पातंजल योगदर्शन (Paatanjal Yogdarshan)

0
300

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. जागतिक पातळीवर तो व्यायामाचा प्रकार म्हणून लोकप्रिय होत आहे. योग दिन (21 जून) हा जगातल्या अनेक देशांमध्ये साजरा होतो. भारताने जगाला दिलेल्या महत्त्वाच्या देणग्यांपैकी योग ही एक देणगी आहे. मात्र ही देणगी भारताला दिली आहे ती पतंजली या इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या मुनींनी.

योगाचे मूळ काय आहे आणि पतंजलींनी त्याचा अभ्यास करण्याची सांगितलेली पद्धत याचा सोप्या भाषेत परिचय करून देत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम.

मोगरा फुलला या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

पातंजल योगसूत्रे

पतंजली ऋषींनी मनुष्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कसे वागावे हे सूत्रबद्ध रीतीने वर्णन केलेले आहे. त्यासाठी त्यांनी मनुष्यांच्या मानसिक आणि शारीरिक व्यवहारांचा अभ्यास केला आणि सूत्रे लिहिली. ती 195 सूत्रे, पातंजल योगसूत्रे म्हणून ओळखली जातात. पतंजली, हे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेले. डॉ. भांडारकर यांनी पतंजलींचा काळ इसवी सनपूर्व 158 सांगितला आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील गोंदरमऊ ह्या ठिकाणी झाला होता. व्याकरणकार पाणिनी हे पतंजलींचे शिष्य होते असे मानले जाते, पण दोघांचा काळ वेगवेगळा आहे. पतंजली अभ्यास व संशोधन यासाठी काशीमध्ये आले. त्यांनी पुढे काशीमध्येच कायमस्वरूपी वास्तव्य केले.

पतंजलींनी ‘योगसूत्र’, ‘अष्टाध्यायी’ व ‘आयुर्वेद’ हे ग्रंथ लिहिले. त्यांनी पाणिनीच्या व्याकरण ग्रंथाचे विश्लेषण करणारा ‘महाभाष्य’ नावाचा ग्रंथही लिहिला आहे. ते आयुर्वेदातील चरक परंपरेचे जनक होते असे मानले जाते. भारतात होऊन गेलेल्या, बहुमुखी प्रतिभा असलेल्या विद्वानांमध्ये पतंजलींची गणना होते. भर्तृहरीने त्यांना नमन करताना त्याच्या ‘वाक्यपदीय’ ग्रंथाच्या प्रारंभी पुढील श्लोक लिहिला आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलिरानतोस्मि ॥

योगाने चित्ताचा, व्याकरणाने वाणीचा व वैद्यकाने शरीराचा मल ज्याने दूर केला, त्या मुनिश्रेष्ठ पतंजलीला मी हात जोडून नमस्कार करतो.

पतंजली विज्ञानवादी, वस्तुनिष्ठ व तर्काधिष्ठित लिहिणारे व बोलणारे होते. राजा भोज यांनी पतंजलींचे वर्णन शरीराची व मनाची चिकित्सा करणारा मुनी असे केले आहे. पतंजलींचा योगसूत्र हा ग्रंथ लोकप्रिय आहे. त्याचे चाळीस भाषांत भाषांतर झाले आहे. रामचंद्र दीक्षित यांनी पतंजली चरित्र लिहिले आहे. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे.

विश्वयोग दिवस अनेक देशांत साजरा केला जातो. पतंजलीचे योग तत्त्वज्ञान व सराव विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अधिक लोकप्रिय झाले. ‘सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप’ ही पहिली संस्था अमेरिकेमध्ये 1920 साली सुरू झाली. गेल्या पन्नास वर्षांत  चांगल्या योग संस्था त्याचबरोबर संप्रदायबाह्य वर्गही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.

पतंजलींनी योगाचे चार टप्पे सांगितले आहेत. ते टप्पे सामान्य माणसाने दैनंदिन व्यवहारात अवलंब करण्यासाठी आहेत. पतंजलीने सांगितलेला हटयोग व काही गोष्टी प्रचलित नाहीत.

पतंजलींच्या म्हणण्यानुसार योग व ध्यान या गोष्टी सततच्या सरावाने माणसाला साध्य होतात. त्यांनी त्या गोष्टी साध्य होण्यासाठी करावा लागणारा अभ्यास क्रमवार सांगितला आहे, त्यांनी योग प्रक्रियेचे आठ प्रकारांत वर्णन केले आहे. ते त्याला अष्टांग योग म्हणतात. ते असे: 1. यम, 2. नियम, 3. आसन, 4. प्राणायाम, 5. प्रत्याहार, 6. धारणा, 7. ध्यान, 8. समाधी. योगसाधनेतील हे आठ टप्पे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत शरीर व मन यांच्या लवचीकतेची तयारी आहे. यम म्हणजे संयम. दुखापतीपासून माणसाला दूर ठेवणारा यम आहे. नियम म्हणजे शिस्त व अभ्यास होय. यम व नियम हे मनाला वळण लावण्यासाठी आहेत. आसन व प्राणायाम हे शरीराला लवचीक व निरोगी बनवण्यासाठी आहेत. आसनांमुळे शरीरातील फारशी हालचाल न होणाऱ्या अवयवांचीही हालचाल होते. त्यामुळे शारीरिक क्षमता कायमस्वरूपी टिकून राहते. प्राणायामामध्ये श्वास नियंत्रण होते. श्वास लय स्थिर करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी उपयुक्त आहे. मनाची क्षमता वाढवण्यासाठी, मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी दीर्घ श्वास, उच्छवास व श्वास रोखून धरणे यांचा उपयोग होतो असे पतंजलींनी सांगितले आहे. पाचवा टप्पा प्रत्याहार. प्रत्याहार ही बाह्य गोष्टींतून लक्ष काढून घेण्याची क्षमता आहे. धारणा म्हणजे धरून राहणे. बाह्य गोष्टींची जाणीव एका वस्तूमध्ये दीर्घकाळ धरून ठेवण्याची क्षमता होय. ध्यान म्हणजे अहंकाराच्या पलीकडे जाऊन मन स्थिर करणे. शेवटचा प्रकार समाधी, म्हणजे निरपेक्ष असण्याची किंवा बनण्याची स्थिती होय.

पतंजलींनी योगसूत्राचे चार भाग केले आहेत. 1. चिंतन, 2. सराव, 3. सिद्धी, 4. निरपेक्षता. पतंजलीच्या सूत्रानुसार योग स्व-सुधारणा, स्व-नियंत्रण, स्व-तडजोड यांवर बेतले आहे. बाह्य गोष्टी चुकीच्या असतात. चुकीच्या गोष्टी व्यक्तीच्या मनात बसतात. व्यक्तीचा ताबा मनावर हवा, पण मन व्यक्तीवर ताबा ठेवते. सुख, सुसंवाद व सामंजस्य हवे असेल तर चुकीच्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. स्वार्थ व प्रेम, दोन्ही दुःख देते, कारण ते अपेक्षांवर आधारलेले असते. राग किंवा संताप याचा उद्देश चांगला असेल तर शांतता लाभते. उदाहरणार्थ, पालक व शिक्षक मुलांना वळण लावण्यासाठी रागावतात. योग स्वतःचे विचार पाहायला व पृथक्करण करायला शिकवतो. आजची सगळ्यात उत्तम गोष्ट उद्याची सगळ्यात वाईट गोष्टही होऊ शकते. नकारात्मक विचार आपल्यावरच येऊन आदळतात व दुःख देतात. मन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग व त्या योगाचा सराव हवा. एका दिवसाच्या किंवा अधूनमधून कधीतरी केलेल्या सरावाने हे साध्य होत नाही. तुम्ही किती वर्षे योग व ध्यान करता यापेक्षा कसे करता हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी धीर, श्रद्धा, विश्वास, संयम, गांभीर्य व गुणवत्ता या गोष्टींची गरज आहे. एखादी गोष्ट वारंवार करण्याची इच्छा झाली की ती थांबत नाही. उदाहरणार्थ, चहा, दारू पिण्याची इच्छा. त्याला व्यसन म्हणतात. पण त्या इच्छा संपवण्यासाठीसुद्धा सातत्य व सराव हवा. मनावर नियंत्रण हवे. वैयक्तिक गोष्टीसाठी ओढ व महत्त्व असण्यापेक्षा इतरांसाठी ओढ असेल तर त्यातील आनंद महत्त्वाचा असतो. निस्वार्थी व्यक्ती ही सर्वात स्वार्थी असते. ती व्यक्ती कधीही सुख व शांतता हरवत नाही. सत्ता व भौतिक गोष्टींचा हव्यास असणाऱ्या व्यक्ती सर्वात दुःखी असतात. गुहेत जाऊन, साधना करून जीवनमुक्त होता येत नाही. प्रथम जीवन समजून घेणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व नकळत अनासक्त होणे ही समाधीच आहे. चूक होणे स्वाभाविक आहे, पण त्यापासून धडा काय घेतला, चूक सुधारण्यासाठी प्रयत्न काय केले हे महत्त्वाचे आहे. सरावाने या गोष्टी साध्य होतात. शारीरिक दुखणे माणसाला आळशी बनवते. आळशी मन सतत शंकेखोर बनते. त्यानंतर जीवनच निष्क्रिय बनते. या सगळ्या वृत्ती मनाच्या असतात, त्यांना बाहेर काढणे शक्य असते. मन नेहमी आळशी अवस्थेत राहत नाही. त्यामुळे स्वत:ची क्षमता ओळखण्याचे आव्हान माणसाने स्वीकारले पाहिजे. मन अस्वस्थ असेल तर शरीर थरथरते, श्वास अनियमित होतो. या गोष्टींना योग्य आहार, व्यायाम व योग्य विश्रांती यांच्या साहाय्याने मार्गावर आणता येते. स्वभाव, क्षमता, आवडीनिवडी या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, त्यानुसार त्याचा स्वीकार केला पाहिजे, हे सांगताना पतंजलीने चार वृत्ती जोपासायला सांगितल्या आहेत. सुखी असणाऱ्यांशी तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे व सुखी झाले पाहिजे. दुःखी असणाऱ्याला अनुकंपा किंवा मदतीचा हात दिला पाहिजे. सद्गुणी असणाऱ्याविषयी आनंदी भावना व्यक्त करत सदगुण शिकता आले पाहिजे आणि जो दुष्ट आहे त्याच्या मार्गात जाऊन संकट ओढवून घेऊ नये.

पतंजलींच्या मते, सुखी असणाऱ्याचा हेवा वाटतो, दुःखी असणाऱ्या माणसाविषयी अलिप्तता असते. माणसाने दुसऱ्याचा हेवा केला तर त्याची मन:शांती ढळते व माणूसच दुःखी होतो. उलट, ज्याचा हेवा करतो तो त्याच्या आनंदात जगत असतो. आपले मन शांत ठेवणे हे आपले ध्येय हवे. त्यासाठी प्राणायाम उपयोगी पडतो. श्वास, उच्छवास व श्वास रोखून धरणे यांचा सराव उपयोगी पडतो. दीर्घश्वास चिंता, राग, गोंधळ यांतून मुक्तता देतो.

ध्यानाचे तंत्र सांगताना पतंजलींनी सुरुवातीला एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करावे असे सांगितले आहे. उदाहरणार्थ; नाकाच्या टोकावर, जिभेच्या टोकावरही मन एकाग्र करणे शक्य असते. श्वासावर लक्ष ठेवावे, हळूहळू मन एकाग्र होत जाते. ध्यानासाठी मन स्वच्छ व निरोगी असणे आवश्यक आहे. पतंजलींनी अशा अनेक व्यावहारिक सूचना दिल्या आहेत. वेदनेचा स्वीकार करणे मनशुद्धीसाठी आवश्यक आहे व ते सरावाने होते. दुसऱ्याला दुःख देणे सोपे असते, पण दुसऱ्याने दिलेले दुःख काहीही प्रतिसाद न देता स्वीकारणे महत्त्वाचे असते. एक वेळ अशी आली पाहिजे, की दुःख देणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यामुळेच माणूस मनाला स्थिर करायला शिकतो. पतंजलींना साधू लोकांचे खिळ्यावर झोपणे वगैरे अघोरी प्रकार मान्य नाहीत. खूप पुस्तके वाचून व योगाचे सिद्धांत वाचून योग येत नाही. त्यासाठी नियमितपणा हवा. प्रेम, दातृत्व, श्रद्धा असेल तर योग कायमस्वरूपी आनंद व शांतता देऊन जातो. अज्ञान, स्वार्थ, तिरस्कार हे योगाच्या मार्गात अडथळे आहेत. मन सतत सुखाच्या शोधात असते, पण सुख माणसाच्या आत असते, ते माणसाला कळत नाही. व्यक्तीला सुखी किंवा दु:खी दुसरा वा दुसरी कोणी करू शकत नाही. ती ती व्यक्ती स्वत:च त्याची निर्मिती करते. व्यक्तीच तिची शत्रू व मित्र असते. चांगले काही केले तर सुख मिळते. चुकीचे केले तर दुःख मिळते. सत्ता, सौंदर्य, पैसा या गोष्टी गमावण्याची भीती व चिंता माणसाला असते. तो त्या भीतीपायी जवळ असणाऱ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही.

योग ही अनुभवण्याची गोष्ट आहे. स्वत:च्या शरीराला व मनाला ताठरपणा व कडकपणा ती व्यक्ती घेत असलेल्या तणाव व विषारी घटकांमधून येतो. पतंजलींच्या मते, प्रथम शरीर नियंत्रण, मग श्वास हालचाल, त्यानंतर जाणीव व शेवटी मन नियंत्रण; हे सहज सोपे व विज्ञानावर आधारित असून सरावाने साध्य होऊ शकते. योग व ध्यान यांनी शरीर व मन यांवर नियंत्रण आले की राग येणे, चिडणे, रडणे, स्तुती यांचा परिणाम होत नाही. त्या भावना स्वाभाविक आहेत. त्या मनात निर्माण होणार, पण त्या नियंत्रणात ठेवणे हे महत्त्वाचे आहे. खूप खाणे, उपाशी राहणे, खूप झोपणे किंवा जागरण करणे हे योगविद्येला अपेक्षित नाही. सतत सरावाने मन स्थिर होते. त्याला पतंजली धारणा (धरून ठेवणे) म्हणतात. मन एकाग्र झाल्यानंतर शरीराचा विसर पडतो. शरीर हलके होते. काहीतरी हेतू ठेवून कोणत्याही भावनेच्या मागे धावणे अयोग्य आहे. लोकांना मदत करतो ही भावनादेखील अयोग्यच आहे. तुमच्या मनात आपसूक सेवेची भावना येईल तेव्हा ती योग्य आहे.

संस्कृत योगसूत्रांचा भावार्थ सांगणारा अनुवाद श्री स्वामी सच्चिदानंद यांनी इंग्रजीमध्ये  केला आहे. पतंजलींचा दृष्टिकोन व्यापक असून, तो सर्व पद्धतींचा स्वीकार करणाऱ्या गुणविशेषाचा आदर्श नमुना म्हणून ओळखला जातो. पतंजलींनी त्यांची सूत्रे एका ठरावीक साच्यात बसवली नाहीत. त्यांनी एखादा ठरावीक धर्म किंवा विशिष्ट तत्त्वज्ञान यांचा पुरस्कार केलेला नाही. त्यांनी सर्वसामान्य तत्त्व व विशिष्ट उदाहरणे घेतली.

हे ग्रंथ ज्या काळात अस्तित्वात आले, तेव्हा ज्ञानाचे संकलन आणि प्रसार असे काम मौखिक पद्धतीने होत असे. संकलित केलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहवे, ह्याकरता ते कमीत कमी शब्दांत, सूत्रबद्ध पद्धतीने दिले जाई. त्याचा उच्चारही विशिष्ट पद्धतीने केला जाई. मात्र प्रत्यक्ष प्रसंगात त्या ज्ञानाचा उपयोग करताना सूत्राचे वेगवेगळे अर्थ निघण्याची शक्यता असे. अशा वेळी त्यांची अर्थनिश्चिती करण्याकरता स्पष्टीकरणांची आवश्यकता वाटत असे. त्यातून वेगवेगळ्या भाष्यांचा जन्म झाला. सामान्य लोकांना सूत्रांचा अर्थ समजावा आणि त्यांना वैयक्तिक जीवनात त्यांचा वापर सहजपणे करता यावा ह्याकरता भाष्ये लिहिली गेली. पतंजलींनी पाणिनी यांच्या व्याकरणसूत्रांचेदेखील महाभाष्य लिहिले आहे. योगसूत्रांचे नंतर अनेक भाष्यकार झाले.

पतंजलींनी योगसूत्रे लिहिण्यापूर्वीही योग अस्तित्वात होताच. पतंजलींनी त्यांच्या आधीच्या सर्व अभ्यासाचे सार अत्यंत सुस्पष्ट आणि समर्पक शब्दांत सूत्रबद्ध केले आणि योगसूत्राची संहिता सिद्ध केली. ती एकविसाव्या शतकातही मानवजातीला मार्गदर्शक ठरत आहे.

– वृषाली मगदूम 9322255390 vamagdum@gmail.com
(संदर्भ : The Yoga Sutras of Patanjali by Shri Swami Satchidananda)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here