दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)

0
485

दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. मंडलीक आडनावाचा राजा इसवी सन 1460 च्या सुमारास सौराष्ट्रामध्ये होता. त्याचे राज्य इस्लामी आक्रमणामुळे नामशेष झाले. मंडलीक कुटुंबे देशाच्या वेगवेगळ्या भागांत वास्तव्यासाठी गेली. त्यांपैकी एक गंगाधर भट (मंडलिक) कोकणात पोचले व वसाहत करण्यास जागा शोधू लागले. त्या गंगाधर भट यांनी (महर्षी कर्वे यांचे) मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्म समभावाची दृष्टी लक्षात येते.

दुसऱ्या बाजीरावाचे लग्न धोंडो नारायण मंडलीक यांच्या मुलीशी इसवी सन 1793 मध्ये झाले. धोंडो नारायण यांचा नातू म्हणजे रावसाहेब. रावसाहेब यांनी मंडलीक घराण्यात मोठे नाव काढले. रावसाहेब यांचा जन्म 1833 साली झाला. ते मुंबई हायकोर्टात न्यायाधीश झाले. ते अत्यंत वक्तशीर होते. त्यांच्या जाण्यायेण्यावरून लोक घड्याळ लावत. रावसाहेब स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा, प्राचीन ग्रंथांचे संशोधन, स्थानिक स्वराज्याची चळवळ अशा अनेक व्यापांत गुंतलेले असत. रावसाहेब मंडलीक यांची गौरव सभा 1888 साली झाली. त्यावेळी ‘सुधारक’कर्ते गो.ग. आगरकर यांनी सांगितले, की “मंडलीक यांच्यासारख्या लोकांमुळे राष्ट्र मोठेपणा पावते. मंडलीक हे भाट्ये, पारशी व मुसलमान या तिन्ही समाजांत सख्य प्राप्त करून घेणारे पहिले हिंदू होत.” ते मुंबई कौन्सिलवर आठ वर्षे आणि वरिष्ठ कौन्सिलवर तीन वर्षे कार्यरत होते. त्यांनी तेथे इंग्रज राजवटीचे दोष संयत शब्दांत स्पष्टपणे दाखवले. ते त्यांनी कायद्याच्या आधारे केले. ते त्यांचे मोठेपण होय. तोपर्यंत असे धाडस कोणा भारतीयाने केले नव्हते.

संबंधित लेख –
रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श
जी.व्ही. – आप्पा मंडलिक – गरिबांचे डॉक्टर

वासुदेवराव मंडलीक हे रावसाहेब यांचे पुतणे. वासुदेवराव सुरुवातीला मुरूडमध्येच राहत असत. त्यांना रावसाहेबांनी मुंबईला आणले. त्यानंतर त्यांना पुण्यात नेऊन त्यांचे नाव तेथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घातले. वासुतात्यांना लोकमान्य टिळक यांच्यासारखे शिक्षक लाभले. तो परिसस्पर्शच ठरला. वासुतात्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक होऊन पुण्याच्या लॉ कॉलेजमधून वकिलीची परीक्षा दिली. वासुतात्यांनी वकिली अमरावतीला सुरू केली. त्यांच्या आईने त्यांना तेथून दापोलीला बोलावून घेतले. वासुतात्यांची वकिली रत्नागिरी कोर्टात चांगली चालू लागली. लक्ष्मीचा ओघ सुरू झाला. वासुतात्यांनी तो शेती-बागायती घेण्याकडे वळवला. त्यांनी कुंभव्याची बागायत व निळवणे गावी जमिनी खरेदी केल्या. मात्र त्यांनी शेती-बागायती नुसती लोडाला टेकून केली नाही तर कुदळ-फावडे हाती घेऊन आणि जनावरांचा कासरा हातात धरून; वेळप्रसंगी, शेतीवर जाऊन ते स्वतः शेतात इतर मजुरांबरोबर राबत असत. ती त्यांची लहानपणापासूनची आवड होती.

वासुतात्या तापट आणि करारी होते. कोणावरही चटकन हात उगारत. ते लोकमान्यांचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यामध्ये वृत्तीही राष्ट्रीय आणि सरकारविरोधी बाणली होती. त्यांना सर्वाना शिक्षण मिळायलाच हवे असे वाटे. वासुतात्या यांनी त्यांच्या सुभद्रा नावाच्या मुलीला दापोलीच्या मिशन हायस्कूलमध्ये शिकण्यास पाठवले. ती शाळेत जाणारी दापोली तालुक्यातील पहिली मुलगी होय. त्यांचा आग्रह सर्व गडीमाणसांना निदान सही तरी करता आली पाहिजे असा असे. त्यांची मोठी मुलगी यजमानांच्या निधनामुळे माघारी आली तरी त्या काळातील रुढीप्रमाणे वासुतात्यांनी तिचे केशवपन केले नाही, तर तिला शिक्षण दिले.

वासुतात्यांना एकूण बारा मुले झाली. सर्व उच्चशिक्षित, म्हणजे डॉक्टर, इंजिनीयर, वकील वगैरे. मोठ्या दोन मुली कमी शिकल्या. धाकट्या दोन मुली- भीमा व सुभद्रा या मॅट्रिक होऊन वैद्यकीय शिक्षण घेणार होत्या. पण त्या दोघींना क्षयाची बाधा झाली. त्यामध्ये भीमा यांचे निधन झाले. सुभद्रा मात्र वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षेपर्यंत छान आयुष्य जगल्या. वासुतात्या आणि कुटुंबीय यांचे घर सध्या ज्या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाचा डेपो आहे त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणीच, वासुतात्यांच्या सर्व मुलांचा जन्म झाला. त्यांची मुले दापोलीच्या स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये शिकली. त्याच शाळेत रँग्लर रघुनाथ परांजपे, महामहोपाध्याय पां.वा. काणे यांच्यासारखी अखिल भारतीय कीर्तीची विद्वान मंडळी शिकून मोठी झाली. मंडलीक कुटुंबीयांचे सध्याचे निवासस्थान दापोली-दाभोळ रस्त्यावर डाव्या हाताला पेट्रेल पंपाशेजारी आहे. वासुतात्यांनी तेथील ती जागा खरेदी केल्यानंतर, ती वास्तू तेथे बांधली आहे.

वासुतात्या पुरोगामी विचारांचे होते. रँग्लर परांजपे परदेशातून शिकून भारतात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावी, मुर्डीला जाण्याआधी दापोलीत काही काळ थांबावे असे ठरवले. पण गावातील ब्राह्मण मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. ते परदेशातून आल्यामुळे ‘बाटले’ असा त्यांचा समज होता. त्यांना कोणी आपल्या पंक्तीला जेवायला बोलावेना. त्यावेळी वासुतात्या मंडलीक यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना जेवण्यास बोलावले. त्या पंक्तीमध्ये रँग्लर परांजपे हेही सहभागी झाले होते. त्या पंक्तीत गावातील ब्राह्मण मंडळी नसतीलही, पण त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. ही त्यांची ऐकलेली आठवण.

वासुतात्यांच्या दोन मुलांनी नाव काढले- पैकी डॉ. पुरुषोत्तम वासुदेव (पी.व्ही.) मंडलीक यांचा जन्म 1898 साली झाला. त्यांनी दापोलीच्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर, मुंबईत सुरुवातीला सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पी.व्ही. यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1924 साली ती परीक्षा पास होऊन त्यांनी खेतवाडी परिसरात आठव्या गल्लीच्या नाक्‍यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

डॉ.जी व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षणही मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होते. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या.

डॉ. पी.व्ही. मंडलीक यांचे निधन 28 सप्टेंबर 1978 रोजी आकस्मिक झाले. पाठोपाठ डॉक्टरांचे धाकटे बंधू डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पा यांचे 1979 साली जूनमध्ये आणि बहीण सुभद्रा मंडलीक यांचे लगेचच, 1979 च्या डिसेंबरमध्ये निधन झाले.

वासुतात्यांनी दापोलीत राहिलेल्या तीन भावांना प्रत्येकी जमीन व निवासस्थान यांची व्यवस्था केली होती. डॉक्टरांनी दापोलीतील सध्याचे निवासस्थान बांधण्यास 1932 साली सुरू केले. ते 1935 मध्ये पूर्ण झाले. ते त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी बांधले, पण त्याच काळात त्यांच्या मातापित्यांचे निधन झाले. डॉक्टरांचे मुंबईतील पेशंट नरोत्तम मिस्त्री यांनी ते घर बांधण्याची जबाबदारी घेतली व सर्व दारेखिडक्या तयार करून गलबतातून दाभोळ व तेथून दापोलीला नेण्यात आले. ते घर इतके भक्‍कम आहे, की त्याला आणखी ऐंशी वर्षे काही होणार नाही. त्याची ऐंशी वर्षे झाली आहेत.

वासुतात्यांच्या एकूण बारा मुलांपैकी मोठा मुलगा डॉ. यशवंत वासुदेव ऊर्फ नानू हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांचा ठाकुरद्वार नाक्यावर दवाखाना होता. त्यांचे निधन 1941 साली झाले. त्यांना तीन मुलगे व तीन मुली. मोठी मुलगी यमू. तिचे लग्न वझे यांच्या घरात झाले होते. त्यांचे पती मिलिटरी अकौंटस् मध्ये नोकरीला होते. त्यानंतर डॉ.उद्धव (राजाभाऊ) मंडलीक. त्यांनी डॉ. पी.व्ही. यांच्याकडे राहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ते गुजरात राज्यात सरकारी नोकरीत कार्यरत होते. नंतर त्यांनी मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. ते हॉस्पिटलच्या स्वच्छतेबाबत फार दक्ष असत. ते हयात नाहीत.

श्रीमती प्रमिला मंडलीक या डॉ. यशवंत वासुदेव (नानु) मंडलीक यांच्या तृतीय कन्या. त्यांनी डॉ. पी.व्ही यांच्या घरी राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुंबई महानगरपालिकेतून निवृत्ती घेतली. त्या त्यांच्या धाकट्या भावाकडे राहत होत्या. त्या हयात नाहीत. त्यांचे लग्न झाले नव्हते. तिसरा भाऊ मधु मंडलीक हे एम एससी (पॅथॉलॉजी) डॉ. पी. व्ही. यांच्या घरी राहून झाले व नंतर टाटा हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमधून निवृत्त झाले. त्यांचे वास्तव्य त्यांच्या मुलाकडे ठाण्याला असते. ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आहेत. सर्वात धाकटी बहीण हेमलता ठाकूरदेसाई. एस एस सी, एस टी सी. त्यांचे यजमान ठाकुरदेसाई इंजिनीयर आहेत. हेमा हयात नाहीत. त्यांचा मुलगा डॉ. अविनाश ठाकुरदेसाई हे सर्जन आहेत. त्यांचे हॉस्पिटल विलेपार्ले येथे आहे.

व्यंकटेश वासुदेव ऊर्फ बाबा मंडलीक हे डॉ. पी.व्ही. आणि डॉ. जी.व्ही. यांचे आणखी एक बंधू. ते वकील होते. ते दापोलीत वकिली करत असत. त्यांचा विवाह बेळगावच्या डॉ. केळकर यांच्या बहिणीशी झाला होता. त्यांना एकूण अकरा मुले- सहा मुलगे व पाच मुली. त्यांच्यापैकी जयंत मंडलीक हे एम एससी, पीएच डी (ऑर्गनिक). ते अमेरिकेत कन्सल्टंट म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते, ते तेथे पौरोहित्य करत असत. ते भारतात आल्यावर, पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वास्तव्य पुण्यात असते. ते निवृत्त आहेत. त्यांचे वय नव्वदीच्या पुढे आहे.

डॉ. चंद्रकांत मंडलीक यांनी मॅथेमॅटिक्स व स्टॅटिस्टिक्स अशा दोन विषयांमध्ये दोन वेळा एम एससी केले. ते झुनझुनवाला कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. ते हयात नाहीत. बाकीचे चार भाऊ वसंत, अनंत (शशी), श्रीकांत हे तिघे पदवीधर होते. निशिकांत ऑटोमोबाईल इंजिनीयर होते. ते हयात नाहीत. त्यांच्यापैकी श्रीकांत यांना एक मुलगा – वरुण. ते नोकरी करतात. त्यांना विवाहित मुलगी आहे. निशिकांत यांना दोन मुलगे. मोठा हेमंत त्यांची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांचे वास्तव्य गोव्यात असते. धाकटा राहुल दापोलीत व्यावसायिक आहे.

बाबा मंडलीक यांच्या पाच मुली- उषा, सुमन, मंदा, मीना, विभावरी. फक्त धाकटी विभावरी हयात आहे. त्या बी पी एन ए नर्स होत्या. त्यांचे लग्न शिधये यांच्याशी झाले. त्यांचे वास्तव्य गोवा येथे असते.

डॉ. नीळकंठ वासुदेव ऊर्फ बजाभाऊ हे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस झाले होते. घरगुती हळदीकुंकू समारंभाच्या वेळी रॉकेलचा डबा फोडताना अपघात झाला व त्यातच त्यांचे निधन झाले ! त्यानंतरची बहीण श्रीमती दाबके. त्यांना एक मुलगा- चिंतामणी. चिंतामणी एक वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्या वासुतात्यांकडे माघारी आल्या व चिंतामणी वासुतात्यांच्या इतर मुलांबरोबर वाढले.

मुकुंद वासुदेव ऊर्फ बाळुभाऊ हे शुगर टेक्नॉलॉजी तज्ज्ञ होते. ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले, त्या काळी बोटीने जावे लागत असे. मात्र तेथे गेल्यावर त्यांना ‘यलो फिवर’ झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.

त्या नंतरची बहीण कमल लेले. त्यांना तीन मुलगे व तीन मुली. त्या आनगाव – कवाड येथे राहत असत, पण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांच्या सर्व मुलांचे शिक्षण, लग्न कार्य डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही यांनी केले.

सावळाराम मंडलीक हे डॉ. पी.व्ही. आणि डॉ. जी.व्ही. यांचे आणखी एक बंधू. ते इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता. सातघरे त्यांच्याबरोबर झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होत्या. सावळाराम भिवंडी व नंतर मालेगाव येथे अमाल्गमेटेड इलेक्ट्रिक कंपनीमध्ये मुख्य इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांना भिवंडी व मालेगाव, या दोन्ही गावांत मान होता. ते कामाच्या बाबतीत खूप कडक, पण इतर वेळी अगदी खेळीमेळीने वागत. त्यांना दोन मुले- मोठी मुलगी डॉ. आशा सातघरे औरंगाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या व तेथूनच त्या निवृत्त झाल्या. प्रकाश मंडलीक हा त्यांचा मुलगा. तोही वडिलांप्रमाणेच इलेक्ट्रिकल इंजिनीयर होता. ते श्रीरामपूरमधील डहाणूकर यांच्या शुगर फॅक्टरीत अनेक वर्षे कार्यरत होते. ते तेथूनच निवृत्त झाले. त्यानंतर, त्यांचे वास्तव्य दापोलीत होते. ते हयात नाहीत. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी. त्यांचे वास्तव्य दापोली येथे आहे. त्यांचा मोठा मुलगा आशीष हा हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञ आहे. तो सध्या नोकरीनिमित्त पुण्यात असतो.

विश्वनाथ वासुदेव मंडलीक – बाबू – हे दापोलीत राहून वकिली करणार होते. पण वकिलीच्या परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

दापोलीच्या मंडलीक घराण्याबद्दल लिहित असताना असे लक्षात आले, की ती सर्वच मंडळी जातिभेद, धर्मभेद न मानणारी होती. त्यांचे परिसरातील मुस्लिमांशी सलोख्याचे संबंध होते आणि आहेत. दोन समाजांमधील ताणतणावाच्या काळात डॉ. पी.व्ही. मुंबईत व डॉ. जी.व्ही आणि नंतरच्या काळात शैला यासुद्धा दापोलीत दोन समाजांमध्ये समझौता करण्यासाठी प्रयत्नशील असत. त्याचप्रमाणे घरातील आणि बाहेरील सर्व महिलांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान मिळाला पाहिजे व त्यांना आर्थिक-सामाजिक-राजकीय स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे अशी त्यांची मानसिकता होती आणि आहे.

नीला पटवर्धन 9869620946 patwardhanneela6@gmail.com

————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here