कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते. जाखडी म्हणजे जखडणे किंवा जाखडी शब्दातील खडी म्हणजे उभ्याने नाच करणे. नृत्य करणारे एकमेकांना धरून, शृंखला करून जखडले जातात आणि त्यांच्याकडून पदन्यास होतो !

मॉरिशस हे हिंदी महासागरातील टिकलीएवढे बेट आहे. तेथे नैसर्गिक सौंदर्य अपार. हवाही आल्हाददायक. पांढऱ्या वाळूचा किनारा. तेथे देशोदेशीचे लोक येत गेल्याने अनेक संस्कृतींचे मिश्रण आहे. अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच, मॉरिशियन आणि क्रिओल. देशाची लोकसंख्या बारा लाख पंचेचाळीस हजार- त्यांपैकी भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जवळजवळ अडुसष्ट टक्के इतकी आहे. इतर बत्तीस टक्के लोक हे युरोप-आफ्रिकेतून आलेले आहेत. मॉरिशस बेटाचे नावही भारतीय दंतकथेतून आले अशी एक बोलवा आहे. राम मारिच राक्षसाला मारण्यास धावले तेव्हा म्हणे मारिचाने पळून जाऊन या बेटाचा आश्रय घेतला ! म्हणून त्या बेटाचे नाव मॉरिशस असे आहे. परंतु इतिहास असा, की त्या बेटावर डच लोक प्रथम 1598 साली आले. त्यांनी तेथे वसाहती स्थापल्या. डचांनी त्यांचा राजा प्रिन्स मॉरीस याच्या नावावरून त्या बेटाचे नामकरण मॉरिशस असे केले. पुढे, डच तेथून हटले आणि फ्रेंचांनी त्या बेटावर वसाहत स्थापन करण्यात यश मिळवले. ते तेथून ब्रिटिशांच्या भारतीय नागरिक तळावर हल्ले करू लागले. त्यामुळे भारतातील ब्रिटिश वसाहतवाल्यांनी फ्रेंच मॉरिशसवर हल्ला करून त्यांचा अंमल 1810 साली तेथे आणला. त्या ब्रिटिश सेनेत तब्बल नऊ हजार भारतीय होते !

दरम्यान, विकासक्रमात मॉरिशस हे साखरनिर्मिती व मळ्याच्या शेती यांचे प्रमुख बेट बनले. ब्रिटिशांना मजुरांचा तुटवडा भासू लागला तेव्हा त्यांनी भारतातून मजूर आणले. त्यांचे राज्य भारतावर असल्याने ते सहज शक्य झाले, त्यातच भारतीयांना शेती व ऊस लागवड या कामांचा अनुभव व ज्ञान होते. शेतमजूर सुरुवातीस बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या प्रांतांतून अधिक प्रमाणात नेण्यात आले.

मराठी लोकांना घेऊन पहिले जहाज मुंबई बंदरावरून 15 जून 1842 रोजी निघाले. त्यामधील एकशेत्र्याहत्तर जणांपैकी शंभर लोक रत्नागिरी, मालवण, ठाणे या कोकणातील आणि सातारा, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील गावांतून आलेले होते. त्या लोकांनी मॉरिशसमध्ये मराठी संस्कृती जपून ठेवली आहे. रत्नागिरी, मालवण, ठाणे भागातील मजुरांना मॉरिशसमध्ये कोकणाप्रमाणेच असणारे समुद्रकिनारे व पर्वतीय प्रदेश आढळले. त्यामुळे ते लोक तेथे रमले. त्यांनी होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यांसारखे सण साजरे करण्याची परंपरा जपली. त्यांनी अळुवडी, आमटी, उकडीचे मोदक यांसारख्या पदार्थांची खाद्यसंस्कृतीही जतन केली आहे.

बाल्या नाच मुंबईकरांना प्रथम माहीत झाला. कोकणातील कुणबी समाज मोठ्या प्रमाणात पोटापाण्यासाठी मुंबईला जाऊन पारशी, गुजराती कुटुंबांकडे कामाला लागला. नी गौरीगणपतीच्या दिवसांत घरी न जाता मालकांसमोरच नाच करून बिदागी मिळवण्याचा व स्वतःचेही मनोरंजन करून घेण्याचा उद्योग आरंभला. त्या लोकांच्या कानात ‘बाळी’ नावाचे आभूषण असे. त्यावरून त्यांच्या नाचाला ‘बाल्या नाच’ असे संबोधन मिळाले. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील केळंबे गावचे मुंबईस्थित रहिवासी, जाखडी नृत्य सादर करणाऱ्या ‘बापुरंगी’ घराण्याचे सदस्य विकास लांबोरे यांनी सांगितले, की “बाल्या नाचामागे परंपरा मोठी आहे. ज्यावेळी शंकर-पार्वतीने सारीपाटाचा खेळ मांडला तेव्हा त्या दोघांचा वाद स्त्री मोठी की पुरुष मोठा, म्हणजेच आदिमाया मोठी की आत्माराम मोठा यावर झाला. तो वाद दाखवणे म्हणजे ‘शक्ती-तुरा अथवा ‘जाखडी नृत्य’ होय. स्त्री म्हणजे काया अथवा शरीर आणि तिच्यासोबत असतो तो पुरुष अर्थात आत्मा. त्यांचा वाद तो कलगीतुऱ्याचा अथवा शक्तीतुऱ्याचा नाच असतो. तेथे कलगीवाले किंवा शक्तीवाले म्हणजे स्त्रीची बाजू उचलून धरणारे आणि तुरेवाले म्हणजे अर्थात पुरुषाची बाजू उचलून धरणारे, असा अर्थ असतो, कलगीवाला पहिली बारी करतो. म्हणजे स्त्रीला मान पहिल्यांदा दिला जातो. ते सुरुवातीला स्तवन करतात. नंतर गण म्हणजे गणपती सादर करतात. कलगीवाले गणपतीला आदिमायेचा म्हणजे पार्वतीचा मुलगा म्हणून पुढे आणतात; अर्थात ‘गौरीनंदना, गौरीसुता, गौरीच्या पुत्रा तू बाप्पा’ असे म्हणतात. ते पुढे गवळण सादर करताना राधा ‘रिप्रेझेंट’ करतात किंवा यशोदेला ‘प्रेझेंट’ करून स्त्री किती श्रेष्ठ आहे ते नमूद करतात. कलगीवाले गवळण सादर करताना तुरेवाल्याला कोडे घालतात. ते सोडवायचे असते आणि त्या सोबत कृष्ण सादर करायचा असतो. त्याला प्रश्न विचारून समोरच्याचे ज्ञान अजमावायचे असते. कल्पना अशी, की हे प्रश्न रचणाऱ्यांनी त्या प्रश्नासाठी दहा-बारा तरी ‘पुस्तके’ चाळावीत. ती पुस्तके म्हणजे अठरा पुराणे, चार वेद, उपवेद, सहा शास्त्रे. शाहिराला त्यांचे वाचन करावे लागते.

तुरेवाले गण सादर करतात तो शंकराचा. तो शिवसुत किंवा शिवपुत्र म्हणणार; म्हणजे ‘शिवजीचा बाळ तू गणेशा’ असे म्हणणार. तेथे तो स्त्रीला कमी दाखवतो, परंतु त्यात आदर असतो. म्हणजे असे, की ‘पार्वती माता रडे, करे याचना शिवापुढे, माझा दे बाळ पुन्हा’ म्हणजे, एक प्रकारे, स्त्रीने पुरुषाकडे भीक मागितली असा त्याचा अर्थ ! म्हणजेच स्त्री ही सन्मानपूर्वक कमी दाखवली जाते. तुरेवाले गवळण सादर करताना कृष्ण सादर करतात. त्यांचा कृष्ण गवळणी कशा माझ्या आईकडे माझ्या चहाड्या करतात, कळ लावतात, चोंबडेगिरी करतात असे गमतीचे विषय घेऊन ‘मी तुम्हाला कसे फसवले? मी तुमच्या माठातील दूध-दही-लोणी तुम्हाला फसवून कसे खाल्ले?’ असे सांगतो. नंतर शाहीर त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर देतात आणि पुन्हा त्यांचा प्रश्न कलगीवाल्यांना विचारतात. कलगीवाले परत येऊन दुसरी बारी सादर करतात. त्यावेळी उत्तर देताना मात्र थोडी ‘हमरीतुमरी’ केली जाते. उदाहरणार्थ, कलगीवाले पुरुषाला म्हणणार, “तू फसवलंस रावणा.” त्यावेळी तुरेवाले म्हणणार, “पुरुषाने तुला काही मर्यादा घालून दिली आहे. त्या मर्यादेतच तू राहण्यास हवं होतंस. लक्ष्मण रेषा मारलेली होतीच ना !” म्हणजे तेथे तात्त्विक वाद होतो, त्यानंतर आरती असते. आरतीमध्ये कलगीतुरेवाले यांचा वाद कितीही (अगदी भांडणेसुद्धा) झाला असला तरी तुरेवाला आरती घेतो. तो कलगीवाल्या शाहिराला आमंत्रित करतो. मग ते सर्वजण एकत्र येऊन आरती करतात. या सगळ्यामधून मनुष्याच्या जगण्याला एक संदेश दिला जातो. तो म्हणजे ‘नवरा-बायकोचे भांडण कितीही झाले तरी तुम्हाला एकत्र यायचे आहे. त्यालाच संसार म्हणतात.’

त्याचप्रमाणे आरती दाखवून देते, की वाद भावकीत, गावकीत कितीही झाले तरी शेवटी सर्वांना एकत्र यायचे आहे. दुसऱ्या बारीला समाज प्रबोधनाची गाणी गायली जातात. दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसन, बलात्कार अशा विविध विषयांवर समाज प्रबोधन केले जाते. म्हणजेच शक्ती-तुरा हे केवळ मनोरंजन नसून त्यात आत्मज्ञान व प्रबोधन हेदेखील अभिप्रेत आहे.

जाखडी नृत्यात एका वेळी आठ ते दहा मुलांचे पदलालित्य एका ठेक्यात दिसते. मध्यभागी ढोलकी आणि झांजा-टाळ-चिमटे वाजवणारे वादक बसलेले असतात, शाहीर गाणे सांगतो आणि त्या सर्वांभोवती फेर धरून एका ठेक्यात पावले टाकत आठ ते दहा मुले नृत्य करतात. म्हणजेच कलेत वादन असते, पुढे गायन येते आणि प्रश्नोत्तराच्या रूपाने शाहिराचे वाचन हेदेखील असते. वेगवेगळे देखावे आणि प्रकाशयोजना केलेली असते. त्याला ‘रंगबाजी’ असे म्हणतात. एकाच वेळी वाचन-गायन-वादन-रंगबाजी-नृत्य हे फक्त कोकणातील जाखडीसारख्या कलांमधून पाहण्यास मिळते.

जाखडी कला सादर करणारे कलावंत म्हणजे दोनशे रुपयांवर मजुरी करणारी, शेती करणारी, बांधावर जाऊन मजुरी करणारी, रानात जाऊन लाकडे तोडणारी माणसे आहेत. ते लोक दिवसभर काम करून थकूनभागून घरी येतात आणि रात्र रात्र जागवून कला सादर करतात, कलेला जपतात, जगवतात व दुसऱ्या दिवशी परत मजुरीवर कामाला जातात. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे.

गाण्याच्या लिखाणात वेगवेगळे प्रकार आढळतात- जसे की छंद, साकी, स्तवन, गण, गवळण, शेर. ढोलकी वाजवणाऱ्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही ठिकाणी नाचता नाचता गोफ विणला जातो. त्या नाचणाऱ्या मुलांच्या नाचण्याचा प्रकार वेगळा आहे. शाहीर वाक्यांमध्ये कोडे घालतो अथवा प्रश्न टाकतो, तेव्हा नाचणारी मुले नाचता नाचता समोरच्या शाहिराच्या मुलांसाठी वेगळ्याच तऱ्हेचा एक गोफ विणतात. तो गोफ मग त्या मुलांनी सोडवायचा असतो. हल्ली नृत्यात गोफ विणला जात नाही, कारण सध्याचा जमाना हा ‘ट्वेंटी-ट्वेंटी’चा अथवा ‘शॉर्टकट’चा आहे, शक्ती-तुऱ्यालाही आधुनिक रूप आलेले आहे. त्यामुळे मूळ गाभा हा आत्मा व शक्ती यांचा ठेवून नवीन गाणी फिल्मी गीतांच्या चालीवर म्हटली जातात.

शास्त्रीय संगीतातील घराण्याप्रमाणे शक्ती-तुऱ्यातही घराणी आहेत. शक्तीवाल्यांची घराणी अनेक असतात. जसे की भानुदास, गुरु गणपती, ब्रह्मनिष्ठ; तशीच तुरेवाल्यांचीही घराणी आहेत- परमहंस, रामचंद्र पंडित, आमचे बाबू रंगी घराणे या प्रकारे. घराण्याचा वारसा असतो, परंपरा असते. शाहीर उगीच कोणी होत नाहीत. त्यासाठी सागरी मांड असतो. सागरी मांड म्हणजे गुरुने त्याच्या शिष्याला स्वत:ची परंपरा देणे. जाखडीमध्ये म्हणण्याची गाणी सवाल-जवाब इत्यादी गोष्टी लिखित स्वरूपातील असतील त्या शिष्याकडे बहाल करणे. कलश मांडून पूजा केलेली असते त्याला मांड असे म्हणतात. त्या मांडासमोर शिष्य गुरुकडून दीक्षा घेतो व परंपरा पुढे चालवतो. त्या मांडावर जाऊन परंपरा तयार करून स्वत:चा गुरू तयार करावा लागतो, वस्ताद तयार करावा लागतो. प्रत्येकाची जोडगोळी असते. त्यात टप्पे असतात. गाणी वस्तादांनी लिहावी, त्यांनीच प्रश्न विवरण करावे. त्यावर निरीक्षण हे मात्र गुरूंचे असते. गायन सादर करणाऱ्यांना बुवा (शाहीर) म्हणतात. पण त्यांच्या वरचा आहे तो लेखक. तो वस्ताद म्हणून ओळखला जातो. म्हणजे बारी बुवा सादर करतो व प्रश्न विवरणाला वस्ताद उभा राहतो. पण असे अनेक शाहीर आहेत, की ते स्वतः बोलतात व स्वतःच गातात.

बाल्या नाचाचा कार्यक्रम रात्री सादर करण्यात येतो. त्यामुळे प्रकाशयोजना केली जाते. त्या प्रकाशात चमकणारे काही आहे का हे पाहिले जाते आणि त्याप्रमाणे पोषाख बनवले जातात. तो पोषाख अंगभर असावा लागतो. कर्ण, विष्णू, अर्जुन, कृष्ण, भीष्म अशा पात्रांप्रमाणे पोषाख बनवले जातात. त्यांतील नाचणारी मुले ही गणपतीचे रूप मानली जातात, म्हणून त्यांना देवांचा पोषाख दिला जातो. नाचाच्या सामानात चार ढोलकी असतात. झांज, लाईट, साऊंड सिस्टिम, पोषाख, मिक्सिंगचे इन्स्ट्रुमेंट, पहिल्या बारीचे-दुसऱ्या बारीचे असे प्रत्येकी दोन दोन पोषाख, वायर्स, बटणे, घुंगरू, मुलांच्या पायांतील पारंपरिक चाळ, गोफ विणण्यासाठी काठ्या व गोफाचे कापड अशा गोष्टी असतात. त्या गोष्टी सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी ठेवलेल्या असतात किंवा ज्या कलावंताचे घर मोठे आहे त्याच्या घरी ठेवल्या जातात.

कुरणे गावचे विलास नारायण घडशी हे जाखडी व नमन या लोककलांतील पात्रांचे पोषाख शिवतात. त्यांनी सांगितले, की “आम्ही ऑर्डरप्रमाणे राजे, महाराजे, पुराणकालातील व्यक्ती यांचे पोषाख शिवतो, त्यासाठी लागणारे जरीकाम केलेले व चमकणारे कापड मुंबईहून मागवतो. सध्या हे पोषाख कवच टाईप निघाले आहे. कवच टाईप म्हणजे देवाधिकांचे व राजांचे जे अंगरखे असतात ते छातीवर व हातांच्या बाह्यांवर फुगवलेले असतात. त्यांना झिरमिळ्यादेखील लावलेल्या असतात. त्यामुळे आम्ही तसे कॅनव्हास, प्लास्टिक, प्रेस कॅनव्हास इत्यादी गोष्टींचा वापर करून शिवतो. लेसदेखील मुंबईहून ऑर्डर करून मागवावी लागते. मी शिवण क्लास पुण्यात शिकलो, पण जाखडीचे ड्रेस बनवण्याची कला मात्र आमच्या घरी शिकलो. आम्ही जाखडीचे कार्यक्रम करत असल्याने ते बनवण्याचे काम पाहून पाहून शिकलो. मुले गणपतीच्या दिवसांत मुंबईहून येतात, त्यावेळी जाखडी नमन करतो. एरवी आमचे कार्यक्रम बंद असतात.”

‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ नावाचा कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे सुनील बेंडखले यांनीदेखील विलास लांबोरे यांच्याप्रमाणेच माहिती दिली. ते म्हणाले, की “जाखडी हा विशेषतः पावसाळ्यात चालणारा नृत्यप्रकार असून हल्ली मात्र वर्षभर चालतो. प्रत्येक नाचणाऱ्याची, वाद्य वाजवणाऱ्याची, बुवाच्या गाण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्या प्रत्येकाची ती स्टाईल असते आणि त्यावरून लोक ठरवतात, की कोण सरस आहे ! आता कीपॅड, ऑक्टोपॅड यांसारख्या इलेक्ट्रिकल वाद्यांचा संगीतासाठी वापर होतो. मात्र ढोलकी ही असतेच असते. लाइटिंगचा वापरही वाढलेला आहे, पोषाखामध्ये नावीन्य आले आहे. त्यावर बारीक एलईडी बल्बदेखील वापरतात. पूर्वी बाल्या डान्स होता तेव्हा साधे शर्ट, रुमाल, अर्धी चड्डी वापरली जाई. पूर्वी जी गाणी गायली जात त्यांच्या चाली त्यांच्या स्वतःच्या असत. ती गाणी श्रवणीय आहेत. उदाहरणार्थ ‘गणा धाव रे, मना पाव रे ऽ…’ त्यानंतर, ‘श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला ऽ अन् माता पित्याची कावड खांद्याला हो कावड खांद्याला ऽऽ’. हल्ली मात्र गीते फिल्मी हिंदी गाण्यांच्या चालीवर गायली जातात. पूर्वी, नाचता नाचता वर काठ्या बांधून गोफ विणला जाई. एकाने विणला की तो दुसऱ्याने नाचता नाचता सोडवण्याचा असे. ते एका एका मिनिटात अभ्यासावे असे टेक्निक आहे, मात्र हल्ली गोफ विणणे कमी झाले आहे.”

मॉरिशसमधील विकोआसमध्ये असलेल्या मराठी मंदिरातील तरुण युवकांनी ‘समर्थ सेना’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ती संस्था या कलेसाठी प्रयत्नशील आहे. संस्थेतील एक सदस्य दिनकर सोनू म्हणाले, की “संस्था 2008 मध्ये स्थापन झाली. त्यांनी झाकरी नृत्याचा कार्यक्रम मुंबईत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतही सादर केला आहे.” ते म्हणाले, “आम्ही एक ढोलकीवाला आणि हातात झांज, चिमटा अशा प्रकारचे वाद्य वाजवणाऱ्यांच्या भोवती फिरून नृत्य करतो.” समर्थ सेनेच्या पथकात सात महिला व अकरा पुरुष आहेत. ते सतरा ते अठ्ठावन्न या वयोगटातील आहेत. त्यांची झाकरी नृत्यासाठी काष्टा घातलेली नऊवारी साडी असा स्त्रीवेष व पुरुषांसाठी कुर्ते अशी वेशभूषा आहे. त्या पथकातील कोरिओग्राफर ओमा देवजी हे आहेत. स्थानिक कलाकार प्रीतीबी रग्गु, जेसीका रग्गु आणि रिताबी बल्लू यांनी नृत्यातील गाण्याची मूळ रचना ‘देवा तुझं’ अशी केली आहे. ते पथक झाकरीबरोबरच लावणी व कोळी नृत्याचाही आविष्कार घडवत असते. मॉरिशसमधील मराठा मंदिरात लोक गणेशोत्सवात शेकड्याने जमा होतात आणि जवळजवळ सर्व लोक ‘देवाचे गुण आम्ही गुण गाऊयाऽ’ असे म्हणत त्या नृत्यात सहभाग घेतात.

दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी त्यांच्या ‘चीटर’ या चित्रपटात या कलेला चित्रित केले असून ऋषीकेश जोशी, वैभव तत्त्ववादी, आसावरी जोशी आणि पूजा सावंत या कलाकारांनी झाकरीची नृत्यशैली शानदार रंगात पेश केली आहे. चित्रपटाचे जवळ जवळ सत्तर टक्के शूटिंग मॉरिशसमध्ये झाले आहे.

मॉरिशसमध्ये लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी या गेल्या असता त्यांनी तेथील शिक्षक नितीन बापू यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली– नितीन बापू म्हणतात ‘येथे मॉरिशसमध्ये मंदिरातून आणि घराघरांतून गणेश चतुर्थीमध्ये दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपती उत्सव होतो. त्यावेळी आम्ही येथे पारंपरिक रीत्या झाकरी नृत्य सादर करतो. त्या झाकरी नृत्यामध्ये ढोलकी व झांज असते. स्त्री-पुरुष व मुले सर्वजण एकत्र गोल रिंगण करून नाचतात किंवा फक्त मुलांचे आणि मुलींचे असे वेगवेगळे गटदेखील असतात. त्यावेळी गणपतीची गाणी म्हटली जातात. ती गाणी पुस्तकातील किंवा जे लोक गाणी लिहू शकतात त्यांनी स्वतः लिहिलेली असतात. पूर्वी आमचे पणजोबा येथे आले होते, त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलेली गाणी लिखित स्वरूपात आमच्याजवळ आहेत. मीही झाकरी नृत्याची गाणी लिहिलेली आहेत. आम्ही इतर लेखक कवींनी लिहिलेली गाणी गणेशोत्सवाच्या वेळी झाकरी करताना सादर करतो. आम्ही मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्रातर्फे स्पर्धा भरवतो. आम्ही एक महोत्सव 2023 मध्ये सादर केला. त्यावेळी तेथे सतरा गट आलेले होते. अहोरात्र झाकरी नृत्याचे कार्यक्रम सादर केले जात होते. अप्रतिम असे भक्तीमय वातावरण होते. आमच्या झाकरी नृत्यांमध्ये सवाल-जबाब, गोफ विणणे इत्यादी भाग नाहीत. फक्त गणपतीवर आधारित गाण्यांवर नृत्य सादर केले जाते. माझे आजोबा सांगत, की आमचे पणजोबा इकडे आले होते तेव्हा त्यावेळी ते त्या पद्धतीने जाखडी सादर करायचे, पण आता थोडाफार बदल झालेला आहे.’ मॉरिशसमधील विद्यापीठात मराठी विभागामध्ये सर्वप्रथम प्राध्यापक झालेले डॉ. बिदेन आबा यांनीदेखील त्यांच्या मुलाखतीतून अशीच माहिती दिली.

जाखडी व झाकरी यांच्यामधील फरक

1.जाखडीमध्ये फक्त पुरुषांचा सहभाग असे. आधुनिक काळात स्त्रियाही नृत्य करतात, परंतु त्यांचे पथक वेगळे असते. झाकरीमध्ये स्त्री व पुरुष दोघे मिळून नृत्य करतात.

2. जाखडीमध्ये सवालजवाब असून गोफ विणण्यात येतात. झाकरीमध्ये तो प्रकार नाही.

3.जाखडीमध्ये रिंगण धरून नाचणाऱ्या आठ ते दहा मुलांचा समावेश असतो. झाकरीमध्ये शेकड्याने स्त्रीपुरुष रिंगण धरून पदन्यास करतात.

मॉरिशसमध्ये झाकरी नृत्याच्या स्पर्धादेखील भरवल्या जातात. त्या लोकांनी मराठीपण जपलेले आहे. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील मराठी मातीशी व संस्कृतीशी नाळ घट्ट बांधली जात आहे.

– विजयालक्ष्मी विजय देवगोजी 8446375251 vijayalaxmivd@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. दादरमध्ये जन्म त्यामुळे घरकामाला पूर्वी बाले पुरुष घरगडी असत , त्यामुळे नृत्य माहीत होते पण एवढी माहिती प्रथमच वाचली.छान लिहिलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here