दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...
दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...
दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...
कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...
मुराद महम्मद बुरोंडकर यांचे कर्तृत्त्व दापोलीत, विशेषत: कोकण कृषी विद्यापीठात बहरले; परंतु नियतीचा भाग असा, की मुराद बुरोंडकर यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून 2021 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले...
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...
दापोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती म्हणजे नरहरी वराडकर.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वराडकर यांच्या मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. त्याचप्रमाणे ते स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही होते. त्यांची दूरदृष्टी व त्यांचे प्रयत्न यामुळे दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.
दापोलीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हे ज्योतिष शास्त्रातील विद्वान गणले जात. त्यांनी कालगणना व कालनिर्णय ह्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. . दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिलेला इंडियन कॅलेंडर हा इंग्रजी निबंध प्रसिद्ध झाला.पां.वा.काणे यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याच्या कामी उपयोग झाल्याचे नमूद केले होते...
दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत...