स्वाक्षऱ्यांसाठी डोंबिवलीला एक घर आहे ! घराचे नाव आहे ‘हे माझे घर, शब्दाचे’; अन् या अवलिया घरमालकाचे नाव आहे सतीश चाफेकर. ते घर म्हणजे आहे एका छोट्या फ्लॅटची टुमदार खोली, पण तिच्या भिंती भरल्या आहेत सह्यांनी मान्यवरांच्या, ‘स्टार्स’च्या, खेळाडूंच्या. अगदी सचिनची आई रजनी तेंडुलकर आणि कवी ग्रेस यांनी त्या खोलीत येऊन त्यांची त्यांची सही केली आहे. त्या खेरीज, चाफेकर यांनी पस्तीस-छत्तीस डायऱ्या, क्रिकेटच्या कितीतरी बॅटा, टी शर्ट, छत्र्या, मास्क अशा संबंधित अनेकविध साहित्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेथे जपून-राखून ठेवल्या आहेत. त्यांचे मोल कोट्यवधी रुपयांचे, खरे तर अनमोल आहे. सतीश चाफेकर यांचे नाव ‘लिम्का बुक’च्या विक्रमवीरांच्या यादीत सहा वेळा नोंदले गेले आहे...