सय्यदभाई – तिहेरी तलाक विरुद्धचा लढा

0
39

सय्यदभाई यांनी मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक ‘तिहेरी तलाक’विरुद्धचा लढा 1990 च्या दशकात आणि एकविसाव्या शतकातही चालूच ठेवला. त्यांनी तिहेरी तलाकमुळे मुलांसह घरी परत आलेली बहीण खतिजा हिचा जगण्यासाठीचा संघर्ष जवळून पाहिला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक कर्मठपणाविरुद्ध लढा दिला. मुस्लिम समाजाचे प्रबोधन हे त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले होते…

सय्यदभाई यांचे नाव हमीद दलवाई यांच्या नंतरचे मुस्लिम समाजातील सुधारक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. त्यांचा जन्म हैदराबादचा (6 एप्रिल 1936). त्यांचे पूर्ण नाव सय्यद मेहबूब शाह काद्री. ते वाढले पुणे शहरात. त्यांना शाळा मॅट्रिक होण्यापूर्वीच सोडावी लागली. ते त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत लिहितात, की ‘मी चांगल्या शाळेत कधी गेलो नाही. पण माझ्यासाठी आयुष्य नावाच्या शाळेत मी जे धडे शिकलो, ते फार महत्त्वाचे होते.’ त्यांचे वडील पुण्याच्या दारुगोळा निर्मिती कारखान्यात काम करत असत. आई इतरांकडे घरकाम करत असे. सय्यदभाईंनी स्वत: त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून पेन्सिली बनवण्याच्या कारखान्यात काम केले. तो पुणे-मुंबई रस्त्यावरील भारत पेन्सील कारखाना. त्याचा किस्सा आहे! कारखान्याचे मालक तात्या मराठे यांच्याकडे सय्यदभाई काम मागण्यास गेले. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही सांगाल ते काम करीन, झाडेन, फरशी साफ करेन.’’ त्यांच्या त्या उत्तराने तात्या मराठे यांनी बाल सय्यदभाईंना कामावर ठेवले. तात्यांचा स्वभाव, त्यांचे वर्तन आणि वागणूक यांमुळे ते सय्यदभाईंच्या गळ्यातील ताईत बनले. कालांतराने, तात्या मराठे यांचे निधन झाले, भारत पेन्सील बंद पडले. मात्र, त्याच जागेवर सय्यदभाईंनी महाराष्ट्र ग्राइंडिंग मिल सुरू केली. तेव्हापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत सय्यदभाईंच्या खुर्चीमागे तात्या मराठे यांचा फोटो कायम राहिला!

सय्यदभाईंची मोठी बहीण खतिजा हिला तिच्या नवऱ्याने तिहेरी तलाक दिला आणि तिला तिची मुले घेऊन आई-वडिलांच्या घरी परत यावे लागले. त्या प्रसंगाचा खोल परिणाम सय्यदभाईंच्या मनावर झाला. त्यांची बहीण जगण्यासाठी शिवणकाम करत असे. सय्यदभाईंच्या मनात ती तिच्या आयुष्याची मांडणी पुन्हा करण्यासाठीचा संघर्ष पाहताना इस्लाममधील पुरुषसत्ताक व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण झाले. मुख्य प्रश्न होता, तो तलाक देण्याचा अधिकार केवळ पुरुषांना कसा काय? तो प्रश्न त्यांनी इस्लाममधील मौलवी आणि इमाम यांना विचारला. त्यांनी सय्यदभाईंचा प्रश्न आणि सय्यदभाई या दोहोंकडेही दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात सय्यदभाई जात आणि लिंग यांचे भेद संपवण्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील समाजवादी कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले होते. ते हमीद दलवाई यांनाही त्यांच्या माध्यमातून भेटले आणि त्यांचे जवळचे सहकारी बनले.

सय्यदभाईंनी मुस्लिम समाजातील धार्मिक कर्मठपणाविरुद्ध लढा दिला. सय्यदभाईंनी लिहिलेल्या ‘दगडावरची पेरणी’ या ‘कार्यकथना’त त्यांच्या कामाचे वर्णन आले आहे. पुस्तक 2001 साली मराठीमध्ये प्रकाशित झाले. त्याचा इंग्रजी अनुवाद ‘जिहाद ए ट्रिपल तलाकः अवर बॅटल अगेन्स्ट ट्रिपल तलाक’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

हमीद दलवाई आणि त्यांचे सहकारी यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना मार्च 1970 मध्ये केली. दलवाई यांनी स्थापनेच्या कार्यक्रमात हे स्पष्ट केले, की त्या संघटनेचे उद्दिष्ट मुस्लिम समाजात धार्मिक पूर्वग्रह न ठेवता राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे आणि समाजात समतेची आधुनिक, मानवी मूल्ये रुजवणे हे असेल. हमीद दलवाई यांचा मृत्यू वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी, 1977 मध्ये झाला. त्यांची पत्नी मेहरुन्निसा दलवाई आणि सय्यदभाई यांच्यासारखे काही सहकारी यांनी त्यांच्यानंतर मुस्लिम समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. त्यामध्ये मुंबईत मेहरुन्निसा दलवाई, कोल्हापुरात हुसेन जमादार, श्रीगोंदा येथे बाबुमियाँ बँडवाले, अमरावतीत वजीर पटेल अशांचा समावेश होता.

सय्यदभाईंनी स्वत:ला शाहबानोच्या लढ्यात 1980 च्या दशकात झोकून दिले. ते तिला भेटण्यासाठी इंदूरला गेले होते. त्यांनी शाहबानोचा सत्कार पुण्यात घडवून आणला. ते स्वतः शाहबानोला न्याय मिळावा या मागणीसाठी पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटले. सय्यदभाईंना आधुनिक मानसिकतेच्या त्या पंतप्रधानांनी इस्लामिक प्रतिगामित्वापुढे शरणागती पत्करली याचे वाईट वाटले होते. सय्यदभाईंनी समविचारी मित्रांची मोट बांधून 1986 मध्ये ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ची स्थापना केली. विविध राज्यांत परिषदांचे आयोजन केले. सय्यदभाई म्हणत, ‘माझी डिग्री एमएसएम आणि मी बिनभिंतींच्या महाविद्यालयात शिकलो.’ एमएसएम म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ!

सय्यदभाई यांनी ‘तिहेरी तलाक’विरुद्धचा संघर्ष 1990 च्या दशकात आणि एकविसाव्या शतकातही चालूच ठेवला. सय्यदभाई त्यांच्या जडणघडणीच्या वयात समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यामुळे प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांना समाजवादी-स्त्रीवादी नेत्या प्रमिला दंडवते यांची मदत झाली. सय्यदभाई व अख्तरचाची यांना त्यांचे स्वतःचे मूल नाही याचे कधी वैषम्य वाटले नाही. मात्र, मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात मूल दत्तक घेण्याची तरतूद नाही. ती सल निर्माण झाल्याने अख्तरचाचींनी सर्वोच्च न्यायालयात मुस्लिमांना मूल दत्तक घेण्याची तरतूद असावी यासाठी याचिका दाखल केली. सय्यदभाईंना भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच, त्यांना मुंबई-महाराष्ट्राच्या पातळीवर ‘चतुरंग’चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यांनी आयुष्याचे ध्येय मुस्लिम समाजाचे प्रबोधन हे मानले होते. सय्यदभाई यांचे निधन 8 एप्रिल 2022 रोजी पुण्यात झाले.

(मुख्य आधार, साधना 22 जुलै 2017 शमसुद्दीन तांबोळी यांच्या लेखामधून काही माहिती समाविष्ट)

(Last Upadated on 28th April 2022)
————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here