अग्रोली गाव आणि बेलापूर (Agroli Village and Belapur, Navi Mumbai)

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या  एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे.

यातल्या आग्रोली आणि बेलापूर या वैशिष्ट्यपूर्ण गावांविषयी लिहित आहेत शुभांगी पाटील-गुरव. हा फार दूरच्या काळातला इतिहास आणि भूगोल नाही. त्यांची स्मृती जागृत ठेवावी हे या लेखाचे प्रयोजन.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

आग्रोली गाव आणि बेलापूर

आग्रोली हे स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचवीसेक घरांच्या लोकवस्तीचे गाव. या गावाच्या नावावरूनच हे आगरी समाजाचे गाव असल्याचे स्पष्ट होते. आज या गावात सुमारे पाचशे घरे असून यात सिडको, कोकण भवन, पोलिस आयुक्तालय, फौजदारी न्यायालय, कपास भवन, रिझव्‍‌र्ह बँक, कोकण रेल्वे, पालिकेचे जुने मुख्यालय, बेलापूर रेल्वे स्थानक या सर्व वास्तू आग्रोली गावातील ग्रामस्थांच्या जमिनीवर उभ्या आहेत. त्यामुळे आग्रोली गाव तसे या परिसराचे वतनदार म्हणावे लागेल. पूर्व बाजूस आर्टिस्ट व्हिलेजपर्यंत घनदाट जंगल, पश्चिम बाजूस पारसिक डोंगराची रांग, दक्षिण बाजूस बेलापूरची विस्तीर्ण अशी खाडी आणि उत्तर बाजूस बेलापूर खिंड अशी भौगोलिक रचना असलेले हे आग्रोली गाव एकेकाळी निसर्गरम्य ठिकाण मानले जात होते.

गावातील एक सूज्ञ, सुशिक्षित आणि संस्कारी कॉम्रेड, भाऊ सखाराम पाटील यांच्या पुढाकाराने त्रेसष्ट वर्षांपूर्वी गणेशोत्सव काळात आग्रोली गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अस्तित्वात आली आणि ती आजतागायत कोणत्याही वादविवादाविना सुरू आहे. नवी मुंबईतील इतर सर्व गावांमध्ये अनेक सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना, शहरीकरण होण्यापूर्वी केवळ ग्रामस्थांचा अनाठायी होणारा खर्च वाचावा म्हणून सुरू करण्यात आलेली ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा नवीन पिढीने कायम ठेवली आहे हे या गावाचे वैशिष्ट्य आहे.

आग्रोली गावातील प्राचीन शिवमंदिराचा महिमा हा स्थानिक लोकांनाच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीलाही माहीत होता. या अमृतेश्वर शिवमंदिराची नवी मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून लिखित स्वरूपात नोंद आहे. सर हेन्री बर्टल एडवर्ड फ्रेरे यांनी मुंबईच्या गव्हर्नरपदाचा (1862 ते1867) कार्यभार स्वीकारल्यानंतर सन 1864 मध्ये येथील पुरातन श्रध्दास्थानांना भेटी देऊन त्याची माहिती करून घेतली होती. आग्रोली येथील अमृतेश्वर शिवमंदिराची प्राचीनता लक्षात घेऊन कंपनी सरकारने या मंदिराची देखभाल, जतन व संवर्धनाचा निर्णय घेतला आणि वर्षभरातच या मंदिरासाठी सनद जाहीर केली. ही सनद उपलब्ध आहे, पण ती जीर्ण झाली असल्याने यातील काही भाग वाचता येत नाही. अमृतेश्वर शिवमंदिराची पूजाअर्चा, सांजवात व देखभाल यासाठीची ही सनद 11 एप्रिल 1864 रोजी प्रदान करण्यात आलेली आहे. गावातील महादेवाचे मंदिर हे पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. तसेच कधी काळी पांडव या महादेवाच्या दर्शनासाठी आले असल्याची आख्यायिका सांगून त्यांच्या पाऊलखुणांचे ठसे पारसिक टेकडीवर दाखवले जात असत. मात्र ते त्या ठिकाणी बांधकाम झाल्यामुळे नाहीसे झाले आहेत. पूर्वी हे महादेवाचे मंदिर शेतात भिंती व छताविना होते. गावातील शिवभक्त गजानन पाटील यांनी स्वखर्चाने 1990- 91 साली मंदिराची उभारणी केली. त्यानंतर मंदिरात भंडारा 1991 पासून आयोजित केला जातो. या ठिकाणी एका कोळी बांधवाने 1984 साली पूजा आयोजित केली होती, त्यावेळी अचानक एक नाग शिवलिंगाभोवती वेढा घालून बसला. ग्रामस्थांनी त्या नागाला दूध अर्पण केले, त्यानंतर काही वेळातच तो नाग शिवलिंगापासून जवळच असणाऱ्या शेताच्या बांधावर जाऊन राहिल्याची हकीकत ग्रामस्थांकडून सांगितली जाते. अमृतेश्वर मंदिराप्रमाणे इथले संकटमोचन हनुमान मंदिरदेखील पुरातन आहे. हे मंदिर वाशीच्या अर्बन हट या ठिकाणी आहे. मंदिराची देखभाल, सांजवात हशा बामा पाटील हे गृहस्थ करायचे. मिनी मंत्रालय म्हणजेच ‘कोकण भवन’चे काम सुरू झाले आणि  त्यानंतर या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली. हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो.

बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चेरे देवाची आख्यायिका ऐकण्यासारखी आहे. या गावात किंवा बाजूच्या दिवाळे गावातील ग्रामस्थांनी शेतातील धान्य, भाजी किंवा शेतीची अवजारे चोरून नेली, तर ती काही तासांत पुन्हा चोरलेल्या ठिकाणी परत ठेवली जात असत, कारण ग्रामस्थ चेरे देवाला कौल लावत असत. त्या देवाच्या भीतीने ही अवजारे किंवा धान्य परत जागेवर येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. चेरे देव म्हणजे नेमका कोणता देव हे स्थानिकांना विचारले, पण त्याविषयी माहिती मिळू शकली नाही. हे ग्रामदैवत असावे असे मानायला हरकत नाही. चेरे देवाचे हे मंदिर बेलापूर रेल्वे स्थानकाच्या उभारणीत नेस्तनाबूत झाले.

बेलापूर रेल्वे स्थानक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक सुंदर तलाव होता. आग्रोलीतील महिला सकाळ-संध्याकाळ तेथे पाणी भरायला जात होत्या. मात्र आज हा तलावही नाही. असाच एक तलाव पोलिस आयुक्तालयाला खेटून आहे.

ठाणे-बेलापूर पट्टी असे नाव असलेला हा 1970 पर्यंत ठाणे खाडीपलीकडील भूभाग एका दिवसात शासनाने ‘नवी मुंबई’ केला. मुंबईला पर्याय ठरणारे शहर वसवण्याचा निर्णय झाला. त्या ठाणे जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले बेलापूर गाव. त्यामुळेच या भागाला ठाणे-बेलापूर पट्टी असे म्हटले जात होते. पुणे-गोव्याकडून आल्यानंतर मुंबईच्या वेशीवर लागणारे बेलापूर हे नवी मुंबईतील पहिले गाव. गावांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारे त्या वेळचे हे गाव. त्यावेळी उत्तर बाजूस, गावाच्या वेशीवरील दोन हजार एकर परिसरात दाट वन आणि तीनशे पन्नास एकर गुरचरण (शासकीय) होते. त्यावेळी बरीच निर्सगसंपदा होती. याच जंगलात त्यावेळी बेलाची झाडे आढळून येत होती. त्यावरून या गावाला बेलापूर असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. गावाच्या पूर्व बाजूस सात एकरावरचा तलाव ही गावाची शान आहे. शहरीकरणात त्याचा आकार कमी करण्यात आला आहे. या तलावात जत्रेच्या काळात पोहण्याच्या स्पर्धा होत. तलावाजवळ श्रीशंकराचे जागृतेश्वर मंदिर आहे. मंदिराचा गाभारा, तलावाच्या पाणीपातळीपेक्षा खाली आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या या शिवकालीन शिवमंदिरात बाजूच्या तलावाचा एक थेंब पाणी कधी शिरल्याचे ऐकिवात नाही. जागृतेश्वराला वाहण्यात येणारी बेलाची पाने मुबलक प्रमाणात या ठिकाणी मिळत होती. बेलापूर गाव शिल्लक आहे, पण बेलाची झाडे शहरीकरणाच्या धबडग्यात नामशेष झाली आहेत.

तीन शतकांपूर्वी बेलापूर किल्ला गावठाणमध्ये पोर्तुगीजांचे राज्य होते. या ठिकाणी दोन मोठे किल्ले तर तीन लहान किल्ले होते. त्यांतील तीन किल्ले मोडकळीस आले होते. पाचही किल्ल्यांची मक्तेदारी पोर्तुगीजांकडे होती. काही पोर्तुगीज नागरिक किल्ल्यांत तर काही किल्ल्याबाहेर रहात होते. हे पोर्तुगीज बेलापूर, आग्रोली, दिवाळे, शहाबाज व फणसपाडा येथील लोकांना त्रास देत असत. त्या त्रासाला वैतागून या पाच गावांतील साठ ते सत्तर  लोक वसईला जाऊन चिमाजी आप्पांना भेटले आणि त्यांना पोर्तुगीजांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली. त्यावेळी चिमाजी आप्पा यांनी सरदार नारायण जोशी यांच्या सोबत बरेचसे सैन्य देऊन त्यांना बेलापूर गावठाणमध्ये पाठवले. सर्व सैन्य किल्याच्या आजूबाजूच्या जंगलात रात्री लपून राहिले व सरदार नारायण जोशी यांनी गनिमी काव्याने संपूर्ण किल्याला वेढा घालून पोर्तुगीजांवर हल्ला केला. यात बरेचसे सैनिक धारातीर्थी पडले तरी किल्ल्याच्या आतल्या पोर्तुगीजांनी पळ काढला. ही बातमी पोर्तुगीजांना समजताच त्यांचे सैन्य मुंबईहून समुद्रमार्गे बेलापूरच्या दिशेकडे निघाले, मात्र हे पोर्तुगीज किल्ल्यापर्यंत पोचण्याच्या आधीच सरदार नारायण जोशी यांनी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावला होता. ज्यावेळी पोर्तुगीज सैन्याने किल्ल्यावर भगवा झेंडा पाहिला त्याच क्षणी आल्यापावली माघार घेत ते मुंबईच्या दिशेने पळून गेले. किल्ल्यावर भगवा फडकल्याची बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी नारायण जोशी यांचा वाजतगाजत सत्कार केला. त्यानंतर नारायण जोशी यांनी बेलापूर गावातील भोलेनाथाचे दर्शन घेत तलावातील पाण्याने अभिषेक केला आणि तलावाला अमृतेश्वर हे नाव सरदार नारायण जोशी यांनी दिले. परिसरातील लोकांच्या सहकार्याने दगडी भिंती बांधून अमृतेश्वर मंदिराची उभारणी केली. त्यांनतर बऱ्याच वर्षांनी गावकऱ्यांनी मंदिरासमोर सभामंडपाची उभारणी केली. कालांतराने ते सभागृहदेखील जीर्ण झाले. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून नव्याने सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराच्या आजूबाजूला श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, गावदेवी मंदिर अशी पाच मंदिरे असून मंदिरांची देखभाल- दुरुस्ती, उत्सव आदी ‘श्रीराम मारुती जन्मउत्सव मंडळ ट्रस्ट’ कडून पाहिले जाते. पाचही मंदिरांना अडीचशे ते तीनशे वर्षाचा इतिहास आहे. ही ऐतिहासिक व पौराणिक मंदिरे चिमाजी आप्पा यांच्या मदतीने व नारायण जोशी यांच्या सहकार्याने स्थापन केली गेली आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने होणारी जत्रा या गावचीच नाही तर संपूर्ण बेलापूर पट्टीची जत्रा असते. पूर्वी चार-पाच हजार जत्रेकरूंचा जत्था या काळात बेलापूरमध्ये लोटायचा. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावातील अनेक रहिवासी मोठय़ा आवडीने करत होते. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असा ‘मेला’ या गावात त्यावेळी लागत असे. कुस्ती आणि पोहण्याच्या स्पर्धा हे जत्रेचे मुख्य आकर्षण. कीर्तन, भजनात तर आख्खे गाव भक्तीमय होत होते. कपडे, शोभेच्या वस्तू, खेळणी यांबरोबर रॉड्रिक्स ऑगस्टिनच्या टुरिंग टॉकीजमध्ये एखाद्या चित्रपटाची मजा लुटली जात होती. ठाणे जिल्ह्यात पूर्वी एकोणतीस मोठ्या जत्रा भरत असत. त्यात बेलापूरच्या श्रीराम नवमीच्या यात्रेचाही समावेश आहे. वर्षानुवर्षे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. या एकदिवसीय यात्रेत भजन-कीर्तनादी कार्यक्रमांबरोबर कुस्त्यांचा फड व पोहण्याच्या स्पर्धाही होतात. बेलापूर गावात या पुरातन मंदिरांबरोबरच जैन धर्माचे तिसरे तीर्थंकर संभवनाथजी यांचे एक जुने  शिखरबंदी मंदिर असून या मंदिराची प्राणप्रतिष्ठा बेलापूर गावाच्या राशीनुसार केलेली आहे. बेलापुरात शिवमंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर अशी हिंदू धर्मियांची पुरातन देवदेवळे असून कंपनी सरकारनेही या देव-देवळांचा मान-मरातब केलेला आहे. मुंबईचे राज्यपाल सर विल्यम रॉबर्ट सेमुर वेसे-फिट्झगेराल्ड (Sir William Robert Seymour Vesey-Fitz Gerald) (1867-1872) यांच्या सहीने 10 सप्टेंबर 1868 रोजी बेलापूर गावातील या मंदिराचे पूर्वापार वहिवाटदार व पुजारी असलेल्या गुरव कुटुंबीयांना सालाना 36.00 रूपये व दीड एकर शेतजमिनीची सनद देण्यात आली होती. तर अशाच प्रकारची दुसरी एक सनद येथील पुरातन हनुमान मंदिरासाठी 2 एप्रिल 1864 रोजी देण्यात आली होती.

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या  एकूण एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे.

– शुभांगी पाटील-गुरव 8369963477 shubhpatil.29@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here