ऐकवत नाही अशी शिवी

0
176

‘गाल्यते (विकृतिं याति मन: श्रवणमात्रेण) इति |

गालि:=अप्रियं वच: शाप: वा ||’

मानवी जीवनात राग, लोभ, मोह अशा क्षणी भावना तीव्रपणे उद्दीपित होतात. मनातील भावना तशा प्रसंगी मातृभाषेत प्रकट, सहज रीत्या प्रवाही होतात. मातृभाषेतील शब्दरचना, संवाद, लालित्य व शब्दबद्ध साजसज्जा चकित करणारी असते.

दिल्ली विद्यापीठातील भाषातज्ज्ञ व विद्वान लेखक डॉ. भोलानाथ तिवारी यांनी पीएच डी प्रबंधाकरता स्थानिक हिंदी बोलीच्या अभ्यासाच्या उद्देशाने, कजागिस्तान व उझबेकिस्तान या देशांचा दौरा केला. तेथे जैन, शीख आणि उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कामुळे विशिष्ट संमिश्र हिंदी बोलीभाषा प्रचलित झाली आहे.

तेथे एका गावी त्यांना दोन महिला भांडण करताना दिसल्या, तेव्हा ते तेथेच थांबले. रशियन दुभाषी त्यांना म्हणाला, “आपण येथून निघू या, लोक आपल्याकडे पाहत आहेत.” भोलानाथ तिवारी हटून तेथेच थांबले. त्या भांडणात, एका शिवीमुळे दुसरी महिला ढसढसा रडली. तिवारी यांनी दुभाषी मित्राला विचारले, “हृदयाला इतकी लागणारी ही जहरी शिवी कोणती आहे? ज्यामुळे ती महिला तत्काळ रडू लागली? मी आतापर्यंत भारतातील अनेक प्रांतांतील शिव्यांचा अभ्यास केला आहे, परंतु या शिवीत अफाट शक्ती आहे असे दिसते. आमच्या भारतीय महिला एका शिवीत अजिबात हार मानत नाहीत.”

तेव्हा दुभाषी मित्र म्हणाला, “नको ! ती शिवी आम्ही ऐकतसुद्धा नाही, तो खूप विषारी शाप आहे. तुम्ही भाषेचे अभ्यासक आहात याकरता सांगतो, की या शिवीचा येथील स्थानिक भाषेतील अर्थ आहे, ‘तुझा मुलगा मोठा झाला, की तू शिकवलेली भाषा विसरून जावो !’”

ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच भाषा जर मुलगा विसरून गेला, तर मुलाचा परिवार, समाज, विद्या व देश यांच्याशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे यासारखा दुसरा मोठा कोणताही शाप नाही !

– विजय नगरकर 9422726400 vpnagarkar@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here