महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या किनारी शंभरएक जलदुर्ग समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. त्यांतील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगरटेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. त्या समुद्रकिनाऱ्याच्या अंगाने जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली आहे. दुर्गांच्या त्या माळेतील एक रत्न म्हणजे पूर्णगड ! पूर्णगड हे छोटेखानी गाव आहे. अगदी छोटीशी वस्ती ! गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाचीच खाडी. रत्नागिरीहून निघालेली वाट या खाडीवरील पुलावरून राजापूर तालुक्यात शिरते...