जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक (Spiritual Rebirth of the World – Need of the Hour)

0
38

अन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय म्हणजे युद्ध. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. तो परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे प्राप्त होतो. अशी नैतिक मूल्ये रुजवण्यास जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक आहे…

ख्रिस्ताचे जीवन हा प्रेमाचा प्रकाश आणि क्षमेचा कळस आहे. क्षमा करणे हे पुरेसे नाही, तर केलेला प्रमाद विसरून जाणे अगत्याचे आहे. सूड नव्हे क्षमा, शिक्षा नव्हे दया हे सूत्र शांतीसाठी आवश्यक आहे. धार्मिक क्रांती म्हणजे देवावरील विश्वास संपवणे नसून त्याऐवजी मानवतेवर श्रद्धा ठेवणे हे आहे. हे सूत्र व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला वेगवेगळ्या स्वरूपात अमलात आणता येईल. त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक आहे. दोन महायुद्धांनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचा उदय, आंतरराष्ट्रीय नाणे निधी संघटना, जागतिक व्यापार संघटना; तसेच, जागतिक बँक आणि तत्सम इतर जागतिक किंवा युरोपीय, आशियाई संघटनांमुळे जग आणि जगातील सर्व मानवजात एक कुटुंब म्हणून जगण्याचा प्रयत्न करू शकते ! अन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही. युद्ध हे कोणत्याही दोन राष्ट्रांमधील असो, तो शांती स्थापनेचा मार्ग असू शकत नाही. युद्ध म्हणजे माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय आहे. उलट प्रेमाचे, क्षमेचे, मित्रत्वाचे राजकारण म्हणजे शांतीचे राज्य ! ख्रिस्ती आणि इस्लाम या दोन्ही धर्मांची भूमिका ही परमेश्वराच्या नावाने मानवतावादी आहे; तर ताओ आणि गौतम बुद्ध यांनी निसर्गाच्या भूमिकेतून तीच मानवतावादी भूमिका मांडली आहे. हिंदू संस्कृतीत सहिष्णुता या तत्त्वाद्वारे तशीच भूमिका आहे. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला काही एक अर्थ आहे. तो अर्थ परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे येऊ शकतो. व्यक्तीने केवळ स्वत:च्या जीवनाचा अर्थ शोधावा असे नव्हे, तर संपूर्ण विश्वाचा भाग म्हणून अर्थ शोधावा अशी अपेक्षा आहे. त्याकरता मी कोण आहे? याचे आकलन महत्त्वाचे आहे. ते आकलन आध्यात्मिक प्रवासात मी कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना होऊ शकते. आध्यात्मिक प्रवासात नैतिक मूल्ये असतात, नवा धर्म मानवतावाद या नैतिक मूल्यावर आधारित असेल.

ख्रिस्ती धर्मग्रंथातील एक प्रसिद्ध विधान आहे – “पुढे येशू त्यांना म्हणाले, मी जगाचा प्रकाश आहे. माझ्या मागे येणाऱ्याला जीवनप्रकाश लाभेल. त्याला अंधारात मुळीच चालावे लागणार नाही.” (योहान 8-12). संत फ्रान्सिस असिसी, ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला यांना प्रकाश दिसला. मला प्रकाश दिसतो का? 1993 मध्ये भरलेल्या दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेत डॉ. रॉबर्ट मलर म्हणाले, “तिसरे सहस्रक एक तर आध्यात्मिक असेल, अन्यथा ते नसेलच ! जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म झाला नाही तर आपली संस्कृती नामशेष होईल.”

– अतुल अल्मेडा 9673881982 atulalmeida@yahoo.co.in

(जनपरिवार, नाताळ विशेषांक 2020)

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here