शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ (The crowning of Shivaji and its meaning)

0
416

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अर्थ त्या काळामधील फक्त तिघांना कळला- पहिले स्वत: शिवाजीराजे, दुसरे गागाभट्ट, कारण त्यामुळे काशी मुक्त झाली आणि तिसरा पराभूत औरंगजेब, कारण त्यामुळे भारताच्या विशेषत: उत्तरेकडील वेगवेगळ्या राजांच्या स्वातंत्र्योर्मी जाग्या होत होत्या…

शिवराज्याभिषेक ही घटना सतराव्या शतकाच्या इतिहासात अद्वितीय अशी आहे. शिवरायांच्या रूपाने चारशे वर्षे कर्दमात पडलेल्या महाराष्ट्रास आशेचा किरण दिसला. यादव साम्राज्याच्या पाडावानंतर, महाराष्ट्रात स्वतंत्र असे राजसिंहासन अस्तित्वात राहिले नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र चारशे वर्षे अव्याहतपणे आक्रमकांच्या टापांखाली भरडला गेला. सरंजामशाहीची पद्धत इस्लामी राजसत्तेच्या अंमलामध्ये पुन्हा एकदा अस्तित्वात आली. शिवरायांच्या उदयकालात अनेक सरंजामदार महाराष्ट्रात नांदत होते, त्यांची प्रजेशी वागण्याची पद्धत ही निव्वळ सावकारी स्वरूपाची होती; रयतेला त्राता असा कोणी राहिला नव्हता. तशा पार्श्वभूमीवर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. तसे तर, शिवराय जन्माने ‘राजे’ होतेच. त्या वेळी महाराष्ट्रात तसे राजे अनेक होते. पण ते सारे केवळ नावाचे ‘राजे’ होते. शिवाजी महाराजांच्या घरात जन्मतः आयुष्यभर सुखाने कालक्रमणा करता येईल, एवढी संपत्ती होती. ते पातशहाचे अंकित म्हणून जहागिरदारासारखे राहू शकले असते, पण शिवरायांच्या मनात मोठी ओढ या भूमीवर स्वराज्य निर्माण करण्याची होती, त्यातून स्वराज्याचा जन्म झाला ! शिवरायांनी स्वराज्याची स्थापना दिल्लीची पातशाही, विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही बहरात असताना केली ! त्या शाह्या डोळे वटारून पाहत होत्या, तरी महाराजांनी महाराष्ट्राला छत्र दिले व सर्वसामान्य रयतेच्या मनात आत्मविश्वास जागृत केला.

मराठ्यांचे स्वतंत्र असे सिंहासन शिवराज्याभिषेकानंतर अस्तित्वात आले. रयत लढू लागली, ती त्या सिंहासनाकरता ! खरे तर, रायगड पडल्यावरच लढा संपला असता; परंतु मराठे शिवाजी-संभाजीराजांच्या नंतरही लढले, ते त्या सिंहासनासाठी ! मराठ्यांनी ते स्वातंत्र्ययुद्ध पंचवीस वर्षे अव्याहतपणे लढवले व त्याचा शेवट म्हणजे, हिंदुस्थानमधील मुघलशाहीची अखेर महाराष्ट्रात झाली ! महाराष्ट्र हा सर्वसमर्थ अशा मुघलशाहीचे कबरस्तान बनला. शिवरायांना त्यांचा राज्याभिषेक हा त्या घटनेचा परिणाम साधण्यासाठी हवा होता, त्यात ते यशस्वी झाले. छत्र सिंहासनामुळे या स्वराज्याला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक दर्जा व स्थैर्य प्राप्त झाले. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा राजकीय अर्थ फार मोठा आहे. ती खूण काहीशे वर्षे चाललेले इस्लामचे वर्चस्व संपल्याची आहे. जीझियाच्या अंमलाखाली भरडल्या गेलेल्या हिंदुस्थानामधील रयतेला शिवरायांच्या राज्याभिषेकाने छत्रचामरे असलेला राजा मिळाला होता. साहजिकच, काशीविश्वेश्वर सुरक्षित झाला ! महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न हे महाराष्ट्राच्या चौकटीपुरते मर्यादित नाही. छत्रपतींच्या रूपाने दक्षिणेतील हिंदू रयतेला त्राता मिळालाच, पण विश्वेश्वर हा उत्तरेत होता, आलमगिराच्या अंमलाखाली ! त्या विश्वेश्वरालाही मोकळीक मिळाली.

शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने आणखी काही बाबी पार पाडल्या. त्या सर्व बाबी स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. त्यांनी ‘राज्याभिषेक शक’ सुरू केले. अष्टप्रधानांची फारसी नावे बदलून त्यांना संस्कृत नावे दिली. सुवर्ण व तांबे यांची नाणी मुद्रेसाठी म्हणून पाडण्यास सुरुवात केली; त्या नाण्यांवर ‘राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे घातली. मराठी भाषा ही फारसीच्या संसर्गाने मुसलमानाळलेली होती. महाराजांनी पंडित रघुनाथपंतांस आज्ञा करून शेकडो फारसी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देण्याचे निश्चित केले. त्यासाठी ‘राज्यव्यवहार कोष’ सिद्ध करण्यात आला. राजपत्र लेखनाविषयी देखील तसे नियम केले गेले. मराठी ही स्वराज्याची राजभाषा बनली. सभासदाने बखरीत म्हटल्याप्रमाणे, ‘मऱ्हाटा पातशाहा येव्हढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य नाही.’

शिवराज्याभिषेकाचा खरा अर्थ त्या काळामधील फक्त तीन माणसांना समजला. त्यांपैकी एक स्वतः महाराज होते. छत्रचामरे ही केवळ महाराजांची हौस नव्हती; तर ती त्या काळाची गरज होती. महाराजांचे राज्याभिषेकाचे उद्दिष्ट स्वराज्याला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक दर्जा व स्थैर्य प्राप्त करून देणे हे होते. दुसरी व्यक्ती म्हणजे, आचार्य गागाभट्ट हे होत. गागाभट्टांनी महाराजांच्या कार्याचे स्वरूप अचूक हेरले होते आणि त्यामुळेच गागाभट्टांनी या भूमीला सनाथ करण्याचे साकडे महाराजांना घातले. सभासद सांगतात, “पुढे वेदमूर्ती गागाभट्ट म्हणून वाराणसीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट हे गोसावीथोर पंडित, चार वेद, सहा शास्त्रे, योगाभ्यास संपन्न, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा ब्रह्मदेव असा पंडित. त्यांस सरकारकून सामोरे जाऊन, भेट घेऊन, सन्माने आणिले. त्यांची पूजा नाना प्रकारे, रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन पूजिले. गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी यांचे मते मुसलमान पातशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात, आणि शिवाजीराजे याणी चार पातशाही दबावल्या आणि पाऊण लाख घोडा लष्कर गड कोट असे असता त्यास तक्त नाही. यांकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तांत आणिले आणि राजियास मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून, विचार करिता सर्वांचे मनास आले. तेव्हा भट गोसावी म्हणू लागले, की तक्ती बसावे.” हिंदूंना छत्रचामरे असलेला राजा मिळाला, म्हणजे विश्वेश्वर सुरक्षित होणार होता आणि गागाभट्टांना हवी होती ती काशीची मुक्तता ! त्याचसाठी गागाभट्ट उत्तरेमधून स्वतः होऊन महाराजांकडे चालत आले.

शिवाजी महाराज व गागाभट्ट या दोघांच्या एवढाच राज्याभिषेकाचा अर्थ ओळखला होता, तो बादशहा औरंगजेबाने ! औरंगजेबाने शिवराज्याभिषेकाने उभे केलेले आव्हान अचूक ओळखले. शिवराज्याभिषेक ही मोगली अंमलाखाली असणाऱ्या सर्व हिंदू जनतेचा आत्मविश्वास जागृत करणारी घटना होती. शिवाजीराजांचे यश पाहून उत्तरेत जाट, बुंदेले व सतनामी यांचे उठाव घडू लागले. रजपुतांच्यामध्ये देखील खळबळ दिसू लागली. उत्तरेमधील बहुसंख्य प्रजेच्या स्वामिनिष्ठ राहण्यावर मोगल साम्राज्याची स्थिरता अवलंबून होती. हिंदुस्थानातील लोकांचा आत्मविश्वास शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या रूपाने जागृत झाला होता. ती मोगल सत्तेची अखेर होण्याची सुरुवात होती. महंमद घोरी, गझनीचा महंमद यांचा वारसा सांगणाऱ्या आलमगिराने त्याच्या डोळ्यांनी इस्लामी वर्चस्वाला मिळालेला तो शह पाहिला. तो पुरता खचला. तो पुढेदेखील अखंडपणे पंचवीस वर्षं मराठ्यांशी लढत राहिला. मराठेही या सिंहासनासाठी प्राणपणाने लढले, प्रसंगी निर्नायकी अवस्थेतसुद्धा ! औरंगजेब दक्षिणेत आला नसता, तर मराठे उत्तरेत गेले असते एवढी लष्करी तयारी मराठ्यांनी त्यावेळी केलेली होती, याची नोंद सभासदाने केलेली आहे. ती तयारी केवळ संरक्षणासाठी नव्हती.

सभासदाने राज्याभिषेकानंतरची औरंगजेबाची मनोवस्था काहीशी अतिरंजित अशी वर्णन केलेली असली; तरी अत्यंत मनोहारी आहे. सभासद लिहितो- ‘ही वर्तमाने बहादुरखान कोका यास कळली. त्याने पुढे, पेडगाव भीमातीर येथे येऊन छावणी केली आणि दिल्लीस पातशहास हे वर्तमान सिंहासनाचे लिहिले. पातशाहास कळून तक्तावरून उतरून अंत:पुरास गेले आणि दोन्ही हात भुईस घासून त्याच्या देवाचे नाव घेऊन परम खेद केला. दोन दिवस उदक घेतले नाही आणि बोलिले, की ‘खुदाने मुसलमानाची पादशाही दूर करून तक्त बुडवून मराठियास तक्त दिले. आता हद्द जाली. असा बहुत खेद दुःखाचे पर्वत मानिले. मग मोठे मोठे वजिरांनी नाना प्रकारे समाधान करून आणा खुणा घालून तक्तावर बसविले. ऐसेच विजापूरचे पातशाहास व भागानगरचे पातशाहास वरकड सर्वांस वर्तमान कळून खेद जाहाला. रूम, शाम, इराण, दुराण व दर्यातील पातशाहास खबर कळून मनात खेद करू लागले. खेद करून आशंका मानिली. ये जातीचे वर्तमान जाहाले.”

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here