कशेळी हे उगवत्या सूर्याचे गाव समजले जाते. एका बाजूला पसरलेला अथांग व विस्तीर्ण अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगरात विसावलेले निसर्गरम्य, हिरवेगार असे शांत गाव. लाल मातीची चिरेबंदी कौलारू घरे, बाजूला असलेल्या कळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, खोप्या, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या व पुढे-मागे प्रशस्त आगर असा गावचा डौलदार थाट. बैलगाड्या हे सर्वांच्या घरचे वाहन असे. कशेळीला भाऊच्या धक्यावरून बोटीने किंवा एसटीने जावे लागत असे. तो अनेक तासांचा खडतर प्रवास असे. बोट मुसाकाजी येथे किंवा पूर्णगड बंदराजवळ लागे...