टिळकांच्या गीतारहस्याचे रहस्य! (Why did Tilak write his world famous thesis Geetarahasya?)

1
172

गोष्ट 1915 सालची. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले होते. त्यांना भेटण्यास येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर होती. तशा परिस्थितीत टिळक यांना भेटण्यास एक शास्त्री आले. ते चांगले अभ्यास केलेले आणि पुराणिक व प्रवचनकार म्हणून वाराणसीत प्रसिद्ध होते. तसेच, ते तेथे त्यांच्या व्याख्यानांचा आस्वाद महाराष्ट्रातील नामवंत लोकांनी घेतला असल्यामुळे महाराष्ट्रातही मशहूर होते. तर ते पंडित ओळखपाळख काढून, एक ओळखपत्र घेऊन लोकमान्यांना भेटण्यास गेले. परंतु पंडितांना टिळक यांच्याशी ‘काय बोलावे’ ते पटकन सुचेना. म्हणून त्यांनी दोघांना माहीत असलेल्या एका गृहस्थांची चौकशी लोकमान्यांकडे केली. टिळक लगेच उठले व स्वतः खाली जाऊन त्या गृहस्थांबाबत तपास करून आले. लोकमान्यांनी सांगितले, ‘ते गृहस्थ तळेगावला गेले आहेत’ पुढे, टिळक यांनीच स्वत:हून ‘गीतारहस्या’ची गोष्ट काढली. ‘माझ्या गीतारहस्याबद्दल काशीकर पंडितांचे मत काय आहे?’ असे टिळक यांनी विचारले.

पंडितांनी सांगितले, की ‘काशीतील हिंदुस्थानी (हिंदी भाषिक) पंडितांना मराठी भाषा येत नसल्याने त्यांनी ते वाचलेलेच नाही. महाराष्ट्रीय पंडित, त्यांना संस्कृतशिवाय कोणत्याही इतर भाषांतील ग्रंथ वाचण्याचा कंटाळा आहे आणि वेळही नसतो. खरे बोलायचे तर पंडितांना त्यांच्या नेहमीच्या पठणपाठणातील ग्रंथांव्यतिरिक्त दुसरे ग्रंथ वाचण्याची आवडच नाही. गीतारहस्य वाचलेच नाही तर ते अभिप्राय काय देणार?’

टिळक यांनी भेटण्यास आलेल्या पंडितांना विचारले, ‘मग तुमचे स्वत:चे मत काय आहे?’ त्यावर पंडित म्हणाले, ‘ग्रंथ तर अपूर्व झाला आहे, पण रहस्याचा जो मुख्य भाग आहे, की ज्ञान झाल्यानंतरही ज्ञानी माणसाला गीतादेवी कर्म करण्याची आज्ञा करते. त्याबद्दल थोडे विचारावेसे वाटते. ते असे, की ‘‘‘आज्ञा’ या शब्दाचा अर्थ होतो, तिचे पालन केले तर फळ मिळते आणि ती मोडली तर दंड होतो. ज्ञानी पुरुषाने गीतेची आज्ञा मोडून कर्म केले नाही तर त्याला मोक्ष मिळणार नाही असे तुमचे मत आहे काय?”

टिळक उत्तरले, “छे ! ज्ञान झाल्यानंतर मोक्ष तर मिळणारच, मग तो कर्म करो वा न करो.”

“मग गीतादेवीच्या आज्ञेचे स्वारस्यच काय उरले?” पंडितांनी विचारले. त्यावर टिळक म्हणाले, “आज्ञा नाही, विनंती म्हणा.”

पंडित म्हणाले, “ठीक आहे. विनंती मान्य करणे श्रीमंतांच्या मनावरची गोष्ट आहे. जनक, शंकराचार्य, रामदास यांनी विनंती मान्य करून देशकार्य केले. शुक्राचार्यादिकांनी विनंती मान्य केली नाही. शंकराचार्यांचाही विनंतीला विरोध नाही. मग आपण संन्यासमार्गी म्हणून त्यांच्यावर प्रच्छन्न टीका का केली?”

पंडितांच्या प्रश्नावर टिळक हसून म्हणाले, “अहो, शंकराचार्यांबद्दल मला अत्यंत आदर आहे व मला हे पक्के माहीत आहे, की शंकराचार्यांचे मत व ग्रंथ ‘यावदचंद्रदिवाकरौ’ चालणार. गीतारहस्य मागे पडेल ! वल्लभ, रामानुज, माध्व यांच्याप्रमाणेच मीही देशकालाला अनुसरून असा तो ग्रंथ लिहिला आहे. स्वतःला तत्त्वज्ञानी समजून निष्क्रिय झालेल्या संन्याशांकरिता तो ग्रंथ आहे.”

मी हे सारे तपशील व संवाद उद्धृत करत आहे ते पंडित भाऊशास्त्री वझे यांच्या पुस्तकातून. त्या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’ भाऊशास्त्री वझे हे ब्रह्मघाट, काशी येथील रहिवासी. भाऊशास्त्री यांच्या तीन पिढ्या वाराणसीत पौरोहित्य, प्रवचने आणि पुराणे सांगण्याचा व्यवसाय करत होत्या. ‘माझा चित्रपट व …’ पुस्तक प्रकाशित झाले ते 1940 साली. त्यावेळी भाऊशास्त्री यांचा मुलगा हादेखील वाराणसीत वडिलोपार्जित परंपरा चालवत होता. भाऊशास्त्री वझे यांचा जन्म 1888 मधील. त्यांचे आजोबा पेशवे घराण्यातील एका महिलेबरोबर वाराणसीत आले. भाऊशास्त्री यांनी अनेक ग्रंथ वाचून वाराणसीचा इतिहास, भूगोल, तेथील चालीरीती, अनेक घाट, तेथे उपजीविका करणारे महाराष्ट्रीय व अन्य प्रांतीय अशी साद्यन्त माहिती दिली आहे. उत्तरार्धात त्यांनी स्वतःची हकीगत दिली आहे. ते पूर्णतः परंपरावादी होते. सरकारने दिलेली महामहोपाध्याय ही पदवी त्यांनी शारदा बिलाचा विरोध म्हणून सात महिन्यांच्या अल्पावधीत परत केली होती. हे पुस्तक ‘इ पुस्तकालय’वर उपलब्ध आहे.

मुकुंद वझे 9820946547 vazemukund@gmail.com
——————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. लोकमान्य टिळकांची आणि गीता रहस्य ची नवीनच माहिती कळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here