सदतिसावे साहित्य संमेलन

0
38

सदतिसावे साहित्य संमेलन दिल्ली येथे 1954 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. लक्ष्मणशास्त्री म्हणजे भारतीय प्राचीन ऋषी परंपरेची आठवण ज्यांना पाहिल्यावर आणि ऐकल्यावर व्हावी असा प्रकांड पंडित व रसिक विद्वान. त्यांचे अस्तित्व केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नाही. जागतिक पातळीवरील सर्व धर्म व्यासपीठावर नियुक्ती होऊ शकेल इतके ज्ञानी गृहस्थ होते ते. त्यांची ख्याती धर्मशास्त्राचा मीमांसक म्हणून मोठी होती.

लक्ष्मणशास्त्री जोशी हे मूळचे खानदेशातील. त्यांचे वडील त्याच ऋषी परंपरेतील होते. लक्ष्मणशास्त्री यांनी त्यांच्या ज्ञानमार्गाची सुरुवात वडिलांपासून केली. ते लहान वयातच शाळा सोडून वडिलांबरोबर वेदांच्या अभ्यासाला बसू लागले. ते वयाच्या तेराव्या वर्षी, 1914 साली वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी स्वामी केवलानंद यांच्या सहवासात न्याय, वेदान्त, व्याकरण यांचा अभ्यास केला. ते काशीला 1918 साली गेले. तेथे त्यांनी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी कोलकात्याच्या संस्कृत महाविद्यालयाची ‘तर्कतीर्थ’ ही पदवी 1922 साली संपादन केली आणि तेथून पुन्हा ते वाईला येऊन प्राज्ञ पाठशाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

तर्कतीर्थ वयाच्या सोळाव्या वर्षी विनोबा भावे यांच्या सहवासात आले. विनोबा वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत शांकरभाष्याचा अभ्यास करत होते. तर्कतीर्थांनी त्यांच्याकडून इंग्रजी भाषा शिकून घेतली आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तेव्हा सर्वांना संस्कृत, मराठी आणि इंग्रजी ह्या भाषांवर प्रभुत्व प्राप्त झालेला हा चालताबोलता ज्ञानकोशच आहे ह्याची जाणीव झाली होती.

हा माणूस केवळ ज्ञानमार्गावरून चालणारा नव्हता; कृतिशीलही होता. ते महात्माजींच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत सामील झाले. शास्त्रीजींनी हिंदू धर्मशास्त्राचे पूरक भाष्य त्यासाठी काढून दिले. त्यांनी महात्माजींबरोबर कायदेभंगाच्या चळवळीत 1930 आणि 1932 साली सहभाग घेतला. ते काँग्रेस पक्षाशी एक विचारवंत म्हणून प्रामाणिकपणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात निगडित राहिले.

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली झाली. तर्कतीर्थ हे सुरूवातीपासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. ते धर्मकोश आणि विश्वकोश यांचे मुख्य संपादकही होते. तर्कतीर्थ यांच्या नावावर शुद्धिसर्वस्वम् (1934), आनंदमीमांसा (1938), हिंदू धर्माची समीक्षा (1941), जडवाद (1941), ज्योतिनिबंध (महात्मा फुले यांचे चरित्र 1947), वैदिक संस्कृतीचा विकास (1951), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त (1973) हे स्वतंत्र ग्रंथ आणि राजवाडे लेखसंग्रह (1964) व लोकमान्य टिळक लेखसंग्रह (1969) ह्यांचे संपादन अशी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

त्यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मुख्य पुरोहित म्हणून 1951 साली काम पाहिले. त्यांचा संस्कृत पंडित म्हणून भारत सरकारतर्फे सन्मान 1973 साली करण्यात आला. तसेच, त्यांना मुंबई विद्यापीठाची एल् एल् डी ही सन्माननीय पदवी 1975 मध्ये देण्यात आली. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने 1976 साली गौरवण्यात आले. तर्कतीर्थांनी भारतभर आणि जगभर प्रवास केला; विविध विषयांवर आयुष्यभर भाषणे दिली.

त्यांचा विवाह मुल्हेरच्या (नासिक जिल्हा) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी 1927 मध्ये झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली होत्या. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणक यंत्रनिर्मिती करणाऱ्या ‘इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स’ ह्या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक ह्या पदावर होते.

तर्कतीर्थ संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की  “वाङ्मय आणि कला हे आध्यात्मिक व उदात्त अशा परस्पर सहयोगाचे उच्चतम साधन आहे. वाङ्मय आणि कला यांच्या उत्कृष्ट संवर्धनाच्या योगाने भाषा प्रगल्भ दशेस येतात. प्रगल्भ दशेस आलेल्या मातृभाषांच्या योगाने सार्वत्रिक लोकशिक्षण देणे शक्य आहे. प्रगल्भ दशेस आलेल्या प्रादेशिक मातृभाषा ही भारतीय लोकशाहीची मुख्य गरज आहे.”

महाराष्ट्रात बुद्धिवादी विचारवंतांची एक थोर परंपरा आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, लो. टिळकवि. दा. सावरकर, महर्षी शिंदे… शास्त्रीजींचे कार्य त्या विचारवंतांच्या परंपरेत मोडते. प्राचीन आचार्य परंपरेतील निःस्वार्थ लोकशिक्षणाची निष्ठा, तर्कशुद्ध दृष्टिकोन, पूर्व-पश्चिमी ज्ञानविज्ञानांचा प्रचंड व्यासंग, स्पष्ट आणि निःस्पृह विचारप्रतिपादन, सामाजिक आणि राष्ट्रीय उद्धाराची कळकळ हे त्या परंपरेचे विशेष होत.

लक्ष्मणशास्त्री यांचे निधन 27 मे 1994 रोजी झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

———————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here