्ट होतो येथपासून ते त्यांची प्रजननशक्ती नाहीशी होते वा त्यांची मुले जगू शकत नाहीत अशा बनावट गोष्टींचा समावेश गैरप्रचारात होता. करमरकर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके 1949 सालच्या ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण’ मंडळाच्या क्रीडा महोत्सवात घडवून आणली. त्यानंतरही, अडीच दशकेपर्यंत त्यांनी त्या मुलींना व मिरजेच्या अंबाबाई तालमीतील इतर खेळाडूंना घेऊन प्रात्यक्षिकांचा धडाका महाराष्ट्रभर व राज्याबाहेर लावला. त्यांनी मुलींचे वेताच्या मल्लखांबातील व आखाड्यातील कौशल्य याबद्दल तऱ्हतऱ्हेच्या गोष्टी तितक्याच विविध तऱ्हांनी प्रसृत केल्या. त्यांनी महिलांच्या खोखोतील सहभागासाठी 1961 ते 1963 या काळात काही वृत्तपत्रांतून लेखमाला लिहिल्या. ते ‘मल्लखांबातील पकडींमधील आसने व आयुर्वेदातील निकष’ अशी मांडणी लेखांद्वारे करत राहिले. काही वृत्तपत्रांनी त्या लेखमालांवर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया व तत्संबंधी पत्रव्यवहार छापले. करमरकर यांनी त्यांवर पुनश्च संशोधन-अध्ययन आरंभले.
तो सर्व काळ मल्लखांब खेळासाठी बौद्धिक संघर्षाचा होता. द.रा. परांजपे, मो.ना. नातू, जेजुरीकर या मंडळींनी करमरकर यांना त्यात खंदी साथ दिली. किंबहुना त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे संघटन सामर्थ्य त्यांच्या पाठी उभे केले. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी होणारे क्रीडा मेळावे, क्रीडा महोत्सव, क्रीडा अधिवेशने व क्रीडाप्रचार दौरे या सर्व उपक्रमांत म.द. करमरकर हे त्यांच्या कन्यांसह ‘महाराष्ट्राचे क्रीडा प्रबोधन’ करण्यास उपस्थित असत. करमरकर यांनी स्वत:च्या नऊच्या नऊ मुलींना त्या प्रयोगाचा भाग बनवले. वैद्य यांनी केलेल्या संशोधनाद्वारे मल्लखांब खेळाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे. त्यांनी काढलेल्या निकषांनुसार खो खो खेळाद्वारे शरीरात कमालीची लवचीकता येते. त्यात कुस्तीच्या पकडींचा सराव असल्याने पुरेशी पैलवानी ताकद निर्माण होऊ शकते. त्यातील पकडी, मुद्रा (पोज) या योगासनांशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यांच्या सरावाने एकाग्रता निर्माण होऊ शकते.
म.द. करमरकर हे त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरीस बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे अध्यक्ष होते. तेव्हापर्यंत वैद्य यांनी या विविध निकषांवर काम केले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन भारतातील बावीस क्रीडासंस्था व विद्यापीठे यांतील ‘योगशास्त्राच्या अभ्यासक्रमांवर तौलनिक अध्ययन’ केले. त्यांनी ते परिषदेस काही निकषांसह सुपूर्द केले. मल्लखांब हा खेळ करमरकर वयाची पासष्टी ओलांडूनही खेळत होते. त्यामुळे खेळाची स्वानुभूती व इतरांना आजन्म ‘मल्लखांब प्रशिक्षक’ म्हणून कार्यरत राहिल्याचा अनुभव व वैद्य अशा वेगवेगळ्या नात्यांनी ते आरोग्यशास्त्राच्या सर्व बाजूंचा विचार करू शकले.
– मनीषा बाठे 9850138970 maneesha.bathe@gmail.com