श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)

अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराला धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक प्राचीन महत्त्व आहे. त्या मंदिराची उभारणी संत श्री सदानंद महाराज व त्यांचे शिष्य श्री गुलाबराव महाराज यांच्या गुरू-शिष्य परंपरेतून करण्यात आली. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराचे अभियंता हे श्री हरिबाबा कासारकर महाराज (अजानुबाहू) होते. मंदिराचे बांधकाम 14×50  चौरस फूट एवढ्या क्षेत्रात आहे. बांधकामाला त्या काळी ऐंशी हजार रुपये खर्च आला. तशी नोंद तेथील हस्तलिखितात आहे.

मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्याला तीन दरवाजे आहेत. सभागृह सागवानी लाकडामध्ये बांधण्यात आले आहे. त्याला सोळा खांब आहेत. सभागृहात मधोमध यज्ञकुंडाची व्यवस्था केलेली आहे. श्री दत्ताची ध्यानस्थ मूर्ती गर्भगृहात आहे. दत्तमूर्तीच्या खाली शिवालय आहे. तेथे जाणारा रस्ता भुयारी आहे. शिवालय ‘चमत्कारिक शिवालय’ म्हणून ओळखले जाते. सूर्यप्रकाशाकरता तीन झरोके आहेत. त्यांद्वारे बाहेरील व्यक्तींना आतील शिवलिंगाचे दर्शन होऊ शकते. खाली शिवलिंग, त्यावर दत्त मूर्ती व त्यावर कळसाचे बांधकाम अशी रचना आहे. कळस तांब्याचा असून त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. खाली कमळ व त्या खाली पृथ्वी अशा विचाराने बांधकाम केलेले आहे. कळस जीर्ण झाला असल्याने त्याचे पुन्हा बांधकाम करण्यात आले आणि तेव्हा पृथ्वीच्या पोकळ भागातून काय निघाले असावे…? तर तांब्याचा हवाबंद कलश. आश्चर्य म्हणजे त्यात होते शंभर-सव्वाशे वर्षे जुने पांढरेशुभ्र रवेदार तूप ! कलश मध्यम आकाराचा आहे. रवेदार तूप आयुर्वेदशास्त्रात महत्त्वाच्या उपयोगाचे मानतात. तूप जेवढे जुने तेवढे ते डोळ्यांच्या विकारावर गुणकारी असते, म्हणे. त्या कलशाला पुन्हा तेथेच स्थापित करण्यात आले आहे.

श्री दत्त मंदिर आणि शिवालय यांना प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गावर नऊ मंदिरे आहेत. ती सर्व मंदिरे भुयारी आहेत. म्हणजे जमिनीखाली आठ फूटांवर आहेत. कोणी नवखा मनुष्य तेथे आला, की तो हमखास वाट चुकतो. त्यामुळे त्याला भुलभुलैया किंवा वऱ्हाडी भाषेत ‘चक्काभुलीचे मंदिर’ असे म्हणतात. प्रदक्षिणा मार्गाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून होते आणि शेवट तुकाराम महाराजांच्या मंदिराने होतो. त्या वेळी बहिणाबार्इंच्या अभंगातील ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’ या पंक्तीची आठवण होते. ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यावर; खाली, भुयारात लाकडी जिन्याद्वारे उतरून गेल्यावर विष्णू दरबार दिसतो. त्या मंदिरात विष्णू, लक्ष्मी, जयविजय व गरुड यांच्या सुबक मूर्ती आहेत. त्यानंतर आणखी खाली उतरून गेल्यास गजलक्ष्मी व अन्नपूर्णा माता यांचे मंदिर आहे. त्या मंदिरातून दोन मार्ग दिसतात, तेथे व्यक्तीची गल्लत हमखास होते. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे व थोडी चिंचोळी वाट चालून गेल्यावर रिद्धीसिद्धी यांच्या समवेत गणपती असे मंदिर आहे. त्यानंतर गजानन महाराजांचे मंदिर दिसते. तेथून परतून व्यक्ती पुन्हा गजलक्ष्मी व अन्नपूर्णा माता यांचे मंदिरात येते. तेथून उजव्या बाजूने जावे लागते. त्यानंतर राधाकृष्णाचे मंदिर दिसते आणि थोडे वर चढल्यावर श्रीराम दरबार दिसतो. त्यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमंत यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. तेथून व्यक्ती पुन्हा वर चालत गेल्यास शेवटचे तुकाराम महाराजांचे मंदिर लागते व प्रदक्षिणा मार्ग पूर्ण होतो. कोठल्याही मूर्तीवर प्रदक्षिणेदरम्यान पाय येत नाही असे तेथील स्थापत्य आहे.

मंदिरातील आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे तेथे श्री सदानंद महाराज रचित शंभर वर्षांची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आहे. ते भारतीय गणित शास्त्राच्या समजुतीचे उत्तम उदाहरण मानले जाते. कॅलेंडर चक्राकार आहे. त्यामध्ये 1923 ते 2023 पर्यंतची वर्षे समाविष्ट आहेत. त्यावर ‘श्री संस्थान दत्त दरबार, सुलतानपुरा-एलीचपूर, श्री गुरू समर्थ सदानंद महाराज पदाकिंकर श्री विमलानंद महाराज, पूर्व वऱ्हाड.’ असा मजकूर देवनागरी लिपीत आहे. पदाकिकंर या शब्दाचा अर्थ पायापाशी आलेला एक दास असा आहे. म्हणजे चरणारविंद. सदानंद यांचे शिष्य गुलाबराव यांनी (गृहस्थाश्रमीचे विमलानंद) ते विधान लिहिले आहे. कॅलेंडर कसे पाहवे त्याची माहिती मोडी लिपीत देण्यात आली आहे. त्या कॅलेंडरवरून व्यक्ती तिच्या जन्मवर्षावरून तिचा जन्ममहिना, जन्मवार काढू शकते. कॅलेंडर दोन भागांत विभागले असून, ते चक्राकार फिरते. वरील भागात 1923 ते 2023 पर्यंतची वर्षे दिली आहेत. खालील भागात महिने, वार दिले आहेत. वर्षाचे चक्र फिरवून महिन्याच्या रेषेवर आणले असता, त्या रेषेला समांतर असे वारांमधून व्यक्तीचा जन्मवार कळतो. तेथेच ते आश्चर्य संपत नाही ! दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप इयरचा देखील तेथे विचार करण्यात आला आहे. म्हणजे कोणाचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असेल, तर श्री गुरू सदानंद’ त्या शब्दांमध्ये (म्हणजे सात/सात अक्षरांमध्ये) जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांची बेरीज करून ती व्यक्ती तिचा जन्मवार काढू शकते.

मंदिर पाहताना आश्चर्यचकित होण्यास तर होतेच, पण भाविक मंडळींसाठी आकर्षण म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचे शिष्य पिठले महाराज, मोरे दादा यांच्या परंपरेनुसार तेथे उपासना व बालसंस्कार वर्ग घेतले जातात. त्या केंद्रातील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न व अनामिक ऊर्जेने भरून जाते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार 26 जानेवारी 1999 ला लोकनिधीद्वारे करण्यात आला.

– शिवानी धनंजय धर्माधिकारी 8788803249 shivanidharmadhikari62@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here