Home व्यक्ती आदरांजली रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

7
856

काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह (1793-1847) यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला. महाराष्ट्रातल्या तरूणांचे संघटन उभारून 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात, स्वत:चा मुलगा आणि पुतण्यांसह भाग घेतला. घरादारावर तुळशीपत्र ठेवले, कुटुंब देशोधडीला लागले. आजच्या लेखात अशा या तेजस्वी पुरुषाची कहाणी सांगत आहेत नयना वैद्य.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

रंगो बापूजी गुप्ते हे सातारचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (1793 ते 1847) यांचे कारभारी व वकील होते. मराठ्यांचे राज्य 1818 मध्ये बुडाले तेव्हा छत्रपती प्रतापसिंह दुसऱ्या बाजीरावाच्या बरोबर होते. इंग्रजांनी त्यांच्याबरोबर स्वतंत्र तह करून त्यांना इतर संस्थानिकांप्रमाणे मांडलिक केले. परंतु त्यांचे इंग्रजांबरोबर खटके उडू लागले. नागपूरच्या पदच्युत राजाबरोबर पत्रव्यवहार केले, गोव्याच्या पोर्तुगीजांशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला असे त्यांच्यावर आरोप होते. राजद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रजांनी त्यांना कैद केले आणि काशीला पाठवले. त्यांनी गव्हर्नर जनरलसमोर स्वतःची बाजू मांडली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी त्यांचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडच्या पार्लमेंटसमोर कैफियत मांडण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती प्रतापसिंह यांनी आधी दोन वकील पाठवले होते परंतु त्यांचा फारसा उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी रंगो बापूजींना पाठवले. दरमहा दोन हजार रूपये पगार ठरवून खर्चासाठी पन्नास हजार रुपये देण्यात आले. त्यांनी मुंबई 12 सप्टेंबर 1840 रोजी सोडली आणि ते डिसेंबर अखेर इंग्लंडला पोचले. त्यांनी खैबर खिंडीतून, कॅप्टन कोगन या इंग्रज अधिकाऱ्याची मदत घेऊन अरब व्यापाऱ्यांच्या काफिल्याबरोबर छुप्या मार्गाने तो प्रवास केला. अरबी भाषा उत्तम बोलता येत असल्यामुळे त्यांचा संशयही कोणाला आला नाही. तेथे जाऊन त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीने, हिंदुस्थानी जनतेवर चालवलेले अत्याचार ब्रिटीश जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न सुरु केले. इंग्रज जनतेला आपल्या बाजूला वळवायचा धडाका लावला. त्या आधी राजा राममोहन रॉय यांनी लंडनमध्ये ‘ब्रिटीश इंडियन सोसायटी’ स्थापली होती. आडाम या इंग्रजाच्या साथीने, रंगो बापूजींनी त्या सोसायटीचे पाठबळ मिळवले. त्यांनी ‘ब्रिटीश इंडिया अॅडव्होकेट’ नावाचे मासिक 1841 मध्ये सुरु केले. हिंदी जनतेच्या विशेषत: सातारच्या जनतेच्या, दुःखाला वाचा फोडली. त्यांनी तेथील अधिकारी वर्गातल्या लोकांना भेटून मुंबई सरकारचे अन्याय चव्हाट्यावर आणले. ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डापुढे 8 फेब्रुवारी 1843 रोजी मराठी जाणणाऱ्या एका इंग्रज मित्राच्या सहकार्याने मराठीत भाषण करून छत्रपती प्रतापसिंहांची हकीकत सांगितली. त्यांच्या इंग्रज मित्राने प्रत्येक वाक्य इंग्रजीत सांगितले. खुद्द इंग्रजी जनतेने, ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध, ‘शेम!’, ‘शेम!’ अशा घोषणा दिल्या. रंगो बापूजींनी लोकमत स्वतःच्या बाजूने वळवले. लंडनच्या प्रत्येक कौंटीचा अभ्यास करून, तेथील दौरा केला. तिथल्या मुत्सुद्दी लोकांचा स्नेह आणि विश्वास संपादन केला. उत्तम इंग्रजीत मुद्देसूद भाषणे देऊ लागले. त्यांना असंख्य इंग्रजी मित्र मिळाले. त्यांना इंग्रजी स्त्रीपुरूष मदत करू लागले. सातारच्या राजावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करु लागले.

हिंदुस्थानी लोकांवरील अत्याचाराची जाणीव जगाला करून देणारे रंगो बापूजी गुप्ते, हे असंतोषाच्या चळवळीचे पहिले जनक होते. इंग्रज लोकांनी त्यांच्यासाठी खेड्यापाड्यातून सह्यांची मोहीम राबवली. त्यांनी लंडनच्या मुक्कामातील चौदा वर्षात असंख्य पत्रे लिहिली. मोत्यासारख्या वळणदार अक्षरात तारीखवार लिहिलेली पत्रे म्हणजे छत्रपतींकरता केलेली लेखणीची लढाईच होती. पुढे, जवळची रक्कम संपली तरी ते हिंमत हरले नाहीत. छत्रपतींच्या मृत्यूची खबर आल्यावर दुःखी अंतःकरणाने पण तरीही जिद्दीने लढा देत राहिले. त्या काळात त्यांच्याकडे स्वत:च्या खर्चासाठीही पैसे नव्हते पण लोकांनी देणग्या देऊन स्वतःहून मदत केली. परंतु या खटपटीचा तसा उपयोग झाला नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची इच्छा नसल्यामुळे रंगो बापूजींचा अर्ज 18 जून 1845 रोजी पार्लमेंटने नामंजूर केला. त्यांनी असंख्य अडचणींना तोंड देऊन प्रतापसिंहांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. खर्चापायी स्वतःचे सगळे धन गमावले. शेवटचा उपाय म्हणून त्याने लंडनमध्ये असतानाच ‘प्रतापसिंहावरील आरोपांचे खंडन’ हे पुस्तक मोडी लिपीत लिहून प्रसिद्ध केले.

प्रतापसिंहांच्या मृत्यूनंतर त्यांचा तनखा बंद होऊन त्यांच्यावर फार बिकट परिस्थिती ओढवली. तरी त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि इंग्लंडमध्ये राहून प्रतापसिंहाचा दत्तकपुत्र शाहू यांच्या नावाने खटपट सुरू ठेवली. प्रतापसिंहांच्या राणीने व तिच्या मुलाने राज्यावरचा दावा सोडून दिला आणि रंगो बापूजींना जून 1850 मध्ये परत बोलावले. इंग्रज सरकारने त्यांना कळवले, की वकील म्हणून आम्ही तुम्हास ओळखत नाही. रंगो बापूजींची परिस्थिती अधिकच बिकट झाली. प्रतापसिंहांच्या मृत्यूनंतच्या सहा वर्षांच्या अवधीत त्यांच्यावर दहा हजार पौंडाचे कर्ज झाले होते. ते अखेर नाईलाज होऊन 1854 मध्ये परत निघाले.

पण परतीच्या तिकिटासाठीही पैसे नव्हते. त्यांच्या इंग्रज मित्रांनी त्यांचे कर्ज फेडून, वर त्यांच्या तिकिटाची सोय केली. मोठी  सार्वजनिक सभा घेऊन, त्यांच्या स्वामीनिष्ठेचे, कर्तबगार स्वभावाचे कौतुक केले. आदराची व प्रेमाची भेट म्हणून, अठरा पाकळ्यांचे मोठे चांदीचे तबक दिले. त्यावरील मजकूर होता, ‘धन्याची एकनिष्ठेने सेवा बजावणाऱ्या रंगो बापूजींना, चवदा वर्षांच्या कष्टप्रद हद्दपारीनंतर, स्वदेशी जाताना, आदर आणि प्रेम भावनेने दिलेले स्मृती चिन्ह!’ त्याखाली प्रतिष्ठीत इंग्रज नागरिकांची नावे कोरलेली आहेत.

या तबकाची आणखीही एक कहाणी आहे. रंगो बापूजींचा 1857 च्या उठावात सहभाग महत्त्वाचा होता. ते पकडले गेले होते परंतु ते शिताफीने तुरूंगातून पळाले. त्यांच्या तसबिरीसाठी इंग्रजांनी कारी येथील त्यांचे रहाते घर अक्षरश: खणून काढले. मौल्यवान चीजवस्तू सोजीरांनी लुटून नेली. त्यात ते तबकही नाहीसे झाले. सुप्रसिद्ध संशोधक शंकराराव आबाजी भिसे यांना इंग्लंडमध्ये जुन्या वस्तू विकणाऱ्या एका दुकानात 1906 साली एक तबक दिसले. त्यांनी सहज त्याच्यावरचा मजकूर वाचला आणि ते चकीत झाले. दुकानदाराने पाच पौंड किंमत सांगितली ती देऊन त्यांनी ते विकत घेतले आणि पुण्याला आल्यावर आपल्या भावाकडे दिले. ते आता पुण्याच्या राजा केळकर वस्तूसंग्रहालयाकडे आहे.

इंग्लंडमधून परत आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेऊन जातीत परत येण्यासाठी प्रयत्न करण्यात रंगो बापूजींचा बराच काळ गेला. त्यानंतर त्यांनी शिवरायांच्या रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन लेखणी आणि पागोटे यांचा आमरण त्याग केला. छत्रपतींची बाजू लढवताना हजारो पत्रे लिहिणाऱ्या रंगो बापूजींनी न लिहण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या घरच्यांनी याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘कायदेबाजीने इंग्रजांशी झगडा देणारा रंगोबा आता मेला. आता लढाई वेगळी असेल!’

गोसाव्याच्या वेशात उत्तर हिंदुस्थानात जाऊन रंगो बापूजींनी तात्या टोपे यांची भेट घेतली. तात्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांशी रंगो बांपूजीची गाठ घालून दिली. पेशव्यांना त्यांनी आश्वासन दिले, की ‘माझ्या मावळातला हजार गडी नि माझे दोन पुतणे तुमचा उठावाचा निरोप येताच उत्तर हिंदुस्थानात रवाना करतो.’ रंगोबांचे थोर कार्य म्हणजे त्यांनी बहुजन समाजाचे उत्कृष्ट संघटन केले. कंपनी सरकारशी लढण्यासाठी त्यांना उद्युक्त केले. उमाजी नायकाच्या वेळचे मावळे, रामोशी, कातकरी, कोळी, भंडारी अशा जाती-जमातींना गुप्त संघटनेत सामील करून घेतले. दऱ्याखोऱ्यातले किल्लेदार, जहागीरदार यांना एकत्र केले. मावळातले अनेक कायस्थ प्रभूही या संघटनेत आले. या संघटनेचा सूत्रधार म्हणून सीताराम या आपल्या मुलाला रंगोबांनी पाठवले.

जेव्हा युरोपमध्ये इंग्लंड व रशिया यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा, उठावाची हीच वेळ आहे असा गुप्त निरोप रंगोबांनी नानासाहेब पेशव्यांना पाठवला. त्यांचा संदेश येताच दोन पुतण्यांसमवेत पाचशे लोकांची टोळी ब्रम्हावर्तास पाठवली. वामनराव व यशवंतराव या त्यांच्या पुतण्यांनी या लढ्यात भाग घेतला. त्या लढाईत इंग्रजांची सरशी झाली. इंग्रजांनी सर्व जखमी सैनिकांची मुंडकी छाटून एका बाजुला ढीग करायला सुरूवात केली. दोघेही भाऊ घायाळ होऊन रणांगणात पडले होते. वामनरावाने फरफटत जाऊन भावाचा शोध घेतला आणि प्रेतांच्या धडांच्या ढिगामध्ये डोके लपवून दोन दिवस काढले. ते मध्यरात्री प्रवास करत लपून-छपून गोसाव्याच्या वेषात महाराष्ट्रात पोचले.

रंगो बापूजींचा एक जवळचा सहकारी कृष्णाजी शिंदकर ह्याने फितुरी केली. रंगो बापूजींना त्याने लबाडीने इंग्रजांच्या ताब्यात दिले. फिरंग्यांनी पकडल्यावर ते शिंदकराला त्वेषाने म्हणाले, “बुवा शिंदकरा, मी तर मरणालाच मिठी मारून हा उद्योग केला पण तू आज महाराष्ट्राचाच गळा कापला तू जातीच्या नावाला काळीमा फासलास !’ तुरूंगात असताना रंगोबांनी उत्कृष्ट इंग्रजीत चतुर संभाषण करून फिरंगी पहारेकऱ्यांना भुलवले आणि पोबारा केला. पुन्हा ते कधीही इंग्रजांना सापडले नाहीत.

इंग्रजांनी त्यांच्या राहत्या घरावर खरोखर गाढवाचे नांगर फिरवले. रंगो बापूजींचा मुलगा कोल्हापूर संस्थानच्या हद्दीत पकडला गेला. त्याची जुजबी चौकशी करून त्याच्या काही नातेवाईकांसह त्याला साताऱ्यातील गेंड्याच्या माळावर 8 सप्टेंबर 1857 या दिवशी फाशी देण्यात आले. रंगो बापूजी समजून, इंग्रजांनी डझनभर लोकांना फाशी दिली. त्यांचे पुतणे जंगलात वनवास भोगत होते. आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेताना त्यांचे पुतणे म्हणाले, ‘रंगोबाकाका देशोधडीला लागला आणि सीतारामसारखा मर्द फासावर चढला. देशाचे होत असलेले लग्न मोडले तिथे आमचे कशाला? पारतंत्र्यात वंशवृद्धी करण्यापेक्षा निर्वंश झाला तरी चालेल!’ अशा थोर देशभक्त घराण्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. रंगो बापूजींची बायको आणि सून शेवटपर्यंत सौभाग्यचिन्हे धारण करून करारीपणे रहात होत्या. शेतकऱ्यांच्या वस्तीत राहून त्यांनी मुलांचे प्राण इंग्रजांपासून वाचवले. त्यांची सून जानकी म्हणे, ‘आमचे पुरुष काय बिछान्यात मेले की दरोडा घालून मेले? आम्हाला वैधव्य आलेले नाही.’

ठाण्याला खारकरवाडीत विठ्ठल प्रभाकर विठ्ठल गुप्ते यांच्याकडे मुंजीचा समारंभ चालू असताना एक तुळतुळीत मुंडन केलेले गृहस्थ 1861 मध्ये आले. सर्वांनी त्यांचे प्रेमाने स्वागत करून जेवायला बसवले. तितक्यात इंग्रजी शिपाई आणि ठाण्याच्या पोलिसांनी घराला वेढा घातला. रंगो बापूजी तेथे आल्याची पक्की खबर कोणा फितुराने पोचवली होती. इतक्यात एक विकेशा विधवा, तांबडे अलवण नेसून डोक्यावर पदर ओढून भरभर बाहेर पडली वर फणकाऱ्याने फिरंग्यांच्या आंगावर ओरडली, ‘मेल्यांनो दूर व्हा! दूर व्हा! शिवाल मला!’ तिचा करारी बाणा पाहून सगळे शिपाई मागे सरकले आणि तिला वाट मोकळी मिळाली. फिरंग्यांच्या हातावर तूरी देऊन देशभक्त रंगो बापूजी गुप्ते भूमिगत झाले. अक्षरशः गुप्त झाले. जीवाचे रान करूनही इंग्रजांना रंगो बापूजी गुप्त्यांचे नखही दिसले नाही. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाण्यातल्या जांभळीनाका चौकाला रंगो बापूजी गुप्ते यांचे नाव देण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा या गावात ‘बैरागी बाबा’ या नावाने राहणाऱ्या रंगो बापूजी गुप्ते यांचे 1885 मध्ये निधन झाले. तिथे त्यांची समाधी आहे. साताऱ्यातही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारकस्तंभ उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्यप्रेमी मराठी जनतेच्या मनातही त्यांचे स्थान अढळ आहे.

– नयना वैद्य 9870429246 salil-vaidya@hotmail.com

About Post Author

7 COMMENTS

  1. रंगो बापूजी गुप्ते यांच्याविषयी थोडी माहिती होती. पण तुमच्या लेखामुळे त्यांच्या अतुलनीय कामगिरी बाबत बरीच विस्तृत माहिती मिळाली. यांचे कार्य हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याशी मिळते जुळते आहे. एवढे पराकोटीचे देशप्रेम व स्वामीनिष्ठा क्वचितच पाहायला मिळते. लेखाबद्दल धन्यवाद.

  2. काव्यप्रेमी नयनांचा रंगोबापूजींवरचा ओजस्वी भाषेतली लेख वाचुन खुप नवीन माहिती मीळाली 🌹

  3. रंगो बापूजी गुप्तेंवरील लेख आवडला. केवढा मोठा कर्तृत्ववान माणूस! आपल्या लेखामुळे रंगोजींचं कार्य माझ्यासारख्याला समजून आलं. धन्यवाद!

  4. रंगो बापूजी हा लेख उत्तम आहे.
    त्यांच्या बद्दल फार कमी माहिती समाजात आहे.
    त्यांचे जीवन कार्य अनेक जनांपर्यंत पोहचले पाहिजे.
    संध्या जोशी.
    मुंबई

  5. फारच सुंदर लेख…
    कंपनी सरकार किंवा इंग्रजांची जुलमी राजवटी विरोधात शौर्याने, आपल्या कर्तबगारीने, आपल्या चातुर्याने लढा देऊन आणि सर्वस्वाचा त्याग करून देशासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली, अशा रंगो बापूजी गुप्ते या विद्वान योद्धाचं कार्य खरच खूप महान आहे, हे या लेखामुळे कळले…
    त्यासाठी लेखिकेचे मनापासून आभार…
    अशा कर्तबगार शूरवीरांच्या इतिहासाचा लोप झाला असून इंग्रज सरकार पुढे दहा- दहा वेळा दयेच्या भिकेसाठी लोळण घेणाऱ्या स्वयंघोषित वीरांसाठी लोकं अभिमानाने आपला उर बडवून घेत आहेत. दुर्दैव आहे देशाचं, दुसरे याला काय म्हणणार…
    रंगो बापुजींचं महान कार्य पाहता, प्रास्ताविकात नमूद केल्याप्रमाणे काही नावांपुढे विशेषणे लावायची आवश्यकता नसते याचे खरोखर प्रत्यंतर येते….

  6. अतिशय सुंदर, उर्जादायक लेख… रंगो बापूजी ह्यांची साद्यंत माहिती सांगणारा प्रेरणादायक लेख लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐

  7. शाहू महाराजांचे वकील म्हणून इंग्लंडला गेले होते एवढीच माहिती होती. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील भूमिकेची माहिती नव्हती. या माहितीकरिता धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here