मुंबई नगरीतील महापालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Building in Mumbai)

1
840

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. अर्थात यात त्यांचा काही दोष नाही.

रजनी अशोक देवधर यांनी ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी इमारतीत चार दशके काम केले आहे. त्यामुळे त्यांना या इमारतीचा प्रत्येक दगड माहीत आहे असे म्हणायला हरकत नाही.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मुंबई नगरीतील महापालिका

मुंबईत नव्याने येणाऱ्या साऱ्यांचे लक्ष बोरीबंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (C.S.M.T.) या रेल्वेस्थानकासमोर असलेल्या एका भव्य, देखण्या दगडी बांधणीच्या इमारतीकडे  वेधले जाते. लहानपणी  आई-बाबांबरोबर  कधी गिरगावातील साहित्य संघ मंदिरात नाटक पाहायला, कधी मेट्रो-इरॉस येथे चित्रपट पाहायला, कधी मलबार टेकडीवरील राणीचा बूट असलेला बगीचा, गेट वे ऑफ इंडिया तर कधी चौपाटीला; जाण्यासाठी मुंबईत आल्यावर या इमारतीचे बाहेरून दर्शन घडत असे आणि प्रत्येक वेळी तिचा उंच मनोरा दिसल्यावर कुतूहल वाटत असे. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर प्रथमच त्या भव्य, ऐतिहासिक इमारतीमध्ये प्रवेश केला आणि नंतर कामानिमित्त तब्बल चार दशके तेथे जाण्याची संधी मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाबाहेर असलेली ही दिमाखदार वास्तू आहे बृहन्मुंबई महानगर पालिकेची. इंग्रजांच्या अंमलाखालील भारतामधली दुसरी महानगर पालिका म्हणजेच सध्याची बृहन्मुंबई महानगर पालिका, ती 1865 मध्ये निर्माण झाली. पहिली नगर पालिका मद्रास म्हणजे चेन्नैची. सुरवातीला मुंबईतील गिरगाव येथे  एका लहानशा इमारतीत असलेले नगरपालिकेचे कार्यालय 1870 मध्ये काळा घोडा चौकातील वॉटसन हॉटेलजवळ हलवण्यात आले. कार्यालयीन कामकाजाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे पालिकेला स्वतंत्र जागेची निकड भासू लागल्यावर  बोरीबंदर रेल्वेस्थानकासमोरची जागा निवडण्यात आली आणि महानगर पालिकेच्या नव्या स्वतंत्र वास्तूची पायाभरणी 9 डिसेंबर 1884 रोजी झाली. त्यावेळी या वास्तूच्या बांधकामासाठी दोन  वास्तू विशारदांचे आराखडे विचाराधीन होते. एक होता फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स यांचा गॉथिक रचनेचा आणि दुसरा इंडो सार्सेनिक पद्धतीची रचना असलेला रॉबर्ट चिझम यांचा. पालिकेची वास्तू फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स यांच्या गॉथिक शैलीनुसार बांधण्यात आली. इंडो सार्सेनिक पद्धतीचाही थोडाफार समावेश करण्यात आला. पायाभरणी झाल्यावर बांधकामाला नऊ वर्षे लागली. ही दिमाखदार वास्तू समुद्राच्या सान्निध्यात 1893 मध्ये साकारली गेली. या इमारतीच्या पूर्वेकडे त्याआधी 1887 मध्ये अस्तित्वात आलेली रेल्वेस्थानकाची गॉथिक शैलीतली तितकीच देखणी वास्तू आहे. महानगर पालिकेचे मुख्य कार्यालय असलेल्या या वास्तूसमोर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, निवडून आलेल्या सदस्यांच्या हाती महापालिकेचा कारभार असावा असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या आणि मुंबईच्या आद्य शिल्पकारांपैकी एक असलेल्या फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे.

या देखण्या वास्तूचे बांधकाम करणारे अभियंता होते रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य. उंच दिमाखदार मनोरा असलेली,  इंग्रजी अक्षर V च्या आकारात रचना असलेली ही भव्य वास्तू तत्कालीन बैठ्या, दुमजली निवासी घरांच्या तुलनेत टोलेजंग होती. या दुमजली दोनशेपंचावन्न फूट उंच इमारतीला सुमारे पस्तीस फूट उंचीचा मनोरा व घुमट आहे. इमारतीच्या कोरीव कामात पौर्वात्य व पाश्चिमात्य शैलींचा मिलाफ आहे. गॉथिक शैलीत साकारलेल्या या वास्तूच्या उंच मनोऱ्याच्या मध्यावर ग्रीक पुराणातील देवदूताची प्रतिमा आहे. इंग्रज व्यापारानिमित्त भारतात आले. पोर्तुगीज राजकन्येशी विवाहबद्ध झाल्यावर इंग्लंडच्या राजपुत्राला मुंबईच्या सात बेटांचा समूह भेटीदाखल मिळाला. दर्यावर्दी इंग्रज सागरी सामर्थ्याचे महत्त्व ओळखून असल्याने त्यांनी भेटीदाखल मिळालेल्या मुंबईच्या सात बेटांमधून वाहणाऱ्या खाड्या भराव टाकून सांधल्या आणि कालांतराने मुंबईला व्यापार, व्यवहार व कारभाराचे मुख्य केंद्र बनवले.

मुंबई महापालिकेच्या इमारतीच्या दर्शनी भागात तिचे चिन्ह विराजमान आहे आणि या चिन्हाच्या वर पंख असलेल्या देवतेचे शिल्प आहे. लॅटिन भाषेत Urbs prima in Indis म्हणजे भारतातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबईचे हे प्रतीकात्मक शिल्प आहे. या देवतेच्या उजव्या हातात जहाज आहे. या शिल्पाच्या खाली गोलाकारात मुंबई महापालिकेचे चिन्ह आहे. त्या चिन्हात गेट वे ऑफ इंडिया, कारखान्याची इमारत, तीन  जहाजे व महानगरपालिकेची वास्तू यांच्या प्रतिमा आहेत आणि त्याखाली ‘यतो धर्मस्ततो जय: (जेथे धर्म तेथे विजय)’ हे गीतेमधील बोधवाक्य लिहिलेले आहे. इमारतीच्या दर्शनी भागात द्वारमंडपाच्यावर (Portico) पंख असलेल्या सिंहांच्या किंवा ग्रिफिनच्या प्रतिमा आहेत.

मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या जिन्यालगत सिंहांच्या दोन प्रतिकृती आहेत. ब्रिटिश साम्राज्याचे सामर्थ्य, सत्ता, शक्ती याचे प्रतीक असलेले ते सिंह आहेत. याखेरीज मुंबईमध्ये आढळणारे प्राणी, पक्षी, पाने, फुले यांचा समावेश कोरीव कामात आहे. मनोऱ्यामधील भव्य घुमट, झरोके, खिडक्या यांवरील कमानी, रंगीत काचांचे जडावाचे काम ही सजावट अप्रतिम आहे. अंतर्भागात नक्षीदार कलाकुसर असलेले लाकडी, लोखंडी गोलाकार वळणाचे जिने आहेत. रंगसंगती साधून बसवलेल्या फरश्यांचे डिझाईनही लक्ष वेधून घेते. वीज नसलेल्या त्या काळात इमारतीच्या आत असलेल्या पाण्याच्या भल्यामोठ्या टाकीतील पाण्याच्या शक्तीवर चालणारी लिफ्ट तेथे होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय असलेल्या या देखण्या इमारतीत पालिकेच्या सभांसाठी बनवण्यात आलेला पालिका कक्ष एखाद्या संपन्न राजवाड्यातील दालन असावे असा वैभवशाली आहे. या कक्षातली सदस्यांसाठीची आसनव्यवस्था, नक्षीदार कठडे आणि उंच छतावरची झुंबरे आकर्षक आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा विभूतींचे आणि स्वतंत्र भारताच्या राजकारणातील  मान्यवरांचे पुतळे  या कक्षात आहेत.

महापालिकेच्या मुख्य वास्तूला शंभर वर्षे होऊन गेल्यानंतर 2011 पासून तिच्या अत्यावश्यक दुरुस्तीचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात आले. ट्रेकाईट दगडात बांधकाम केलेल्या मूळ ढाच्याला धक्का न लावता, त्यातील सौंदर्यपूर्ण सजावट अबाधित ठेवून ती दुरुस्ती करण्यात आली. अठराव्या शतकात युरोपमध्ये वैभवशाली प्रासाद, चर्च यांसारख्या इमारतींमध्ये वापरले जाणारे, अजूनही मजबूत असलेले इंग्लंडमधील मिल्टन कारखान्यातील नक्षीदार आधार (buttresses) या इमारतीत आहेत. घुमटाकृती छतावरील सुवर्णजडित नक्षीदार सजावट, मध्यवर्ती भागातील कारंजे, खांब व भिंतींवरील कलाकुसरीचे नक्षीकाम; या वास्तूच्या स्थापत्य शैलीचा संपन्न वारसा सांगतात.

महानगर पालिकेच्या कामाची व्याप्ती वाढल्यामुळे 1960 नंतर या मुख्य इमारतीला जोडून नवी इमारत बांधण्यात आली. मुख्य इमारतीमधून कार्यालयीन कामकाजाचे विभाग अन्यत्र हलवण्यात आले. मुंबई शहर व उपनगरांमध्ये चोवीस विभाग कार्यालये सुरू करण्यात आली. जगातील तिसऱ्या क्रमांकाची दाट लोकवस्ती असलेल्या मुंबई शहरातल्या नागरिकांना महापालिका विविध सेवा-सुविधा पुरवते. रोग निदान चाचणीची   अद्ययावत उपकरणे व अत्याधुनिक उपचार-सुविधांनी सज्ज इस्पितळे असलेली देशातील ही एकमेव महापालिका आहे.

कोविडच्या जागतिक महामारीमध्ये निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती हाताळण्यात महापालिकेने कसूर केली नाही. मुंबई शहरातील ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असलेली, संपन्न स्थापत्य शैलीचा वारसा पुढच्या पिढ्यांना सांगणारी ही आगळी वास्तू जतन करण्यात आली आहे. स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासकच नव्हेत तर सर्वसामान्य नागरिक, पर्यटक यांच्यासाठीही जानेवारी 2021 पासून या वास्तूचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. जिज्ञासूंनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.
– रजनी अशोक देवधर 7045992655  deodharrajani@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. थिंक महाराष्ट्र चा प्रत्येक लेख मी आवर्जून वाचत असतो. त्यातल्या त्यात ‘मुंबई ‘ हा माझा आवडता विषय. त्यामुळे मुंबई वरती असलेली माहिती मी चुकवत नाही. लेख खूप छान आणि माहितीपूर्ण आहे. अजून “मुंबई’ सदरावरचे लेख वाचायला आवडतील. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here