अर्पण करू…

1
211

आसावरी काकडे यांची आत्मचिंतनात्मक कविता वाचली. इंग्रजी साहित्यामध्ये ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’ नावाचा एक काव्यप्रकार आहे. तो नावाप्रमाणेच, स्वतःशी केलेला संवाद असतो. त्याच्या सादरीकरणात शेजारी श्रोता आहे, हे गृहीत धरलेले असते. श्रोता बोलणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकत असतो, पण त्यावर प्रतिक्रिया मात्र देत नाही किंबहुना स्वतः बोलत नाही.

अगदी त्याचप्रमाणे, आसावरी काकडे यांच्या ‘अर्पण करू’ या कवितेतली व्यक्ती समाजमनाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दिसते. माणसाला आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या अनुभवांतून हळुहळू परिपक्वता येते. अशा वेळी, आपल्याच आयुष्याकडे जेव्हा आपण अलिप्ततेने पाहतो, तेव्हा मनात असंख्य जाणिवा येतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मनात येणारे विचार वेगळे, भावना वेगळ्या, आकांक्षा वेगळ्या, आस वेगळी, असोशी वेगळी. या साऱ्यांनी आपले गतायुष्य व्यापलेले असते. खरेतर भावनेच्या भरात, तारुण्याच्या उन्मादात कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नाही, असे वाटण्याचे क्षण प्रत्येकानेच अनुभवलेले असतात. किंबहुना त्यातून आयुष्याची दिशा ठरते. निग्रहपूर्वक त्या दिशेने प्रवास करताना येणारे टक्के-टोणपे खाऊन, दु:ख म्हणजे काय, असहाय्यता म्हणजे काय हे अनुभवून, तावून-सुलाखून स्वतःकडे, इतरांकडे पर्यायाने आयुष्याकडे पाहण्याची परिपक्वता येते.

जसा महापूर ओसरल्यावर, गढूळ पाणी शांत झाल्यानंतर येणारी नितळता, तसे आयुष्याचा, नातेसंबंधांचा अर्थ समजल्यावर येणारे गहिरेपण या कवितेत दिसते. आपण प्रत्येक जणच असतो एक गिर्यारोहक… आपल्या आयुष्याचा. जे मिळवायचे ते मिळाल्यावर, त्यासाठीचा संघर्ष संपल्यावर सगळ्यांप्रति अर्पण करण्याकरता मनात साचून राहतो, तो केवळ सद्भाव. ही अनुभूती देणारा हा गहिरा काव्यानुभव आहे. म्हणूनच, आसावरी काकडे यांच्या संवेदनशील शैलीतून चितारलेली, ‘अर्पण करू…’ ही कविता आणि त्यांची रेखाटने म्हणजे मला त्यांच्या अंतर्मनाशी त्यांनी केलेला संवाद वाटतो. त्यांच्या चित्रांतून जाणवते की कागदावर टेकवलेली पेन्सिल अबोलपणे त्यांच्या मनात चाललेल्या विचारांना आकार देण्याचा प्रयत्न करत आहे.

अपर्णा महाजन aparnavm@gmail.com

——————————————————————————————————————————

अर्पण करू… 

चल, प्रात:स्मरणाच्या या प्रसन्न वेळी
अर्घ्यदानाबरोबर
अर्पण करू गंगेला
एकेक आठवण
सुखावणारी… दुखावणारी…
हाताला लागेल ती
तिच्याबरोबर अर्पण होईल
तिला लगडलेलं आयुष्य कणकण…

शिखरावर ध्वज फडकवून
डौलात परततो आहे
आपल्यातला गिर्यारोहक
त्याच्या पाठीवरचं ओझं
थोडं कमी करू…

आठवणी अडून बसतील
आयुष्याला बिलगून बसतील
त्यांची समजूत घालू
काही झोपल्या असतील शांत
त्यांना हलवून जागं करू …

आता नको मोह
अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांचा
नको नवा दाह
अपेक्षाभंगांचा
आठवणींमध्ये नको नवी भर
चल, नको रेंगाळू, मन आवर
ओळखही दिली नाहीस
असतील असे काही आवेग
चल, उचल तेही, उचल
पावलांपुढली रेघ
नकोत मागे कोणत्याच खुणा

एक वळण मावळले
दुसरे उगवते आहे
चल, त्याचे स्वागत करू
जुन्या वळणाचे देणे-घेणे नको सोबत
प्रात:स्मरणाच्या या प्रसन्न वेळी
चल, सारे अर्पण करू…

नवं वळण कुठे नेईल माहीत नाही
पोहोचणार कुठं? कधी?
तेही कळणार नाही!
पण नकोत न आता प्रश्नोत्तरं
मागचं-पुढचं विसरून सारं
पार केल्या वळणाचं बोट सोडून
पिसासारखं हलकं होऊन
अलगद चालत राहू
चल, आता मागे नको पाहू…

हे करायचंय, ते मिळावयाचंय
नकोत आता कसले तगादे
जाऊ वाट नेईल तिकडे
राहू निरंकुश …
समुद्राची हाक येईल
क्षितिज साद घालेल
वाटेत कुणी आधारासाठी
हात मागेल
जमेल तेवढे देत जाऊ
तहानलेल्याची ओंजळ भरू

चालता-चालता अवचित येईल
पुढचं वळण
असेल थोडा उजेड
थोडा अंधार पण…

तुझं-माझं तिथे काही
असणार नाही
धुक्यामध्ये आपलं घर
दिसणार नाही.

अशा अवघड वळणासाठी
तयार होऊ
उरलंसुरलं ज्याचं त्याला
देऊन जाऊ
जाता-जाता सर्वांसाठी
प्रार्थना करू…
‘लोका: समस्ता:  सुखिन: भवन्तु
सुखिन: भवन्तु सुखिन: भवन्तु ||’

आसावरी काकडे 9762209028 asavarikakade@gmail.com

—————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. अभिव्यक्तिचे सशक्त व संवेदनशील दोन मार्ग सारख्याच ताकदीने हाताळणा-या प्रगल्भ प्रतिभेच्या कवियित्री आसावरी काकडे ह्याच्या आशय संपन्न कवितेतून व चित्र रेखाटनातून व्यक्त होणारी सद् भावनेची
    अनुभूति तुम्ही छानच मांडली आहे
    उपक्रमाचे सूत्रच उदात्त आहे त्यास समर्पक कविता आहे
    खुपचछान !

    विद्या मक्तल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here