मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी

3
297

दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसलेले. मुर्डी गावाचे मूळ नाव मरूततट्टी असे होते. म्हणजे समुद्रावरून येणारा वारा (मरूत) जेथे अडवला जातो ते ठिकाण ! गावची लोकसंख्या जेमतेम पाचशे. मुर्डी गाव कधी वसले ते माहीत नाही, पण गावात असलेल्या विमलेश्वराच्या देवळाचा इतिहास पाचशे वर्षे जुना आहे. गावात ब्राह्मणवाडी, तेलीवाडी, कुणबीवाड्या… सगळा मिळून आकार पाचशे-सहाशे एकरांचा. कोकणातील अनेक गावांमध्ये जनसंख्या घटणे, घरे बंद पडणे ही प्रक्रिया वेगात आहे. तशी ती मुर्डीत नाही.

पेशवे जेव्हा हर्णे मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी ह्या गावाला स्वतंत्र ओळख दिली. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे. खोतांचा वर्तन-व्यवहार मात्र, कथा-कादंबऱ्यांतून वर्णन केला जातो तसा नव्हता.

या गावात जन्मलेले, शिकलेले रघुनाथ पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब परांजपे हे भारतातील पहिले सिनियर रँग्लर म्हणून नावारूपाला आले. ते उच्च शिक्षणासाठी गावाबाहेर पडले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले तरी सुद्धा गावाला विसरले नाहीत. त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची पहिली शाळा मुर्डीला 1936 साली काढली. परांजपे यांनी शाळेला नाव त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांचे दिले आहे. ती मुंबई इलाख्यातील पहिली शाळा ! शाळेचा वर्धापनदिन हा 22 डिसेंबरला असतो. त्या शाळेच्या उद्घाटनाला मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आले होते. परांजपे यांनी त्या काळात मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी शिपाई ठेवला होता. शाळेला गणवेश होता, पण तो फक्त काही कार्यक्रमांच्या वेळीच मुलांना घालण्यास दिला जात असे. मध्यान्हभोजन ही कल्पना त्या शाळेत त्या काळी राबवली गेली होती ! मुले शाळेत उपाशी येत, त्यांचे अभ्यासात लक्ष कोठून लागणार? मुलांना भिजवलेली चण्याची डाळ दिली जात असे.

शाळेच्या वरच्या मजल्यावर प्रशस्त हॉल आहे. तेथे रँग्लर परांजपे यांनीच सुरू केलेले ‘पुरुषोत्तम केशव परांजपे’ वाचनालय आहे. गावात सुसज्ज आणि समृद्ध वाचनालय ही मोठीच पर्वणी ! देशापरदेशात स्थित असलेली मुर्डी गावची मंडळी अभिमानाने सांगतात, की “आमचा पिंड पोसला तो त्या वाचनालयातील पुस्तकांनी ! आम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली ती तेथील वाचनालयामुळे !” देवेंद्र फडणवीस ‘निसर्ग’ वादळाने झालेल्या अपरिमित हानीची पाहणी करण्यासाठी गावात आले होते. मुर्डीला त्यांचा थांबा शाळा आणि वाचनालय यांच्या उद्ध्वस्त झालेल्या पटांगणात होता. तेव्हा त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला होता. “राहती घरे आणि बागा उद्ध्वस्त झालेल्या असतानासुद्धा मुर्डी ग्रामस्थांनी मागणी केली ती वाचनालय लवकरात लवकर सुस्थापित व्हावे” अशी नोंद फडणवीस यांनी नोंदवली.

आंजर्ले हा मुर्डीच्या शेजारी असलेला मोठा, बाजाराचा गाव. त्या गावी जाण्यासाठी केवळ पाऊलवाट होती. गाव जगाशी बारमाही रस्त्याने जोडले जावे असे गावाने ठरवले. एक गृहस्थ जमीन देण्यास कटकट करू लागले. प्रकरण भांडणापर्यंत गेले. रँग्लरांना तो प्रकार समजला, तेव्हा त्यांनी कलेक्टरला पत्र पाठवले. ते पत्र वाचताना कलेक्टर खुर्चीतून उठलाच ! कारण तो होता रँग्लरांचा विद्यार्थी. त्याने त्वरित गावात येऊन ‘त्याच्या’ सरांचे घर बघितले. तसेच, संबंधित अडेलतट्टू गृहस्थांना समज दिली. रस्त्यासाठी जागा मिळाली !

गावातील अनेक मंडळी परगावी स्थायिक झाली असली तरी गावाकडे लक्ष ठेवून असतात. चांगल्या-वाईट प्रसंगी गावाकडे धाव घेतात. याचा प्रत्यय गावातील एका गाडीला अपघात होऊन सार्वजनिक कामासाठी प्रवास करणारे तीन तरुण एकाच वेळी मृत्युमुखी पडले तेव्हा आणि ‘निसर्ग’ वादळात जी प्रचंड वाताहत झाली त्या वेळेसही आला. शाळा ‘निसर्ग’ वादळात 3 जून 2020 रोजी उद्ध्वस्त झाली. वाचनालयाची वाताहत झाली. पण सदानंद बापट (यांचे मुर्डी हे आजोळ- आईचे माहेर) या दानशूर गृहस्थाने एका संस्थेच्या सहयोगाने शाळा जशीच्या तशी बांधून दिली. वादळात वाचनालयातील पुस्तके भिजली. वाचनालय सुस्थितीत आणण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यासाठी पुस्तकरूपाने, अर्थरूपाने मदतीचा ओघ वाहत असतो. जुन्या दुर्मीळ ग्रंथांच्या पुनरुज्जीवनाचे काम जिकिरीचे व वेळखाऊ आहे.

गावातील गावकऱ्यांचे दोन तट प्रसिद्ध होते- एकमेकांना पाण्यात पाहणे व कोर्टकचेऱ्या करणे. त्यात वेळेचा व पैशांचा अपव्यय होत असे. एकदा मूळ मुर्डीचे असलेले पण गुजराथेत नडियाद येथे स्थायिक झालेले डॉ. परशुराम बाळकृष्ण पेंडसे गावात आले. त्यांनी मनावर घेतले. ते सर्व ग्रामस्थांना व्यक्तिशः भेटले. त्यांच्या लक्षात आले, की गावकऱ्यांचे सर्व मतभेद काल्पनिक आहेत. त्यांनी सर्वांना एकत्र करून गावातील तट संपवले व गावात ‘तंटामुक्ती’ केली.

लेखक श्री.ना. पेंडसे हे मुर्डी गावचे. पण त्यांचे बालपण, शिक्षण हे सर्व तेथून जवळच असलेल्या मुरुड गावी झाले. त्यानंतर ते मुंबई-पुण्याकडेच राहिले. तरीही ते इतर साहित्यिकांसह मुर्डीला अधूनमधून येत असत. ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी गावात द्युत म्हणून सोंगट्यांचा खेळ खेळला जातो तो पाहण्यास व सविस्तर समजून घेण्यास ते आलेले होते. मुर्डीला त्यांच्या आजोळी शालेय शिक्षण पूर्ण करून पुढील वाटचालीसाठी गावाबाहेर स्थायिक झालेले पोलिस ऑफिसर सहाय्यक पोलिस आयुक्त (निवृत्त) प्रफुल्ल जोशी. राष्ट्रपती पुरस्कार मुर्डीच्या ह्या सुपुत्राला त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल प्राप्त झाला, तो सर्व मुर्डीकरांसाठी अभिमानाचा क्षण होय. मुर्डीतील कर्नल केदार परांजपे हेदेखील एक अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व. त्यांनी भारतीय लष्करात महत्त्वाची पदे सांभाळून जोखमीच्या मोहिमांमध्ये भाग घेतला.

गावातील विमलेश्वराच्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला त्या वेळेस शंकराचार्य गावात आले होते. दुसऱ्या जीर्णोद्धाराच्या वेळेस कीर्तनकार कोल्हटकरबुवा आले होते. मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. घागबुवा, ढोलेबुवा, मकरंदबुवा, आनंदबुवा, मालवणचे नातूबुवा अशा अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांनी ह्या देवळात हजेरी लावली आहे. सद्यस्थितीला धरून किंवा स्फूर्तिदायक इतिहास सांगणे अशा प्रकारचे कार्यक्रम देवळात होत असतात. लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेले कीर्तन हे लोकशिक्षणाचे माध्यम कसे आहे ते मुर्डी गावात पाहता येईल ! आबालवृद्ध श्रोते कीर्तनाच्या मंडपात दिसतात. मुलांनी कीर्तनाला बसले पाहिजे असा आग्रह धरणारे पालक गावात आहेत.

गावात गणपती, श्रीराम, हनुमान अशी मंदिरे आहेत. ग्रामदेवता-काळकाईदेवी (चाचवलकरीण) सायकरीण, पेटकरीण अशा देवता आहेत. पेंडसे कुटुंबीयांपैकी एकाच्या नारळ-पोफळीच्या बागेत सालबादेवी आहे. चैत्रातील अष्टमीला सालबादेवीचा उत्सव असतो. त्याखेरीज माघी गणेशोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, शिमग्यात ग्रामदेवतेच्या पालखीचा उत्सव असे कार्यक्रम गावात होत असतात. आषाढात रुद्रनुष्ठान मंत्रघोषात पार पडते. तेव्हा विमलेश्वरावर संततधार धरून ‘सुवृष्टी’ केली जाते. गोपाळकाल्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण असतो. कारगिल युद्धाच्या वेळेस गावातील सण-समारंभ-उत्सव रद्द करून त्यातील वाचलेले पैसे ग्रामस्थांनी अधिकची भर घालून ती रक्कम पंतप्रधान निधीला पाठवली होती. बहुतांश कुटुंबे ही संघ विचारसरणीची असल्याने संघशाखा सुरू असतात. गावातील एकाच घरातून तीन संघप्रचारक निघाले आहेत. गावातील अनेक मंडळी कारसेवेला अयोध्येला 1992 मध्ये गेली होती. त्यात आई, वडील व दोन मुले असे एक संपूर्ण कुटुंबही सामील होते. सत्याग्रह 1948 च्या संघबंदीत आणि 1975 च्या आणीबाणीत करून तुरुंगात गेलेल्या मुर्डीकरांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे !

मुर्डी गाव उद्यमनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आमरस डबे हवाबंद करण्याचा उद्योग घरोघरी चालतो. त्याचा पाया घालणारे प्रवर्तक मुर्डीतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जी पहिली तीन कॅनिंग युनिट 1962 साली निघाली, त्यांतील एक मुर्डीमधील आहे. दळणवळणाची अपुरी साधने, साधनसामग्रीचा अभाव, गावात वीज नाही, एवढेच काय तर बहुसंख्य जनतेला ‘टिण्ड’फूड काय असते त्याची कल्पना नाही… अशा त्या काळात आंब्यासारख्या नाशिवंत पदार्थाचा व्यवसाय सुरू करणे, तो नावारूपाला आणणे, शिवाय आपल्यासारखेच अनेकजण या उद्योगात येऊ पाहत आहेत त्यांना उभारी देणे हे सर्व मुर्डीतील ह्या आद्य कॅनिंगवाल्यांनी केले आहे. त्याशिवाय वड्या साठं, लोणची, मुरंबे, सरबते, लाडू, उदबत्त्या, फणसाचे गरे, केळीपीठ, पाचक, ओवाअर्क, पापड, चकल्या व अन्य फराळ, केक व अन्य बेकरी उत्पादने… असे  कित्येक पदार्थ; तसेच भातशेती, कडधान्य लागवड यांच्या बरोबरीने जायफळ-मिरी-नारळ-सुपारी यांची रोपे, आंब्याची कलमे (स्टोन ग्राफ्ट) यांची बरीच निर्मिती व व्यापार मुर्डीतून होत असतो. तेथे आयुर्वेदिक औषधांची निर्मिती, छापखाना, अत्तरनिर्मिती, ट्रॅव्हल-टुरिझम, शिकवणीवर्ग, जीवनोपयोगी गोष्टींची दुकाने हेही व्यवसाय चालतात. पर्यटनाची प्रथा आधुनिक काळात पडल्यापासून रिसॉर्टच्या रूपाने ‘होम स्टे’ नावाचा आणखी एक व्यवसाय निर्माण झाला आहे.

मुर्डी गावात शिक्षक व अन्य काही अपवाद वगळले तर कोणीही नोकरी करत नाही. उलट, तेथे आजूबाजूच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातात. बहुतेक सगळे लहानमोठे उद्योजक. उद्योगातही कितीतरी विविधता. काहीजण पारंपरिक पौरोहित्य करणारे आहेत, तेही केवळ वारसा आहे म्हणून नव्हे तर त्यातील जास्तीत जास्त ज्ञान मिळवून, निरनिराळे विधी आत्मसात करत, त्यातील तज्ज्ञ बनून पौरोहित्य करतात ! त्यांनी त्यांच्या मुलांना लहानपणीच वाणी शुद्ध व्हावी, ती संस्कृतात पारंगत व्हावी म्हणून पाठशाळेत घातले आहे. लहान वयापासून कीर्तन ऐकणाऱ्या तेथील तरुणांमधून कीर्तनकार घडत आहेत.

शहरात वाढलेल्या मुली गावात सुना म्हणून येऊन येथील संस्कृतीशी एकरूप होतात तेव्हा त्यांचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. तसेच, उद्योगी आणि स्वयंपूर्ण झाल्यास खेडेगावातील मुलांचीही लग्ने चांगल्या मुलींशी होतात, याचा प्रत्यय गावात येतो. मूर्डीच्या माहेरवाशिणीसुद्धा जेथे कोठे गेल्या आहेत- महानगर असो की खेडेगाव असो- तेथील काही ना काही उद्योग करून, त्यांनी उद्यमनगरीतील माहेराचा वारसा जपला आहे.

गावात सगळेजण दिवसभर भरपूर कष्ट करतात. संध्याकाळी कोणाच्या तरी घरी गप्पांचे फड जमवतात. मोदींपासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत सर्वांना मोफत सल्ले देतात. उत्सवात छान- छान नाटके बसवतात, गाण्यांचे कार्यक्रम करतात, विविध वाद्ये वाजवतात, भजने रंगवतात, कधी सहभोजनाची अंगतपंगत बसते- जेथे बंधुवर्ग स्वयंपाक करून माताभगिनींना आयते खाऊ घालतात.. बस्स ! राजासारखे राहतात, आणखी काय हवं महाराजा?

विद्या अनिल पेंडसे 7798209710 vidyapendse.murdi@gmail.com

——————————————————————————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. उत्तम लेख.मुर्डी गावची चांगली माहिती लेखात आहे.

  2. मुर्डी गावाची नवी ओळख भावली. फार छान लेख. अभिनंदन!!

  3. गावाची ओळख रहिवासी लेखिकेनेच केली असल्याने ती आपुलकिने केली आहे.बारीकसारीक तपशील त्यात आले आहेत. गावाचा पूर्वेतिहाद समजला नाहीतरी नजिकचा इतिहास व वर्तमान समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here