विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !

0
265

मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना… तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचूडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! माझे दिवस महाविद्यालयीन जीवनात “हेमासाठी साऱ्या विसरू माया-ममता-स्वाती” असले विडंबन काव्य रचण्यात गेले. परंतु माझ्या कविता चालीसकट पाठ असत. ती मात्र अगदी पहिल्या वर्गापासून जमेची बाजू होती. त्यामुळे मी कधी काळी कविता रचली तर ती कोठल्या तरी वृत्तात स्वाभाविक असे ! मला स्वत:ला ते माहीत नसायचे व कळायचेही नाही. शालेय अभ्यासक्रमात अभ्यासण्यासाठी काव्यातील वृत्तछंद होते, पण ते शिकण्याचा योग लागोपाठ बदललेल्या अभ्यासक्रमांमुळे आला नाही. पुढे, महाविद्यालयात तर शिक्षण विज्ञान शाखेत झाले, त्यामुळे वृत्तछंदाचा व माझा संबंधच कधी राहिला नाही.

पण एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ! मी भगवत् गीतेचा भावानुवाद वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला तेव्हादेखील मला छंदांचा छंद लागायचा होता. त्यामुळे ते मी नक्कीच कोठून तरी चोरले असावे अशी अनेकांची खात्री झाली होती. तसे ते बोलल्याचेही माझ्या कानावर आले होते. पण मी माझ्या स्वभावाविरुद्ध त्यांच्याशी त्या वेळी भांडलो का नाही ते गीताच जाणे ! त्यानंतर मात्र मला भावानुवाद करण्याचा छंद लागला आणि त्यासाठी वृत्तांचा अभ्यास करावा लागला. शंकराचार्यांची स्तोत्रे हा वृत्त व गेयता यांमुळे माझ्या आवडीचा विषय आहे. त्यांची विविध स्तोत्रे आणि मुख्य म्हणजे‘सौंदर्यलहरी’ यांचाही भावानुवाद माझ्याकडून होऊन गेला. आचार्यांनी ललितात्रिपुरसुंदरीच्या सगुण सात्त्विक रूपाचे वर्णन तेथे केले आहे. वास्तविक ते त्याही पलीकडे काहीतरी गूढ असावे असे अनेक अभ्यासकांना वाटते.

मी तुलसीदासांचे दोहे मराठीत दोहा वृत्तात करून आमच्या अध्यात्म व्हॉटस अॅप ग्रूपवर टाकत असे. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. त्याच नादात आमचे नागपूर निवासी एक सदस्य अरविंद मुळे यांना ‘विवेकचूडामणि’वर भाष्य लिहिण्याची बुद्धी झाली. ते वाचून मी त्या महान ग्रंथाचा भावानुवाद करण्याची जबाबदारी घेतली. आम्ही ‘विवेकचूडामणि’चा मूळ श्लोक, भावानुवाद व विवेचन असे ग्रूपवर रोज टाकू लागलो. मी भावानुवाद लिहून फक्त मुळे यांना पाठवत असे. बाकी पुढील सर्व प्रक्रिया ते करत. कमीत कमी पन्नास श्लोकांचा आगाऊ पुरवठा करावा लागे. हा आमचा उद्योग सुरुवातीस व्यवस्थित सुरू होता, पण विषय जसा गहन होऊ लागला तशी मला अनामिक भीती वाटू लागली. कधी वाटे, की हे काम आपल्याकडून होणे शक्य नाही; पण माझ्याकडे तयार श्लोकांची मोठी संख्या शिल्लक असे. त्यामुळे धीर येई आणि मी पुढील अनुवाद काम करण्यास लागे. असे करता करता पाचशेऐंशी श्लोकांचा जादुई आकडा माझ्याकडून गाठला कधी गेला ते मलाच कळले नाही ! विवेकचुडामणी ग्रंथाचे श्लोक पाचशेऐंशी इतकेच आहे.

ग्रूपवर सर्व साहित्य प्रसिद्ध झाले आणि कोणीतरी सुचवले, की हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे. पृष्ठसंख्या भरपूर होत असल्यामुळे ते काम आमच्या आवाक्याबाहेरचे आहे हे लक्षात आले. पण तसे होणे नव्हते. त्या कामाकरता देणगी म्हणून अगदी पन्नास हजार रुपये देणारेही तयार झाले. पण पुस्तक देणग्यांतून तयार करण्यात मजा नाही; ते प्रकाशकाने प्रसिद्ध करावे तर त्याची गुणवत्ता सिद्ध होईल, ह्याबाबत मी व मुळे ठाम होतो. आणि काय जादू झाली ते कळले नाही. नागपूरच्या ऋचा प्रकाशनाच्या संचालक माधुरी मुळे ह्यांनी तो अनुवाद ग्रंथ छापण्याची तयारी दाखवली. आम्ही अनुवादकार्यात संदर्भासाठी रामकृष्ण मठाच्या पुस्तकाचा वापर केला होता. त्यासाठी त्यांची परवानगी मिळवली. वर, नागपूर मठाचे प्रमुख ब्रह्मस्थानंद स्वामी यांनी वाखाणणी करून आशीर्वादपूर्वक आमच्या कार्यास शुभसंदेशसुद्धा दिला !

ग्रंथ छापून तयार झाला. त्याचे प्रकाशन भारती ठाकूर यांच्या हस्ते मध्य प्रदेशात नर्मदा नदीकिनारी ओंकारेश्वर येथे करण्याचे ठरवले होते, पण ते कोरोनामुळे शक्य झाले नाही. मग प्रकाशन घरीच, जवळच्या लोकांच्या उपस्थितीत केले. मागे वळून पाहताना माझ्याकडून हे अशक्यप्राय काम कसे झाले याचे आश्चर्य वाटते. ही रचना मी केली यावर माझा विश्वास बसत नाही, कारण माझ्याजवळ ईश्वरदत्त किंचित काव्यप्रतिभा या व्यतिरिक्त काहीही नाही. तरीही हे कार्य माझ्या हातून घडले हे सत्य आहे! लिहिण्यासाठी मूड पाहिजे असे मला कधी जाणवले नाही. आज इतके काम करायचे असे ठरवले की तितके ते करूनच मी उठत असे. ह्या पद्धतीने काम झाले ! त्यामळे माझा माध्यम म्हणून या कार्यात वापर झाला; ज्याचे काम त्याने करून घेतले ही माझी भावना आहे. त्यातच माझा आनंद आहे !

– विनय देशपांडे (खंडाळकर) 9325066915 deshpandevinay02@gmail.com

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here