भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

1
232

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 – 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! 

भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र त्यांचे संशोधन हे विशेष म्हणजे, इंद्राजींचे पेपर त्यांनी गुजराती भाषेत लिहिले होते आणि शिलालेखांचे भाषांतरही त्याच भाषेत केले होते.

आजच्या लेखात डॉ. मंजिरी ठाकूर भारतीय पुरातत्त्व संशोधन क्षेत्रातल्या या महान संशोधकाची माहिती देत आहेत.  

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

भगवानलाल इंद्रजी जुनागढ ते मुंबई – एका शोधकर्त्याचा प्रवास !

भारतीय संस्कृतीचा इतिहास पाहताना किती मागे जाऊन अभ्यास करावा याचे नेमके नियम नाहीत. साधारणपणे सिंधू संस्कृतीपासून उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास सुरू होतो. आपण ब्रिटिशांनी इतिहास ‘रचण्यात’ केलेल्या अनेक गोष्टींच्या गोष्टी ऐकतो आणि वाचतो. बुद्धकाळ, परकीय आक्रमणे, प्रवासी त्यांची टिपणे आणि नोंदी, अनेक राजांच्या, सम्राटांच्या नामावळी यात थोडं गुरफटल्यासारखं होतं खरं, पण गर्द झाडांच्या सावलीत जसे आपण सुखावतो तसेच या साऱ्या इतिहासात सुखावलेलो असतो. इतिहासाच्या पाऊलखुणा नेमक्या पहायच्या कशा? याचे नेमके शिक्षण का दिले जात नाही? वाचनात येणारा प्रत्येक संदर्भ योग्य की अयोग्य? त्यावर किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो? असे अनेक प्रश्न पडू लागले की इतिहासाच्या वाटेला न जाण्याचा निर्णय घेतला जातो. इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यास का आणि किती महत्वाचे आहेत हे, आपलाच इतिहास आपल्याला बाहेरचे येऊन सांगतात तेव्हा लक्षात येतं. दोन – पाचशे वर्षांपूर्वीचे संदर्भ अभ्यासातून विरत जातात, त्यांच्या सांस्कृतिक खुणा नाहीशा होत जातात… मग हजारो वर्षांपूर्वीचे काय? आपल्याकडील ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती. पाली ही बोलीभाषा आणि ब्राह्मी ही लिपी आहे हे देखील अनेकांना माहीत नव्हते तेव्हा काही लोकांनी अभ्यासाला सुरुवात करून त्याची उदाहरणे आपल्यासमोर ठेवली.

हे झाले भाषेविषयी, त्याचसोबत काहींनी अनेक मूर्ती, प्रथा-परंपरा, वेशभूषा अशा संस्कृतीच्या अनेक खुणांना टिपून ठेवले. त्याचा योग्य अभ्यास केला. मी मास्टर्स करताना अशा एका व्यक्तिमत्त्वाने काहीशी भारावले होते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे, भगवानलाल इंद्रजी. भारतीय कला आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला भगवानलाल इंद्रजी हे नाव माहीत नाही असे सहसा होत नाही. त्या काळात भारतात, शिक्षणाची भाषा इंग्लिश नव्हती. राष्ट्रीय उठावाचे वारे पुरेसे जोरात वाहू लागले नव्हते, रामायण आणि महाभारत मुघल लघुशैलीत बंद झालेले होते, भगवान बुद्धांच्या पाऊलखुणा लुप्त झाल्या होत्या, सम्राट अशोक नावापुरताच शिल्लक राहिला होता.

त्या काळात गुजरातमधील जुनागढ येथे भगवानलाल यांचा जन्म ब्राह्नण कुटुंबात 1839 मध्ये झाला. त्यांनी वडिलांकडून संस्कृतचे धडे घेतले. गुजराती कुटुंबात जन्मलेले भगवानलाल जसे मोठे होत गेले तसा त्यांचा अभ्यास, व्यासंग वाढत गेला. तरुण वयात गिरनार पर्वतांमध्ये फिरताना त्यांची अभ्यासू नजर तेथील शिलालेखांवर पडली आणि एका वेगळ्या इतिहासाची नांदी झाली.

रुद्रदमन (पहिला) याच्या शिलालेखाचे काम त्यांच्याकडे 1854 च्या सुमारास आले. सोबतच सम्राट अशोकाच्या ब्राह्मी शिलालेखांवर काम करणाऱ्या लिपीतज्ज्ञ, जेम्स प्रिन्सेपचे लिखाणही त्यांच्या हाती सोपवले गेले. प्रिन्सेपच्या लिखाणाचा भगवानलाल यांना फायदा झाला. त्यांनी स्वतः त्यावर काम करायचे ठरवले आणि स्वतःचे हस्तलिखित तयार करायला सुरुवात केली. त्यांना काहीवेळा जोडाक्षरांच्या अडणचणींमुळे नेमके शब्द उलगडणे जमेनासे झाले. तेव्हा त्यांनी मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) येथील त्यांच्या मित्रांशी संपर्क  साधून गिरनार शिलालेखासंबंधी अभ्यासाचे संदर्भ मागवले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ची अनेक जर्नल्स त्यांच्या हाती आली. अथक प्रयत्नांनंतर भगवानलाल यांना रुद्रदमनच्या शिलालेखाचे सविस्तर पुनर्वाचन केले. त्यांच्या या कामाचे कौतुक केले गेले. काठियावाडचे ब्रिटिश पोलिटिकल एजंट कर्नल विल्यम लँग यांनी हे काम भगवानलाल यांच्यावर सोपवले होते. ते स्वतः ब्राह्मीचे अभ्यासक होते.

रुद्रदमनच्या शिलालेखाबद्दल सांगणे गरजेचे आहे. रुद्रदमन हा पश्चिमी शक क्षत्रपांपैकी एक राजा होता. तो स्वत:ला महाक्षत्रप म्हणवून घेत असे. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सुदर्शन नावाचा तलाव आहे. हा तलाव इसवी सनपूर्व चौथ्या शतकात चंद्रगुप्त मौर्याच्या एका प्रांताधिकाऱ्याने बांधला होता. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत त्याची दुरुस्ती करून तो भक्कम केला गेला. पण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात अतिवृष्टीमुळे त्याला मोठे खिंडार पडले आणि सगळे पाणी वाहून गेले. ही घटना सन 150 च्या ऑक्टोबर महिन्यात घडली. रुद्रदमनाने स्वत:च्या खर्चाने हा तलाव आधी होता त्यापेक्षा तिप्पट भक्कम बांधला. तलावाचा हा इतिहास या शिलालेखात लिहिलेला आहे. लेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि भाषा संस्कृत आहे.   

कर्नल लँग यांच्यानंतर काठियावाडमध्ये आलेले पोलिटिकल एजंट अलेक्झॅन्डर फोर्ब्स यांनी भगवानलाल इंद्रजी यांची गाठ मुंबईतील अभ्यासक डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याशी घालून दिली. काही प्राथमिक पत्रव्यवहारानंतर भाऊ दाजींनी भगवानलाल यांना मुंबईला 1861 मध्ये बोलावून घेतले आणि त्यांची ओळख एशियाटिक सोसायटीचे त्यावेळचे अध्यक्ष, हेन्री न्यूटन यांच्याशी करून दिली.

भगवानलाल यांच्या कामाविषयी डॉ. भाऊ दाजी अत्यंत संतुष्ट होते. त्यांनी भगवानलाल यांना ड्राफ्ट्समन म्हणून अजिंठा येथील गुंफांच्या कामासाठी 1863 मध्ये पाठवले. त्याआधी डॉ. लाड यांच्याबरोबर त्यांनी गिरनार, मध्यप्रदेश येथील अनेक शिलालेखांवर काम केले होते. त्यांना डॉ. लाड यांच्या कामाच्या पद्धतीची नीट माहिती झाली होती. अजिंठा येथील काम उरकून आलेले भगवानलाल यांच्या पोतडीत अनेक विस्मयजनक गोष्टी होत्या. अनेक शिलालेखांचे संदर्भ…! नाशिक, कार्ले, भाजे, भायंदर, जुन्नर, पितळखोरे आणि नाणेघाट येथील शिलालेखांचे काम मोठ्या जोमाने सुरु झाले. या सर्व शिलालेखांचा शोध घेणे, त्यांचा मजकूर निश्चित करणे, संदर्भ शोधून लिहून ठेवणे यात खंड पडत नव्हता. त्यांनी सातवाहन राजा सातकर्णी आणि त्यावेळच्या इतर राजवटींचे संदर्भ शोधण्यात देखील यश मिळवले.

त्यांनी कामाचा सपाटा लावून दिला. अजिंठा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गुफांचे काम आटोपून संशोधनासाठी ते दक्षिण भारतात 1863 मध्ये गेले. त्यापाठोपाठ त्यांनी जैसलमेर येथे एका जुन्या भांडारातील जैन हस्तलिखितांचा अभ्यास 1864 मध्ये सुरु केला. मात्र याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि वर्षाअखेर ते मुंबईला परतले.

ते पुरेशी विश्रांती झाल्यावर उत्तरेकडील बौद्ध आणि हिंदू धार्मिक स्थळांकडे वळले. बनारस, बोधगया, बिहार येथील बाराबर, नागार्जुनी, हाथीगुंफा, ओरिसामधील धौली अशा अनेक स्थळांना भेटी देऊन तेथील शिलालेख, वास्तुकला यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या यथायोग्य नोंदी लिहून ठेवल्या. येणारा प्रत्येक दिवस कामाचा आणि अधिक कामाचा हेच जणू त्यांचे सूत्र झाले होते. त्यांनी हिंदू मंदिरांचा अभ्यास 1868 मध्ये हाती घेतला. नागपूर आणि जबलपूर येथील शिलालेखांचे काम सुरु झाले. सम्राट समुद्रगुप्त याच्या अतिशय महत्वाच्या शिलालेखाचा अभ्यास करून त्यांनी डॉ भाऊ दाजी लाड यांना पाठवून दिला. 

ते पुन्हा उत्तरेतील बनारस, मथुरा, भितारी आणि दिल्ली अशा प्रवासाला 1869 मध्ये गेले. त्यांनी याच सुमारास मथुरा येथील अशोकाचा सिंह स्तंभ शोधून काढला. त्याचसोबत गांधार शैलीतील काम्बोजिका, भगवान विष्णू शिल्प, शिवलिंग अशा अनमोल ठेव्याचा शोध लावला. त्यातील बरेचसे दिल्लीतील संग्रहालयात आहेत. शिवाय स्थानिक लोकांकडून त्यांनी काही नाणी देखील विकत घेऊन त्यावर काम सुरु केले. नाण्यांच्या संबंधात, इंद्रजी हे मोजक्या भारतीय नाणी संग्राहकांपैकी एक होते आणि वैज्ञानिक पद्धती वापरून नाण्यांचा इतका तपशीलवार अभ्यास करणारे ते एकमेव होते. मुंबईला परतण्यापूर्वी त्यांनी पुन्हा बोधगया येथे वास्तव्य केले.

त्यांच्या कामाचा व्याप आणि विस्तार बघता मनाला प्रश्न पडतात. एकतर त्यावेळी प्रवासाच्या सुखसोयी सोडाच, सोयी देखील नव्हत्या. चोवीस तास जळणारे विजेचे दिवे, पंखे नव्हते. पटापट लिहायला कॉम्प्युटर्स सोडा साधे टंकलेखन करता येईल अशीही साधने नव्हती… असो! भगवानलाल यांचा अभ्यासू प्रवास चालूच राहिला. डॉ भाऊ दाजी लाड यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. याचाच परिणाम म्हणजे डॉक्टरांच्या शिफारसीवरून नवीन कामाची मुहूर्तमेढ 1871 मध्ये रोवण्यात आली. जुनागढ येथील संस्थानिकांनी एका उपक्रमासाठी पैसे उभे केले. डॉ लाड यांच्या सांगण्यावरून मथुरा, आग्रा, बनारस, फरुखाबाद, गोरखपूर, गाझीपूर आणि अलाहाबाद येथील मॅजिस्ट्रेट्सना भगवानलाल यांना त्यांच्या शोध कार्यात हवी ती मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन भगवानलाल डॉ लाड यांचा विश्वास पूर्ण करायला निघाले. खांडवा, ओंकारेश्वर, इंदोर, उज्जैन, भोजपुरी, धार, मांडू, भिलसा, सांची, उदयगिरी, बनारस, सारनाथ, अलाहाबाद, भीतरी, दिल्ली, कळशी, मथुरा, आग्रा आणि ग्वाल्हेर अशा लांबलचक प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीने साथ दिली. मात्र शेवटी त्या अतिशय आजारी पडल्या आणि भगवानलाल दौरा आटोपता घेऊन मुंबईला परतले.

त्यांचे महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नाशिक येथील गॅझेटियर्समधील योगदान फार मोठे आहे. त्यांचे जुन्नर, नाणेघाट, पंढरपूर, सोलापूरच्या गॅझेटियर्समध्येही अभ्यासपूर्ण योगदान आहे. त्यांनी मुंबईतील जोगेश्वरी, घारापुरी येथील गुंफामधील मूर्तीकलेचा विस्ताराने अभ्यास केला आहे. त्यांनी भारतातील क्षत्रिय राजांच्या वंशावळीचे काम नाण्यांच्या अभ्यासातून केले. त्यांनी भारतातील अनेक ठिकाणांचा अभ्यास केला ज्यात प्रामुख्याने विविध भाषा, जीवनशैली, संस्कृती, पोशाख, धर्म अशा अनेक तपशीलवार नोंदी आहेत. आपल्या आयुष्याचा हा भला थोरला ऐवज, जो त्यांनी अख्खा भारत पिंजून काढून जमा केला होता, त्यांनी भेट स्वरूपात दान केला. रॉयल एशियाटिक सोसायटी, ब्रिटिश म्युझियम आणि बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी येथे हा अनमोल ठेवा, ज्यात त्यांच्या अभ्यासाची हस्तलिखिते, नाणी आहेत.

आयुष्यात इंग्रजी न शिकलेले, भगवानलाल इंद्रजी 1888 साली प्रदीर्घ आजाराने निर्वतले. अभ्यासाच्या अशा महामेरूचे उल्लेख आताशा पुस्तकांमधून खाली बारीक अक्षरांत लिहिलेल्या फूटनोट्समध्ये असतात. अभ्यासाला विषयाचं बंधन नसते तसेच भाषेचेही हे भगवानलाल इंद्रजी यांच्या उदाहरणाने समजते. अनेक प्रवासवर्णने आपण लिहितो, वाचतो. पण नेमके अभ्यासपूर्ण लिखाणावर लक्ष केंद्रित होत नसते. काही वेळा तर आपल्याच गावात सलग दोन तीन वर्ष गेलो की मागच्या खेपेतील अनेक खाणाखुणा नाहीशा झालेल्या लक्षात येतात. आता तरी कॅमेरे आहेतच म्हणा आपल्या हातात… पण खोलात जाऊन जे पहातो त्याविषयी माहिती गोळा करणे राहून जाते. भगवानलाल यांच्याविषयी लिहिताना अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवत राहिल्या. असेच अजून एक उदाहरण जाता जाता सांगून टाकते… लेडी हेरिंगहम आणि तिची असिस्टंट डोरोथी. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोघी (कशा काय कोण जाणे!) अजिंठा लेणी चितारत होत्या. शोधा बर त्यांना!

डॉ. मंजिरी ठाकूर 9820436045 rtmanjiri@gmail.com

About Post Author

Previous articleभांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)
Next articleसाने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण
डॉ. मंजिरी ठाकूर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम ए आणि पी एचडी केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि कान्हेरी येथील लेण्यांमधील शिल्पकला हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांना ऑक्सफर्ड सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज, ऑक्सफर्ड, युकेची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप तसेच हेरास इन्टिट्यूटची सर दोराब टाटा फेलोशिप मिळाली आहे. त्यांनी महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या टुरिझम डिपार्टमेंटसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या डेप्युटी क्युरेटर होत्या. त्यांनी कलेतिहासाशी संबंधित विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांचे शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्या जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कलेतिहासाच्या संलग्न प्रध्यापक म्हणून कर्यरत आहेत.

1 COMMENT

  1. उत्तम माहिती पाठवल्याबद्दल धन्यवाद असेच नेहमी पाठवत राहावे ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here