पौडातील मंगलम आनंदाश्रम ! (Mangalam Anandashram in Paud)

0
912

मंगलम वृद्धाश्रमास भेट दिल्यावर समाजसेवेचा पॅटर्न नसतो, ती एक प्रोसेस असते याची जाणीव होते. आनंद पैशांपेक्षा मोठा असतो हे तेथे आल्यावर कळते. एकटे राहून विकृती वाढवण्यापेक्षा चार-चौघांत राहून-मिसळून संस्कृती घडवावी, त्यात समाधान आहे, यश आहे ही ‘मंगलम’मागील धारणा जाणवते…

व्यवसायाने व नोकरीपेशाने कमर्शियल आर्टिस्ट असलेले अमृता व राघवेंद्र तळवलकर या दांपत्याने निवृत्त झाल्यावर मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने ‘आनंदाचे ठिकाण’ सुरू केले आहे. तो आहे मंगलम वृद्धाश्रम ! त्या प्रकल्पास भक्कम पाया त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची आणि सासू-सासर्‍यांची केलेली सेवाशुश्रूषा आणि त्या काळात जाणवलेल्या वृद्धांच्या समस्या-अडचणी व त्यातून काढलेले मार्ग हा लाभला आहे. हे त्या वेगळ्या आश्रमाचे वैशिष्ट्य. तो वृद्धाश्रम वाटतच नाही. तो आनंद देणारा व वाटणारा आश्रम आहे ! तेथे आठ-दहा मंडळीच असतात. त्यांचे एकत्र कुटुंब बनून जाते. तेथे शांत, सुंदर, मोकळे, प्रदूषणविरहित, प्रसन्न असे वातावरण आहे. तळवलकर दांपत्य वृद्धांबरोबर राहतात, भोजन घेतात, गप्पा मारतात; जवळ जवळ सतत त्यांच्यात व त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळे ते गावाकडील मोठे घर, एकत्रित कुटुंब वाटते. तो दोन एकरांचा परिसर – आमराई, छोटीमोठी शेती, भाजीपाला, शंकराचे देऊळ, गाय, बैठ्या खेळांची साधने, संगीतप्रेमी लोकांसाठी हार्मोनियम-भजन-गाणी, गप्पाटप्पा, हास्यविनोद, मनमोकळ्या स्वभावाचे हसरेबोलके आजी-आजोबा असे सगळे वातावरणच जणू कुटुंबात राहिल्यासारखे भासते. तेथे प्रवेश घेताना अट आहे, ती म्हणजे आजी-आजोबा हिंडतेफिरते असावेत. वृद्धाश्रमात दाखल होताना दरमहा असलेली रक्कम, प्रवेश फी, रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट व इतर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. एका रूममध्ये दोन किंवा तीन आणि हॉलमध्ये डॉर्मिटरी- तेथे आठ जणांची सोय आहे. सर्वांना जेवण एकसारखे मिळते. डॉक्टरांची तपासणी व भेट महिन्यातून दोनदा असते.

ज्यांचे कोणीच नाही व जे पैसे देऊ शकत नाहीत असेही काही लोक तेथे आहेत. पण त्याची जाणीव त्यांना होऊ दिली जात नाही. तळवलकर दांपत्याने तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू तेथे विक्रीसाठी असतात आणि त्यातून मिळणारी रक्कम ही तेथे मोफत प्रवेश घेतलेल्या आजी-आजोबांची काळजी व देखभाल करण्यासाठी वापरली जाते. आनंद पैशांपेक्षा मोठा असतो हे तेथे आल्यावर कळते. मालती बर्वे या आजी आजच्या पिढीत आपली संस्कृती, संस्कार रुजावेत यासाठी ऑनलाइन वर्ग घेतात. त्या पौरोहित्यासंदर्भातील सर्व विषयांवर ज्ञानदानाचे काम करत आहेत. ‘मंगलम’मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेट, सहल, छोटे छोटे कार्यक्रम; तसेच, कमीत कमी दोन दिवस मुक्काम हा करून पाहवाच. वृद्ध तेथे दहा-पंधरा दिवस, एक महिना, तीन महिनेसुद्धा राहू शकतो/शकते. मंगलम वृद्धाश्रम हा 2017 पासून सुरू आहे. तो रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. ते ठिकाण पुण्यातील चांदणी चौकापासून पंचवीस किलोमीटरवर पौड या गावात आहे.

तळवलकर जोडपे अफलातून आहे. त्यांना जाणून घेण्यासाठी ‘मंगलम’मध्ये गेलो आणि आनंद घेऊन परत आलो ! समाजसेवेचा पॅटर्न नसतो, ती एक प्रोसेस असते याची जाणीव तेथे झाली. सुखासीन आयुष्य सोडून मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये, चांगल्या घरामध्ये, शहरात राहण्याची संधी असताना, वृद्धांच्या सोयीसाठी, निसर्गरम्य परिसरात दोन एकर जागेत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राघवेंद्र व अमृता तळवलकर या दांपत्याने मंगलम वृद्धाश्रम सुरू केला. आपल्या उपस्थितीत वृद्धांना घरच्यासारखी वागणूक देऊन त्यांच्याशी हसत-खेळत वेळ व्यतीत करणे हे संवादाचे उत्तम उदाहरण आहे. सगळे आहे, पण संवाद नाही ही सध्याची शोकांतिका आहे. सुखासीन आयुष्यापेक्षाही समाधानाचे आयुष्य प्रत्येकाला हवे आहे. सगळे आहे, पण काहीच नाही अशी अवस्था आहे. त्यावर हा उत्तम उतारा आहे. समाजसेवा पुस्तकात वाचण्यास मिळेल, पण जोपर्यंत ती व्यक्तीच्या मस्तकात जात नाही, तोपर्यंत व्यक्ती त्या संदर्भात काही विचार करत नाही. मन दुःख टिपणाऱ्या टिपकागदाचे असेल तर समाजसेवा घडते. कुटुंबाचा परीघ मी, माझे असा झाला आहे. एकटे राहून विकृती वाढवण्यापेक्षा चार-चौघांत राहून-मिसळून संस्कृती घडवावी, त्यात समाधान आहे, यश आहे ही ‘मंगलम’मागील धारणा जाणवते.

राघवेंद्र व अमृता तळवलकर यांच्या दोन्ही मुली परदेशी स्थायिक आहेत. त्या दोघांनी त्यांचे त्यांचे छंद जोपासून, जे आर्थिक उत्पन्न होईल ते आश्रमासाठी देण्याचे ठरवले आहे. राघवेंद्र जे.जे. आर्ट्समधून निवृत्त झाले. त्यांची पेंटिंग्ज विक्रीला आहेत. अमृता या फॅशन डिझाइनर आहेत. त्यांनी बनवलेल्या पर्स, गोधडी आणि विविध सुंदर वस्तू तेथे विक्रीला आहेत. तळवलकर यांनी आंब्याची पन्नास झाडे वाढवली आहेत, भाजीपालाही लावला आहे. आश्रम निसर्गाच्या सान्निध्यात आहे. सहा महिला व एक आजी-आजोबा तेथे राहत आहेत. बाहेरून आधी कळवून येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची व जेवण्याची सोय होऊ शकते. शुल्क आकारणी दिवसाला करण्यात येते. तेथे वाढदिवस किंवा इतर प्रकारचे कार्यक्रम होऊ शकतात.

राघवेंद्र तळवलकर, आश्रम संपर्क – 8857026917

मंगलम वृद्धाश्रम 442 प्रवीण फार्म, खानदेशी रोड, वडगाव-मुळशी रोड, पुणे

– अनिल कुलकर्णी 9403805153/ 8217070808 anilkulkarni666@gmail.com

——————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here