सीमावादाचे मूळ – मॅकमोहन रेषा

0
113

ब्रिटिशांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर अतिशय हुशारीने देशातील छोटी-छोटी असंख्य राज्ये मांडलिक केली, पण तरीही जिवंत ठेवली; त्यांच्या साम्राज्यात खालसा केली नाहीत. त्याच ब्रिटिशांनी कार्टोग्राफीच्या (नकाशाशास्त्र) नियमानुसार हिंदुस्थानचा सखोल नकाशा बनवला. त्याच्या सीमा ठरवल्या. तोपर्यंत हिंदुस्थानच्या सीमा केव्हाही ठरवल्या गेल्या नव्हत्या ! ब्रिटिशांची अडचण होती, पूर्वोत्तर भागातील हिंदुस्थान व तिबेट यांच्यामधील सीमा ही. ते काम त्या बर्फाच्छादित प्रदेशात तिबेट व चीन यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हते. त्या काळात हेन्री मॅकमोहन हे ब्रिटिश इंडियाचे सेक्रेटरी होते. त्यांनी त्यांच्या विचाराने 1914 मध्ये एक सीमारेषा निश्चित केली. तिबेटची संमती त्याला होती, पण चीनने त्याला त्रिपक्षीय बैठकीत सख्त विरोध केला. तीच ती गाजलेली मॅकमोहन रेषा ! हे घडून आले त्यावेळी स्वतंत्र हिंदुस्थान आणि स्वतंत्र कम्युनिस्ट चीन हे अस्तित्वातच नव्हते ! दोन्ही देश अनुक्रमे 1947 आणि 1949 मध्ये स्वतंत्र झाले.

चीन सीमेविषयी पुन्हा सतर्क 1955 पासून झाला. चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय हिंदुस्थानात 1960 मध्ये आले. त्यांचा प्रस्ताव अक्साई चीन चीनमध्ये असू द्यावे आणि अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानात असावे असा होता. नेहरू सरकारने तो नाकारला. तोच प्रस्ताव पुन्हा एकदा 1961 मध्ये केला गेला. चीनमध्ये माओत्सेतुंग सर्वेसर्वा होता. हिंदुस्थानने विरोध करताच, त्याने तो भाग बळाने चीनमध्ये आणण्याचे ठरवले. चीनने त्याचे मोठे सैन्य त्या भागात 1962 मध्ये पाठवले. नेहरू आणि त्यांचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी युद्ध अपेक्षित असूनही हिमाच्छादित भागात युद्ध तयारी करण्याची तसदी घेतलेली नव्हती. अपेक्षित तेच घडले. हिंदुस्थानचे एक हजार तीनशेत्र्याऐंशी सैनिक मारले गेले, एक हजार सत्तेचाळीस जबर जखमी झाले, एक हजार सहाशेशहाण्णव मिळालेच नाहीत (बेपत्ता) आणि तीन हजार नऊशेअडुसष्ट सैनिक बंदिवासात असा तो लांच्छनास्पद इतिहास 1962 च्या युद्धाचा आहे. त्यामुळे नेहरू यांनी हाय खाल्ली आणि त्यातच त्यांचा दु:खद मृत्यू झाला. हिंदुस्थान 1962 चे सीमायुद्ध विसरू शकलेला नाही.

सीमावादाचे मूळ आहे मॅकमोहन रेषा. चीनने ती कधीही मान्य केलेली नाही. ब्रिटिशांनी निर्माण केलेला तो वाद मिटवण्यासाठी देवघेव करावी लागेल, त्याशिवाय तो कधीही मिटणार नाही. हिंदुस्थान आणि चीन यांच्यादरम्यान दुसरा प्रश्न कोठलाही नाही. हिंदुस्थानने अमेरिकेच्या नादी लागून चीनशी वैर घेऊ नये. भारतीय सेना भारताच्या सीमा समर्थपणे राखण्याचे काम करण्यास सक्षम आहे. सीमेवरील झगडे चालू राहणार, पण युद्धाची शक्यता कमी आहे. दोघांनाही ते परवडणार नाही, नाक खुपसणाऱ्या अमेरिकेपासून मात्र भारताने सावध राहिले पाहिजे. कारण त्याचे चीनशी होणारे संभाव्य युद्ध त्यांना भारतात खेळण्याची इच्छा आहे.

प्रभाकर देवधर psdeodhar@aplab.com

(साधना, २६ सप्टेंबर २०२० वरून)

——————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here