माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते !
गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. राजारामशास्त्री भागवत, इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर, नाटककार-कथालेखक-कवी विठ्ठल सीताराम गुर्जर, बालकुमार साहित्यिक भा. रा. भागवत, उद्योगपती शं. बा. ओळकर, रामायण समालोचनकार-लेखक र. भ. कळके, नामवंत तबलावादक सखारामपंत भागवत व रामभाऊ नाफडे आणि इंग्रजीचे प्रसिद्ध प्राध्यापक (माझे वडील) वि.ह. कुळकर्णी, डॉ. गंगाधर कुळकर्णी, जागतिक कीर्ती मिळवलेले हृदयविकारतज्ञ- कळके हार्ट व्हॉल्व्ह इन्व्हेंटर डॉ. भगवंत राजाराम कळके, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्टचे प्रमुख वामनराव कुळकर्णी, लघुलिपी शास्त्राचे संशोधक श्रीराम भागवत व सोन्या-चांदीचे व्यापारी मोतीराम कशाळकर ही मोठमोठी माणसे मूळ कशेळीची होती. माझ्या वडिलांच्या- वि.ह. कुळकर्णी यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी केलेल्या भाषणात प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी खास उल्लेख करून म्हटले होते, की विहंच्या (माझ्या वडिलांना निकटचे मित्र विह म्हणून संबोधत असत) कशेळी गावाची ख्याती आम्हाला माहीत होती. परंतु त्यांच्या घरी रसाळ ’अमृत्या’ फणस, त्याची सांजणे व कधी न खाल्लेली काजूची चविष्ट उसळ आम्हाला खाण्यास मिळाल्याने आम्ही खवैय्ये अधिक खूष झालो होतो !
आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते. आश्चर्य म्हणजे, संपूर्ण कशेळी गावात तसा गोड व रसाळ फणस नाही. मग, त्या ‘अमृत्या’च्या गऱ्यापासून होणाऱ्या सांजणांबद्दल तर विचारूच नका.
लाल चिरेबंदी कौलारू घरे, कोळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या, फळा-फुलांनी बहरलेले प्रशस्त आगर, फणसांनी भरलेली प्रचंड झाडे… शिवाय, आंबे, काजू, करवंद, केळी, रातांबे, नारळी, पोफळी, अननस, चिंच व इतर मेवा… अलिकडच्या (2020) चक्री वादळाचा तीव्र तडाखा कशेळी गावाला बसला होता. नारळी-पोफळीसह इतर झाडांची हानी प्रचंड प्रमाणात होऊन अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यांत आमचेही घर होते. मात्र, आमच्या ’अमृत्या’ फणसाला काहीही झाले नाही ! कल्पवृक्षच तो, खंबीरपणे ताठ होता व तो त्याच दिमाखात उभा आहे.
अनेक जुनी घरे पाडून किंवा पडून तेथे नव्याने कौलारू घरे बांधली जात आहेत. पूर्वीसारखीच बैठी परंतु सुबक अशी तांबड्या चिरेबंदीची. नव्या-जुन्या पिढ्या आनंदाने एकत्र नांदताहेत. अनेक गावांना नव्या काळात शहरी रूप आले आहे. मात्र, कशेळी गावाला अजूनही शहरी वातावरणाची झळ लागलेली नाही. गावाचे गावपण टिकून राहिले आहे.
– जयंत विठ्ठल कुळकर्णी, न्यूयॉर्क jvkny1@gmail.com