Home गावगाथा जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!

जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!

दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे.

जालगाव हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील गाव. दापोलीचे उपनगरच म्हणायचे. त्याला दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. गावचा स्वतंत्र असा ताम्रपटही आहे. जालगाव 808.38 हेक्टर क्षेत्रामध्ये वसले आहे. ते गाव जंगल परिसराने वेढलेले आणि लाल मातीच्या रस्त्यांनी नटलेले मर्यादित अशा लोकवस्तीचे होते. त्या नयनरम्य समृद्ध गावाचे आकर्षण मुंबई-पुणेकरांना साद घालत असे. त्यांना राहण्यास जावे तर जालगावी असे वाटे. त्यांच्या समवेत नोकरीउद्योगानिमित्ताने बाहेरील मंडळीही येऊ लागली. पाहता पाहता, गाव पंधरा हजार लोकवस्तीच्या जवळ पोचले आहे. गावची लोकसंख्या सात हजार सहाशेअडतीस 2011 च्या जनगणनेनुसार आहे. दहा वर्षांत लोकसंख्येत दुप्पट वाढ ! हे कोकणात अपूर्व होय. तेथे गावेच्या गावे स्थलांतरामुळे लोकवस्तीने रोडावत आहेत.

जालगाव हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिल्याच स्पर्धेत 2001 मध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेले गाव आहे. ही त्या गावाची संस्कृती. जालगावची ग्रामपंचायत 1952 साली स्थापन झाली. त्या वेळी घरांची नोंद सहाशेबावीस होती. त्यामध्ये खोपटी व वाडे वगळता सुमारे साडेपाचशे घरे म्हणजेच सुमारे दीड हजारपर्यंत लोकसंख्या होती. सद्यस्थितीमध्ये, एकाहत्तर वर्षानंतर (2023), जालगावमधील घरांची संख्या तीन हजार सहाशेपर्यंत पोचली आहे.

गावच्या नोंदीनुसार गावाला ग्रामपंचायतीच्या स्थापनेपूर्वी कथा-कादंबरीत वर्णिलेली खोती होती. गावचे खोत गावाचा पूर्ण कारभार चालवत. खोती कालबाह्य झाली आणि गावअध्यक्ष हे पद निर्माण झाले. गावाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती पूर्वापार बारा बलुतेदारी पद्धतीने करण्यात आली होती. त्यामध्ये लष्करवाडी, ब्राह्मणवाडी, लक्ष्मीवाडी, मिसाळवाडी, पाटीलवाडी चोरगेवाडी, पांगारवाडी, कुंभारवाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी, बर्वेआळी, सुतारकोंड, बाजारपेठ, खालची आळी आणि वरची आळी अशी नावे पूर्वीच्या काळातील कर्मावरून ठरलेल्या प्रजातींनुसार त्या त्या भाग-परिसराला पडत गेली होती. बारा वाड्या आणि तीस नगरे असा मोठा पसारा गावाचा होता, तरीसुद्धा सामाजिक ऐक्याची भावना नवीन युगात कायम टिकून आहे- त्या ठिकाणी पूर्णतः संमिश्र लोकवस्ती आहे. स्नेहभाव आणि सहभावना यांचा सुंदर असा मिलाप त्या ठिकाणी पाहण्यास मिळतो.

गावात श्रावण पौर्णिमेला पोते बांधण्याची पद्धत आहे. श्रावण पौर्णिमेला गावसयी (गावबैठक) भरते आणि स्नेहभाव अधिक दृढ व वृद्धिंगत होण्यासाठी प्रेमाचा बंध (सुताचा धागा) हातावर बांधला जातो. गावातील ग्रामस्थांमधील ऐक्यभावना अशा प्रथापरंपरांनी वृद्धिंगत केली जाते. ती प्रथा सुमारे दोनशे वर्षे सुरू असल्याची माहिती गावअध्यक्ष अशोक जालगावकर यांनी दिली. गावात गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, दीपोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

गावाचे भैरी देवस्थान म्हणजेच गावदेऊळ बाजारपेठेत दापोली-दाभोळ रस्त्यावर आहे. गावची मोठी जत्रा तेथे हनुमान जयंतीला भरते. त्यापूर्वी गावातील श्राणेवर देव बसतात आणि देव साकडे घालून मिरवणुकीने ढोल-ताशांच्या गजरात पालखीतून मिरवले जातात. ती मिरवणूक श्राणेवरून सुरू होते. पहिला मान गावअध्यक्षांकडे असतो. त्यानुसार पालखीतून मिरवत भैरीदेवाची पालखी गावअध्यक्षांकडे बसते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथेनुसार सर्व वतनदारांकडून रंगपंचमीला बाजारपेठेत येते.

पहिली जत्रा श्राणेवर कुंभारवाडी येथील परिसरामध्ये भरते. त्याला बोलीभाषेत ‘सानेवरची’ (श्राणेवरील) जत्रा असे म्हणतात. त्या ठिकाणी आबालवृद्ध भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, बर्फाचा गोळा-कोनातील आईस्क्रीम-फुगा घेऊन धमालमस्ती करत, आनंद घेत असतात. त्या ठिकाणी पानावर शेंगदाण्याची उसळ लोकप्रिय आणि प्रसिद्ध होती. कालपरत्वे उसळ जाऊन वडापाव आला- मिसळ आली- भेळ आली !

गावाची पालखी कधी उठवावी याबाबत देवाला कळे लावण्याची प्रथा आहे. त्यानुसार देव गावामध्ये त्या ठिकाणी (श्रहाणेवरून) उठतात आणि बहिरी व भैरी देवस्थान येथे पालखी मिरवणुकीने नेले जातात. त्यानंतर पालखी गावातील बारा वाड्यांमधील वतनदारांकडे फिरते. वतनदार जालगावकर कुंभार मानकरी, वाडकर पाटील मानकरी, यादव, जंगम, ढोल सजवणारे, गोंधळी, धुमाळ, प्रभावळकर, पालखी सजवणारे आणि रंगपंचमीला जालगाव बाजारपेठ येथे परंपरेनुसार ती येऊन भैरी देवस्थान येथे स्थानापन्न होते.

त्यानंतर गावच्या जत्रेच्या तयारीचे वेध लागतात. गावाच्या जवळच्या जंगलात जाऊन इतर गावांपेक्षा उंच काठी कोठे सापडेल याचा शोध सुरू होतो. शोध पूर्ण झाल्यावर ती काठी युवामंडळी गाव परिसरातील जंगलातून वाजतगाजत गावात घेऊन येतात. जत्रेपूर्वी पागोट्यांनी त्या काठीला छान सजवले जाते.

हनुमान जयंतीला भैरी देवस्थान येथे फार मोठी गाव जत्रा भरते. त्या जत्रेला वेगळे असे महत्त्व आहे. तीन गावांचे मिलन किंवा तीन गावाच्या देवींची भेट त्या ठिकाणी होते. ती परंपराही दोनशे वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. जालगावला लागून असलेले गव्हे गाव आणि दुसऱ्या बाजूची हद्द गिम्हवणे गावाची, अशा तीन गावांतील सजवलेल्या सुमारे पन्नास फूट उंचीच्या काठ्या ढोलताश्यांच्या गजरात आणि मिरवत-मिरवत जालगावच्या जत्रेला हनुमान जयंतीला येतात. तेथे त्या तीन गावांतील नागरिकांची, देवदेवतांची भेट होते- स्नेहमिलन होते. त्या तिन्ही काठ्यांचे मिलन आणि त्यांना उभारतानाचे कौशल्य पाहण्यासाठी भाविक एकच गर्दी करतात आणि त्यामुळे गावागावातील अतूट अशी प्रेमभावना अबाधित राहून परंपरेची अखंड रचना प्रवाही राहते. जत्रा दुपारी सुरू होऊन सूर्य मावळताना संपते. त्यावेळी जालगाव येथे हजारोंच्या संख्येने नागरिक भक्तिभावाने देवळात येतात आणि तेथे असलेल्या मिठाईच्या, खेळण्यांच्या, आईस्क्रीमच्या दुकानांना भेटी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात. त्यानंतर तिन्ही गावांतील काठ्या गिम्हवणे आणि गव्हे या ठिकाणी जाऊन त्या त्यांच्या स्थानी उभ्या केल्या जातात.

जालगावमध्ये शिमगोत्सवात मुख्य होम हा भैरी देवस्थान बाजारपेठ या ठिकाणी होळीच्या पहाटे, तिसऱ्या प्रहरी लावण्याची प्रथा आहे. त्या होमावर शीत वाजतगाजत आणले जाते. शीत म्हणजे सुरमाडाचे मोठे झाड. ते होमावर उभे केले जाते. होलिकोत्सव गावातील सर्व वाड्यांवर आनंदात खेळला जातो. त्यामध्ये पारंपरिक खेळ खेळला जातो. ‘नाच्या पोऱ्या’ असे त्याला बोली भाषेत म्हटले जाते. त्याच प्रमाणे छोटी मुले संकासुर किंवा नकट्याचे सोंग घेऊन, घरोघरी फिरतात. शिमगोत्सवाच्या निमित्ताने गाव गजबजून जाते. चाकरमानी गावाकडे आलेले असतात. त्यांची घरे भरून जातात. घरातील आजी-आजोबा त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या आगमनामुळे खूपच उत्साहित होऊन गेलेले दिसून येतात. एकंदरीतच, शिमगोत्सवामुळे, गावातील जत्रेच्या निमित्ताने आप्तस्वकियांच्या भेटी होतात आणि एक वेगळा असा कौटुंबिक मिलाप झालेला पाहण्यास मिळतो.

जालगाव हे आलेल्या पाहुण्यांस सर्वार्थांनी आपलेसे करणारे गाव आहे. ‘जाल तुम्ही ‘जालगावी’ सुज्ञ बनोनी जाल गावी असे नक्कीच या निमित्ताने नमूद करता येईल !

प्रशांत परांजपे 9561142078 pakshiknivedita@gmail.com

——————————————————————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version