भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे.

मराठी आणि गुजराती रंगभूमीमध्ये सातत्याने विविध पातळ्यांवर देवाणघेवाण चालू असते. तसेच भांगवाडी थिएटर हा मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे; या विचाराने गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील स्त्रीपार्टी नटाची शोकांतिका अधोरेखित करणारे सतीश आळेकर यांचे ‘बेगम बर्वे’ हे महत्त्वाचे नाटक, मनोज शहा यांनी गुजरातीमध्ये ‘मास्टर फुलमणी’ या नावाने 1999 मध्ये भांगवाडी थिएटरच्या पद्धतीने सादर केले होते. त्याचे देश-विदेशात अनेक प्रयोग झाले आणि नावाजले गेले.

‘मोगरा फुलला’ या सदरातले इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मुंबईच्या काही गजबजलेल्या रस्त्यांनी, बाजारांनी, जुन्या चाळींनी आणि माणसांनी तिचा सोनेरी इतिहास जपून ठेवला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या मुंबई शहरात जुन्या वास्तू, मुंबईची गोष्ट सांगत उभ्या आहेत. अशाच एका सुवर्णकाळ पाहिलेल्या वास्तूची गोष्ट, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांनी सांगितली आहे. ती वास्तू म्हणजे ‘भांगवाडी थिएटर’! मुंबईच्या काळबादेवीमध्ये असलेल्या ह्या थिएटरला गुजराती रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भव्यदिव्य नेपथ्य, नटांचे खणखणीत आवाजातील संवाद, गाणी आणि प्रेक्षकांचा once more! मनोज शहा हे गेली अनेक वर्षे गुजराती रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी नव्वदपेक्षा जास्त नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे. ते ‘आयडियाज अनलिमिटेड’ ह्या नाट्यसंचाद्वारे नाटकांची निर्मितीही करतात. त्यांनी ‘अपूर्व अवसर’, ‘मोहन नो मसालो’, ‘डॉ. आनंदीबाई जोशी: लाईक, कमेंट, शेअर’, ‘कार्ल मार्क्स इन काळबादेवी’ ही दिग्दर्शित केलेली काही नाटके आहेत. त्यांचे पहिले नाटक ‘मास्टर फुलमणी’ हे सतीश आळेकर यांच्या ‘बेगम बर्वे’ ह्या नाटकाचे रूपांतर आहे. त्या नाटकात मनोज शहा यांनी भांगवाडी परंपरेची शैली वापरून जुना काळ उभा केला होता.

प्रश्न: भांगवाडी थिएटरची सुरुवात कशी झाली होती?

मनोज शहा: गुजरातीमध्ये भवाई नावाचे लोकनाट्य आहे. भवाई सादर करणारे कलाकार नायक समाजातील असायचे. ते नायक एका गावाहून दुसऱ्या गावी जाऊन भवाई करायचे. भवाईमध्ये ज्या कथा असायच्या त्यांना ‘वेश’ म्हणत. उदाहरणार्थ साधूचा वेश, प्रधानाचा वेश, मूर्ख राजाचा वेश असे वेगवेगळे वेश असायचे. भवाई बहुतेक वेळा नवरात्रीच्या आसपास सादर केली जायची. भवाईमध्ये सादर केली जाणारी नाटकं मैदानावर व्हायची. मंदिरा समोर खड्डा खणून गावकरी जागा तयार करायचे जेणेकरून ग्रीक पद्धतीच्या एरेना थिएटरप्रमाणे चारशे-पाचशे लोकांना नाटक पाहता येईल. पण बहुतेकवेळा देवीच्या मंदिरात सादरीकरणे व्हायची. त्या काळात मनोरंजनाची इतर कोठलीही साधने नव्हती. त्यामुळे वेश फार प्रसिद्ध होते. भवाईमध्ये Live Music असायचे. कलाकार गाणी गात असताना लोकही त्यांच्यासोबत गायचे. हास्यविनोद करत सादरीकरण व्हायचे. पण त्यात सामाजिक संदेश असायचे. आपल्या गावात, देशात काय अडचणी आहेत, हे सांगितले जाई. हळुहळू ही कला लुप्त होऊ लागली. 

हे कलाकार शहरांमध्ये 1934-35 च्या दरम्यान आले. काहीजण मुंबईत आले तर काही सौराष्ट्रमध्ये गेले. हे कलाकार नवरात्रीच्या दिवसात मुंबईच्या चाळींमध्ये वेश सादर करायचे. त्या काळात ‘लैला मजनू’, ‘हातिम ताई’ अशी उर्दू-पारसी नाटकं मोठ्या प्रमाणात व्हायची. पारसी नाटकांवर ब्रिटिशांचा प्रभाव होता. हे पारसी नाटक करणारे लोक ब्रिटिशांसोबत नाटकाची निर्मीती सांभाळायचे. त्यामुळे त्यांना नाटक कसे सादर करायचे हे माहीत होते. त्या पारसी लोकांसोबत भवाई करणारे कलाकार प्रवास करायला लागले, काहीजण कोलकात्याला गेले. थिएटरमध्ये नाटक करू लागले आणि हळूहळू नाटक मंडळी सुरू झाली. त्या मंडळींमधून एक-दोन मंडळी मुंबईला 1935 च्या दरम्यान आली होती. तेव्हा मुंबईत पारसी नाटकं आधीपासून व्हायची. पिला हाऊस, कॅपिटल ही थिएटर्स होती. पिला हाऊस म्हणजे प्ले हाऊस. तेथील आजूबाजूच्या परिसरात जेवढी थिएटर्स होती, त्या सगळ्यांमध्ये नाटकं व्हायची. आपल्या देशाच्या राजकीय परिस्थितीतून, लोकांच्या मानसिक स्थितीतून, तसेच भारतीय संस्कृतीशी लोकांची जी भावनिक नाळ जोडलेली होती त्यातून ज्या गोष्टी मिळाल्या त्यावर नाटकं व्हायला लागली. उदाहरणार्थ हरिश्चंद्र तारामती, राजा भतृहरी अशा ज्या पौराणिक-ऐतिहासिक कथा आहेत त्यावर आधारित नाटकं सुरू झाली आणि लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. त्यातल्या काही माणसांनी काळबादेवी मधील ‘भांगवाडी’ नावाच्या वाडीमध्ये थिएटर सुरू केले. ती जागा आजही तेथे आहे. त्यावेळी वाड्या असायच्या. तुम्ही काळबादेवीमध्ये पाहिले तर विठ्ठलवाडी, जांभूळवाडी अशा सगळ्या वाड्या आहेत. त्या जागेला भांगवाडी नाव पडले कारण तेथे भांग मिळायची. भांग विकणे हा त्या काळातला व्यवसाय होता. हळूहळू भांगवाडी प्रसिद्ध होऊ लागली. त्या कलाकारांची सादरीकरणाची जी पद्धत होती ती भांगवाडी स्टाईल म्हणून प्रसिद्ध झाली.

प्रश्न: भांगवाडीमध्ये कोणत्या प्रकारची नाटकं सादर व्हायची? त्या काळातली गाजलेली नाटकं कोठली होती?

भांगवाडीमध्ये पौराणिक, सामाजिक, राजकीय अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं व्हायची. नातेसंबंधांवर आधारित कौटुंबिक नाटकंदेखील व्हायची. ‘वडीलोना वाके’, ‘मालौपती’, ‘हंसाकुमारी’, ‘सूर्यकुमारी’, ‘अहिल्याबाई’, ‘अरुणोदय’, ‘सिराज उद्दौला’, ‘विधि ना खेल’  ही काही नाटकांची नावे आहेत.

तेथे मूल्य, तत्त्व सांगणारी नाटकंसुद्धा व्हायची. संस्कृतमधल्या भतृहरीच्या गोष्टीवर आधारित एक नाटक होते. ते नाटक बघायला एक राजा आला होता. नाटक पाहून त्याने त्याच्याकडील मौल्यवान दागिने त्या कलाकाराकडे फेकले. सगळ्यांना वाटले की तो कलाकार ती भेट उचलेल. पण त्याने ते दागिने उचलले नाहीत. थिएटरच्या मालकाने त्याला ते दागिने उचलायला सांगितले. अन्यथा राजा आपल्याला पुन्हा येथे नाटक करायला देणार नाही असे सांगितले. तरीही त्याने ते दागिने उचलले नाहीत. नाटक संपल्यानंतर सगळ्यांनी त्याला त्याबद्दल विचारले. त्यावर तो म्हणाला, की नाटक सुरू असताना मी राजा भतृहरी होतो. त्यामुळे मी ते उचलू शकत नव्हतो अशी भारताची मूल्य जपणारी संस्कृती होती.

मी एका राजकीय नाटकाबद्दल असे ऐकले-वाचले होते, की त्या काळात ब्रिटिशांनी लोकांवर बंधने आणली होती. तेव्हा लोक डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घालायचे. त्या नाटकात असे दाखवले होते, की एक पात्र आपल्या डोक्यावरची टोपी काढून खाली फेकते आणि खिशातली गांधी टोपी डोक्यावर घालते. तर प्रेक्षकही त्यांच्या टोप्या फेकायचे आणि त्यांना दिलेल्या गांधी टोप्या घालायचे. अशी क्रांतिकारी कृती व्हायची.

प्रश्न: संहितेची रचना कशी असायची? नाटकात किती अंक असायचे? 

मनोज शहा: विषयानुसार तीन, चार  किंवा पाच अंक असायचे. दोन अंकी नाटक नसायचे. पहिला अंक सुरू व्हायच्या आधी कलाकार स्तुती(नांदी) गायचे. वेळेचे काही बंधन नव्हते. स्त्री वेशातील लहान मुले हातात फुलांच्या माळा घेऊन प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी रांगेत उभी राहायची. नाटक सुरू व्हायला अर्धा तास जायचा. ह्या सगळ्यात आताच्या स्टँडअपप्रमाणे काही कलाकार बंद पडद्यासमोर येऊन कॉमिक सादर करायचे आणि लोकांना हसवायचे. ते नाटकाचा मूड सेट करायचे. अंक संपल्यानंतर मधल्या वेळेतही ते कलाकार येऊन कॉमिक सादर करायचे. त्याला ‘पडदा नो खेल’ असे म्हणत. स्टँडअपप्रमाणे त्यातले काही खेळ प्रसिद्ध होते. परंपरा अशी फिरून पुन्हा आपल्यासमोर येते. हे कॉमिक नाटकाच्या विषयाशी संबंधित नसायचे. भवाईप्रमाणे त्यात चालू घडामोडींवर बोलले जायचे.

प्रश्न: नाटकाची भाषा कशी असायची

नाटकाच्या विषयानुसार त्यातली भाषा असायची. जर ऐतिहासिक नाटक असेल तर ऐतिहासिक भाषा असायची, जर सामाजिक नाटक असेल तर रोजच्या जगण्यातली भाषा असायची. जर एखादं उर्दू नाटक असेल ‘सिराज उद्दौला’ किंवा ‘हातीमताई’ किंवा ‘अरेबियन नाईटस्’ अशा प्रकारचं, तर फारसी मिश्रित उर्दू भाषा असायची. गुजराती आणि फारसी भाषेत नाटकं व्हायची. जी हिंदी नाटकं होती, ती सगळी लोक उर्दूमध्ये बघायचे. जर ग्रामीण नाटक असेल तर त्या गावच्या बोलीभाषेत नाटक व्हायचं, इतक्या वेगवेगळ्या बोलीभाषा भारतात आहेत.  पुण्यातली मराठी, मुंबईची मराठी वेगळी आहे. तुम्ही जळगावला गेलात, कोल्हापूरला गेलात तर तिथल्या भाषांमधला musical tone बदलतो. गुजरातीतही असेच आहे. प्रत्येक गावची बोली वेगळी आहे.

प्रश्न: नटांची पार्श्वभूमी काय होती? आम्हाला त्यावेळच्या प्रसिद्ध भांगवाडी कलाकारांबद्दल ऐकायला आवडेल.

मनोज शहा: एक विसनगर नावाचं गाव आहे. बहुतेक कलाकार हे त्या आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातून यायचे. त्याला उत्तर गुजरात म्हणतात. हे कलाकार एकमेकांशी कुटुंबाप्रमाणे जोडलेले असायचे. भांगवाडीमध्ये दहा-बारा वर्षाच्या मुलांना ते प्रशिक्षण द्यायचे. तेथे वीस-पंचवीस मुलं यायची, राहायची. त्यांना गाण्याचे धडे दिले जायचे, ते दिवसातले आठ तास रियाज करायचे. ज्यांना गाणं नीट यायचं नाही त्यांना वेताच्या काठीने मारायचे. एखादा मुलगा चांगला गात असेल, स्टार मटेरियल असेल तर त्याला मालक तूपातला शिरा द्यायचे. 

भारतीय समाजात मुलींनी नाटकात काम करणं मान्य नव्हतं. त्यांच्यासाठी तो dignity चा प्रश्न होता. त्यामुळे लहान मुलं स्त्रियांच्या भूमिका करायचे. त्यासाठी मुलांना केस कापू द्यायचे नाहीत. त्यांना आवाजाचं प्रशिक्षण दिलं जायचं. जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत त्यांचा आवाज बाईसारखा येतो. पण जेव्हा कंठ फुटतो तेव्हा आवाज बदलतो. जोपर्यंत कंठ फुटत नाही तोपर्यंत त्याला स्त्रीपात्रासाठी ठेवलं जायचं नंतर पुरुषांच्या रोलसाठी पाठवलं जायचं. ज्याचे केस लांब आहेत, जो चांगले गातो, जो शरीराची काळजी घेतो त्याला आठवड्यातून एकदा शॅम्पू, सुगंधी साबण, नवीन धोतर दिलं जायचं. त्याचे कपडे चांगले असतील ह्याची काळजी घेतली जायची. मुंबई आणि कोलकात्यामध्ये हे प्रशिक्षण दिलं जायचं. लोकांना वाटायचं की कोलकात्याच्या नाटक कंपनीमध्ये एखादा मुलगा नाटकाचं प्रशिक्षण घेऊन आलाय तर तो चांगलाच असणार. तिथे काही मास्टर मुलांना चांगलं प्रशिक्षण द्यायचे, त्यामुळे चांगले नट तयार व्हायचे. काही वर्षांनंतर हळूहळू मुली नाटकात काम करू लागल्या.

भांगवाडीतील एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे जयशंकर सुंदरी. जसे मराठीत बालगंधर्व होते तसे गुजरातीत ‘जयशंकर’! मी एक गोष्ट ऐकली होती, एक संगीताचा ज्ञानी होता, डॉक्टर होता, गिरगावात राहायचा. तो बालगंधर्वांची नाटकं पाहायचा आणि मग जयशंकर यांची नाटकं पाहायचा. दोघांची नाटकं पाहून तो त्यांच्याबाबत चर्चाही करायचा, की जयशंकर यांनी हा राग, हे गीत अशाप्रकारे गायलं. तसंच तो बालगंधर्वांबद्दल जयशंकर यांना सांगायचा. ह्यामुळे संस्कृतीचं आदानप्रदान दोघांमध्ये होत होतं. जयशंकर यांच्यावर लोक खूप प्रेम करायचे. आता कसं चालायचं, कसे कपडे घालायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं तसं त्यावेळी हे सगळं शिकण्यासाठी स्त्रिया त्यांच्याकडे यायच्या. ते कसे साडी नेसून स्टेजवर वावरतात, त्याप्रकारे एखाद्या पार्टीत कसं वावरायचं हे शिकण्यासाठी स्त्रिया यायच्या. त्यांच्यावर लोक एवढे भाळले होते की मोठे व्यावसायिक जेव्हा व्यवसायासाठी परदेशात जात, तेव्हा ते तिथून जयशंकर सुंदरींसाठी भेटवस्तू घेऊन येत. त्यांनी शेक्सपिअरची ध्वनिमुद्रित नाटकं आणली होती, सोबत ग्रामोफोनही आणला होता. आणखी एक अश्रफ खान नावाचा कलाकार होता. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की कुठल्यातरी नाटकात ते जेव्हा गाणं गायचे तेव्हा एरव्ही बस, ट्राम जाणारा काळबादेवीचा रस्ता त्या विशिष्ट वेळी स्तब्ध व्हायचा. दोन-चार वेळा त्याचं गाणं ऐकल्यानंतर पुन्हा शहर सुरू व्हायचं.

हे कलाकार भांगवाडी थिएटरमध्ये रहायचे?

मनोज शहा: हो. तिथे तशी व्यवस्था होती. तिथेच रहायचं आणि तिथेच नाटक करायचं. एखाद्या कलाकाराला आपल्या गावी जायचं असेल तर त्याची सहा महिन्यांपूर्वी तारीख वगैरे ठरवून प्रवासव्यवस्था केली जायची. सणावाराला नाटकाचे प्रयोग व्हायचे नाहीत. प्रयोगाच्या वेळा महिन्या-महिन्यासाठी ठरलेल्या असायच्या. 

नाटकांमध्ये संगीताचं काय महत्त्व होतं? कुठल्या प्रकारची गाणी सादर व्हायची?  

संगीताला तर विशेष महत्त्व होतं. एका गाण्याला दहा वेळा ‘once more’ मिळायचा आणि अशी साधारण चाळीस गाणी नाटकांमध्ये असायची. बहुतेक गाणी लोकसंगीतावर आधारलेली असायची. शास्त्रीय संगीताचा वापर तुलनेने कमी व्हायचा. काही गाणी तर प्रसिद्ध होती. उदाहरणार्थ ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे’ हे गाणं गुजराती नाटकातलं आहे, जे त्यांनी नंतर ‘मुघल-ए-आझम’मध्ये घेतलं. ते खूप प्रसिद्धही झालं. अशी देवाणघेवाण होत असते. एका गीतातून दुसरं गीत, दुसर्‍यातून तिसरं. एकाच रागावर आधाररेली गीतं. त्यामुळे सगळे एकमेकांना जोडलेले होते. सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर यांची नाटकं उर्दूमध्ये व्हायची. त्यातली गाणी अरेबियन नोटेशन्सवर आधारलेली असायची. प्रसिद्ध उर्दू लेखिका कुर्रतुल ऐन हैदर यांनी पारसी थिएटरवर एक कादंबरी लिहिली आहे, त्यात हे सगळे संदर्भ आहेत.

प्रश्न: त्या काळातल्या नाटकांची आणखी काय वैशिष्ट्ये होती

मनोज शहा: तेव्हा माइक सिस्टीम सारख्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे कलाकार चारशे – पाचशे लोकांपर्यंत आवाज जाईल इतक्या मोठ्या आवाजात सादरीकरण करायचे. संवादही एका ओळीचे असायचे. फार लांब संवाद नसायचे. या प्रकाराला भांगवाडीमध्ये ‘बेतबाजी’ असं म्हणतात. एकाने एक वाक्य म्हटलं, की दुसरा लगेच त्यावर दुसरं वाक्य म्हणणार. ही बेतबाजी कलाकार अशी रंगवायचे की प्रेक्षक टाळ्या वाजवायचे. स्वगतंही व्हायची पण ती हळूहळू आली. म्हणजे राजा हरिश्चंद्राचं परिवर्तन  झालं तर त्याला 2-4 मिनिटांचं स्वगत असायचं. त्यांनी शेक्सपिअर, मोलियर यांची नाट्यशैली आत्मसात केली होती. पाश्चात्त्य लेखनशैलीवर आधारित नाटकंही भांगवाडी थिएटरमध्ये लिहिली जायची.

लाईट नसल्यामुळे पेट्रोमॅक्सचे दिवे वापरून नाटक सादर केलं जायचं. त्या काळात box set नसायचा. आपल्याकडे पडद्यांची परंपरा होती. ताजमहालाचा पडदा, बागेचा पडदा असे मोठमोठे depth असलेले पडदे लावले जायचे. नाटकात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी lavish असायच्या. अशी भव्यदिव्य नाटकं व्हायची.

प्रश्न: रोज नाटक व्हायचं की काही विशिष्ट वेळा असायच्या?  तिकिटांचे दर काय असायचे?

मनोज शहा: रोज नाटकं व्हायची. तिकिटांचे दर काय असायचे याबद्दल फार कल्पना नाही. पण मला वाटतंय की ते affordable असतील. भांगवाडीमध्ये जेव्हा प्रयोग व्हायचे, तेव्हा उदाहरणार्थ जयशंकर सुंदरींचं नवीन नाटक येतंय तर सहा महिन्याआधी लोकांना कळायचं की कोणतं नाटक येणार आहे. ते पाहण्यासाठी म्हणून कोलकाता, चेन्नई, बडोदा, सूरत इथून लोक यायचे. तार पाठवून मुंबईला कळवायचे की आम्ही इतकेजण येणार आहोत, आमची तिकीटं आरक्षित करुन ठेवा. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था नाटक कंपन्या करुन ठेवायचे. कारण जर त्या नाटक पाहायला आलेल्या शेठपैकी एखाद्याला ते आवडलं तर त्यांच्या संस्थानात, प्रदेशात ते नाटक करायला आमंत्रण मिळू शकेल ही आशा नाटक कंपन्यांना असायची. त्या काळीही भांगवाडीतल्या कलाकारांनी परदेशात दौरे केले होते, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनोरंजन केलं होतं. एक जबरदस्त गोष्ट अशी की पूर्ण ट्रेन यायची सूरत, बडोद्यावरुन ज्या ट्रेनवर नाटकाचं नाव लिहिलेलं असायचं. ‘सौभाग्य सुंदरी नाटकनी ट्रेन’ असे ट्रेनवर बॅनर लावले जायचे. ज्या डब्यांमध्ये नाटक पाहायला जाणारी मंडळी बसायची त्यावर हे बॅनर असायचे. त्यामुळे छोट्या-छोट्या गावातल्या लोकांना या नाटकवाल्या ट्रेनचं अप्रूप असायचं. खास ती ट्रेन पाहायला लोक प्लॅटफॉर्मवर यायचे. कारण हे त्यांच्यासाठी अद्भुत आणि असामान्य होतं. एखादा मुलगा जर परदेशी शिक्षणासाठी जात असेल तर आजूबाजूचे लोक, नातेवाईक कसे त्याला निरोप देण्यासाठी एकत्र एअरपोर्टवर जमतात तसे हे लोक नाटकाची ट्रेन पाहण्यासाठी एकत्र जमायचे. त्यांना कुतूहल असायचं की ही मंडळी मुंबईला जाताहेत, तिथे जाऊन काय करणार? तर नाटक पाहणार. कुठे पाहणार? भांगवाडीमध्ये! क्या बात है!

प्रश्न: नाटकांचा निर्मिती खर्च कोण सांभाळायचं?

मनोज शहा: त्याकाळी थिएटरचे मालक स्वतःच नाटकाची निर्मिती करायचे. त्यांची कंपनी असायची, ज्यात त्यांचं स्वत:चं नाटक चालायचं. कधीकधी काही लोक बाहेरगावाहून सुद्धा यायचे जे partnership मध्ये नाटकाचे खेळ करायचे. म्हणजे सौराष्ट्र, बडोदा, अहमदाबाद इथून काही लोक मुंबईत आले तर ते भाड्याने auditorium घ्यायचे. फक्त एक-दोन प्रयोगांसाठी नाही तर महिनाभरासाठी. त्या काळात तिथे ते एकच नाटक चालायचं.

काही काही नाटकांना प्रायोजकत्व मिळायचं. उदाहरणार्थ महाराज गायकवाड नाटक पाहायला आले तर ते नाटकाला देणगी द्यायचे. कलाकारांची विचारपूस करुन त्यांना आवश्यक गोष्टी पुरवायचे. उदाहरणार्थ, जयशंकर सुंदरींना बदामाचा शिरा देण्यासाठी बदाम पाठवले जायचे. अशा रीतीने प्रोत्साहन दिलं जायचं.

प्रश्न: वेगवेगळ्या भागातून, विविध सामाजिक, आर्थिक स्तरातून लोक नाटक पाहायला यायचे का? लोकांचा प्रतिसाद कसा असायचा?

मनोज शहा: त्याची एक गोष्ट आहे. कोठीवरच्या बायका त्यांच्यासोबतच्या वादकांना (सनईवादक, तबलावादक, पेटीवादक) घेऊन नाटक पाहायला यायच्या. ते पंधरा-वीस लोक एकत्र नाटक पाहायचे. नाटकातलं एखादं गाणं आवडलं की ते पंधरा-पंधरा वेळा once more द्यायचे. यामागील कारण असं की ते गाणं ऐकून ऐकून पाठ करायचे, त्याचा रियाज करायचे. म्हणजे त्यांच्या कोठीवर कुणी गेलं तर त्यांना हे नाटकातील गीत ऐकायला मिळायचं. मी असं वाचलं-ऐकलं आहे की भांगवाडीच्या रस्त्यावर भांगेची, बदाम-पिस्त्याची, फुलांची दुकानं होती. फुलांच्या दुकानांमध्ये लोक पैशांची रिंग बनवायला सांगायचे. त्या रिंगमध्ये फुलं आणि पैसे एकत्र गुंफले असायचे. लोक अशी पाच-दहा रुपयांची रिंग बनवून घ्यायचे. दहा रुपयाची रिंग म्हणजे त्या काळी फार मोठी गोष्ट होती. एखाद्या कलाकाराने चांगलं गाणं गायलं तर प्रेक्षक ती रिंग त्या कलाकाराच्या गळ्यात फेकायचे आणि कलाकार त्या प्रेक्षकाचे नाव जाहीर करायचे. प्रेक्षक त्यांना once more द्यायचे आणि कलाकार ते गाणं पुन्हा सादर करायचे. संध्याकाळी सात वाजता सुरू झालेलं नाटक सकाळी सहापर्यंत चालायचं. इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळायचा.

प्रश्न: सर, हे थिएटर कधी बंद झालं आणि त्यामागे काय कारणं होती, असं तुम्हाला वाटतं?

मनोज शहा: कलाकारांनी, निर्मात्यांनी थिएटर बंद करायला सुरुवात केली. संपूर्ण संस्था 1985 मध्ये बंद झाली. त्याची वेगवेगळी कारणं होती. एकतर राजकीय परिस्थिती बदलली आणि दुसरं म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची होती. आधी सिनेमा आला, टेलिव्हिजन आले, तंत्रज्ञान आले, फोन आले, रेडिओ आले व त्याचा प्रभाव पडला. आधी ग्रामोफोन असायचे, नंतर रेडिओ आले. ते काय तुम्ही खिशात ठेवा/ऐका. थिएटरमध्ये जाण्याची गरज उरली नाही. सगळं हातात मिळालं होतं. 

प्रश्न: तुमचा भांगवाडी नाटकाशी संबंध कसा आला? तुम्ही भांगवाडी थिएटरमधील नाटकाचा अनुभव घेतला होता का?

मनोज शहा: हो. मला आठवतं, मी सहा-सात वर्षाचा असताना भांगवाडी थिएटरमध्ये नाटक पाहिलं होतं. त्यातला एक सीन असा होता की एक लाल रंगाची दोन मजली बस रंगमंचावर येते. एक वृद्ध स्त्री रस्ता ओलांडत असताना तिचा अपघात होतो आणि ती मरते. तेव्हा बसचं कटआऊट वापरायचे, पण ते इतकं कमाल बनवायचे की अजूनही ती बस माझ्या आठवणीत आहे. त्यांनी इतकी चांगली कलाकृती तयार केली होती. ते 2D-3D चं चित्र बनवायचे. त्या स्त्रीचा मुलगा अपघात झाल्यावर तिथे येतो. तेव्हा ते सस्किन ह्या कापडापासून तयार केलेले कपडे घालायचे. त्या कापडाची flair चांगली असते, त्याला चांगली चमक असते. टाय, बूट आणि चकाचक कपडे घालून तो मुलगा हिरोसारखा तिथे येतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी उभा राहून त्याच्या आईबद्दल दुःखद गाणं गातो. माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं, अशा प्रकारचं ते गाणं होतं. नाटक बघायला येणारे गुजराती लोक गाव सोडून आलेले असायचे, त्यामुळे ते गाणं ऐकून त्यांना त्यांच्या आईची आठवण यायची, त्यांना बरं वाटायचं.

प्रश्न: ‘मास्टर फुलमणी’ नाटकात साकारलेल्या भांगवाडी थिएटरविषयी, त्याच्या प्रक्रियेविषयी सांगाल का? भांगवाडीची परंपरा नाटकातून दाखवण्यामागची प्रेरणा काय होती?

मनोज शहा: मी जसं सांगितलं, की मी लहान होतो तेव्हा भांगवाडी थिएटरमध्ये पाहिलेल्या बसने मला प्रभावित केलं होतं. मला ती परंपरा आवडायची आणि ती मला माझ्या परीने जपायची होती. दुसरं म्हणजे पुरुषांनी स्त्री भूमिका करण्याचं मला खूप अप्रूप वाटायचं. मलाही एक आव्हान म्हणून तशी भूमिका करायची होती. पण माझा तो काळ गेला. म्हणून मग मी त्याचं दिग्दर्शन केलं. आम्ही त्यात भांगवाडीची सादरीकरण शैली वापरली. ‘बेतबाजी’ (संवादफेक), सगळं exaggerate करून सांगणं अशा गोष्टी नाटकात वापरल्या. याचं कारण असं की आपला आवाज शेवटपर्यंत पोचला पाहिजे. ह्या नाटकासाठी संशोधन करत असताना मला अशी एक व्यक्ती भेटली ज्याच्याकडे भांगवाडीचे ग्रामोफोन रेकॉर्ड होते. त्याच्या मी टेप करुन घेतल्या. संशोधन केलं की कोणत्या प्रकारची धून वापरली आहे, कोणत्या प्रकारचं गाणं वाजवलं आहे. नंतर मी चंद्रचूड ह्या मराठी संगीतकाराला भेटलो. त्यांच्याजवळ ‘पायपेटी’ (पायाने वाजवायची पेटी) होती. मला तीच माझ्या नाटकासाठी वापरायची होती म्हणून मी चंद्रचूड यांना नाटकासाठी बोलवलं. ते खरोखरच मास्टर होते. त्यांनी मला फार मदत केली. नंतर त्यांचा शिष्य निलेश भिवणकर ह्यानेसुद्धा नाटकासाठी काम केलं. आम्ही नाटकाचा यूएसए दौराही केला. आम्हाला नाटकासाठी युरोपियन, इटालियन पेंटिंगप्रमाणे बॅकड्रॉप हवा होता. म्हणून मग मी भूपेन खक्करला विनंती केली. आमच्याकडे फारसं आर्थिक पाठबळ नव्हतं म्हणून आम्ही साधेपणाने नाटकाची निर्मिती केली. माझं उद्दिष्ट हे होतं की मला नाटक हॉर्निमन सर्कलमध्ये करायचं होतं. कारण मुंबईतील पहिलं नाटक हॉर्निमन सर्कलमध्ये झालं होतं जे ब्रिटिश आणि पारसी लोकांनी केलं होतं आणि मी माझं नाटक पृथ्वी फेस्टिव्हल दरम्यान तिथेच केलं. 

प्र. सर, आता भांगवाडी स्टाईलची नाटकं होतात का?

मनोज शहा: नाही होत. आता लोकांची मानसिकता बदलली आहे. बोलण्याची पद्धत बदलली, तंत्रज्ञान आले. आता बोलण्यासाठी तुमच्याकडे लेपल माईक आहेत. काही थिएटर्सना साउंड सिस्टीमचीही गरज नाही. त्यांच्याकडे इनबिल्ट थिएटरची व्यवस्था आहे, माईकची गरज नाही. त्यामुळे ही भांगवाडी परंपरा पूर्णपणे बंद झाली आहे.

प्रश्न:  ही परंपरा पुन्हा सुरु करायची असेल तर काय करायला हवं, असं वाटतं?

मनोज शहा: एका माणसामुळे काही होत नाही. ते माझं स्वप्न होतं, जे मी पूर्ण केलं. आपल्याकडे कितीही समृद्ध परंपरा असली तरी आपली गाडी पैशांवर येते. कारण माणसाला पैसा हवा. समजा, ही परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी कोणीतरी देणगी दिली तरी ते नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक येतील की नाही हीसुद्धा शंका आहे. कोणत्याही एका माणसामुळे हे होऊ शकत नाही. काही परंपरा ह्या सायकलमध्ये वाचतात, काही निघून जातात. पण हे जतन करुन ठेवलं जातंय ही चांगली गोष्ट आहे. सध्या किती मराठी शास्त्रीय संगीत नाटकं होतात? सौभद्र वगैरे…काय नाटकं होती ती! त्यांच्यावर चित्रपट बनले. पण नाटकं होत नाही आणि आपल्यावर वेगवेगळ्या नवनवीन गोष्टींचा प्रभाव पडत चाललाय. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. त्यामुळे हे होतच राहणार. 

प्रश्न: भांगवाडी थिएटरने गुजराती थिएटरला, प्रेक्षकांना काय दिलं, असं तुम्हाला वाटतं? 

मनोज शहा: गुजराती थिएटरवर भांगवाडीचा काही अंशी प्रभाव आहे. तेव्हाच्या काळी भांगवाडी थिएटरने समाजाला मोठ्या प्रमाणात प्रभावित केलं होतं. राजकीय मूल्ये, जीवन मूल्ये या सगळ्यांमध्ये थिएटरने बदल आणले होते. संपूर्ण जगावर नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकाला कहाणी ऐकायची आहे. We humans want to listen to new stories and experience new emotions. हे सगळं तेव्हा नाटकांमध्ये असायचं आणि तोपर्यंत full-fledged cinema आला नव्हता. तो अनुभव घ्यायला लोक भांगवाडीमध्ये यायचे. उदरनिर्वाहासाठी गाव सोडून मुंबईत आलेल्या लोकांना त्यांच्या आईवडिलांची, गावाकडची आठवण करून देणाऱ्या कहाण्या असायच्या. माणसाने कसं वागावं, ह्याचं चित्रण नाटकांमध्ये असायचं. ते पाहून प्रेक्षक हसायचे, रडायचे, गायचे, टाळ्या वाजवायचे. That is theatre!

प्रश्न: गुजराती रंगभूमी आणि मराठी रंगभूमी इतकी वर्षे महाराष्ट्रात एकत्र नांदतायत, तर ह्या दोन रंगभूमींमध्ये नेमकी कशा प्रकारे देवाणघेवाण होते? 

मनोज शहा: गुजराती माणसं ही Business minded असतात. एखाद्या गुजराती निर्मात्याला वाटलं की प्रशांत दामलेचं हे नाटक हिट आहे तर तो निर्माता आधी नाटकाचे शो, तिकीटस् यांची गणितं बघतो. आणि त्याचं गुजराती रुपांतर रंगभूमीवर आणतो. पण तोच निर्माता देवबाभळी करणार नाही. कारण देवबाभळीचा विषय हा गहन आहे आणि मराठी संस्कृतीशी निगडीत आहे. जर त्यात गुजराती संस्कृतीचे घटक टाकता येत असतील तर ते रुपांतरित केलं जाऊ शकेल. गुजरात्यांचं उद्दिष्ट हेच असतं की ‘पैसा मिळाला पाहिजे.’ आणि मराठीतही तेच आहे. ‘कोडमंत्र’ वगैरेसारखी गुजराती नाटकं मराठीतही झाली. ‘मराठी बाणा’सारखा कार्यक्रम गुजरातीत रुपांतरित झाला. अशाप्रकारचं adaptation पूर्ण इंडस्ट्रीमध्ये होत असतं. 

तेजस्वी पाटील 7666038675 Tejasweepatil2000@gmail.com

तन्वी गुंडये 9702844613 tgundaye@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय सुंदर आणि पारंपरिक जुना अनुभव आहे.नाट्यनिर्मिती,परिस्थिती, आणि समाज आवड पाहून या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत.या लेखनातून ठराविक काळ परिस्थिती चे चित्र उभे राहते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here