अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…

2
250

अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात सध्या हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे एक हॉटेल कनकुरे यांच्या नावाने प्रसिद्ध होते. थोडेसे अंतर चालून गेले, की चावलमंडीच्या चौकात पुन्हा ‘बिन’ नावाचे आणखी एक हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. चावलमंडीच्या शेवटच्या चौकात मच्छी टांग येथे ‘गोपाल’ नावाचे एक हॉटेल आणि दोन-तीन हॉटेले देवडीवर… त्यांचे बोर्ड कधी पाहिलेच नाहीत ! त्यातच एक देवडी आणि बुंदेलपुरा या दोन मोहल्ल्याच्या सीमेवर श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई.

नाम्याचे प्रसिद्ध भजे! भजे म्हणजे साधारण बेसनाचे हा आपला समज, पण बेसनाव्यतिरिक्तही भजी बनवता येतात हा शोध बहुधा अचलपुरच्या नाम्यानेच लावला असावा. नाम्या म्हणजे नामदेवराव राऊत, पण त्याला कोणी नामदेव म्हटल्याचे स्मरणात नाही. तो आख्ख्या अचलपूर-परतवाड्यात नाम्या म्हणूनच प्रसिद्ध होता. नाम्याचा तो जमाना मिक्सर आणि ग्रार्इंडर यांचा नव्हता. नाम्याने बरबटीच्या भज्यांची रेसिपी शोधली. बरबटीची डाळ हा शब्द विदर्भातील. बरबटी म्हणजे चवळी. विदर्भात बरबटीची डाळ सर्रास मिळते. बरबटीची डाळ सकाळी भिजत घालून ती दुपारी चार वाजता जात्यावर दळली, की नाम्याच्या भज्याची पूर्वतयारी झाली ! नाम्याची टपरीच मुळी संध्याकाळी पाच वाजता उघडे, दळून आणलेल्या डाळीमध्ये, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण यांचा पेंड वाटून तो कालवायचा. चवीपुरते मीठ टाकून मिश्रण हाताने फेटायचे.

दुकानाची साफसफाई झाली की नाम्याची भट्टी पेटवण्याची सुरुवात होई. नाम्याने टपरीच्या एका बाजूला विटांच्या दोन भट्ट्या करून ठेवल्या होत्या. त्यात लाकडे खाली टाकली, की भट्टी पेटायची. ती भट्टी आज पण तशीच पेटते ! नाम्याची तिसरी पिढीसुद्धा गॅसची शेगडी वापरत नाही.

भट्टी पेटली, की त्यावर नाम्या कढई ठेवत असे. त्यात स्वच्छ व शुद्ध तेल टाकले, की ते गरम होईपर्यंत नाम्या खलबत्त्यात लाल-हिरव्या मिरच्या, लसूण टाकून ते कुटण्यास बसत असे. ती भज्यांबरोबर तोंडी लावण्याची चटणी असे. तीसुद्धा नाम्याची स्पेशालिटी होती. नाम्या तेल गरम झाले, की त्यात भजी सोडायचा. त्याने ती सोडण्याची कलादेखील वैशिष्टयपूर्ण पाळली होती. त्याने काढलेली भजी एकाच आकाराची येत. पुरे अचलपूर-परतवाडाकर नाम्याच्या भज्यांकडे आकर्षले गेले होते. कोणाच्याही घरी पाहुणे आले म्हणजे त्यांना ती भजी हमखास खिलवली जात. तो पाहुणा पुन्हा आला तर तो स्वतःच तोंडाने म्हणे, ‘आम्हाला नाम्याचे भजी नाही का खाऊ घालणार?’

नाम्याच्या हॉटेलच्या टपरीतील दुसरा हमखास वेगळा पदार्थ म्हणजे ‘फॉर्मुला’. हे नाव कोणी दिले त्याचा काही थांगपत्ता लागत नाही, पण भजी खाण्यास आलेले गिऱ्हाईक दुसरा पदार्थ हमखास मागवत असे, तो म्हणजे ‘फॉर्मुला’ ! फॉर्मुला म्हणजे रबडी आणि त्यात गुलाब जामुन. त्याचा फॉर्मुला 1 + 1 असे. म्हणून त्या पदार्थासच ते नाव पडले असावे. नाम्याच्या घट्ट रबडीची चव दीर्घकाळ तोंडात रेंगाळत असे. नाम्या गेला आणि ‘फॉर्मुला’ बंद पडला ! नाम्याचा शेवटचा पदार्थ म्हणजे चिवडा. टपरीवरील भजी संपली तर गिऱ्हाईक खाण्यासाठी चिवडा मागत असे. नाम्याचा चिवडा होताच वैशिष्टयपूर्ण. एवढे तीनच पदार्थ नाम्याच्या हॉटेलमध्ये मिळत. समोसा, कचोरी, मिसळ हे पदार्थ नाम्याच्या खिजगणतीतही नव्हते.

नाम्याचे हॉटेल संध्याकाळी पाच वाजता सुरू होई, ते रात्री दुसऱ्या शो चा मध्य होईपर्यंत चालू असे. आम्ही ‘बाविशी’च्या नाटकाची तालीम संपली, की बरोबर दहा वाजता नाम्याच्या हॉटेलमध्ये जात असू. तोही आमची वाट पाहायचा. आमच्या मित्रांपैकी सुधाकर कुळकर्णी याची आणि नाम्याची चांगलीच मैत्री होती. तो गणपती उत्सवातील नाट्यतालमींचे भज्यांचे पैसेही कधी कधी घेत नसे. म्हणे, तेवढीच गणपतीची सेवा ! नाम्याच्या हॉटेलात प्रवेश केला, की आमचा सुधाकर कुळकर्णी गाणे म्हणण्यास सुरुवात करे. (भज गण रामदयाल या गाण्याच्या चालीवर.)

भजे घे न ताजे छटाक, अरे नाम्या
भजे घे न ताजे छटाक
सेवही घेजो, पपडीजी देजो, अरे देजोरे
फार्मुला छान – नाम्या भजे घे न ताजे छटाक !

नाम्याच्या तिसऱ्या पिढीची म्हणजे नातवांची चार-पाच दुकाने देवडीवर लागली आहेत. पण ज्यांनी नाम्याच्या हातची भजी खाल्ली, ते नातवांच्या भज्यांना म्हणतात, प्रयत्न चांगला, पण नाम्याची सर नाही. आणि तेही खरेच ! मी कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलो, पण नाम्यासारखी भजी मात्र मला कोठेही खाण्यास मिळाली नाहीत. नाम्याने सुरू केलेल्या बरबटीच्या भज्यांची सध्या अचलपुरात रेलचेल आहे. विदर्भ मिल चौकात, स्टॅण्डवर भज्याची दोन दुकाने लागली आहेत. ते दिवसभर भजी विकत असतात, पण नाम्याच्या सांज भज्याची चव त्यांना नाही.

कनकुरेचा पेढा आणि मिसळ – चावलमंडीमध्ये पहिले हॉटेल कनकुरेचे लागायचे. त्याची हकिगत वेगळीच होती. ते हॉटेल सागाच्या घडीच्या फटीच्या दरवाज्याचे. ते मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला होते. मुळात अचलपुरातील रस्ते अरूंद. जुन्या काळी दोन टांगे, गाड्या जेमतेम पास होतील इतकाच रूंद रस्ता. म्हणून अचलपुरात बस अजूनही चावलमंडीतून पास होत नाही. त्या अरूंद रस्त्याला लागूनच कनकुरे यांचे हॉटेल होते. ते हॉटेल पेढ्यांसाठी प्रसिद्ध. खरपाच्या दगडाच्या (सुरी-चाकू-कैची-कात्री वगैरेंना धार लावण्याचा, त्याला सहाण असेही म्हणतात) आकाराचे लांब लांब पेढे, अचलपुरात मिठाई खरीदण्यासाठी सर्व जण त्याच हॉटेलचा उपयोग करत. कनकुरे यांच्या हॉटेलचा दुसरा फेमस पदार्थ म्हणजे मिसळ. त्या हॉटेलमध्ये गिऱ्हाईक बहुधा मिसळ खाण्यास यायचे. मिसळ फार चविष्ट असायची. त्यात दोन किंवा तीन बेसनाची भजी, चिवडा, शेव आणि थोडी पापडी असे पदार्थ असत आणि त्यावर चण्याचा गरम रस्सा ! त्यातील बारीक शेव आणि सदैव गरम रस्सा यामुळे मिसळ फारच चविष्ट लागायची, खाकी हाफपॅण्ट आणि वरती फक्त बनियान घातलेला, थोडेसे टक्कल असलेला वेटर त्याच्या बोलण्याने लक्ष वेधून घ्यायचा. शिवाय, तो रस्सा गरम करताना भट्टीवर लागलेले सायकलचे चाक विशिष्ट गतीने फिरवायचा. त्याचा घर्र आवाज एका वेगळ्याच संगीताची जाणीव करून द्यायचा.

भुरूमलची कॉफी – कनकुरे यांच्या हॉटेलची मिसळ खाल्ली, की लोक भुरूमलच्या हॉटेलमध्ये कॉफी पिण्यास जात असत. भुरूमलच्या कॉफीची चव वेगळीच लागत असे. नंतर समजले, की तो चिखलदऱ्याच्या जंगलातून कॉफी झाडांच्या बिया आणून घरी भुगरी बनवत असे. त्यामुळे कॉफी ‘नॅचरल’ असून तिची चव वेगळीच लागे.

विदर्भ मिलच्या कॅण्टिनचे आलु बोंडे – विदर्भ मिल राजाभाऊ देशमुख यांच्या मालकीची होती. राजाभाऊंनी मजुरांना सकाळचा नाष्टा चांगला मिळावा म्हणून स्वतंत्र कॅण्टिनची व्यवस्था केली होती. विदर्भाचा आवडता पदार्थ म्हणजे आलुबोंडे, पुण्या-मुंबईकडे त्याला बटाटा वडा म्हणतात. मुंबईत त्याचा वडापाव करून खातात. विदर्भात वड्याबरोबर पाव कोणीच खात नाही, तर त्या बरोबर तर्रीचा रस्सा असतो. तर्रीच्या रश्श्यात ‘आलू बोंडा’ कुस्करून, त्यावर थोडे दही (मागेल त्याला) टाकले की त्याची चवच न्यारी ! तर्रीच्या रश्याची चवच न्यारी लागते. ‘लई भारी !’ असे म्हणत मिल मजूर त्यावर ताव मारायचे, पण अचलपूर-परतवाडा शहरांतील खास शौकिनही नऊ ते दहाच्या दरम्यान विदर्भ मिलच्या कॅण्टिनमध्ये पोचत.

परतवाड्याचे गोपाल हॉटेल – परतवाडा येथील दुराणी चौकातील गोपाल हॉटेल प्रसिद्ध होते. त्या हॉटेलचे पेढे दूरवर जात. कमी साखरेचा, उत्तमोत्तम खव्याचा त्यांचा पेढा प्रसिद्ध होता आणि आजही आहे. त्यांच्याकडे सकाळी निघणारे बरबटीचे वडेदेखील लोक चवीने खातात.

स्टेट बँकेजवळील दादारावचे वडे – सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दादारावच्या टपरीवर गरम वडे आणि आलुबोंडे निघत. ती टपरी स्वच्छतेसाठी आणि शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. रोज शुद्ध ताज्या तेलात काढलेले वडे व आलुबोंडे लोक पार्सलने घरच्या पाहुण्यांसाठी घेऊन जातात.

खाण्याची हौस बरीच वाढली आहे. तरुणांनी/महिलांनी नोकऱ्या मिळत नसल्यामुळे शहरभर मिळेल त्या जागेत हॉटेले लावण्यास घेतली आहेत. पण त्यांनी काही वैशिष्टये पाळलेली दिसत नाहीत, समोसे, कचोरी, वडे, फाफडा, मिसळ; एवढेच नाही तर चाईनीज पदार्थ व पिझ्झा आणि बर्गरही मिळू लागले आहेत. पण नाम्याच्या भज्यांची, कनकुरे यांच्या मिसळीची आणि भुरूमलच्या कॉफीची जी चव रेंगाळते ती काही केल्या जात नाही.

– अशोक बोंडे 9619246124

—————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. अगदी जुन्या काळाची सफर घडवली.कदाचित नगरपरिषद जवळची गुळपट्टी व गोपालचा दहिकलाकंद विस्मरणात गेला की काय!

  2. एक सुंदर खाद्य प्रपंच आणि अनुभव आहे.आपल्या लिखाणातून एकदा तरी या परिसराचा अनुभव घ्यावा असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here