सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)

सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते. तो सारा भाग ग्रामीण आणि त्या काळात तेथे हिंदी तर सोडाच, पण मराठी चित्रपटांपासूनही कोसो दूर होता, पण अमरापूरकर जिद्दीने तेथे पोचले व यशस्वी झाले.

सदाशिव अमरापूरकर यांना त्यांच्या राज्य नाट्य स्पर्धेत ‘काही स्वप्नं विकायची आहेत’ या नाटकातील भूमिकेने अंतिम फेरीत अभिनय व दिग्दर्शन असे दुहेरी रौप्यपदक मिळाले. त्या नाटकाने त्यांना व्यावसायिक नाट्यसृष्टीचे दरवाजे उघडून दिले ! मात्र त्यांचा लौकिक वाढला तो ‘अर्धसत्य’ या सिनेमाने. त्यांच्या ‘रामा शेट्टी’ने काही मिनिटांच्या दृश्यात थेट ‘फिल्मफेअर’ पुरस्काराला गवसणी घातली ! त्यांचे डोळे बोलके होते, आवाज दमदार होता, त्यांना भूमिकेची समज अचूक होती. त्यांनी शब्दफेकीची ‘नगरी शैली’ राष्ट्रीय पातळीवर पोचवली.

सदाशिव यांचा जन्म 11 मे 1950 ला अहमदनगर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय नारायण तथा दादासाहेब अमरापूरकर. ते अहमदनगर शहरातील प्रथितयश व्यावसायिक, स्वातंत्र्य सैनिक व समाज कार्यकर्ते होते. ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे ‘बाबावाडी मांडवगण’ या अनाथ मुलांच्या संस्थेचे संस्थापक विश्वस्त व सनातन धर्म सभेचे पदाधिकारी म्हणून कार्य विशेष परिचयाचे आहे.

सदाशिव यांनी पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, अहमदनगर कॉलेज व पुढे पुणे विद्यापीठ या ठिकाणी घेतले. ते शालेय जीवनात क्रिकेट खेळत व त्यात ते निपुण होते. मात्र त्यांच्या अभिनयाची सुरुवात महाविद्यालयात झाली. तेथे त्यांनी एकांकिकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय करून बक्षिसे मिळवली. त्यांना पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांत अभिनय, दिग्दर्शन, लेखन यांत सलग चार वर्षे सुवर्ण, रौप्य पदके प्राप्त झाली होती. त्यांना पुण्याच्या प्रतिष्ठित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तर वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले. त्यांचे कौशल्य कथाकथनातही दिसून आले. त्यांनी शारदा करंडक; तसेच नगर, पुणे, नाशिक, मालेगाव, मुंबई येथील अनेक करंडक व चषक जिंकले. त्यांनी नगरच्या कलाकारांची पाच नाटके राज्य नाट्यस्पर्धेसाठी बसवली. त्यांना प्रत्येक वेळी दिग्दर्शन आणि अभिनय यांसाठी पारितोषिके मिळत गेली.

त्यांना ‘काही स्वप्नं विकायचीत’ या नाटकातील भूमिकेबद्दल मानाचा ‘गणपतराव भागवत चषक’ 1976 साली प्राप्त झाला. त्यांनीच ते नाटक दिग्दर्शित केले होते. त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर त्याच वर्षी पदार्पण केले. त्यांची त्या पाठोपाठ त्यांच्या विविध भूमिकांतील अभिनयाने पुढील नाटके गाजली- ‘सूर्याची पिल्ले’, ‘छिन्न’, ‘कन्यादान’, ‘छू मंतर’, ‘मी कुमार’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘बखर एका राजाची’, ‘अकस्मात’, ‘ती फुलराणी’, ‘ज्याचा त्याचा विठोबा’, ‘हॅण्ड्स अप’.

त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण ‘22 जून 1897’ या मराठी चित्रपटाद्वारे 1979 मध्ये केले. त्यांनी 1979 ते 2014 पर्यंत सुमारे साडेतीनशे चित्रपटांत कामे केली. त्यात मराठी, हिंदी, हरियाणवी, बंगाली अशा चित्रपटांचा समावेश आहे. त्यांपैकी काही लोकप्रिय नावे अशी – आरं आरं आबा आता तरी थांबा, सावरखेड एक गाव, दोघी, वास्तुपुरुष, अर्धसत्य, आखरी रास्ता, सडक, कालचक्र, खतरोंके खिलाडी, मोहरा, हम साथ साथ है, कुली नंबर वन, हुकूमत, ऐलाने जंग, मेरे दो अनमोल रतन, तेरी मेहेरबानिया, बॉम्बे टॉकीज. त्यांनी भारत एक खोज, राज से स्वराज तक, भाकरी आणि फूल, शोभा सोमनाथकी या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड, क्रिटिक अ‍ॅवॉर्ड, पॉप्युलॅरिटी अ‍ॅवॉर्ड, सर्वोत्तम चरित्र अभिनेता अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांना फिल्म फेअर अवॉर्डपासून, म.टा. सन्मान, नाट्यदर्पण आणि इतरही अनेक पारितोषिके व सन्मान मिळाले.

सदाशिव अमरापूरकर हे लोकांचे आवडते अभिनेते होतेच, पण एक सत्शील, संवेदनशील माणूस, समर्पित कार्यकर्ता, ग्रंथप्रेमी विचारवंत ही त्यांची खरी ओळख होय. त्यांना गरीब, सज्जनांबद्दल खरी कणव आणि कळवळा होता. त्यांची समाजसेवेची आवड लहानपणापासूनचीच. ते वडिलांच्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांबरोबर खेळताखेळता, त्या सर्वांच्या सोबत जेवण करत असत. ती समवृत्ती आयुष्यभर त्यांच्या मनावर बिंबली गेली. त्यांचा तो समभाव कॉलेजमध्येही दिसून येई. स्पर्धेसाठी नाटक बसवायचे आणि नंतर त्याचे चारपाच प्रयोग इतरत्र करून, जमलेले पैसे दुष्काळ पीडितांसाठी, पूरग्रस्तांसाठी किंवा गरजू स्वयंसेवी संस्थांना देणगी म्हणून पाठवायचे असे उपक्रम त्यांचे चालत. ते स्वतःसाठी किंवा कलाकार मित्रमैत्रिणींसाठी मानधन घेत नसत.

त्यांना नगरबद्दल अकृत्रिम जिव्हाळा वाटत असे. त्यांना नगरचे लोक, कार्यकर्ते, गुणी कलाकार… सगळ्यांचे कौतुक वाटे. त्यांनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली तेव्हा गोविंदा, जॉनी लिव्हर, असरानी अशा सोळा कलाकारांना सोबत घेऊन ‘स्टार नाईट’चा कार्यक्रम 1997 साली केला आणि संग्रहालयासाठी मोठा निधी उभा करून दिला. दु:खद गोष्ट अशी, की सदाशिवची आई कार्यक्रमाच्या आधी दोनच दिवस निवर्तली, पण सदाशिवने ठरवलेले सत्कार्य पार पाडले! डबघाईला आलेले संग्रहालय पुन्हा एकदा जोमाने काम करू लागले.

सामाजिक कृतज्ञता निधीचा जन्म सदाशिव व अन्य कलाकार यांच्या सामाजिक जाणिवेतून झाला. जे कार्यकर्ते झोकून देऊन समाजासाठी काम करतात, त्यांना कोणतेही मानधन मिळत नसे. या कलावंतांनी त्यांच्यासाठी मोठा निधी उभा करावा म्हणून ‘लग्नाची बेडी’ हे आचार्य अत्रे यांचे नाटक बसवले. श्रीराम लागू, निळू फुले, सुहास जोशी, सुधीर जोशी, रीमा लागू, भारती आचरेकर अशा जाणकार अभिनेत्यांसोबत उत्कृष्ट नाटक तयार झाले. मुंबईसह महाराष्ट्राच्या शहराशहरांतून आणि गावागावांतून नाटकाचा झंझावाती दौरा झाला. सोबत अनिल अवचट, नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव यांच्यासारखे समाज कार्यकर्ते असत. ते सर्वजण प्रयोग झाल्यावर झोळ्या घेऊन उभे राहत आणि लोक त्यात भरभरून पैसे टाकत… त्यातून लाखो रुपये जमा झाले. त्याच्या व्याजातून निरलसपणे काम करणाऱ्या समाजकार्यकर्त्यांना नियमित मासिक मानधन दिले जाते.

अमरापूरकर यांनी नगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा येथील प्रकरण व त्याला आलेला जातीय रंग आणि त्यासंबंधी राजकीय नेत्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका यावर सोनई येथे साधना परिवारातर्फे झालेल्या पीडित कुटुंबीयांना मदत वाटप कार्यक्रमात टीकेचे ओढलेले आसूड कित्येक काळ अनेकांच्या स्मरणात होते. ते उद्वेगाने म्हणाले होते, की ‘अशा घटनांमुळे मला मी नगर जिल्ह्याचा रहिवासी आहे याचीदेखील लाज वाटू लागली आहे !’ ती घटना अशी, की अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मागास कुटुंबातील युवकाची हत्या झाली होती. त्यावेळी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांनी घेतलेली भूमिका मवाळ व संशयास्पद होती. राजकीय दबाव आणि धनदांडग्यांचे दडपण यांमुळे आरोपींना शक्य असूनही अटक होऊ शकली नव्हती. सदाशिव अमरापूरकर त्या काळात नेमके सोनई येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. त्यांनी जाहीर सभेत सर्वांना खडे बोल सुनावले. त्यांचे त्या वेळचे खणखणीत वाक्य ‘पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला कमीपणा आणणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो’ असे होते. लक्षात घ्यावे, की सदाशिव अमरापूरकर त्यांच्या ‘होम ग्राऊंड’वर बोलत होते.

याच प्रकारे, निवडणुकीच्या अगोदर मतदारांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ ही चळवळ उभी करण्यात आली. अमरापूरकर, लागू, निळू फुले वगैरे विचारवंत नट गावोगावी व्याख्याने देऊन, लोकांना मतदारांचे हक्क आणि कर्तव्ये याबद्दल माहिती देत. सकाळी व्याख्यान आणि दुपारच्या सत्रात लोकांच्या शंकांचे निरसन असा कार्यक्रम असे. त्या दौऱ्याचा खर्च पूर्णपणे लोकसहभागातून करण्यात आला. त्या दौऱ्याला राजकीय पक्षांकडून विरोध, निषेध, त्यांच्यावर हल्ला असे प्रयत्न झाले, पण दौरा पूर्ण झाला. त्या दौऱ्यात प्रामुख्याने, निवडून दिलेल्या, पण काम न करणाऱ्या उमेदवारास परत बोलावण्याचा मतदारांचा अधिकार; तसेच, मतपत्रिकेवर ‘एकही उमेदवार लायक नाही’ असा एक रकाना छापला जावा ही मागणी यांचा उहापोह झाला.

वाचन ही सदाशिव यांची आयुष्यभराची आवड राहिली. ते कोठेही शूटिंगसाठी गेले, तरी तेथे दुर्मीळ ग्रंथांचा शोध आणि तेथील समाजकार्यकर्ते व पत्रकार यांच्याशी मनमोकळा संवाद हा जणू त्यांचा छंद होता. विविध वयोगटांतील-आर्थिक स्तरातील-जातिधर्मांचे स्त्री-पुरुष त्यांच्या लोकसंग्रहात होते. वेद-पुराणे, लीळाचरित्र या भारतीय संस्कृत-मराठी ग्रंथांपासून शेक्सपीयरच्या नाटकांपर्यंत पुस्तके त्यांच्या संग्रही होती. त्यांनी ज्ञानेश्वर, तुकारामापासून खलील जिब्रानपर्यंत आणि गौतम बुद्धापासून गांधी-आंबेडकरांपर्यंत सगळे वाचून काढले होते. त्यांनी स्वत:देखील ‘किमयागार’ हे नाटक व ‘अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ’ अशी दोन पुस्तके लिहिली आहेत.

पडद्यावरील दुष्ट खलनायकी चेहऱ्यामागील आणि भेदक डोळ्यांमागील खरा माणूस हा मृदू अंत:करणाचा, कोमल मनाचा आणि कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या नजरेचा होता. परिणाम म्हणून वेश्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या नगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेला, रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. किंवा मुंबईच्या फोरास रोडवरील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना ओळखपत्रे मिळवण्यास मदत केली. त्यांनी स्वत:ला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात खंबीरपणे झोकून दिले होते; तसेच, त्यांनी मेधा पाटकर यांच्या सोबत नर्मदा बचाव आंदोलन आणि आदिवासी पुनर्वसन, मुंबईच्या झोपड्पट्टीवासियांचे आंदोलन यांना सक्रिय पाठिंबा दिला. ते अण्णा हजारे यांच्या पाठीशी त्यांच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी उभे राहिले.

त्यांची महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यातील खेड्यांत भाषणे झालेली आहेत. ते रोटरी क्लब, लायन्स क्लब, महाविद्यालये, शाळा, स्वयंसेवी संस्था, संमेलने या ठिकाणी विना मानधन भाषणे देत असत. अमरापूरकर यांनी परभणी येथील ‘विचार वेध’ संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले भाषण त्यातील विचारसौंदर्यामुळे गाजले. लोक त्यांच्या भाषणाला प्रगल्भ विचार, प्रामाणिक मते आणि परखड भाषा यामुळे गर्दी करत. त्यांना टी व्ही वरील महाचर्चांमध्ये देखील स्पष्ट मतप्रदर्शनामुळे जेवढे चाहते, तेवढेच विरोधक निर्माण झाले. त्यांना निस्वार्थ समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून ‘बॅरिस्टर नाथ पै पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. सदाशिव यांचे पाय अभिनयाच्या अंगभूत गुणामुळे उत्तुंग कीर्तिशिखरावर पोचल्यानंतरही जमिनीवरच राहिले आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय एसी कारमधून फिरतानाही जमिनीवर चालणाऱ्यांचे प्रश्न, हाच राहिला.

अमरापूरकर पुढील सामाजिक संस्थांशी संलग्न होते – ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, (अहमदनगर) – विश्वस्त, सामाजिक कृतज्ञता निधी (पुणे) – कार्यकारी विश्वस्त, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (सातारा) – विश्वस्त, स्नेहालय (अहमदनगर) – सल्लागार विश्वस्त, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र (पुणे)- कार्यकर्ते, इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ- (ठाणे) -कार्यकर्ता, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नगर शाखा) – सक्रिय कार्यकर्ता, नर्मदा बचाव आंदोलन – (कार्यकर्ता), लोकशाही प्रबोधन व्यासपीठ (कार्यकारी विश्वस्त).

त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या पत्नी, लेखिका सुनंदा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कन्या रिमा या त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी सदाशिव यांच्या स्वप्नातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्या नावे ‘मेमोरियल फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. अमरापूरकर यांचा मृत्यू 3 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई येथे घडून आला.

सुनंदा अमरापूरकर 9223479744 nandaamarapurkar@gmail.com

—————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here