स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
327

संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या… ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल.

भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे. त्यांच्याबरोबर आठवणींच्या जगात एक फेरफटका मारून येऊ या!

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

स्वरांची मोहिनी

संगीत आणि साहित्य या दोन भिन्न कला असल्या तरी त्यांच्या गोडव्यासंदर्भात माझं एक निरीक्षण आहे. संगीताच्या अनेक आवडत्या रचना अनेकदा ऐकल्या तरी गोडी अवीट असते. साहित्य आपण परत परत वाचलं तर ते पहिल्यांदा वाचलं होतं ती गोडी परतच्या वाचनात राहत नाही. संगीत थेट हृदयाला भिडतं. चांगलं संगीत हृदय गदगद करून सोडतं. ते अंगांग भेदून जातं. त्याची अमीट छबी मन:पटलावर कोरून.

आपण अगदी खुषीत असतो तेव्हा आतून कुठून तरी गाण्याची धून गुणगुणत शरीरभर स्पंदित होत आहे असं अनुभवाला येतं. कधी ती सुरावट कानात मुरलेल्या लेहऱ्याची धून असू शकते वा एखाद्या बासरीच्या सुरावटीचा रागाचा आलापसुध्दा. संगीत मनुष्य जीवनात बहर, रसमयता व ओलावा आणतं. आनंदाचा पाऊस आणतं. कान मात्र विकसित पाहिजे.

संगीत व गणित यांनी माझ्यातल्या लेखकाला व कलाकाराला खूप काही तरी दिलं. संगीतात गणितही आहे. ताल अमूक मात्रांचा असतो तेव्हा गायकासाठी वा नर्तकासाठी सम दाखवणारे लयकारीचं गणितीय घड्याळ असतं. समेवर येणं हे लयकारीचं गणित. लेख किंवा ललित निबंध मला ख्यालासारखा वाटतो. त्याचं उड्डाण म्हणजे ‘टेक ऑफ’ हे आलापासारखं. विलंबित लयीत जाणारं. नंतर येते मध्य लय. शेवटी द्रूत लय येऊन ख्यालाचं विमान जसं लॅण्ड होतं, तसाच छोटासा तराणा आळवून गायक ख्यालाची सांगता करतो. साहित्यकृतीही तशीच असावी. अगदी सुगम, सुकर, सुलभ, सोपं असं लॅण्डिंग असावं. विमान उतरताना टायर धांवपट्टीला टेकून ‘घास्स’ करून धक्का बसावे तसा शेवट न होता, फुलपाखरांच्या धावपट्टीवरून फुलांचे टायर जात आहेत इतकी ही उतरण अलवार व्हावी. साहित्यकृतीचा शेवट असा अलगद असावा. 

श्रवणप्रीती पक्व झाल्यावर एन. राजम यांचं व्हायोलीन गातं कसं, हे उमगू लागतं. त्यांचं वादन गोव्यातील संगीत संमेलनात दोन तीनदा ऐकण्याची संधी मिळाली. ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’ हे भजन व्हायोलीन गात आहे असंच वाटलं. त्यांनी ‘जब जानकीनाथ सहाय करे’ हे गायकी अंगाने वाजवलेलं भजन तर व्हायोलीन गायनाचा कळसच होता. ते प्रसिध्द भजन अनेक दिग्गजांनी गायलं आहे. श्रीकांत बाक्रे यांच्या आवाजातील ते भजन माझ्या सर्वांत जास्त आवडीचं. झोपाळ्यावर बसून हवेतून सावकाश, संथ गतीने वर वर झोके घेत जात आहोत असा विहरण्याचा, हिंदोळ्याचा आनंदी आभास ते भक्तिभावपूर्ण भजन ऐकताना होतो.

पंजाबी भजनांची श्रवणसाधना काही न्यारीच. गुरूमहिमा गाणारी. या भजनांना झुळूझुळू वाजणारे दोनतीन हार्मोनियम व तणातण वाजणारे तीन तबला संच यांची विलोभनीय साथ असते. नादांचा तो सुसूत्र मिलाफ आनंददायी असतो. ‘मन क्यूं बैराग करेगा, सद्गुरू मेरा पूरा…’ अशा अनेक भजनांतून येणारा पंजाबी मुशीतला भक्तिरस कानांना मंजुळ लागतो, सुखावतो, शांतवतो.    

संतूरवादक शिवकुमार शर्मांची हंसध्वनी रागावरील ध्वनिफीत आहे. गोव्याच्या केरी प्रियोळ वा सत्तरीतील वाघेरी पर्वतावरून उंच उंच कपारींवरून थंड, सुशीतल पाण्याचे तुषार वा मोठ्ठाले ओघळणारे थेंब लयदार गतीत कोसळावे, तिथं अनेक चिमण्या चिवचिवाट करत उडत असाव्यात तसा भास हे अप्रतिम संतूर वादन ऐकताना होतो. स्वर तुषार आणि शुभ्र पाण्याचे तुषार एका तालात नाचताना दिसू लागतात. दूर प्रवासात जाताना गाडीत असले संगीत हवे. मन स्वच्छ, निरभ्र होऊन आत कुठे तरी शुचिर्भूत होत विसावते. ‘श्रावणात घन निळा’ हे गाणं श्रावणात ऐकताना किती आनंद होतो ! सुधीर फडके यांची भावगीते, भक्तिगीते व गीतरामायण हा केवढा मोठा ठेवा !   

आम्ही हिंदी फिल्मी गाणी ऐकत वाढलो. लहानपणी रेडियोवर बिनाका गीतमाला ऐकली. अमीन सायानींचं गोड निवेदन… ते अगली पायदान पर पेश है असं लडिवाळपणे म्हणत. गीतमालेत अजरामर गाणी ऐकली. जी गाणी दशकांआधी ध्वनिमुद्रित झाली ती गाजलेली गाणी अजूनही ऐकली तरी खुषीची कारंजी हृदयात नर्तन करू लागतात. यमन रागावर शेकडो फिल्मी गीतं संगीतबध्द झालेली आहेत. अजून वाव आहे, कारण यमन हे अनंत आकाश आहे असं सगळे संगीत गायक म्हणतात. यमन गाण्यांचे स्वर सर्वांग गोंजारतात. आम्ही कॉलेजात असताना विविध भारतीवर रात्री एक कार्यक्रम असे- ‘साज और आवाज’. प्रथम साज म्हणजे वाद्यावर गाण्याची धून वाजे. नंतर प्रत्यक्ष कंठातील चित्रपट गीत. बांसरी, व्हायोलीन, गिटार, सारंगी, सतार, माऊथ ऑर्गन अशा वेगवेगळ्या वाद्यांतून अनुभवी कलाकार साज म्हणजे प्रसिध्द गाण्याचं वाद्यसंगीत वाजवत. पियानोही असे. तथापि, कालांतराने ब्रायन सायलस या नामवंत पियानोवादकानं पियानोवर नॉस्टॅल्जिक ट्यून्स वादनाचे कार्यक्रम सुरू केले. ते कार्यक्रम गाजले. अमिताभ बच्चन व इतर कलाकारही त्याच्या कार्यक्रमात येत. ब्रायन सायलसच्या पियोनावरील हिंदी फिल्मी गीतांच्या पंधरा सीडी आल्या होत्या. मी दिल्लीत कॅनॉट प्लेस मधून त्या खरेदी करून आणल्या होत्या. त्या माझ्याकडे अजूनही आहेत. मी अधूनमधून ऐकतो. ‘लग जा गले’, ‘सावन का महिना’, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’… अनेक गाणी ब्रायन सायलसने पियानोवर वाजवली आहेत. कितीतरी ‘हिट’ गाणी. आईस्क्रीम पार्लर, रेल्वेगाडी, विमानतळ, कलादालने अशा ठिकाणी ब्रायन सायलस व इतर कलाकार यांचं हे वादन अत्यंत मृदू, मऊसूत खळखळणाऱ्या आवाजात चालू असतं. डॉक्टरांच्या ओपीडी क्लिनिक्समध्ये पेशंट तासन् तास प्रतीक्षेत बसलेले असतात. तिथं छोट्याशा स्पीकरवर सॉफ्ट आवाजात हे वाद्यसंगीत लयदार झेपावणाऱ्या झऱ्यासारखं वाजवण्यास पाहिजे. प्रतिक्षा सहनशील व सुसह्य होऊन जाईल !

यू ट्यूब हे इंटरनेटने आणलेलं फार मोठं वरदान आहे. मी आणि माझा मित्र एकदा रसिकलाल अंधारियांचा गोरख कल्याण गाडीत ऐकत होतो. जसराजजींच्या रागेश्रीची आठवण झाली. मी मित्राला म्हटलं – महनीय व्यक्ती आल्यावर त्याला पाहण्यास लोकांची गर्दी उसळते. त्यांची पांगापांग करण्यास एक सेवक डाव्या बाजूने व एक उजव्या बाजूने हातवारे करत लोकांना दुतर्फा उभे राहण्याची सूचना देतो, नेमकं तसंच गोरख कल्याण हा राग, रागेश्री व बागेश्री यांना बाजूला सारत पुढे आल्याचा भास होतो. मित्राला ती उपमा फार आवडली. त्याचंही संगीत वेड व संगीत चिंतन खूप. मी म्हटलं, ‘हा गोरख कल्याण आकाशाची निळाई, सागराची खोली आणि मनाचा ठाव घेत स्पर्श करतो’. त्यानं टाळीच वाजवली. या मित्राचं जीवनच संगीतानं व्यापलेलं. त्याने त्याच्या मुलाचं नावच ठेवलं ‘गंधार’.

माझा हा मित्र एकदा मालिनी राजूरकर या त्याच्या आवडीच्या गायिकेला भेटण्यास गोव्याहून खास हैदराबादला गेला. तो मालिनीचा एकंदर साधेपणा पाहून हरखून गेला. मालिनीताईंच्या गणितप्रेमाविषयी व अध्यापनाविषयीही मला सांगू लागला. गाण्यात कुठे कुठे ही गणितीय सौंदर्यशास्त्राची समीकरणं दिसतात ते मला स्पष्ट करू लागला. माझंही स्पेशलायझेशन गणित विषय आहेच. हे मित्राला माहीत आहे. नंतर तबल्यातील लय, ताल, ठेका आणि गणितातील Permutations and Combinations यांवर आम्ही बोललो.  गणितात अचूकतेचं शास्त्र आहे. संगीतात अचूकतेची कला आहे. निझामुद्दीन खानची तबल्याची लग्गी किती गोड त्यावर माझा मित्र भान हरपून बोलतो. पाकिजा चित्रपटातील गाण्यांना जी विलक्षण वजनदार तबलासाथ आहे, त्यातील ठेहरावातलं न गवसलेलं सौंदर्य माझा मित्र उलगडून दाखवतो.

संगीत हे त्याच्या कला व कलात्मकता, सौंदर्य, काव्यात्मकता, भाव, भक्तिरस या सर्वांगांनी हृदयाला हात घालण्याची किमया करते. शास्त्र पाहिजेच पण शास्त्रापेक्षा कला सरस असली पाहिजे. कला एकरेषीय नसते. कलेच्या सर्व रेषा सादरीकरणात उठून दिसल्या पाहिजेत. सावनी शेंडे यांची गायन मैफल फोंड्यात काही महिन्यांपूर्वी ऐकली. अविस्मरणीय असं गाणं झालं. गोव्याच्या रसिकांना सावनीताईंचं गाणं परिचयाचं. ती मैफल कानांत रेंगाळत राहिली आहे. 

सावनीताईंनी रसिक प्रेक्षकांना सुरांची सैर करून आणताना चारूकेशीच्या होडीत बसवले. अलवारपणे. ती यात्रा अलौकिक होती. स्वर-तुषार सहजी उधळून आले. सावनीताईंचं ‘मन हो राम रंगी रंगले’ हे भजन मुळातच लोकप्रिय आहे. गोवेकरांना हृदयप्रिय आहे. मी आरंभीच त्यांना फर्माईश पाठवली होती. त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी ‘राम रंगी रंगले’ हे मन रंगवून टाकणारं भजन भक्तिभावरसपूर्ण आवाजात सादर केलं. रसिक त्या अनुभूतीत डुलत चिंब भिजून गेले. 

अशा किती तरी अद्वितीय मैफिली आम्ही गोव्यात अनेक दशके अनुभवत आहोत. मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरीताई, जसराज, जितेन्द्र अभिषेकी, अजय चक्रवर्ती, राजन व साजन मिश्रा, प्रभा अत्रे … अनेक मैफिली कानांची फुलं करून ऐकल्या आहेत. त्यांच्या आठवणी अवीट गोडीनं भरलेल्या व भारलेल्या आहेत.

जितेन्द्र अभिषेकी हे आमच्या गळ्यातील ताईत. माझं बालपण म्हार्दोळला गेलं. त्यांचा गाव जवळचे मंगेशी. ते घरी आल्यावर मंगेशीहून चालत संध्याकाळी म्हार्दोळला महालसा मंदिरापर्यंत येत. त्यांच्या बरोबर स्थानिक हार्मोनियम वादक दामजीमामा मंगेशकर असायचे. बुवांचा तो शुभ्र पेहराव डोळ्यांसमोर आहे. मंगेशीला एकदा मराठी साहित्य संमेलन झालं होतं. हायस्कूलजवळ. मंगेश मंदिराजवळच, मैदानावर. तेव्हा अभिषेकी बुवा आणि गायक संचानं ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ हा सुंदर कार्यक्रम सादर केला होता. अप्रतिम नाट्यगीतांचा वर्षाव झाला. अभिषेकींनी नाट्यगीतांच्या सुवर्णकाळात ज्या रचना दिल्या त्या अद्वितीय. त्यांनी मराठी नाट्यसंगीताला महाकाय नजराणा दिला – ‘कट्यार काळजात घुसली’ ते नाटक कायम पाहावंसं वाटतं ते बुवांच्या आनंददायक रचनांमुळं. त्यांनी काही कोंकणी गीतांना सुरेख चाली लावल्या. त्यात बाकीबाब बोरकरांचं, ‘त्या दिसा वडा कडेन गडद तिनसनां’, हे गीत तर त्यांच्याच आवाजात आहे. ‘ते निळे निळेशे धुंवरेपेल्यान’ हे गीतकार पद्मश्री वामन सरदेसाई यांचं गीत त्यांनी इतकी उत्तम चाल देऊन गायलं आहे की ते माझं आवडतं गीत. ‘कृपया तुम्ही कुणी गाऊ नका हो’ असं सांगावंसं वाटतं.  त्यांच्या आवाजातील कोंकणी गीतं आकाशवाणीवरून श्रोत्यांच्या ओठात घोळू लागली. अभिषेकी यांचं मंचावर ऋषीमुनी, योगीयांच्यासारखं, आत्मविश्वासपूर्वक भारदस्तपणे आसनस्थ होणं हाच एक प्रेक्षणीय सोहळा असे.   

अनेक मराठी, हिंदी भजनांनी आमच्या जीवनात समृध्दी आणली. ‘हे गोविंद हे गोपाल, हे दयाल नाथ…’. जगजीतसिंग यांच्या आवाजातील ते भजन ऐकताना एका वेगळ्याच विश्वात अलगद विहरल्यासारखं वाटतं. जीव हलका हलका होतो. उगाच शांत शांत वाटतं. ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे’ हे अभिषेकी यांनी गायलेलं गोव्याचे संत कृष्णंभट्ट बांदकरांचं भजनही असंच मधुर आहे. गोव्याचे आणखी एक संत सोहिरोबा आंबिये रचित ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ हे अभिषेकीयांच्या आवाजातील भक्तिगीत सुध्दा गोड आहे. 

संतकवींच्या रचनांमध्ये इंद्रियातीत अनुभूतीचा समावेश शब्दबध्द असतो. प्रार्थना असते. ईश्वरी गुणगान असतं. अद्वैताच्या अऩुभूतीनं भारलेली शरणागत, नम्र भावना असते. गोमंतकीय गायक स्व. बाळकृष्ण केळकर यांचं ‘का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाला तो एकलाचि’ हे तुकारामांचं भजन फोंड्यात एका मैफिलीत ऐकलं होतं. ते स्मरणपटलावर कायमचा ठसा उमटवून गेलं. संजीव अभ्यंकर यांची दत्त भजनं व इतर भजनं हृदयाला शूचिर्भूततेचा व स्वच्छतेचा अनुभव देतात. माणिक वर्मा यांनी गायलेलं ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ हे अजरामर भजन हा भक्तिरसाचा परिपाक होय.  संत कबिरांची अनेक भजनं आहेत. ‘माटी कहे कुम्हारसे तू क्या रोंधे मोहे एक दिन ऐसा आयेगा मैं रोंधूंगी तोहे…’ हे लक्ष्मी शंकर यांचं रेडियोवर ऐकलेलं गोड कबीर भजन आठवणींच्या कप्प्यात  आहे.

आधुनिक तंत्रज्ञानानं संगीत ऐकण्याची चांगली साधनं आम्हाला दिली आहेत. अत्याधुनिक स्पीकर यंत्रणा आली आहे. इवल्याशा एमपीथ्री प्लेयरमध्ये शेकडो गाणी रिकॉर्ड करून विमानतळावर प्रतिक्षा करताना वा गाडीच्या प्रवासात ऐकू शकतो. संगीतात मनुष्याला आनंद देण्याची पराकोटीची शक्ती आहे. संगीतीय व्याकरण न कळलं तरी हृदयाला नाचवून रिफ्रेश करण्याची ताकद त्यात आहे. तंत्रज्ञानानं संगीत सर्वदूर पोचवलं. श्रवणभक्तिची अनेक कवाडं, दालनं आणि आवारं खुली केली. महान संगीतकार बिथोवनचं एक वचन आहे – ‘सर्व शहाणपण आणि तत्त्वचिंतन यांच्या पल्याड संगीत हा एक साक्षात्कारी अनुभव आहे’. खरंच!!

– मुकेश थळी 9545827662 anushanti561963@gmail.com

About Post Author

Previous articleकिल्ले सुतोंडा (Sutonda Fort)
Next articleशेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)
मुकेश थळी हे बहुभाषी साहित्यिक, अनुवादक आहेत. त्यांना गणित आणि शास्त्रीय संगीत या विषयांत रूची आहे. ते गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या शाळांत शालेय स्तरावर गणित विषयाचे अध्यापन करत. गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहायक, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार म्हणून काम केले. त्यांचे कोंकणी भाषेत चार ललित लेख संग्रह आणि एक नाटक प्रकाशित आहे. कोकणी-इंग्रजी शब्दकोशाकरता सहसंपादक, कोकणी कथांचे इंग्रजी अनुवाद जे साहित्य अकादमी व फ्रंटलाईन अशा राष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांत प्रसिध्द आहेत. कथा, कविता, गीते आणि नाटकांचे लेखन तसेच कोकणी, इंग्रजी, मराठी नियतकालिकांसाठी स्तंभलेखक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून काम केले आहे.

4 COMMENTS

  1. फार फार सुंदर लेख. वाचताना ती माझी सर्व आवडती गाणी मनात वाजून गेली.काश कोई महफिल सजाएं इन गानोसें और सामने बैठकर सुनना नसीबमें हो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here