शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण. मंदिराचा भव्यदिव्य परिसर, भव्य महाप्रसादालय, मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गजानन महाराजांची समाधी, आकर्षक सभामंडपात नियोजनबद्ध रांगेत चहा पाण्याच्या व्यवस्थेसहीत सुलभ शौचालय उपलब्ध आहे.
मात्र शेगाव हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे रोज साधारण दहा ते पंचवीस हजार भाविक येतात. तेवढे भाविक दररोज महाप्रसादाचा लाभ घेतात. तेथे धार्मिक कार्यक्रम सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतात अशी ख्याती आहे. मंदिराची साफसफाई सेवाधारी मंडळी रोज करतात.
गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमीच्या दिवशी शके 1800 मध्ये 23 फेब्रुवारी 1878 ला दुपारी अडीच वाजता प्रकटले. त्यांचे पहिले दर्शन भीषण होते. ते देविदास पातुरकर यांच्या मुलाच्या मुंजावळी कार्यक्रमातील घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात होते आणि ते गाईगुरांना पिण्यासाठी ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित होते ! ते बंकटलाल अग्रवाल यांच्या दृष्टीस प्रथम पडले. त्यांनी त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे अंगावर काही ल्यालेले नव्हते. त्यांची थोरवी बंकटलाल अग्रवाल यांनी जाणली. गजानन महाराज हे परमोच्च स्थितीला पोचलेले असे ब्रह्मवेत्ते संत होते. ते परमहंस संन्यासी होते. जेव्हा बंकटलाल यांनी त्यांना जेवणाविषयी विचारले, त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति) अवस्थेत होते. ती ब्रह्मस्थिती अथवा सहजसमाधी अवस्था (योगशास्त्रात तशा अन्य दोन अवस्था म्हणजे सुषुप्ती (झोपणे) आणि स्वप्नावस्था या होत). गजानन महाराज यांचे चरित्र अशा अद्भुत घटनांनी भरलेले आहे; तरी ते स्वत: शिक्षण-मार्गदर्शन-लोकसंपर्क व सेवा अशा जीवनव्यवहारातील घटनांतून गेलेले दिसतात.
बाल अवस्थेतील योगी गजानन महाराज एके दिवशी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोटचे स्वामी भक्तांना उपदेश करत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी परस्पर एकमेकांना ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली आणि ‘सिद्धपुरुष व्हाल’ असा आशीर्वाद दिला. बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्याही पाया पडत. स्वामींनी बाल गजाननास आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे जाण्यास सुचवले. तेथून तू अकोटला नरसिंग महाराजांकडे जा आणि तेथून पुढे शेगावला जाऊन तेथेच स्थिर होत देह सोड अशा सूचना दिल्या.
नाशिक येथील देव मामलेदार, आकोट येथील नरसिंग महाराज, कारंजा लाड येथील बाळशास्त्री गाडगे ही सर्व समकालीन संत मंडळी म्हणून परिचित होती. बाल गजानन नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे असताना, देव मामलेदारांनी देह सोडला, पण जाता जाता बजावले, की शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा. बाल गजानन कावनाई गावातील कपिलधारा तीर्थावर आले. तेथे त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिद्धी दिली. ते महंतांच्या आदेशानुसार नाशिकला एका वटवृक्षाखाली राहू लागले. नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या मेळाव्यात विदर्भातील कारंजा (लाड) या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेज:पुंज अशा बाल गजाननावर गेली. त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून कारंजा (लाड) या त्यांच्या गावी-घरी आणले. तेथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली. लोक त्यांना कपडे, अलंकार, भेटवस्तू देऊ लागले.
बाल गजानन त्या उपाधीला कंटाळून कपडे-अलंकार, सर्व तेथेच टाकून, बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी (जावरा) या चांदुर रेल्वे तालुक्यातील गावी आले. तेथे त्यांची सच्चिदानंद मणिरामबाबा यांच्याशी भेट झाली. महाराज चार-पाच दिवस तेथे कामठ्यामध्ये (सुतारकाम करण्याची जागा) राहिले. गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तेथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आणि गणपती उत्सवाला प्रारंभ करून दिला. तो उत्सव अव्याहतपणे सुरू आहे. गजानन महाराजांसारख्या ‘दिव्य महात्म्या’ने सच्चिदानंद मणिरामबाबांना गुरुबंधू अथवा ज्येष्ठ बंधू मानले. गजानन महाराज आणि सच्चिदानंद मणिरामबाबा यांची आध्यात्मिक चर्चा होत असे. मणिरामबाबांनी संत गजाननास अकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे गजानन महाराज अकोटला नरसिंग महाराजांना जाऊन भेटले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले, की मी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून तुमच्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी ते समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तू माझे क्रियाकर्म करून शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरता जा असे सुचवले. नरसिंग महाराजांनी गजाननास अष्टसिद्धीप्राप्ती शिकवली व त्या शक्ती गजाननांकडे संप्रेरित केल्या. गजानन महाराजांनी अनेक रंजल्या-गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखवला. जोडमोहा येथील संत खटेश्वर महाराजही बग्गीला येऊन गेले. जोडमोहा जिल्हा यवतमाळ येथे खटेश्वर महाराज होऊन गेले. त्या मंदिरात रोज जवळपास शंभरच्या आसपास कुत्र्यांना पोळ्या, भाकरी, बिस्किटे खाऊ घातली जातात. तेथे गोरक्षणसुध्दा आहे. तेथे कार्तिक पौर्णिमेस यात्रा महोत्सव भरतो.
दासगणूंनी लिहिले आहे, “कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||” बंकटलाल यांनी वर्णन केले आहे – “दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||”
गजानन महाराजांनी भक्तजनांना मार्गदर्शन बत्तीस वर्षे केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या त्या अवलिया संताने विविध चमत्कार केल्याची नोंद आहे. त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या ‘गण गण गणात बोते’ या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. ‘गण गण गणात बोते’ हा गजानन महाराजांचा आवडता मंत्र. ते त्याचा अखंड जप करत. त्यांचे अहर्नीश भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना गिणगिणे बुवा असेही नाव दिले होते. ‘गण गण गणात बोते’ या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत.
महाराजांना झुणका भाकरीसोबत मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या आवडत असत, म्हणून गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कोणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, ते प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करत. त्यांचे वर्तन कोठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळात ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी असे असे. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. ते चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून खुलत असत.
त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, “तुला काय करणे यासी | चिलिम भरावी वेगेसी | नसत्या गोष्टीशी | महत्त्व न यावे निरर्थक ||” महाराजांना कपड्यांचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर ती मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर फेकून देत असत. त्यांनी पादुका, पादत्राणे कधी वापरली नाहीत. भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करत. ते चिलीम क्वचित ओढत असत.
वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, “मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||”
देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, “मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरू नका | मी आहे येथेच ||” यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेम दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, “दुःख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे II”
गजानन महाराज भाद्रपद शुक्ल पंचमी, (ऋषीपंचमी) शके 1832, 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगावी समाधीस्थ झाले. त्यांच्या वास्तव्याने शेगाव हे अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठ बनले.
गजानन महाराज व शेगाव यांविषयी भाविकतेने अधिक बोलले/लिहिले जाते. म्हणून काही व्यक्ती व घटना यांबाबत वास्तव माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती माहिती अशी –
रामचंद्र कृष्णाजी पाटलाचा वाडा – जेथे गजानन महाराजांनी पाटलास गोसाव्याच्या रूपात दर्शन देऊन उपदेश केला होता. तो वाडा येथे मारुती मंदिराजवळ आहे.
बंकट सदन – श्रींचे प्रथम दर्शन घेणारे परमभक्त बंकटलाल अग्रवाल यांचे घर रामचंद्र पाटलांच्या वाड्यापासून जवळच आहे.
पातुरकरांचा वाडा – वटवृक्षाला लागून पातुरकर यांचा वाडा आहे. त्यांच्याकडे ऋतु- शांतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता.
बंकटलाल अग्रवाल यांना एक मुलगी यमुना. तिला रामचंद्राजी चांदुरकर यांच्या मुलास मधुकरला दिली होती. शेगावमध्ये ते देशभक्त व थोर स्वातंत्र्यसैनिक म्हणून परिचित होते. शेगाव येथे बंकट सदन आहे. तेथे बंकटलाल अग्रवाल यांचे वंशज चंदुशेठ अग्रवाल राहतात.
– अमोल कावलकर 7588189823 sacchidanand30@gmail.com
———————————————————————————————-