मधुमालतीचे दिवस (Madhumalati Days)

1
342

‘मधुमालती’ हे काव्य चतुर्भुजदास या कवीचे, अवधी भाषेत लिहिलेले मध्ययुगातले काव्य. कलेतिहासाच्या अभ्यासक डॉ. मंजिरी ठाकूर यांच्या हाती या काव्याचे हस्तलिखित लागले ज्यात दोनशेहून अधिक राजस्थानी शैलीतील लघुचित्रे होती. या काव्याचा आणि चित्रांचा अभ्यास करताना एकातून एक उलगडत जाणाऱ्या कथा, उपकथा, जोडकथांचे एक मनोहर जोडकाम असणाऱ्या खास भारतीय कथनशैलीपर्यंत आणि त्यायोगे पंचतंत्रापर्यंत त्या येऊन पोचल्या.   

‘मधुमालती’ या काव्याविषयी, भारतीय कथनशैलीविषयी आणि पंचतंत्राच्या जगद्व्यापी प्रवासाविषयी आजच्या लेखात खास शैलीत लिहित आहेत डॉ. मंजिरी ठाकूर.

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मधुमालतीचे दिवस…

मला पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली तो दिवस खास होता. फेलोशिप मिळाली होतीच त्यात खास म्हणजे फेलोशिपच्या अभ्यासाचा विषय होता. ‘मधुमालती’ या काव्यावर आधारित, अठराव्या शतकातील थोडी थोडकी नव्हे चक्क दोनशेपेक्षा जास्त मिनिएचर्स, कोटा शैलीतील. खूप काही लिहिण्यासारखे आहे. नेमकी सुरुवात कशी करावी… तर ‘मधुमालती’ हे काव्य चतुर्भुजदास या कवीचे, अवधी भाषेत लिहिलेले आणि त्याही पूर्वी मंझन कवीचे. पण मूळात या दोन काव्यांत खूप फरक आहे. चतुर्भुजदासाचे काव्य हे काहीसे ‘मालती माधव’ या काव्याशी मिळते जुळते आहे असे डॉ. कुमारस्वामी यांचे मत तर मंझन या पंधराव्या शतकातील सुफी कवीचे काव्य पर्शियन कथेसारखे आहे.

माझ्या नजरेत कोटा शैलीतील रंगांचे काव्य भरत होते. पण गोष्टही छान होती. राजाची लाडकी राजकन्या मालती आणि एका मंत्र्याचा मुलगा मधू. मग खानदान वगैरे. यात खरी गंमत येते ती म्हणजे एकमेकांना समजताना आणि समजावताना दोघेही नायक आणि नायिका अनेक कथांचा आधार घेतात. त्या कथांमधील व्यक्तिरेखा, म्हणजे पशू-पक्षी सुद्धा पुढच्या कथांचा आधार घेतात. एक गुंफण तयार होत जाते. गोष्टी अशा, की कल्पना आणि वास्तव गुंफत पुढे सरकत जातात. मजा येते आणि गोष्टींची नशाही येते. अगदी रामायणापासून बाणाच्या ‘कादंबरी’तही  मोहक पण बुचकळ्यात पाडणारी गुंफण आहे.

आता हा चतुर्भुजदास मधू-मालतीच्या शृंगाराला ‘प्रदुमनकी लीला’ म्हणतो! संपूर्ण काव्यात अनेक कथा येत जात असताना त्यांचे संदर्भ महत्त्वाचे होते. अगदी जातक कथा, पंचतंत्र वगैरे मधून गोष्टी सहज उचलून अलगद ठेवल्या होत्या. पण खरी कमाल होती ती चित्रकारांची. अकबराच्या राजवटीत राजस्थानात मिनिएचरचे (लघुचित्र) अनेक ‘कारखाने’ उभे राहिले होते. त्या चित्रकारांनी काही चित्रांचे स्टेन्सिल्सही बनवले होते. अतिशय सफाईने चित्रे काढून, रंगवून, घोटून तयार होत. त्यात मला अभ्यासाला दिलेले manuscript हे रंगांची उधळण करणाऱ्या कोटा शैलीतील होते. हिरवी झाडे, गुलाबी डोंगर, केशरी आकाश आणि कोटातील प्रसिद्ध वाघ यासोबत अनेकविध वस्त्र आणि आभूषणे, राजवाडे आणि घरे, अगदी देव देवता आणि त्यांची वाहने या सगळ्यांची रेलचेल अभ्यासताना मजा आली.

हे काव्य अनेक चित्र शैलींमध्ये चितारले गेले आहे. काही विदेशी म्युझियम्समध्ये फोलियोज आहेत पण सलग इतकी चित्रे असल्याचे दिसले नाही. मी RORI, म्हणजे राजस्थान ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये जाऊन माहिती गोळा केली. त्यांनी प्रकाशित केलेले ‘मधुमालती’ हे पुस्तक घेतले. त्यात या काव्याच्या अठरा आवृत्तींचे संकलन आहे. पण दोनशे चित्रे एका शैलीत दिसत नाही. मात्र एक लक्षात आले की हे काव्य खूप लोकप्रिय असणार, नाहीतर त्याच्या इतक्या आवृत्त्या कशा निघतील?

एका इंटरेस्टिंग टप्प्यावर डॉ गौरी माहुलीकर यांनी या काव्यातील दोहे आणि चौपाई यांचे काम सुरु केले. त्यांचे भाषेचे विश्लेषण खूप काही शिकवून गेले. आम्ही त्यात तासनतास बुडून गेलो. हे प्रकाशित व्हायचे आहे त्यामुळे आता खूप फोटो शेअर करू शकणार नाही. पण जेथून चतुर्भुजदासाने काव्य लिहायला सुरुवात केली तेथून एक उचलते… गणपती आणि सरस्वती यांना नमन करून चतुर्भुजदास सुरु करतो….’मधुमालती’!

मधुमालती शोधायची होती, ती सुद्धा चतुर्भुजदास नावाच्या कवीची. मग म्हटले आधी पाया शोधू. डॉ. आनंद कुमारस्वामी यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘मधुमालती’ हे भवभूतीच्या ‘मालती माधव’सारखे आहे. मंझनची म्हणजेच मीर सय्यद मंझन शत्तरी राजगिरी याची ‘मधुमालती’ वेगळी आहे. ही कथा मनोहर आणि मधुमालती यांची आहे आणि याचा काळ इसवी सन 1545 आहे. प्रेम, त्याग, त्यागातून प्रेम आणि प्रेमासाठी त्याग अशी गुंतागुंत आहे या कथेत. शिवाय यात त्यांची मित्रमंडळीही आहेत. ते त्यांना मदत करत असतात असे उल्लेख चतुर्भुजदास करतात.

मला अभ्यासाला दिलेली मधुमालती इतकी अप्रतिम चित्रे होती… आता चित्रे समजताना काव्यही समजू लागले होते. चतुर्भुजदासाचा सापडला त्याच्याच शब्दात. अगदी सुरूवातीला …

काम पबंध पकास फुनि, मधुमालती विलास। प्रदुमन की लीला इह, कहत चत्रभुजदास।।

मग त्याचा कालखंड पण शोधता आला. कुंभनदास नावाच्या ‘अष्टछाप’ कवीचा हा मुलगा. जन्म साधारण 1557 चा. भाषेवरील प्रभुत्वामुळे वडिलांचा लाडका. वयाच्या दहाव्या वर्षी कुंभनदासने मुलाला दीक्षा दिली आणि पुष्टी परिवारात सामील करून घेतले. त्याच्या प्रतिभेला चार चाँद लागले. 

आता अष्टछाप म्हणजे काय तर, वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना ‘अष्टछाप कवी’ म्हटले जाते. त्यांपैकी पहिले चार वल्लभाचार्यांचे आणि शेवटचे चार विठ्ठलनाथांचे शिष्य होते. विठ्ठलनाथ हे वल्लभाचार्यांचे पुत्र व उत्तराधिकारी. विठ्ठलनाथांनी अनेक शिष्यांतून या आठांची निवड करून त्यांना अनुग्रहपूर्वक ‘अष्टछाप’ असे सन्मानाने संबोधिले. साधारणतः त्यांचा 1500 ते 1586 हा काव्यरचनाकाल मानला जातो. सर्वच कवी थोर भक्त व संगीतकार होते. सूरदास व नंददास हे तर प्रख्यात भक्तकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचे संगीत ऐकण्यासाठी तानसेन, अकबर वगैरे मंडळी येत असे सांगतात. आपल्या सरस व संगीतपूर्ण पदरचनेच्या आधारे या पुष्टीमार्गी कवींनी कृष्णभक्तीचा प्रवाह जनताभिमुख केला.

तर चतुर्भुजदासाविषयी सांगत होते, त्याचा लिखित संभार बराच होता आणि गंमत म्हणजे मधुमालतीच अनेक रूपात (versions) त्याने लिहिली, जसे की मधुमालती कथा, मधुमालती वार्ता, मधुमालती विलास, मधुमालती सार, मधुमालती रस विलास, रस मालती मनोहर, काम विलास, काम विलास कथा, काम प्रभुत्व प्रकाश, काम प्राबंध प्रकाश, प्रदुमन की लीला इत्यादी. वाचक  विचारात पडले असतील, एकच कथा ती सुद्धा प्रेमकथा, इतक्या प्रमाणात… खरं तर ही एक प्रेमकथा आहे. कथानकाची गुंफण बरीच गुंतागुंतीची असली तरी मूळ गाभा प्रेमकथेचाच. पण कथेविषयी नंतर बोलू….

मधुमालतीचा अभ्यास करताना, खरे म्हणजे मधुमालती जगताना बऱ्याच ‘गोष्टी’ लक्षात येऊ लागल्या. मूळ नायक आणि नायिका यांना समांतर जोड देणाऱ्या अनेक उपकथा, जोड कथा दिसू लागल्या. उपदेश, प्रतारणा असे सगळे प्रकार त्यात आले होते. आधी लिहिल्याप्रमाणे ही पद्धत जुनी आणि रुढावलेली!

मधुमालतीत आलेल्या काही गोष्टी अगदी जवळच्या होत्या, खूप ओळखीच्या वाटल्या. कावळा आणि घुबड, व्यापारी त्याचा मुलगा आणि साप, सापाची अंडी वाचवणारा गरुड़, हरणाच्या प्रेमात पडणारी वाघीण, पत्नीशी प्रतारणा करणारा पती, नायकाच्या मदतीला आलेली टोळधाड, दासीच्या मदतीने प्रियकराला भेटणारी राजकन्या अशा अनेक कथा आल्या. अजून बऱ्याच उपकथा होत्या. सगळ्या अगदी जवळच्या वाटणाऱ्या. थोड्याफार फरकाने चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या. त्याला जोड द्यायला उपकथासुद्धा फारच इंटरेस्टिंग होत्या. खरे तर त्या उपकथा म्हणून आल्या नव्हत्या, पण त्यांचा उल्लेख महत्त्वाचा होता. त्यात शिवाद्वारे काम-दहन होते, मालतीची कृष्णाकडे याचना होती. राम, लक्ष्मण, हनुमान होते. सरस्वती वरदान होते.

थोडक्यात सगळे देव देवता होते आणि त्यांची चित्रे विलक्षण देखणी. Attributes एकदम perfect ! कमळ, शंख, मोरपीस, तसेच नंदी, हंस, वाघ इत्यादी. चित्रकाराची अत्युत्तम रेखाटनाची अविरत साधना. मी जरा खोलात शिरायचे ठरवले. याचे कारण होते त्या कथांवर आधारित असलेली आकर्षक चित्रे. एखाद्या दीर्घ कथेवर सलग काढलेली चित्रे मनात बरेच प्रश्न साठवून गेली. मी माझ्या पीएचडीच्या गाईड आणि जातक कथांवर लेखन केलेल्या डॉ. मीना तालिम यांच्याशी खूप गप्पा मारल्या. त्यांनी सांची, अमरावती, अजंठा या कथा-चित्र शैलीवर बरेच काही सांगितले. कथेवरुन चित्र काढणे, चित्रांमधून कथा ओळखणे, केवळ अफलातून! चित्र-शिल्प या माध्यमानी अनेक कथांना दृश्य रूप देण्यात भारतीय कलाकारांनी रोवलेली मेढ कितीतरी टप्प्यात अभ्यासली जाऊ शकते. 

दोन महत्त्वाच्या गोष्टी, ज्या माझ्या अभ्यासाचा भाग होत्या, एक म्हणजे अनेक कथांची विलक्षण गुंफण, बेमालुम सरमिसळ आणि त्यावर आधारित चित्र मालिका. चतुर्भुजदासची ‘मधुमालती’ जातक कथापर्यंत जाऊन पोचली आणि वाटेत मिळाले अजून काही! गोष्टी… गोष्टीत गोष्टी, पक्षी, प्राणी, निसर्ग. कोठून आणि कसे काय? कधी सुरुवात झाली? शोध घेत गेले विष्णुशर्मा पर्यंत.

विष्णुशर्मा म्हणजे ज्यांनी पंचतंत्र लिहिले असे म्हटले जाते. विष्णुशर्माचा काळ साधारण इसवी सनाच्या पूर्वीचा मानला जातो. ठोसपणे त्याचा काळ आणि जन्म ठिकाण नोंदलेले नाही. लहानपणापासून जे मनाला खरे वाटत आले ते अतिशय लोभस “पंचतंत्र”, या विष्णुशर्माने लिहिले आहे असा उल्लेख आहे. कितीतरी गोष्टी ! प्राणी, पक्षी, जंगल सगळं सगळं आपल्याच अवती भवती असल्यासारखे खरे वाटत रहायचे. 

जगभरात अगदी प्राचीन असलेल्या ‘ओरल ट्रॅडीशन’चा उत्कृष्ट नमुना. अगदी ग्रीसमधल्या क्रीटपासून मध्य आशिया आणि चीनपर्यंत पसरलेले हे गोष्टींचे महाजंजाळ आजच्या नेटकऱ्यांना लाजवेल असे होते. आपल्याकडे नशिबाने उशीरा का होईना बराचसा खजिना एकत्रित केला गेला होता. जातक कथा आणि पंचतंत्र यातील बोलणारे प्राणी, पक्षी आणि त्यांनी दिलेला उपदेश हे सर्वाना आकर्षित करत असे. तर असे विष्णुशर्माचे पंचतंत्र आणि त्याची अद्भुत सफर… सगळ्या जगाची. 

पंचतंत्रचा अनेक भाषांतराचा, सफरींचा इतिहास आणि वर्तमान अचंबीत करणारा आहे. मूळचे संस्कृत पंचतंत्र, बोरझूया या पर्शियन राज वैद्याने (physician) इसवी सनाच्या सहाव्या शतकात हिंदुस्थानातून पर्शियात नेले. तत्कालीन राजा खुसरो अनुशिर्वान याला या कथांच्या प्रेमात पडायला वेळ लागला नसणार. नाहीतर  त्याने याचे भाषांतर Pahlavi म्हणजेच पुरातन पर्शियन भाषेत व्हावे असा आग्रह धरला नसता. राजाज्ञा झाल्यावर बोरझूयाने भाषांतर केले ‘कारीराक उद दामानाक’ या नावाने (इसवी सन 570). दुर्दैवाने आज मात्र मूळ प्रत उपलब्ध नाही. पण इथे सुरवात झाली हे मात्र खरे. इराक मधील मोसुल येथे याचे सीरियन भाषेत भाषांतर झाले आणि बायझंटाइन साम्राज्यात त्याची लोकप्रियता पसरत गेली. साधारण सातव्या आठव्या शतकात एबनं अल मुखाफा या अरेबिक स्कॉलरने बोरझूयाच्या पर्शियन ट्रांसस्क्रिप्टचे अरेबिकमध्ये भाषांतर केले ‘कालिया वा दिमना’ मग काय…

संपूर्ण मध्य आशिया या काळात अनेक स्थित्यंतरांतून जात होता. बायझंटाइन, रोमन, पर्शिअन अशी अनेक साम्राज्ये होऊन गेली होती. अरबी अंमल वाढत होता. भाषा पसरत होती आणि ‘कालिया वा दिमना’सुद्धा. जवळ जवळ प्रत्येक इस्लामिक राज्यकर्त्यांनी त्यांच्या दरबारात ‘कालिया वा दिमना’चे illustrated folios करवून घेतले. गोष्टीना हात, पाय, कान, डोळे सगळे काही फुटत गेले.

सयेमोंन सेथ या कॉन्स्टॅन्टिनोपल येथील ग्रीक फिजिशियनने इसवी सन 1080 मध्ये ग्रीक भाषेत ‘Stephanites kai Ichnilates’ या नावाने भाषांतर केले. कॉन्स्टॅन्टिनोपलमधून परत प्रवास सुरु झाला तो स्लाव्हिक देशातून उदाहरणार्थ बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, रोमेनिया आणि युक्रेन या देशांत. यातील सर्वात जुने ट्रान्सक्रिप्ट युक्रेनमध्ये आहे. अशारितीने पंचतंत्र  हिंदू, इस्लामिक, इस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकप्रिय लोककथा बनून ज्यू लोककथांमध्येही सामील झाले आणि हिब्रू भाषेत आणि पुढे लॅटिन मध्ये भाषांतर झाले.  

साधारण पंधराव्या सोळाव्या शतकापर्यंत युरोपभर सर्व भाषेत पोचलेले पहायला मिळते. सर थॉमस नॉर्थ यांनी 1570 मध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर केले, ‘The Moral Philosophy of Doni.’ दोनी या इटालियन भाषांतरकाराच्या नावाचा त्यात उल्लेख केला गेला. ‘Fables of La Fontaine’ मध्ये विद्यापती या भारतीय लेखकाचाही उल्लेख येतो, मात्र युरोपियन भाषांमध्ये भाषांतर होताना विद्यापतीचे बीडपाई किंवा Piplay झाले आणि ‘Fables of Bidpai’ असे संकलन केले गेलेले दिसते. 

बीडपाईच्या कथा जर्मन भाषेत छापील स्वरूपात 1483 मध्ये आल्या. बायबलनंतर छापले गेलेले हे पहिले पुस्तक. आज जगात पंचतंत्राचे पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये, दोनशेपेक्षा जास्त व्हर्जन्स आहेत. इथोपिया ते रशिया, मोरोको ते लाओस… प्रत्येक देशात ते त्यांच्या त्यांच्या संस्कृतीप्रमाणे चितारले गेले आहे. 

कधीकधी मनात विचार येतो, कोण हा विष्णुशर्मा.. कसे काय लिहिले असेल हे त्याने.. त्याने लिहिले की फक्त रचले.. मग पुढे कोणी कोणी त्यात भर घातली. त्या वेळेला त्याला पुढच्या काळात त्याच्या कथेच्या जगद्व्यापी प्रवासाची कल्पनाही आली नसेल. एक भारतीय पुस्तक जे नीतीकथांचे पुस्तक म्हणून जग व्यापून उरले आहे.

– डॉ. मंजिरी ठाकूर 9820436045 rtmanjiri@gmail.com

वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना ‘अष्टछाप कवी’ म्हटले जाते. त्यांची नावे : कुंभनदास, सूरदास, परमानंददास, कृष्णदास, नंददास, चतुर्भुजदास, गोविंदस्वामी व छीतस्वामी असून त्यांपैकी पहिले चार वल्लभाचार्यांचे आणि शेवटचे चार विठ्ठलनाथांचे शिष्य होत. विठ्ठलनाथ हे वल्लभाचार्यांचे पुत्र व उत्तराधिकारी. विठ्ठलनाथांनी अनेक शिष्यांतून या आठांची निवड करून त्यांना अनुग्रहपूर्वक ‘अष्टछाप’ असे सन्मानाने संबोधले. सर्वसाधारणतः हे आठही शिष्य परस्परांचे समकालीन होत. साधारणतः 1500 ते 1586 हा त्यांचा काव्यरचनाकाल मानला जातो. पुष्टिमार्गात त्यांना ‘अष्टसखा’ असेही म्हटले जाते. वल्लभाचार्यांनी गोवर्धन पर्वतावर उभारलेल्या श्रीनाथ (श्रीकृष्ण) या आराध्य दैवताच्या मंदिरात भजन-कीर्तन-काव्यादिद्वारे त्यांची उपासना हे कवी करत. या कवींत ब्राह्मणांपासून शूद्रादी जातींचे कवी होते. सर्वच कवी थोर भक्त व संगीतकार होते. सूरदास व नंददास हे तर प्रख्यात भक्तकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचे संगीत ऐकण्यासाठी तानसेन, अकबर वगैरे मंडळी येत असे सांगतात. परमानंददासाची कविता परमानंद सागरमध्ये संग्रहीत असून ती वात्सल्यरसाने परिपूर्ण आहे. कुंभनदासाची कविता श्रीनाथाच्या अष्टाप्रहर चालणाऱ्या उपासनेबाबत आहे. कृष्णदास, गोविंदस्वामी इत्यादींची पदरचनाही उपलब्ध आहे. नंददासाचा अपवाद सोडल्यास या सर्वच कवींनी त्यांच्या काव्यात सिद्धांतविवेचन न करता भक्तीकडे अधिक लक्ष दिले आहे. नंददासाची रचना मात्र सिद्धांतविवेचनात्मक आहे. दास्य, वात्सल्य, सख्य आणि माधुर्य ह्या चार संबंधांनी या कवींनी ईश्वरविषयक भावना व भक्ती त्यांच्या काव्यात व्यक्त केली आहे. आपल्या सरस व संगीतपूर्ण पदरचनेच्या आधारे या पुष्टीमार्गी कवींनी कृष्णभक्तीचा प्रवाह जनताभिमुख केला.

संदर्भ : 1. गुप्त, दीनदयालू, अष्टछाप और वल्लभ संप्रदाय, अलाहाबाद, 1937. 2.वर्मा, धीरेंद्र, अष्टछाप,अलाहाबाद, 1938.
लेखक: चंद्रकांत बांदिवडेकर

About Post Author

Previous articleअग्रोली गाव आणि बेलापूर (Agroli Village and Belapur, Navi Mumbai)
Next articleकलगी तुरा (Kalagi Tura)
डॉ. मंजिरी ठाकूर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम ए आणि पी एचडी केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि कान्हेरी येथील लेण्यांमधील शिल्पकला हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांना ऑक्सफर्ड सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज, ऑक्सफर्ड, युकेची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप तसेच हेरास इन्टिट्यूटची सर दोराब टाटा फेलोशिप मिळाली आहे. त्यांनी महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या टुरिझम डिपार्टमेंटसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या डेप्युटी क्युरेटर होत्या. त्यांनी कलेतिहासाशी संबंधित विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांचे शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्या जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कलेतिहासाच्या संलग्न प्रध्यापक म्हणून कर्यरत आहेत.

1 COMMENT

  1. फार अभ्यासपूर्ण, वेगळ्याच क्षेत्रातील विषयावरचा माहितीपूर्ण लेख.. स्वत: निरक्षर असला तरी पुस्तकात चित्रे घालायची कल्पना सम्राट अकबराची आणि तेव्हापासून त्याने ती पद्धत सुरू केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here