कुस्तीवीर सुधीर पुंडेकर याचे क्रीडाकेंद्र (Wrestler Sudhir Pundekar’s Sports Center)

सुधीर पुंडेकर याने बेल्ट रेसलिंग या कुस्तीप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहे. तो खेळतो उत्तम; त्याचे खेळण्यावर प्रेम आहे आणि तो स्पर्धा खेळतो तेव्हा त्याला ती देशसेवा वाटते ! तशा उदात्त भावनेने तो या एकूण व्यवहाराकडे पाहतो. तो मूळचा फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या छोट्या गावचा. शेतकरी कुटुंबातील. त्याने कुस्तीबरोबरच इतर क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारे केंद्र गावात सुरू केले आहे. त्याला थोडी निराशेची, वैफल्याची पार्श्वभूमी आहे. कारण त्याने स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे, पण भारतात केवळ ठरावीक खेळांचा उदोउदो होतो. त्यामुळे सुधीरच्या यशाची दखल फार कोणी घेतली नाही. सुधीरला किर्गिझिस्तानमध्ये एप्रिल, 2022 साली झालेल्या बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. तो जगात या क्रीडाप्रकाराच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्या घटनेची बातमी कोणत्याही चॅनेलवर दाखवण्यात आली नाही की त्याला शासनाचा कोणताही पुरस्कार मिळालेला नाही हे त्याचे दु:ख आहे. त्याला ती भारतातील एकूण क्रीडाविश्वाची शोकांतिका वाटते. म्हणून त्याने व्यक्तिगत पातळीवर एक मोठे स्वप्न पाहिले आहे- क्रीडा केंद्राचे.

सुधीर वयाच्या सोळाव्या वर्षापासून ‘बेल्ट रेसलिंग’ या कुस्तीच्या प्रकारात चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आशियाई (2017), वर्ल्ड मार्शल आर्ट्स मास्टरशिप गेम्स (2019), यूडब्ल्यूएसकेएफ वर्ल्ड स्पोर्ट्स केम्पो (2019), यूडब्ल्यूडब्ल्यू वर्ल्ड पँक्रेशन चॅम्पियनशीप, बेल्ट रेसलिंग वर्ल्ड कप (2016) अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विविध पदके मिळवली. पण तरीही त्याला व्यावहारिक आणि आर्थिक अडचणींना सातत्याने सामोरे जावे लागते.

सुधीर पुंडेकर नांदल गावच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला आणि कुस्तीच्या स्पर्धा जिंकत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदवीधर झाला. त्याने कुस्तीचे शिक्षण साताऱ्याच्या तालमीत घेतले. त्याचे शिक्षण हिंदी विषय घेऊन बीए इतपत झाले. तो सध्या बत्तीस वर्षांचा आहे. त्याची आई व पत्नी असा त्याचा संसार आहे. वडिलांचे निधन चार वर्षांपूर्वी झाले. त्यांची सहा एकर शेतजमीन आहे.

त्याने खेळाडूला स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो हे अनुभवले असल्यामुळे स्वत: स्वत:चे ‘शिवसमर्थ क्रीडा-कुस्ती संकुल’ हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्याने स्वतःची एक एकर जमीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी वापरली आहे. केंद्रात कुस्तीबरोबर ज्युदो, कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, कराटे, त्वायकोंडो, मार्शल आर्ट, योगासने या क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण केंद्रात देण्यात येते. त्याचे स्वप्न अजून मोठे आहे. जिम, अभ्यासिका, जलतरण तलाव, मैदान, दृक-श्राव्य विभाग अशा सुविधा केंद्रात द्याव्या व या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावे असे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रात तीस मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरूही झाले आहे. तो म्हणाला, की सध्या गावातील मुले येतात, पण या भागातून मुले शिकण्यास येथे यावीत अशी माझी अपेक्षा आहे.

सुधीर आजारी क्रीडापटूंना त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्नशील असतो. त्याचे निरीक्षण असे, की खेळाडूला मानसन्मान मिळतात, तेव्हा त्याची वाहवा करण्यास सगळे गोळा होतात; पण त्याला खेळत असताना काही अपघात झाला- आजारपण आले, तर त्याचा वाली कोणी नसतो, सुधीरने काही धर्मांदाय संस्थांच्या मदतीने अशा खेळाडूंना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. सुधीरने पस्तीस खेळाडूंना मदत केली आहे.

सुधीरच्या दृष्टीने क्रीडानैपुण्यातून भारताचा तिरंगा फडकावणे ही सर्वात उच्च दर्जाची देशभक्ती आहे. त्यामुळे तो त्याच्या बाजूने ‘क्रीडाक्षेत्रात भारत देशाची प्रगती करण्यासाठी’ प्रयत्न करतो. मात्र त्याचे त्या धडपडीत त्याच्या व्यक्तिगत खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. सुधीरला क्रीडाक्षेत्राकडे उदासीनतेने बघणारा भारतीय समाज आणि एकाच खेळाला झुकते माप देणारी माध्यमे यांची मानसिकता खूप अस्वस्थ करते. स्वाभिमान हा कोणत्याही खेळाडूचा प्राण असतो, त्यामुळे खेळाडूला माध्यमांना, पुढाऱ्यांना ‘आमच्या खेळाची दखल घ्या, पुरस्कारांची बातमी द्या’ असे स्वतः होऊन सांगावे लागणे, खेळांत आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवूनही त्याबाबत साधी शाबासकीही न मिळणे या गोष्टी त्याला मानहानिकारक व म्हणून त्रासदायक वाटतात.

भारतातील खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळासाठी निवडले जातात, तेव्हा त्यांची बरीच शक्ती प्रवासखर्चाची जमवाजमव करणे, त्यांची प्रशिक्षण आणि प्राथमिक गरज यांची सोय करणे यांत खर्च होते. इतर देशांचे खेळाडू स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांत व्यग्र असतात, तेव्हा भारतीय खेळाडू प्रवास कसाबसा करून तेथे दाखल झालेले असतात ! मात्र भारतीय खेळाडू अशा तऱ्हेने ऐन वेळी स्पर्धेत सहभागी होऊनही शक्य तितकी चांगली कामगिरी करतात, पण तिकडे जाणकारांचे लक्षच नसते. सुधीरला भारतीय क्रीडा संघटना, सत्ताधीश यांच्या अशा वृत्तीबद्दल दुःख होते.

सुधीर समर्थभक्त आहे. त्याचे म्हणणे असे, की रामदासांनी चारशे वर्षांपूर्वी ठिकठिकाणी मठ उभारून अध्यात्म व मल्लविद्या यांचा प्रसार केला. तशा कामाची सध्या गरज आहे. त्या दिशेने त्याचे हे पहिले केंद्र आहे. तो म्हणाला, की माझे वडील वारकरी पंथाचे होते. तोही मोठा संस्कार माझ्या विचारांवर आहे. केंद्रासाठी एक कोटी रुपये खर्च झाला आहे व आणखी सत्तर लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. तो म्हणतो, की वेगवेगळ्या ट्रस्टचे निधी व कंपन्यांचे सीएसआर फंड यांतून पैसे उभे राहत आहेत.

सुधीर म्हणाला, की बेल्ट रेसलिंगमध्ये जगभरात त्याची पाचवी रँक आहे, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी सन्मानाने बोलावले जाते. भारत सरकारच्या क्रीडा खात्याच्या लेखी मात्र हा क्रीडाप्रकार महत्त्वाचा नाही व त्यामुळे त्यासाठी तरतूद केली जात नाही. बेल्ट रेसलिंग जगात रशियाच्या दक्षिणेकडील देशांत व अरबस्तानात विशेष लोकप्रिय आहे. उझबेकीस्तान व सौदी अरेबिया या देशांत 2023 साली दोन-तीन महत्त्वाचे आशियाई व जागतिक सामने होणार आहेत.

सुधीर पुंडेकर 9511268338

 – संजीवनी शिंत्रे 9922954959 shintresj@gmail.com

(आधार ‘विवेक’च्या चरित्र ग्रंथमालेचा)

———————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here