महत्त्वाकांक्षी ‘महाभूषण’ प्रकल्प
स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा परिचय करून देणारे संकेतस्थळ गुरूवार, 24 जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आले आहे (https://shroff.mahabhushan.com/). वेबसाइटचे लेखन गिरीश घाटे यांनी केले आहे. जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाईट्स या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. त्या मालिकेतील हे आठवे संकेतस्थळ आहे.
गोविंदभाई श्रॉफ यांचा स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत म्हणून लौकिक होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांची 24 जुलै ही एकशेचौदावी जयंती. त्यांनी सत्तेपासून दूर राहून मराठवाड्याच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांनी मराठवाडा विकास मंडळ, सरस्वतीभुवन शिक्षण संस्था, जनता विकास परिषद, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था अशा संस्थांच्या माध्यमातून काम केले. त्यांनी संपूर्ण साक्षरता अभियानाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांचा सामाजिक समतेवर आधारित समाजरचना, स्वावलंबन, मूल्याधिष्ठित शिक्षण, ग्रामोद्योग व लोकाभिमुख औद्योगिकीकरण यावर ठाम विश्वास होता.
गोविंदभाईंच्या जीवनकार्याची माहिती, लढा, विचारधारा आणि विकासासाठी केलेला सातत्यपूर्ण संघर्ष अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. गोविंदभाईंनी हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाड्याच्या संयुक्त महाराष्ट्रात विलिनीकरणासाठीचा लढा आणि त्यानंतरच्या पाच दशकांच्या विकासाच्या वाटचालीत योगदान दिले आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत विद्यार्थ्यांना संघटित करून निजाम सरकारविरूद्ध वंदे मातरम् सत्याग्रह घडवून आणला होता. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे 1900 ते 1930 या काळात महाराष्ट्रात जन्मलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. प्रकल्पात सुमारे तीनशे वेबसाइट तयार होणार आहेत. पैकी साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, व्ही. शांताराम, आबासाहेब गरवारे, इरावती कर्वे आणि नानाजी देशमुख या सात वेबसाईट पूर्ण झाल्या आहेत. गोविंदभाई श्रॉफ यांचे संकेतस्थळ हे आठवे आहे. यास्मिन शेख, शंतनुराव किर्लोस्कर यांच्या वेबसाइट महिनाभरात पूर्ण होणार आहेत.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पांतर्गत गोविंदभाईंनी केलेल्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व प्रसार करण्यासाठी हे संकेतस्थळ महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
– थिंक महाराष्ट्र