आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)

0
263

प्राचीन दाल्भ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले ! दाभोळ बंदरातून अरबी घोडे, मिरी, डिंक, कापूर, लवंग, रेशीम, अत्तरे, रत्ने, हस्तिदंत, प्रवाळ, शिसे, कापड, तांदूळ अशा अनेकविध मालाचा व्यापार चालत असे. आदिलशाहीतच दाभोळला एक सुरेख मशीद उभी राहिली. त्यामुळे आदिलशाही स्थापत्यशैलीबद्दल महाराष्ट्रात कुतूहल निर्माण झाले.

मुस्लिम स्थापत्याची सुरुवात आदिलशाहीच्या स्थापनेआधीपासून, मूळ बहामनी राजवटीपासून दख्खनमध्ये झाली होती (इसवी सन 1347). उत्तर भारतातील तुघलक शैलीचा प्रभाव त्या शैलीवर सुरुवातीला आणि इराणी शैलीचा प्रभाव नंतर दिसून येतो. बहामनीची राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली गेली, त्या स्थित्यंतरातही योगायोगाने आलेल्या तुघलकी ते इराणी शैलीचा प्रवास दिसतो. नवीन स्थापन झालेल्या आदिलशाहीला दख्खन मुस्लिम स्थापत्याचा तो वारसा मिळाला होता. स्थापत्य शैलीचे शिखर गाठले गेले ते गोवळकोंडा-हैदराबादची कुतबशाही आणि विजापूरची आदिलशाही या राजवटींत.

आदिलशाहीची घडी नीट बसत गेली आणि नंतर, आदिलशाही स्थापत्याची सुरुवात, अली आदिलशहा पहिला (1558-1580) याच्या कारकिर्दीत झाली. अहमदनगरच्या निजामशहाची राजकन्या चाँदबिबीचे लग्न त्याच्याशी झाले होते. आदिलशहा पहिला (1558-1580) ते अली आदिलशहा दुसरा (1658-1672) हा सुमारे सव्वाशे वर्षांचा कालावधी आदिलशाही स्थापत्याच्या भरभराटीचा काळ समजला जातो.

आदिलशाहीचा संस्थापक आदिल खान हा आला तुर्कस्तानातून. तुर्कस्तानातील ऑटोमन साम्राज्याचा सुलतान मुराद दुसरा (1421-1451) याच्या मृत्यूनंतर त्या गादीच्या वारसदाराला कोठलीही इजा वर्तमान काळात व भविष्यात पोचू नये आणि त्याचा सुलतान होण्याचा मार्ग निर्विघ्न असावा, म्हणून त्या काळच्या तेथील प्रथेनुसार खरा वारस सोडून त्याच्या इतर सर्व मुलांची हत्या करण्याची आज्ञा देण्यात आली. त्या रक्तपातामध्ये एका राजपुत्राची आई तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकली. तिने त्याला देशाबाहेर पाठवून दिले. तो तुर्की राजपुत्र लपूनछपून बाहेर निघाला व इराणला जाऊन पोचला. तो तरुण महत्त्वाकांक्षेने भारावून अंदाजे 1460 साली जहाजाने दाभोळ बंदरात येऊन ठेपला. त्याचे नाव युसूफ. युसूफ दाभोळहून निघून बहामनी सुलतानाकडे बिदरला गेला. युसूफच्या तेथील कर्तृत्वावर खूश होऊन बहामनी सुलतान मुहम्मद शाह (तिसरा) याने त्याला ‘आदिल खान’ ही पदवी दिली आणि त्याला विजापूर परगण्याचा सुभेदार म्हणून नेमले.

आदिल खानाने 1490 साली स्वतःच्या नावाने खुत्बा वाचून घेतला. अशा तऱ्हेने आदिलशाही राजवंशाची स्थापना झाली होती. पहिला युसूफ आदिल शहा (खरे तर आदिल खान) आणि त्याच्या नंतर आलेले त्याचे काही वंशज यांचे बहुतांश आयुष्य विजापूरच्या नवीन राज्याची घडी बसवण्यात, त्यांनी तयार केलेल्या राजवंशाला स्थिर करण्यात खर्ची पडले. त्यामुळे त्यांच्याकडे बांधकामे, स्थापत्य अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नव्हता.

आदिलशाहीला लाभलेला अरबी समुद्राचा किनारा ही त्या राज्याची जमेची मोठी बाजू होती. आदिलशाहीच्या अखत्यारीत कोकणातील दाभोळ, राजापूर, वेंगुर्ला, गोवा अशी बंदरे होती. विशेषतः चौल, दाभोळ आणि गोवा या ठिकाणांहून भारताच्या पश्चिमेला असलेल्या भूभागाबरोबर आणि भारतातीलही अन्य बंदरांबरोबर व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. जहाजे दाभोळहून अरबस्तानातील मक्केला जाण्याच्या हज यात्रेसाठीसुद्धा निघत. दाभोळ हे इतके महत्त्वाचे बंदर होत गेले, की त्याला ‘बाब-उल्-हिंद’ म्हणजेच अरबी भाषेत ‘भारताचे प्रवेशद्वार’ असे म्हणत.

खुत्बा – धर्मगुरूने मशिदीमध्ये सर्वासमोर केलेले औपचारिक भाषण. त्या भाषणात राज्य करत असणाऱ्या राजाच्या नावाचा उल्लेख केला जातो.

प्रसाद बर्वे  9822898993 pragarve@yahoo.co.in

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here