पंढरपूरची वारी पुण्याजवळच्या देहू-आळंदीपासून सुरू होते. महाराष्ट्राच्या गावागावांतून दिंड्या निघालेल्या असतातच. लक्षावधी वारकरी वीस दिवस चालत असतात. वारीची सांगता एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री होते. डोळ्यांत भक्ती आणि मुखावर हरिनाम जपणारे हे वारकरी, समाजातील एकतेचे जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे वारी केवळ धार्मिक यात्रा राहत नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र लक्षात घेतले पाहिजे, की हाच सोहळा कधी काळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी क्लेशदायक होता. अनेक दिवस चालून आलेल्यांपैकी काही वंचितांना गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन न घेताच परत फिरावे लागे. त्या अन्यायाला वाचा फोडली ती साने गुरुजी यांनी ! खरे पाहता, विठ्ठल हा समता आणि भक्तिभाव यांचे मूर्त स्वरूप मानला गेलेला देव. त्याचे महाराष्ट्राच्या ग्रामीण जनजीवनाशी अतूट नाते आहे. वारकरी पंथात वय, जात, वर्ग आड न येता एकमेकांच्या पाया पडण्याची आणि आलिंगन देण्याची परंपरा आहे. परंतु समता आणि भक्तिपरंपरा सांभाळण्याच्या या संस्कृतीलाही अस्पृश्यतेवर आधारित भेदभावाची गडद छटा होती. मंदिरप्रवेश सवर्ण आणि काही जाती यांच्यापुरता मर्यादित होता. अस्पृश्य मानल्या गेलेल्या भक्तांना दरवाज्याबाहेरून विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागे. त्यांच्या दिंड्या मुख्य मिरवणुकीपासून वेगळ्या काढल्या जात. त्यांना पंढरपूरच्या बाहेर, चंद्रभागेच्या काठी थांबवले जाई.
साने गुरुजींनी विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. त्या काळी देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. गांधीजींनी आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर अस्पृश्यता नष्ट करण्यात संपूर्ण जीवन व्यतीत करू असे वचन दिले होते. गुरुजींना वाटे, की गांधीजींच्या प्रत्येक अनुयायाने अस्पृश्यताविरोधी आंदोलन छेडले पाहिजे. त्यांचा विश्वास होता, की हिंदू धर्मातील जातीय भेदभाव नष्ट करण्याची जबाबदारी सवर्ण हिंदूंवर आहे.
गुरुजींनी सत्याग्रहाची आखणी विचारपूर्वक केली. गुरुजींनी चार महिने महाराष्ट्रभर प्रचारदौरा काढून जनजागृती अभियान छेडले. गुरुजींच्या त्या प्रचारदौऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. पंढरपूरमधील मंदिर दलितांसाठी खुले व्हावे यासाठी हरिजन सेवक संघाने स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यावर दहा लाख लोकांनी सह्या केल्या. मात्र सत्याग्रहाला काही राजकीय आणि धार्मिक वर्तुळांत विरोध होता. वारकरी समुदायातदेखील गुरुजींच्या अवाहनाला संमिश्र प्रतिसाद होता. देहूकर मठ आणि अंमळनेरकर मठ यांनी मंदिरप्रवेशाला विरोध केला, तर सातारकर मठ आणि तनपुरे मठ यांनी सक्रिय पाठिंबा दिला.
पंढरपूरमधील भगवंतशास्त्री धारूरकर यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने विटाळापासून बचाव करण्यासाठी विठ्ठलमूर्तीमधील प्राण काढून घेण्याची पूजा केली ! त्यांनी मूर्तीतील प्राण घागरीत घालून धारूरकर यांच्या घरात बंदिस्त ठेवला. तिकडे, वाईतील नारायणशास्त्री मराठे यांनी मंदिरप्रवेशाला पाठिंबा दिला आणि धारूरकरांनी केलेल्या पूजेच्या पावित्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले.
समाजात मान्यता असलेल्या नेत्यांमध्येही सत्याग्रहाच्या फलिताबाबत एकवाक्यता नव्हती. बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहाबाबत उदासीन होते. ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘दीनमित्र’चे संपादक मुकुंदराव पाटील यांनी सत्याग्रह अनावश्यक असल्याचे म्हटले. याउलट, क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील या ब्राह्मणेतर चळवळींतील नेत्यांनी गुरुजींच्या सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा दिला.
सावरकरांसारख्या हिंदू राष्ट्रवाद्यानेही अस्पृश्यताविरोधी मोहीम हाती घेतली होती. जातिव्यवस्था ही हिंदू अस्मिता एकसंध करण्याच्या मार्गातील अडथळा आहे आणि म्हणूनच ते तिचा विरोध करत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जात असे. त्यामुळे गुरुजींचा सत्याग्रह सावरकरवादी ध्येयाला पोषक आहे असाही आरोप केला जात होता. सावरकर आणि हिंदू महासभा यांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला असला, तरी गुरुजींनी त्यांच्यापासून कायम अंतर राखले.
गुरुजींनी मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले. त्यांनी “समाजातील कोणत्याही घटकाची दिशाभूल करण्याचा माझा उद्देश नाही आणि अस्पृश्यांना त्यांचे धार्मिक हक्क मिळावेत, हाच माझा केवळ शुद्ध हेतू आहे” असे निक्षून सांगितले. “मी राजकारणी नसून सामाजिक क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता आहे” असे ते नेहमी सांगत. त्यांचे मत अन्यायातून क्रांती घडण्याची वाट न पाहता, शांतताप्रिय प्रयत्नांद्वारे लोकांचे विचार आणि वागणूक बदलणे आवश्यक आहे असे होते. हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या राजकीय कार्यक्रमासाठी लोकांना एकत्र आणण्यापेक्षा, त्यांना हिंदू धर्माच्या खऱ्या प्रेरणेनुसार वागण्यास प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे असेही गुरुजींना वाटे. त्यांनी ठाम भूमिका मांडली, की समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे.
गुरुजींचा अस्पृश्यतेविरुद्ध दृष्टिकोन गांधीवादी होता. मात्र गांधीवादी आणि स्वतः गांधीजीही गुरुजींच्या हेतूबाबत साशंक होते. यामागे गुरुजींचे पूर्वीचे कम्युनिस्ट संबंध हे मुख्य कारण होते. प्रत्यक्षात, गुरुजी मार्क्सवाद्यांपासून केव्हाच दूर झाले होते.
मंदिरप्रवेशाचा अधिनियम मुंबई विधिमंडळात मांडला गेला, तो महिन्याभरात अंमलात येणार होता. तेव्हा सत्याग्रहाची आवश्यकता नाही असे सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यांचा आरोप गुरुजींच्या उपोषणाचा वापर समाजवादी करत आहेत असा होता.
गुरुजींनी कोणालाही जुमानले नाही व 1 मे 1947 रोजी आमरण उपोषण सुरू केले. शंकरराव देव आणि इतर काँग्रेस नेत्यांनी गुरुजींनी उपोषण मागे घ्यावे असे साकडे गांधीजींना घातले. गांधीजींनी उपोषण थांबवण्याचा संदेश तत्काळ पाठवला. गांधीजींचे मत असे होते, की मंदिराच्या अधिकारीवर्गाचे हृदयपरिवर्तन घडवण्याऐवजी कायद्याची मदत घ्यावी. विनोबाजींनी गुरुजींच्या चार महिन्यांच्या जनजागृती मोहिमेला पाठिंबा दिला होता. परंतु त्यांनी उपोषणास मात्र पाठिंबा दिला नाही.
गांधीजींनी तार पाठवली तर विनोबाजींनी देखील गुरुजींना पत्र पाठवले. परंतु गुरुजींनी उपोषणाचा निर्णय बदलला नाही. त्यांनी गांधीजींना लिहिलेल्या उत्तरात म्हटले, “हे लिहीत असताना मला किती दुःख होत आहे, हे आपण जाणलेच असेल. परंतु कधी अशी परिस्थिती येते, की सारे जग विरुद्ध गेले तरी आपल्याला निश्चयी राहवे लागते. किंबहुना, ही तुमचीच शिकवण आहे. जोपर्यंत दुसऱ्याचे युक्तिवाद माझ्या मनाला पटत नाहीत, तोपर्यंत माझ्याशी मी सत्यनिष्ठ राहिले पाहिजे.”
गुरुजींचे विचार प्रश्न कायद्याने सुटत नाही; जोपर्यंत समाजात हृदय परिवर्तन होत नाही आणि मन व विचार बदलत नाहीत तोपर्यंत कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. कायदे कागदावरच राहतात आणि त्यातून पळवाटा काढल्या जातात असे होते.
लोकांचा दबाव, गुरुजींचा आत्मक्लेश आणि ग वि. मावळणकर यांच्या कुशल वाटाघाटी यांमुळे 10 मे रोजी मध्यरात्री पंढरपूर मंदिराच्या बहुसंख्य विश्वस्तांनी मंदिरप्रवेशाच्या बाजूने मतदान केले. अस्पृश्यांनी विठ्ठल मंदिरात 11 मे 1947 रोजी प्रवेश केला आणि गुरुजींनी दहा दिवसांनंतर उपोषण सोडले. पंढरपूरचे मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुले झाले. तथाकथित अस्पृश्य मंडळींच्या दिंड्याही मुख्य वारीचा सलग भाग होऊ लागल्या. गुरुजींच्या अखंड निश्चयाने आणि शांततामय सत्याग्रहाच्या आग्रहाने उद्दिष्ट गाठले !
सत्याग्रहामागे गुरुजींचे विचार स्पष्ट होते. अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव संपवण्याची गरज केवळ पीडितांना नाही, तर त्याच्या लाभधारकांनाही आहे. उच्च जातीयांनी दलितांच्या उद्धारासाठी नव्हे, तर स्वतःच्या नैतिक उन्नतीसाठी भेदभावाच्या प्रथा सोडून देण्यास हव्यात. गुरुजींनी मूळ हिंदू धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. त्यांचा विरोध जातिव्यवस्थेवर आधारित समाजातील भेदाभेदांना होता. त्यांचा हिंदू धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रबुद्ध किंवा सनातनी या कोणत्याही एकांगी विचारांकडे झुकणारा नव्हता. हिंदू धर्मातील जातीयतेचा वीट आला म्हणून धर्म बदलल्याने जातीयता नष्ट होत नाही. त्यांचे मत समाजातील प्रत्येक घटकाच्या मूळ मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे असे होते.
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com