आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)

0
718

विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम – लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्याची कारणे दोन सांगितली जातात. एक तर तिला होत नसलेली ऋतुप्राप्ती तेथे त्यावेळी झाली. दोन म्हणजे चाच्यांचा धोका पुढील समुद्री प्रवासात बराच वाढला आहे असे कळले. प्रवास रद्द झाला ! बरोबर आणलेली मोठी रक्कम तर शिल्लक राहिली ! त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान. मशीद बांधण्यास त्या काळी पंधरा लाख रूपये खर्च आला ! मशिदीचे बांधकाम 1559 मध्ये सुरू झाले व 1563 मध्ये पूर्ण झाले अशी त्या बांधकामासाठी चार वर्षे लागली. मशिदीच्या घुमटावर धातूचा मुलामा दिला होता तर घुमटावरील चंद्रकोर सोन्याची होती असेही म्हटले जाते. त्या मशिदीच्या निर्वाहासाठी बहिरवली, भोपण, पांगारी, इसापूर, भोस्ते, चिवेली, कारूळ, मुंढर अशी आठ गावे इनाम देण्यात आली होती. ती मशीद ‘माँ साहेबांची मशीद’ म्हणून ओळखली जाते. त्याला अंडा मशीद असेही म्हणतात. मात्र हे नाव का पडले त्याचे समर्पक कारण कळत नाही. एका कथेनुसार एका फकिराने त्याच्याकडील एका अंड्यातून जन्मलेल्या एका कोंबडीपासून उत्पन्न झालेल्या अनेक कोंबड्या विकून ती मशीद उभारली. त्यामुळे त्या मशिदीला अंडा मशीद असे नाव पडले असे म्हणतात.

दाभोळच्या एस्.टी. स्टँडजवळ असलेली ती मशीद म्हणजे आदिलशाही स्थापत्याचा कोकणातील अप्रतिम नमुना आहे. खरोखरीच आदिलशाही बांधकामाच्या विकसित काळातील तो सुंदर आणि सुबक ठेवा आहे. तिची तुलना खुद्द विजापुरातील कोठल्याही समकालीन मशीद अथवा मकबरा याच्याशी सहज शक्य आहे. फरक एवढाच, की इतर इमारती बहुसंख्येने विजापुरात तर ही मशीद एकटीच विजापुराहून शेकडो किलोमीटर दूरवर महाराष्ट्रात/कोकणात आहे.

इमारतीची लांबी-रूंदी 70X60 फूट आहे. इमारतीला चार मिनार आहेत आणि भव्य घुमट पंच्याहत्तर फूटांचा आहे. मशिदीच्या अवशेषांवरून दिसते, की तिच्या चारही बाजूंला कुंपणासारखी भिंत असावी. मशिदीच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी उत्तरेला मोठे आणि सुंदर प्रवेशद्वार दिसते. त्यालाच लागून पूर्वेला सरळ रांगेत घोड्यांना बांधण्याची; तसेच, प्रवाशांना राहण्याची सोयही दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर, त्या काळी सुंदर बाग असावी. मुख्य मशीद एका उंच चौथऱ्यावर बांधली आहे. ती मशीद त्रेसष्ट फूट लांब आणि चोपन्न फूट रुंद आहे. मशिदीच्या आकारावरून वाटते, की ती जामा अथवा जामी मशीद नसावी. काही जुन्या कबरी मशिदीच्या प्रांगणात दिसतात, त्या जांभा दगडाच्या आहेत. तेथे अतिक्रमण झालेले दिसते. मशिदीच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी चौकोनी आकाराच्या छान पायऱ्या आहेत. तेथेच जवळ पुरातत्त्व खात्याची ‘संरक्षित स्मारक’ म्हणून पाटीसुद्धा आहे. तसे नमूद केलेले असूनही, मशिदीच्या प्रांगणाची आणि खुद्द मशिदीच्या इमारतीची अवस्था वाईट आहे.

आदिलशाही काळातील घुमट

मशिदीच्या कोठल्याही भागाला अवाजवी महत्त्व दिले गेलेले नाही. मीनार, घुमट, मुख्य प्रार्थना गृह, मशिदीचा चौथरा आणि मशिदीसमोरील कारंज असलेला हौद हे सगळे प्रमाणबद्धतेने बांधलेले दिसतात.

हौज आणि कारंजे

चौथऱ्याच्या पायऱ्या चढल्यावर दिसतो तो कारंज असलेला हौद. त्याचे प्रयोजन मशिदीच्या आत प्रार्थना करण्याआधी जाताना करण्याच्या ‘वजू’साठी किंवा सुशोभीकरणासाठीही असावे. हौदाच्या मधोमध एक खांब आहे. त्या खांबावर मोराप्रमाणे दिसणारे दगडी पक्षी आहेत. त्यांच्या चोचींमधून पाणी बाहेर येण्याची सोय दिसते. तो हौद कोरडा असला तरीही त्या काळी पाणी खेळत असताना तो किती सुंदर दिसत असावा त्याची कल्पना येऊ शकते. मशिदीसमोर, बरोबर मध्यभागी असलेला तो हौद हे आदिलशाही स्थापत्याचे एक द्योतक आहे.

मशीद काळ्या दगडात बांधलेली आहे. मशिदीचे मुखदर्शन पारंपरिक तीन कमानींनी होते. कमानींच्या वरील आणि बाजूच्या जागेवर काही अलंकरण दिसत नाही, तरी तेथे इतर आदिलशाही मशिदींप्रमाणे चुनेगच्चीची कलाकुसर मूलतः केलेली असेलही! कमानी तीन थरांच्या दिसतात. त्यांची ठेवण बिदरच्या अली बरीद सुलतानाच्या मकबऱ्याच्या आणि विजापूरच्या हैदरिया मशिदीच्या कमानींसारखी दिसते. त्या प्रशस्त तीन कमानींमुळे मशिदीच्या आतमध्ये भरपूर हवा आणि प्रकाश खेळता राहतो. मुखदर्शनाचा पुढील टप्पा म्हणजे सज्जे. आदिलशाही स्थापत्याचे ते एक अंग. सज्जे मुख्य इमारतीला हस्तांद्वारे जोडलेले आणि हस्तांनी तोलून धरलेले असतात. ते हस्त या मशिदीच्या बाबतीत तीन थरांचे आहेत. त्या हस्तांमध्ये आदिलशाही स्थापत्यात खूप वेळा दिसणारे हत्तीच्या उचललेल्या सोंडेसारखे दिसणारे अलंकरणही आढळते. त्या हस्तांमध्ये चौरस आकाराचे उलटे कमलपुष्पही दिसते.

हस्त आणि सज्जा यांवरून नजर वर जाते आणि मधील कमानीच्या दोन्ही बाजूंच्या बरोबर वर, गच्चीच्या कठड्याच्या पातळीवर छत्रीवजा दोन रचना दिसतात. त्याही रचनेवर खालील मुखदर्शनावर दिसणाऱ्या कमानीच्या छोट्या प्रतिकृती; तसेच, हस्त आणि सज्जा दिसतात. सज्ज्यांवर ठळक पाकळ्यांमध्ये बसवलेला गोलाकार घुमट आणि त्याच्या चारही बाजूंनी तसेच पण छोटे घुमट असलेले चार छोटे मीनार दिसतात. गच्चीचे कठडे खेळण्याच्या पत्त्यांतील ‘किलवर’ या चिन्हाच्या आकाराप्रमाणे सुशोभित केलेले आहेत.

मिनार

मशिदीचे आणखी महत्त्वाचे अंग म्हणजे मीनार. मीनाराचा पारंपरिक उपयोग बांग देण्यासाठी होत असे आणि मीनार चढून मुअझ्झिन नमाज पढण्यासाठी मशिदीत बोलावत, असे मानले जाते. भारतातील मुस्लिम स्थापत्यांमध्ये मीनारांची संख्या आणि त्यांची जागा त्या-त्या शैलीप्रमाणे वेगवेगळी दिसते. दाभोळच्या मशिदीत दिसणारे मीनार आदिलशाही स्थापत्याला तंतोतंत धरून असलेले दिसतात. तेथील मीनार आतून भरीव आहेत. त्या मीनारांत आतून चढता येत नाही. त्यांचा वापर मशिदीच्या स्थापत्याचा एक भाग आणि मशिदीची शोभा वाढवण्यासाठी केला आहे. त्यांचे बांधकाम जमिनीपासून सलग आहे. ते दिसण्यास बोजड नसून सडपातळ आणि सुबक आहेत. त्यांचा तो वेगळेपणा दख्खनच्याच बहामनी आणि बरीदी शैलीच्या व इतर मीनारांपेक्षा उठून दिसतो. मीनारांवर संपूर्ण नक्षीकाम दिसते. मीनारांचा चौथरा चौरस असून, त्यावर कमानींची नक्षी, कमानींच्या आत घड्याळाच्या लोलकाप्रमाणे लोंबणारे अलंकरण, कमानींच्या बाहेरील वरील भागात आदिलशाही स्थापत्यात दिसणारा हत्तीच्या उचललेल्या सोंडेप्रमाणे असणारा घटक आणि त्यावर उमललेले कमळ असे उथळ शिल्पकाम दिसते. चौथरा जरी चौरस असला तरी वरील मीनार षटकोनी आहेत. मीनारांवर टप्प्या-टप्प्यावर आदिलशाही स्थापत्यात दिसणारे अजून एक अलंकरण म्हणजे कमळाच्या ठळक मोठमोठ्या पाकळ्या आणि छोटे सज्जे. कमळाच्या ठळक पाकळ्यांवरही लोलकाप्रमाणे लोंबत्या आकाराची कलाकृती दिसते. मीनारावर गच्चीच्या उंचीच्या वर सर्व बाजूंनी बाहेर आलेले कमळाच्या पुढे वाकलेल्या कळ्यांप्रमाणे सुशोभन दिसते. त्यावरील टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा. त्या भागात तशाच मोठ्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये असलेला चेंडूप्रमाणे दिसणारा गोल घुमट आहे.

मशिदीच्या आत लिवानमध्ये (प्रार्थनागृह) प्रवेश केल्यावर तीन कमानींची अजून एक रांग दिसते. त्या कमानी ‘कॉर्बेल’ पद्धतीच्या नाहीत. संपूर्ण कमानींवर, तसेच मशिदीच्या आतील भागावर चुन्याचा गिलावा केलेला असावा. छताकडे बघितले तर कमानीच्या मदतीने तयार केलेले घुमट दिसतात. घुमट आणि कमानी यांच्यामध्ये मुकर्ना पद्धतीची नक्षी दिसते. छत आतील बाजूने घुमटांचे असले, तरी ते बाहेरच्या बाजूने सपाट आहे. मशिदीच्या कडेच्या भिंतीमध्ये सामान ठेवण्यासाठी कोनाडे आणि त्यांच्यावर प्रकाश व हवा येण्यासाठी झरोक्यांची सोय आहे. अर्थातच, मक्केच्या दिशेला मेहराब आहेच. मेहराबीवर किंवा आतमध्ये फारसे अलंकरण नाही. मेहराबीची कमान आणि मुखदर्शनाची कमानी यांत कमालीचे साम्य दिसते. लिवानच्या आतील एक घटक म्हणजे मिन्बार. मिन्बार लाकडी अथवा बांधकामही केलेले असू शकते. त्या मिन्बारावरून धर्मगुरू प्रवचन देतात. दाभोळच्या त्या मशिदीतील लाकडी मिन्बार मशिदीएवढा जुना वाटत नाही.

प्रार्थनागृहातून वर जाण्यासाठी मार्ग आहे. मशिदीचा एकच मजला आतून जरी भासत असला, तरी बाहेरून बघितल्यावर ती दोन मजली दिसते. जिन्यावरून सर्वात वर गच्चीवर जाता येते. गच्चीची जमीन सपाट आहे आणि गच्चीवर मशिदीच्या मागील बाजूला चिकटून कमानींच्या सहाय्याने खोलीवजा रचना केली आहे (ती भक्कमपणा देण्यासाठी आतून बुजवून टाकलेली आहे). खाली चौरस तर वरील भाग गोलाकार असलेले चार बसके मीनार खोलीसदृश त्या रचनेच्या चारी कोपऱ्यांवर आहेत. चेंडूसारखे गोल घुमट त्याही रचनेवर आहेत. त्या चारही बुटक्या मीनारांमध्ये त्या खोलीसारख्या बांधकामाच्या वर, मधोमध मशिदीचा मुख्य घुमट आहे. त्याचाही आकार चेंडूसारखा गोल असून त्याच्या भोवती तळाला ठळक मोठ्या पाकळ्या आहेत. त्या प्रत्येक पाकळीवर साखळीवर लोंबणाऱ्या पदकांची उठावाची नक्षी आहे. मोठा गरगरीत घुमट आणि मोठ्या उठावदार पाकळ्या… आदिलशाही शैलीची ती आणखी दोन लक्षणे आहेत.

भारतीय मुस्लिम स्थापत्यातील आदिलशाही शैलीत बांधले गेलेले ते स्मारक, पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित म्हणून घोषित झालेले आहे. तरीसुद्धा त्याची अवस्था दयनीय आहे. अतिक्रमणे, मुख्य इमारत आणि उत्तरेकडील प्रवेशद्वार यांवर वाढलेली आणि इमारत जास्त-जास्त पोखरण्याच्या मार्गावर असलेली झाडे यांनी वास्तू ग्रासलेली आहे.

काही शब्दांचे अर्थ –

मिन्बार- मशिदीमध्ये जिन्यासारखी असलेली रचना.

मुकर्ना- सर्वसाधारणपणे दोन कमानींमधे आणि घुमटाच्या खालील भागात छोट्याछोट्या खोबणींच्या स्वरूपात असलेली नक्षी अथवा अलंकरण.

मेहराब- मशिदीतील मक्केच्या दिशेला असलेल्या भिंतीत उभी, खाली जमिनीपर्यंत असलेली कोनाड्यासारखी खोलगट रचना. त्या दिशेला तोंड करून नमाज पढला जातो.

प्रसाद बर्वे  9822898993 pragarve@yahoo.co.in

————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here