अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
299

ग्रामीण किंवा निमशहरी भागातील लोकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात. त्यांच्याबद्दल विचारले असता ते संकोचाने म्हणतात, ‘माझ्याबद्दल नको, आमच्या शाळेबद्दल आणि मुलांबद्दल लिहा.’ शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे असे शिक्षक भविष्यकाळासाठी दिशादर्शक ठरतील.

अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

———————————————————————————————-

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा

आम्ही ‘अनवट कोकण’ पाहण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील ‘तुरळ’ या गावी मागच्या वर्षी चार दिवस राहिलो. आसपासची प्राचीन देवळे, कातळशिल्प वगैरे पाहताना एक दिवस आयोजक म्हणाले, “आज आपण संगमेश्वर येथील कलादालन पाहू या.”  ते ऐकून थोडे आश्चर्य वाटले. इतक्या छोट्या गावी कलादालन? अर्थातच, उत्सुकतेने पाहायला गेलो. ‘पैसा फंड इंग्लिश स्कूल’ या शाळेसमोर गाडी थांबली. ‘पैसा फंड’ या अनोख्या नावानेच आधी लक्ष वेधून घेतले. अरे, शाळेत कलादालन? नक्कीच काहीतरी वेगळे पाहण्यास मिळणार, असे वाटले आणि तसेच झाले.

‘व्यापारी पैसा फंड’ या संस्थेची ती शाळा 1929 पासून, म्हणजे देश पारतंत्र्यात असल्यापासून सुरू आहे. संगमेश्वरमधील व्यापारी वर्गाने खेडोपाडी, अगदी वाडी-वस्तीवर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने ती शाळा उभारली. त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या नफ्यातील ठरावीक हिस्सा ‘शैक्षणिक फंड’ म्हणून गोळा केला. फक्त आपला स्वार्थ न पाहता समाजासाठी काहीतरी करण्याचा हा विचारच किती प्रेरणादायी आहे ! असा प्रामाणिक हेतू मनी ठेवून काम केल्यावर किती उत्तुंग यश मिळते, हे शाळेकडे पाहून कळते.

आजही या शाळेचा नावलौकिक तसाच आहे. तेथे मुलांना तळमळीने शिकवले जाते. त्या मुलांनाही आयुष्यभर शाळेबद्दल आत्मीयता वाटते. शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. फक्त अभ्यासच नव्हे; तर मुलांमधील कलागुण हेरून खेळ, चित्रकला यांनासुद्धा प्रोत्साहन दिले जाते. खरेतर, शहरातील पालकांना मुलांच्या अभ्यासाइतके त्यांच्या इतर कलागुणांचे महत्त्व वाटत नाही. मग खेड्यात तर विचारायलाच नको. कलेचा अभ्यास करूनही अर्थार्जन होऊ शकते, हे त्या पालकांच्या गावीच नसते. पण अंगभूत कलागुण असणारी अनेक मुले कोकणातील छोट्या-छोट्या गावी आहेत. हे शाळेच्या लक्षात आले. मग शाळेने मुलांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले. त्यातून स्वतंत्र कलावर्गाची स्थापना केली. त्याचा चांगला फायदा झाला. शाळेचे अनेक विद्यार्थी कला महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन आता त्या क्षेत्रात स्थिरावले आहेत.

शाळेची अशी माहिती घेतघेत कलावर्गात पोचलो. तेथे जितेंद्र पराडकर सरांनी आमचे स्वागत केले. ते कलावर्गाविषयी माहिती देऊ लागले, “संस्थेला नेहमी असे वाटत होते, की पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपले विद्यार्थी कोठेतरी कमी पडतात. त्यांना काहीतरी विशेष मार्गदर्शन केले पाहिजे म्हणून शाळेने स्वतंत्र कलावर्गाची उभारणी केली. त्यामुळे मुलांचा आत्मविश्चास वाढण्यास मदत झाली. मुलांना चित्रकलेची गोडी तर लागली; पण ती वाढायला अजून काय करता येईल, असा विचार शाळा सतत करत होती. मग मुलांशी केलेल्या चर्चेतून ‘कलासाधना’ या वार्षिक अंकाची निर्मिती झाली. दरवर्षी पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्तम चित्रे घेऊन कलासाधनाचा अंक तयार होत असतो. त्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना दाखवायला अनेक चित्रांचे संग्रह झालेच; पण त्या अंकात त्यांचे चित्रही असावे यासाठी मुले मनापासून प्रयत्न करू लागली.” ते सांगत असताना पराडकरसरांनी कलासाधनेचे अनेक अंक आमच्यापुढे ठेवले. प्रत्येक चित्र दाखवताना सरांना त्या-त्या विद्यार्थ्याबद्दल असणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून कळत होता. मनात आले, ‘किती जिव्हाळा, कौतुक आहे सरांना मुलांबद्दल!’ “हा कलावर्गही विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभा राहिला आहे बरं का,” ते सांगताना सर अगदी भारावून बोलत होते, “मुलांची कला पाहून देणगीदारांनीही देणग्या दिल्या व 2008-2009 मध्ये स्वतंत्र कलावर्ग उभा राहिला.”

ते पाहून बाहेर पडतोय, तोच कलादालनाच्या वास्तूने लक्ष वेधून घेतले. कारण त्याच्या प्रवेशद्वारासमोर, एक अप्रतिम थ्री-डी चित्र व फायबरची नऊ फूट उंचीची एक पेन्सिल आहे. त्या कलादालनाची निर्मिती कधी झाली? असे आम्ही विचारताच पराडकरसर म्हणाले, “कोविडचे संकट आले आणि मुले शाळेत यायची बंद झाली. त्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून कलाविभागाने शाळेमध्ये आर्ट गॅलरी उभी करण्याचे ठरवले. संस्थेनेदेखील प्रोत्साहन देत त्या विचाराला संमती दिली. फक्त शाळेला नाही, तर गावाला अभिमान वाटावा असे काम संस्थेने करायचे ठरवले.”

पुन्हा त्या जुन्या आठवणीत रमत सर सांगू लागले. “या भव्य कामात शाळेचे माजी विद्यार्थी, दानशूर मंडळी, कलाविकासासाठी काम करणाऱ्या समाजिक संस्था अशा सर्वांची मदत झाली.” सर अगदी कृतज्ञतेने सांगत होते, “शाळेचे जी.डी.आर्ट झालेले माजी विद्यार्थी हेमंत सावंत व प्राची रहाटे यांनी मनापासून प्रयत्न करून कलादालनासाठी चित्रे मिळवली. कारण चित्रे विकत घेणे शाळेला परवडण्यासारखे नव्हते. त्या दोघांच्या प्रयत्नाने अनेक प्राध्यापक, युवा कलाकार यांची चित्रे तर मिळाली, पण त्यांनी नऊ शिल्पेही दालनासाठी मिळवून दिली. ए.टी.डी. झालेल्या स्नेहांकित पांचाळ याने शिल्पांसाठी चौथरे बनवून देण्याची जबाबदारी घेतली. पर्यटकांना आमच्या भागातील युवा कलाकार, त्यांची कला आता माहिती होईल.” सरांचा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता तर त्या युवा कलाकारांच्या चित्रांची विक्री करून त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे संस्थेने ठरवले आहे.

सगळी सुंदर चित्रे, शिल्पे व त्याचबरोबर सर देत असलेली कलाकारांची माहिती ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. “सर, खूप मोठे काम आहे तुमचे. तुमच्यामुळे अनेक कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळते आहे.” आम्ही असे म्हणताच ते एकदम संकोचाने म्हणाले, “छे, छे मी कोठे काय केले ? मी तर या शाळेत एक साधा शिक्षक आहे. सगळे मुलांचे, संस्थेचे आणि देणगीदारांचे क्रेडिट आहे.” माझ्या मनात आले, आपण किती फुटकळ काहीतरी केले, तर केवढा गवगवा करतो आणि इतके मोठे काम करूनही सर काहीच क्रेडिट स्वतःकडे घेत नाहीत. किती निगर्वी असतात काही लोक.

सर स्वतःचे कष्ट कितीही विनयाने नाकारत असले, तरी कलादालन उभे राहण्यात जितेंद्र दत्तात्रय पराडकर या व्यक्तीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचे शिक्षण आर्ट मास्टर आणि डिप्लोमा इन जर्नालिझम असे झाले आहे. शिक्षक असलेल्या वडिलांच्या इच्छेला मान देऊन कमर्शिअल आर्टिस्ट होण्याची इच्छा असूनही त्यांनी शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. परिसरातील साऱ्याच गोष्टींबद्दल त्यांना प्रचंड आत्मीयता आहे. निसर्ग, पर्यावरण, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, पुरातन मंदिरे… सारेच त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी निसर्गप्रेमातून ‘साद निसर्गाची’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. पत्रकारिता हा आवडीचा विषय. ते त्यातून परिसरातील नामवंत व्यक्ती, निसर्ग यांबद्दल वेळोवेळी लिहित असतात. पुरातन मंदिरे, वास्तू यांचे जतन करण्यातही सरांचा खूप मोठा सहभाग असतो. ते इतके सारे करूनही कोठलाही गाजावाजा करत नाहीत, मी या कारणाने स्तिमित झाले.

जितेंद्र पराडकर -9890086086
अलका जतकर 8308316302 ajatkar@hotmail.com

———————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. शाळेबद्दल खूप चांगली माहिती मिळाली. पराडकर यांचे शैक्षणिक परिश्रम कौतुकास्पद आहेत. शहरी,निमशहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये अशी सर्जनशीलता यायला हवी आहे.

  2. अगदी बरोबर!
    हा लेख खूप लोकांनी वाचला तर झिरपत जाईल हा विचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here