दत्ताराम तुकाराम पांचाळ हे हार्मोनियम आणि पायपेटी तयार करण्याचा व्यवसाय गेली चार दशके करत आहेत. पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम हे संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गावचे. त्यांच्या कुटुंबातील विश्वनाथ पांचाळ यांनी मुंबईला जाऊन सुतारकाम करताना हार्मोनियम तयार करण्याची कला शिकून घेतली. दत्ताराम हे त्यांचे लहान बंधू. दत्ताराम यांनीही ते कौशल्य हस्तगत केले. ते वयाच्या विसाव्या वर्षी मुंबईत गेले. तेथे प्रसिद्ध हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीला लागले. त्यांनी प्रभादेवी येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रॉनिक तंतुवाद्य दुरुस्तीची कामे प्रारंभी केली; त्याच वेळी ते हार्मोनियमची दुरुस्ती करू लागले. दत्ताराम पांचाळ यांनी तेथे आठ वर्षे अनुभव घेतला; मग परळ येथे स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पण त्यांनी तो व्यवसाय ज्या इमारतीत सुरू केला होता, ती इमारत नवीन बांधकाम करण्यासाठी पाडण्यात आली आणि पांचाळ यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला.
पांचाळ हे गेली बारा वर्षे करंबेळे ह्या मूळ गावी हार्मोनियम व पायपेटी तयार करण्याचा व्यवसाय करत आहेत. ते पेट्या बनवण्यासाठी स्थानिक सागवानी लाकडाचा उपयोग करतात. ते लाकूड टिकाऊ असल्यामुळे त्यापासून हार्मोनियमचा बाहेरचा भाग तयार केला जातो, तर आतील भागासाठी देवदार, ओक, इंग्लिश प्लाय आणि बटनांसाठी अॅक्रेलिक यांचा वापर होतो. ते सर्व सामान मुंबईहून मागवले जाते. पांचाळ यांनी करंबेळे गावात स्वत:चे घर बांधले आहे आणि त्याच्या माडीवर हार्मोनियम तयार करण्याचा कारखाना चालवला आहे. त्या कारखान्यात वर्षभर हार्मोनियम तयार होत असतात.
एका कारागिराला एक हार्मोनियम तयार करण्यास आठवडा लागतो, तर एक पायपेटी तयार करण्यासाठी महिना लागतो. एक हार्मोनियम तयार करण्याचा खर्च साधारण आठ हजार रुपये, तर एका पायपेटीचा खर्च तीस हजार रुपयांपर्यंत जातो. दत्ताराम यांच्या हाताखाली चार कामगार आहेत. ते सर्व मिळून वर्षाला सुमारे दीडशे हार्मोनियम तयार करतात. त्यांच्या हार्मोनियमला पुणे आणि आळंदी येथून मुख्य मागणी आहे. त्यांनी तयार केलेली एक हार्मोनियम गेल्या वर्षी स्वित्झर्लंडला गेली. संगीत नाटकांचा काळ संपल्यावर पायपेटीची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली. आता वर्षाला चार-दोन पायपेट्या विकल्या जातात असे पांचाळ यांनी सांगितले.
दत्ताराम पांचाळ यांच्या हार्मोनियमचे आणि पायपेटीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बहुतेक भाग हे फोल्डिंगचे तयार केले आहेत. त्यामुळे एखादा भाग बिघडला तर तेवढाच भाग काढून कलाकारांना तो पांचाळ यांच्याकडे दुरुस्तीसाठी आणता येतो.
सूरज हा त्यांचा मुलगाही ती कला शिकत आहे. तो स्वत: गायक आहे; तो हार्मोनियम आणि पायपेटी, दोन्ही उत्तम प्रकारे वाजवतो. तो त्याच्या साथीदारांसह भजनगायनाचे कार्यक्रम करतो. तो गात असताना स्वत:च हार्मोनियमची किंवा पायपेटीची साथ स्वत:च्या गायकीला करतो.
सूरज पांचाळ : 9404899427
– अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com
——————————————————————————————————————————————–