विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री.म.माटे (Vidnyanbodhachi Prastavana)

26
484

श्री.म.माटे उर्फ माटे मास्तर हे महाराष्ट्रातल्या कर्त्या सुधारकांपैकी एक. माटे यांना सनातन संस्कृतीचा अभिमान होता आणि तेच त्या संस्कृतीचे कठोर टिकाकारही होते. त्यांनी दलित साहित्याची पहाट होण्यापूर्वी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहून दलितांची स्थितीगती मराठी समाजासमोर आणली. त्यातले, ‘बन्सीधरा! तू कोठे जाशील?’ ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ किंवा ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्या कथा आजही अनेकांच्या लक्षात असतील.

‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे कुठल्या पुस्तकाची प्रस्तावना नसून स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांचा ‘विज्ञानबोध’ नावाचे वार्षिक नियमितपणे प्रकाशित करण्याचा मानस होता. याची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टीकोनाची मांडणी केली आहे. गिरीश दुर्वे यांच्या लेखाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत व्हावी हाच हेतू आहे.

‘मोगरा फुलला’ या लेखातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

विज्ञानबोधाची प्रस्तावना –श्री. म. माटे

महाराष्ट्राच्या इतिहासात, एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा शतकी कालखंड महत्त्वाचा आहे. या काळात भारतात इंग्रजांची राजवट स्थिर झाली होती. ब्रिटिशपूर्वकाळातील राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील अराजकता, अशांतता, बेशिस्तपणा, अनास्था याला काहीसा पायबंद बसला होता. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहू लागले आणि येथील समाजजीवन ढवळून निघाले तथापि कोणताही समाज स्वतःची परंपरागत जीवन पद्धती किंवा संस्कृती सोडण्यास सहजासहजी तयार नसतो. अशा, एकप्रकारे कोंडीत सापडलेल्या समाजास योग्य दिशा दाखवण्यासाठी अनेक विचारवंत, सुधारक या काळात पुढे आले. महाराष्ट्रातील ज्या विचारवंतांनी येथील राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रबोधनास सुरुवात केली अशा विचारवंतांमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ठळकपणे उठून दिसणारे नाव म्हणजे श्रीपाद महादेव माटे (31 ऑगस्ट 1886 ते 25 नोव्हेंबर 1957).

मराठीतील महत्त्वाचे कथालेखक, निबंधकार आणि ग्रंथलेखक म्हणून श्री. म. माटे उर्फ माटे मास्तर, सजग वाचकांना परिचित असतात. ते चिंतनशील वृत्तीचे, पक्की वैचारिक बैठक असलेले, व्यासंगी विचारवंत होते. ते सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांची मुख्य तळमळ अस्पृश्यता निवारण ही होती. ‘नव्या  मनूचा स्वीकार केल्याखेरीज व सुधारणांच्या वाऱ्यांचा या समाजात संचार झाल्याखेरीज समाज समर्थ व वैभवशाली बनू शकणार नाही’ अशी त्यांची धारणा होती. त्यावेळच्या समाज जीवनाचा अभ्यास करताना अनेक त्रुटी माटे मास्तरांच्या लक्षात आल्या. उदाहरणार्थ, रूढ असलेली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्पृश्य-अस्पृश्य इत्यादी बाबतीतले कडक निर्बंध; वैज्ञानिक व प्रगत दृष्टिकोनाची कमतरता; दुभंगलेला समाज; स्त्रियांकडे पाहण्याचा प्रतिगामी दृष्टिकोन; समाजजीवनात धर्माला असलेले अवाजवी महत्त्व आणि समाजात निर्माण झालेला आळशी वर्ग इत्यादी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही व्यापक सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय समाजजीवन सुखाचे राहणार नाही हे जाणून माटे मास्तरांनी समाजातील उपेक्षित वर्गामधून कामाला सुरुवात केली तसेच त्यांनी मुख्यत्वे समाजप्रबोधनाच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, सुधारक यांची चरित्रे, आत्मचरित्रे, शिक्षण, अस्पृश्यता अशा विषयांवर लेखन केले, वैचारिक निबंध लिहिले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने त्यांच्यात विद्या व संस्कृती यांचा प्रसार करणे याबरोबरच माटे यांची बांधिलकी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाच्या साहाय्याने भौतिक समृद्धी या आधुनिक विचारसरणीशी होती.

विज्ञानाची सांगड उत्पादकतेशी घातल्याशिवाय ऐहिक समृद्धी येणे शक्य नाही हा विचार त्यांच्या विज्ञाननिष्ठेचा पाया होता.

या विज्ञानानिष्ठेतून माटे यांनी ‘विज्ञानबोध’ हा ग्रंथ संपादित केला आणि पुढे वार्षिक स्वरूपात हा ग्रंथ प्रकाशित होत राहील असा त्यांचा संकल्प होता. त्यांनी विज्ञानबोध या वार्षिकासाठी दोनशे पानांची प्रदीर्घ प्रस्तावना ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ या पुस्तकाच्या रूपाने लिहिली आहे. इतकी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिण्या मागचा त्यांचा हेतू ते प्रस्तावनेच्या सुरुवातीला स्पष्ट करतात. ‘ही एवढी विस्तृत प्रस्तावना प्रस्तुत ग्रंथासाठी लिहिलेली नाही, विज्ञानबोध नावाचे जे वार्षिक चालू करण्याचा आमचा संकल्प आहे व प्रस्तुत ग्रंथ हा ज्याचा पहिला व प्रास्ताविक अंक आहे त्या वार्षिकासाठी ती लिहिली आहे. बृहन्महाराष्ट्रातील शिक्षकांनी आधिभौतिक शास्त्राचा अभ्यास जोराने सुरू करायला हवा हे आमचे मत आम्हास आरंभी आग्रहाने प्रतिपादावयाचे आहे. त्यासाठी प्रस्तावनेचा एवढा विस्तार केला आहे’.

विज्ञानबोधाची निकड विशद करताना माटे सांगतात, की सतत परदेशी मालावर अवलंबून राहून राजकीय स्वातंत्र्य नाममात्र उरणार आहे. हे टाळायचे असेल तर भारतीय वैज्ञानिकांनी पुढे आले पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण समाजातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. तरच वैज्ञानिक संशोधन, त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर व त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यता, भांडवली गुंतवणूक आणि जीवनावश्यक व आनंद देणाऱ्या वस्तूंची उपलब्धता होऊन समाजाला सुख समृद्धी प्राप्त होईल.

माटे यांनी सात-आठ दशकांपूर्वी ह्या दीर्घ प्रस्तावनेत मांडलेले असे अनेक विचार आजही फार महत्त्वाचे ठरतात कारण स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली तरीदेखील आत्मनिर्भर होण्यासाठी देशाची धडपड चालूच आहे. अशा परिस्थितीत माटे यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जनमानसात रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ या पुस्तकाची नव्याने ओळख करून घ्यायला हवी. ह्या विस्तृत प्रस्तावनेची सुरुवात ‘घरचे वारे बदलले पाहिजे’ या आग्रहापासून ते करतात. त्यात ते लिहितात, की ‘पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आधिभौतिक शास्त्रांचा अभ्यास, नवे शोध, नव्या क्लुप्ती इतक्या भरभर पुढे येत आहेत की त्यांच्याशी ज्या लोकांचा परिचय नाही ते लोक विद्वान असून सुद्धा मागासलेले राहतील. आपले राज्य गेले आणि गोऱ्यांचे आले या पराभवाची मीमांसा करताना इतिहासकार आपल्या सामाजिक, मानसिक कमकुवतपणाला दोष देतात पण यात थोडेबहुत तथ्य आहे खरंतर ज्याचे मारक शास्त्राचे ज्ञान मोठे तो इतरांहून वरचढ ठरतो. जिवंत ज्ञानाचे झरे आपल्याच भूमीत उत्पन्न व्हावयास हवेत. संशोधनकार्य मोठ्या प्रमाणात आपल्या माणसांना शक्य आहे. एकंदर जनसमूहामध्ये शास्त्राची आवड उत्पन्न करणे. लोकांच्या कल्पकतेला, बुद्धीच्या स्वतंत्र स्फुरणाला जागा करून देणे हे प्रस्तुतचे युगमान लक्षात घेता अत्यंत जरुरीचे आहे.’ हा माटे यांचा विचार खरंतर आजचे युगमान लक्षात घेता देखील अत्यंत जरुरीचा आहे. बहुतेक जगाचा सूक्ष्म अभ्यास करावा असे कोणालाच वाटत नाही ही त्यांची तळमळ ते प्रस्तावनेतील ‘मनाला आलेली मरगळ’  या लेखात स्पष्टपणे मांडतात. भारतीय जनमनात रुजलेल्या अध्यात्म भावाविषयी ते चिंतीत होते. ते म्हणतात, ‘अर्धसंस्कृतांच्या उत्पातात सर्व जगत् सापडल्यामुळे भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचे अणुरेणूरूप विचार तेथेच दग्ध झाले आणि मनुष्ययोनी केवळ आत्म्याचा विचार करू लागली’… ‘हिंदुस्तान देशातही आत्मविचार इतका चेकाळला की माणसांना देहाचा म्हणजे प्रपंचाचा विसरच पडला. व मग ते आत्मवादाचे तत्त्वज्ञान पसरता पसरता ब्रह्मज्ञान निघाले. तत्त्वज्ञानराशीत सबंध राष्ट्राचे मन गुदमरून गेले. या तत्त्वज्ञानाची पकड शिक्षितांच्या मनावरसुद्धा इतकी जबरदस्त आहे की भौतिक ज्ञानाचे प्रेम त्यांना उत्पन्नच होत नाही’. पुढच्या लेखात ते ‘ब्रह्मसत्य जगत मिथ्या’ या अध्यात्मिक तत्त्वाची सडेतोड मीमांसा करतात. ते म्हणतात, की ब्रम्हयाने हे विश्व जरी खेळ म्हणून निर्माण केले असले तरी त्या क्षणातील आदिसूत्र म्हणून त्याला काम उत्पन्न करावा लागला, षड्रिपू हे रिपू नसून आमचे मित्र आहेत.

हा तत्त्वज्ञानविषयक वैचारिक गोंधळ आजही समाजमन व्यापून आहे. त्याविषयी सर्वसामान्य माणसाने कसे जागृत असायला हवे याविषयीचे म्हणून माटे यांचे स्पष्ट विचार आजही तितकेच दिशादर्शक आहेत. प्रस्तावनेतील ‘वैचारिक कसोटी’ या लेखात माटे धार्मिक असहिष्णुतेवर बोट ठेवताना माटे म्हणतात, की ‘द्वैती अद्वैती इत्यादी मुद्द्यांवर समाजाची शकले पडावी हे खरोखर आपले दुर्भाग्य होय. पंथ काढणाऱ्यांनी आपली परमार्थविषयक भूमिका जर खरोखर केवळ परमार्थविषयक आहे, तिचा ऐहिक जीवनाशी कसलाही संबंध नाही, ही भूमिका केवळ तत्त्वसंशोधनापुरती आहे, तिच्यात साक्षात्काराचा भाग नाही, आम्हाला दैवी स्फुरण झालेले नाही असे मन उंच करून सांगून ठेवले असते व उत्तरोत्तर त्यांच्या विचारपंथात जे दाखल होत आले त्यांच्यापुढे या प्रतिज्ञारूप विचारांची जर सारखी उजळणी होत राहिली असती तर समाज इतके विछिन्न होण्याचे कारण नव्हते… ब्रह्मविदांनी आम्हांस संसारातून मुक्त करण्याची तयारी दाखवावी हे जरी यथायोग्य असले तरी ‘तुला बरे करतो’ असे म्हणणारा वैद्य हा वैद्य आहे की वैदू आहे, खरोखर काही पढला आहे की काय याची चौकशी ज्याप्रमाणे रोगी करणार त्याप्रमाणेच आम्ही संसारी लोक या उपदेशोत्सुक ब्रम्हवेत्त्यांच्या अधिकाराविषयी चर्चा करूच करू, तिच्यात अवहेलना नाही; केवळ जिज्ञासा आहे.’

अनेक साक्षात्कारी ब्रह्मवेत्यांना वेगवेगळे म्हणजे ‘कोणास काही कोणास काही पण ज्यांचा एकमेकांना पत्ता नाही असे हरतऱ्हेचे साक्षात्कार होऊन गेले. अशाच या परस्परविरोधी निदान परस्परविसदृश्य साक्षात्कारांच्या भांडवलावर आज कित्येक हजार वर्षे ब्रह्मवेत्त्यांनी मनुष्ययोनी झुलत ठेवलेली आहे. नुसती झुलत ठेवली असती तरी चालले असते पण या कल्पित ज्ञानाच्या योगाने एवढे अभिनिवेश पेटले की परस्परांच्या संसाराची, राष्ट्राची, वाङ्मयाची, संस्कृतीचीही होळी करावयास माणसे प्रवृत्त होत आली आहेत.’ माटे पुढे विचार मांडतात, की ‘जसे आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करणारे स्वतंत्रपणे प्रयोग करत असले तरी आपली उत्तरे काय आहेत हे एकत्र येऊन पाहतात, तुलना करतात, चूक किंवा बरोबर अशी शहानिशा करतात, पुढील मार्गांच्या दिशा कायम करतात तसे ब्रह्मवेत्यांनी करावयास नको होते काय?’

आजच्या धर्म आणि वर्णविद्वेषाच्या वातावरणात या माटे यांच्या विचारांचा प्रसार करण्याची आणि समाजप्रबोधन करण्याची अतिशय निकड आहे हे कोणीही मान्य करेल. ‘ऋण कोणाच्या धर्माचे’ या लेखात धर्म, विज्ञान, ज्ञान, शास्त्र याबद्दलचे आपले विचार बुद्धिवादी दृष्टिकोनातून मांडताना माटे म्हणतात, की धर्माने आपल्या जीविताची घडी बसवून दिलेली आहे हा एक सार्वत्रिक समज आहे पण खरंतर आपली जी घडी बसवून दिलेली आहे ती या परमार्थाने नव्हे हे परमार्थिक ज्ञान बाजूस ठेवून माणसांना जी शुद्ध सामाजिक ज्ञाने हस्तगत करता आली, ती त्यांनी जपून ठेवली व ती समाजाच्या हिताची असल्याने त्यांना धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. ते पुढे म्हणतात, की परिस्थितीच्या अवलोकनाने जे असावयास हवे असे सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मनात जे ज्ञान अनुभवाने उतरले होते त्यालाच त्यांनी नियमांची रूपे दिली. मग लोक मूळचे अवलोकन करणाऱ्यांना द्रष्टे म्हणू लागले. पण द्रष्टे हा शब्द पुढील माणसे काही भोळ्या अर्थाने वापरू लागतात पण खरंतर त्यात अतिमानुष्यत्वाचा काही एक भाग नाही, शुद्ध अवलोकन, चिंतन आणि योजना एवढेच काय ते त्यात आहे.’ हा इतका स्पष्ट, बुद्धिवादी आणि सत्य विचार आजच्या समाजात धार्मिक अहंकार पसरवणाऱ्या धर्ममार्तंडांच्या बिलकुल पचनी पडणार नाही. परंतु सर्वसामान्यांत हा ऐंशी वर्षापूर्वीचा विचार रुजवण्याची अत्यंतिक निकड आहे.

विज्ञानबोधाच्या विस्तृत प्रस्तावनेत माटे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्मिक निष्क्रियता, धार्मिक कट्टरता,  चिवट धार्मिक समजुती, भारतीयांच्या मनात घट्ट बसलेला न्यूनगंड अशा अनेक विषयांवर मार्मिक आणि सडेतोड टिप्पणी करतात. उदाहरणार्थ त्यांचे या प्रस्तावनेत मांडलेले काही विचार असे आहेत:

1. केवळ काव्य, नाटकांवर सुशिक्षित मनाची जी गुजराण होते त्याऐवजी किंवा निदान त्याच्या जोडीला शास्त्रज्ञानाचा खुराक अभ्यासू मनाला पोचवला पाहिजे.          

2. शास्त्राचा साक्षात्कार हा सर्व लोकांना अनुभवता येतो व पारमार्थिक साक्षात्कार हा एका माणसाला मिळालेले, एकानेच अनुभवायचे असे भांडवल आहे, हा फरक माणसांनी लक्षात घेतला नाही. त्यामुळे गुंता झाला व जे कोणी आपले मत मानत नाही त्यांना भाजून काढावे, सुळावर खोचावे, धर्माधिकारी हा इतरांप्रमाणेच चुकीस पात्र आहे असे म्हटल्याबरोबर म्हणणाऱ्यांची जीभ काढून टाकावी असे अन्वनित प्रकार जगताच्या इतिहासात हजारोंनी झाले. येथे ब्रह्मवेत्यांना विचारावेसे वाटते की केवळ तत्त्वज्ञान म्हणून आपले हे ज्ञान सांगावयास नको होते का? जर परमेश्वरी स्वरूप मूळचे एकच तर आपणा सर्वांचे साक्षात्कार असे निरनिराळे का येतात असे आपण कधी आपणास व एकमेकांस विचारले होते काय? याचे सरळ उत्तर असे आहे की हे कधीही केलेले नाही.

3. ती ज्ञाने त्यावेळच्या मोठ्या लोकांनी जेव्हा सांगितली तेव्हा ते आग्रहाने असे म्हणाले की हे सर्वसत्तामान अशा परमेश्वराचे शब्द आहेत. तोच आमच्या मुखावाटे आपले मनोगत बोलत आहे. हे देवाचे नाव या लोकांच्या उद्गाराशी कायमचे जखडले असल्यामुळे त्या उद्गारातील तारतम्याची चिकित्सा करावयास माणसे धजेनाशी झाली.

4. ज्ञानाची प्रगती होत असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसेल की ‘सर्व शहाणपणाचा कब्जा मी आपल्याकडे घेतला आहे’ असे जे धर्म म्हणतो ते बरोबर नाही.

माटे यांनी ऐंशी वर्षांपूर्वी धर्माची विज्ञानाशी सांगड घालून मांडलेले हे प्रबोधनपर विचार आजच्या एकविसाव्या शतकातही तितकेच लागू होत आहेत. आज जगभर वाढलेला कट्टरतावाद बघता इतक्या दीर्घ कालखंडात समाजाने काही प्रगती केली आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. भारताच्या बाबतीत विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात माटे यांच्या प्रस्तावनेच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर, जरी आश्वस्त वाटण्यासारखे बरेच काही असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आपल्या देशात वैज्ञानिक शक्ती बनण्याची क्षमता आहे. स्वदेशी कोविड-19 लशीचा विकास, स्वदेशी क्रायोजनिक इंजिन ही संभाव्यतेच्या अनेक लक्षणांपैकी दोन आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इस्रो, भाभा अणुसंशोधन प्रकल्प, टाटा मूलभूत अनुसंधान संस्था यांसारख्या संशोधन संस्थांचा पाया घातला गेला आणि या संस्था आज भरीव कामगिरी करत आहेत. मात्र त्याचबरोबर धर्मभोळेपणाही वाढत आहे अशा परिस्थितीत माटे मास्तरांच्या विचारांचा प्रसार करणे गरजेचे आहे. इंजिनीयर, डॉक्टर, व्यावसायिक बनण्याच्या आकांक्षाबरोबर संशोधक होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी. मूलभूत संशोधनाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न व्हायला हवेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विवेकवादी विचार रुजवण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेतले विचार आजही प्रस्तुत आहेत असे वाटते, म्हणून त्या पुस्तकाचे हे स्मरण.

संदर्भ – निवडक: श्री.म. माटे, खंड 2

– गिरीश दुर्वे 996449950 girish_durve@yahoo.co.in

About Post Author

26 COMMENTS

  1. अतिशय सुंदर लेख. श्री. म. माटेंच्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ मधील एक धडा शालेय अभ्यासक्रमात कुठेतरी होता.
    नंतरच्या काळात शांता शेळकेंच्या लेखनात त्यांच्या विषयी थोडीशी माहिती वाचनात आली होती पण विज्ञान आणि वैद्न्यानिक दृष्टिकोन प्रसारासंबंधीच्या त्यांच्या कार्याची प्रथमच माहिती झाली.
    गिरीश दुर्वेंची लेखन शैली अतिशय सुबोध आहे.
    त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

  2. श्री म माटे यांच्या पुस्तकाचा व त्यांच्या विज्ञान निष्ठ विचारांचा फारच छान आढावा. उत्तम आकलन आणि लिखाण या साठी लेखकाचे अभिनंदन.

  3. जवळजवळ शंभर वर्षापूर्वी व्यक्त झालेली ही (वि)ज्ञाननिष्ठा काळाच्या पुढली आणि माटे मास्तरांच्या द्रष्टेपणाची द्योतक आहे. आजही या विचारांची रुजवण करण्याची आवश्यकता/निकड जाणवावी हे आपल्या समाजपुरुषाचे अपयशच नव्हे काय ? असो …. गिरीश दुर्वे यानी या “प्रस्तावने”ची सुयोग्य शब्दात करून दिलेली ओळख प्रस्तुत काळात धर्ममार्तंडांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. एक सामान्यजन म्हणून माटे मास्तरांची मूळ “विज्ञानबोधाची प्रस्तावना” वाचण्याची उत्सुकता गिरीश दुर्वे यांच्या लेखाने चाळवली हे नक्की.

  4. श्री म माटे यांचे विज्ञाननिष्ठ विचारांचे विस्तृत स्पष्टीकरण श्री गिरीश दुर्वे यांच्या लेखनातून समजले .ओघवत्या भाषेतील लिखाण आवडले .अभिनंदन

  5. उत्तम लेख. छदमविज्ञान फोफावत असतानाच्या काळात असे विचार पुढे येणं ,त्यांचा प्रसार होणं फारच स्वागतार्ह ! माटे काळाच्या किती पुढे होते हे जाणवतं.त्यांच्या त्या जाणिवांना गिरीशने यथोचित न्याय दिला आहे.

  6. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ श्री.म. माटे पुस्तकाचा परिचय गिरीशने सुबोध शब्दात, मुद्देसूद लिहिला आहे. गिरीशच्या लेखाने आम्हा वाचकांची या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत झाली ह्यात काहीही संदेह नाही. पुस्तकाच्या परिचयाआधी गिरीशने एकोणिस विसाव्या शतकामधील महाराष्ट्र राज्यातील राजकीय, सांस्कृतिक… चित्राची ओळख वाचकांना देऊन विज्ञानबोध वार्षिक व त्यासाठी प्रस्तावना हा ग्रंथ लिहिण्याचा श्री.म. माटे ह्यांचा हेतू विशद केला आहे. श्री.म. माटे यांनी सात आठ दशकापूर्वी मांडलेले विचार आजही आपल्या उन्नतीसाठी किती महत्वाचे आहे हेही गिरीश दुर्वे सांगून जातात. माटे यांचे काही विचार लेखात उद्धृत केले आहेत. ‘द्वैती अद्वैतीवर समाजाची शकले पडावी हे खरोखर आपले दुर्भाग्य, आत्मवादाचे तत्त्वज्ञान इतके चेकाळले की… सबंध राष्ट्राचे मन गुदमरून गेले, षड्रीपू हे रिपू नसून आमचे मित्र आहेत…’टाँगलेन… तिबेटी ध्यानतंत्र, डॉ आनंद नाडकर्णीचा चतुरंगमधील लेखाची आठवण झाली. हे ध्यानतंत्र आपल्याला नकारात्मक भावना, चिंता..आपल्या श्वासाबरोबर आत घ्या म्हणजे त्याच्याशी मैत्री करा असे सांगत. श्री.म. माटे सुद्धा हेच सांगतात षडरिपुशी मैत्री करा (त्यापासून लांब राहिला तर ते बळावतील असच काहीस त्यांचं म्हणणं असावं.) लेखाची प्रास्ताविक आणि सांगता ह्याची छान गोफ विणली आहे. गिरीश असेच छान छान लिहीत जा तुला अनेक शुभेच्छा.

  7. खुप छान लेख आहे. त्या कालखंडात अशा प्रकारे विज्ञाननिष्ठ विचार रुजविण्यासाठी प्रयत्नपूर्वक लिखाण करणारा माणूस किती काळाच्या पुढे विचार करणारा आणि द्रष्टा असेल. एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तुमच्या या लेखामूळे झाली. अभ्यासपूर्ण लेख आहे. असेच लिहित रहा👌🏻👍🏼

  8. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडातील सामाजिक, धार्मिक,आर्थिक व वैज्ञानिक व्यवस्थेसंबंधी श्री. म. माटे यांनी मांडलेल्या विचारावर एकविसाव्या शतकामध्ये मिमांसा करणे अवघड आहे. कारण, आजचे वातावरण याच मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, खरंच फारसा काही फरक झाला आहे, असे दिसून येत नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे खरच धाडसाचे असून लेखकाने साजेशा ताकदीने त्याची मांडणी केलेली आहे ,असे म्हणणे रास्त ठरेल.
    ज्या वाचकांना वेगवेगळ्या कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक विषयावरील माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा असते, अशा वाचकांना ही एक पर्वणीच असून निश्चितच त्यांना समाधान मिळेल, असा एक चांगला लेख दिल्याबद्दल लेखकाचे आभार…
    तसेच, अशा विविध विषयांवर तुलनेने व अस्पर्शित असलेल्या माहितीसंबंधी साहित्य उपलब्ध करून देत असल्याने ‘ थिंक महाराष्ट्र ‘ या पोर्टलचे देखील आभार…

  9. लेख आवडला .
    अभ्यासपूर्ण आहे . सखोल व बारकाईने विचार आत्मसात करून मग ते व्यक्त केले आहेत हे स्पष्ट होते .
    आजच्या काळाशी घातलेली सांगड ही उपयुक्त तर आहेच पण अधर्माची जी एक उन्मादी स्थिती आज हेतुपूर्वक निर्माण केली गेली आहे त्या वर माटे यांचा विज्ञान विषयक दृष्टीकोन अत्यावश्यक ठरतो .
    असा क्लिष्ट विषय इतक्या सोप्या रीतीने मांडता येणे ही साधी बाब नाही . त्यात लेखक यशस्वी झाला आहे .
    गिरीश दुर्वे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अधिकाधिक लेखनास शुभेच्छा.
    🙏👍🙏

  10. अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख आहे .सोपी आणि मुद्देसूद लेखन शैली आणि श्री. माटे यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांचे स्पष्टीकरण श्री. दुर्वे यांनी अतिशय समर्पक अशा शब्दात मांडले आहे. त्याचप्रमाणे सात-आठ दशकापूर्वी मांडलेल्या विचारांचा आढावा उत्तमरीत्या मांडल्यामुळे लेख वाचनीय झाला आहे. यापुढेही अशा दुर्मिळ साहित्याची माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे. असंच भरभरून लिहित रहा.

  11. अतिशय सुरेख लेख, नक्कीच हे पुस्तक आणून वाचावं ही जिज्ञासा उत्पन्न करणारा.
    श्री गिरीश दुर्वे यांचं वाचन हे सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे हे लेखनातून जाणवलं.
    श्री म माट्यांच्या ह्या पुस्तकातील त्यांच्या विचारांचे मुद्दे इतके छान मांडले आहेत की ते वाचल्यावर आपल्याला ह्या पुस्तकाची श्रुतिफळं मिळाल्याचा आनंद होतो.

    अनेक अनुभवी , व्यासंगी आणि जेष्ठ व्यक्तींनी खूप छान व्यक्त केली आहेत त्यांची मतं आणि विचार. मी लहान तोंडी मोठा घास घेऊन माझ्या विचारांना वाट करून दिली.

    खूपच सुंदर आणि अतिशय मुद्देसूद लेखन.

  12. सर्व अभ्यासू आणि व्यासंगी वाचकांचे त्यांच्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल मनापासून आभार
    . आपलं प्रेम कायम असंच मिळत राहो.

  13. गिरीश दुर्वे यांचा लेख खूप सुंदर. लेखाचा हेतू जो आहे तो विचार समाजात रूजवला पाहिजे.आमच्यामनात येणारे अनेक प्रश्न माटेमास्तरांनी त्याकाळात बोलून दाखवले,हे खरंच आश्चर्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here