डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळचा दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील रहिवासी वैद्यकीय उपचार आणि सल्ला यांसाठी त्यांच्याकडे एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे सहकुटुंब गर्दी करतात. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना बहुदा तेथे जन्माला आली असावी! डॉक्टर हे माझे आजोबा. आम्ही त्यांना ‘जोजो’ म्हणतो.
दाभोळ हे गाव अरबी समुद्राच्या खाडीत, वाशिष्ठी नदीच्या कुशीत वसलेले आहे. अलिकडे शहरीकरण होत असले तरी दाभोळ हिरवेगार, नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेले, लाल कौलारू घरांनी सजलेले असे देखणे आहे. चंडिका मंदिर, धक्का, अंड्यावरची (शाही) मशीद अशी आकर्षणे तेथे आहेत.
जोजोंचा जन्म कोल्हापूरजवळच्या आजरा गावचा, 1935 सालचा. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवीधर झाले. जोजोंनी लहानपणी गरिबीमुळे उपचारांअभावी मृत्यू खूप झाल्याचे जवळून पाहिले होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा गोरगरिबांसाठी उपलब्ध करावी हे त्यांच्या मनात पक्के होते. जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतले. असे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले.
तेव्हा दाभोळमध्ये वीज नव्हती, मूलभूत सुविधा नव्हत्या. त्या जोडीला गरिबी, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव… जोजो नवीन डॉक्टर म्हणून कधी पायी डोंगर ओलांडून तर कधी होडीने खाडी पार करून पलीकडील गावागावात रुग्ण तपासण्यासाठी जात असत. बऱ्याचदा शेवटची परतीची होडी चुकली किंवा पावसाच्या दिवसांत रात्री अंधारात डोंगर उतरून येणे शक्य नसले, तर ते ती रात्र पेशंटच्या घरी काढत.
जोजोंचे पेशंट बहुरंगी-बहुढंगी, सर्व वयोगटांतील, सर्व जाती-धर्मांतील, उच्चशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत असे सगळे. लहान गावात बस्तान बसवण्यासाठी डॉक्टरकडे काविळीपासून कर्करोगापर्यंतचे निदान आणि त्यातून ‘बरे करण्याचे’ कौशल्य असावे लागते. जोजोंकडे ते होतेच, पण त्या बरोबर रुग्णांबद्दल प्रेम, आपुलकी होती. जोजो स्वतःला वाचन, तंत्रज्ञान या माध्यमातून ‘अप टू डेट’ ठेवत असतात. नेहमीचे आजार, साथी, रोग यांवरचे उपचार सरळ/पुस्तकी आणि बहुतांशांना जमण्यासारखे असतात. पण खेड्यात विंचू-सर्पदंश झालेले तान्हे बाळ, माडावरून पडून जखमी झालेला घरगडी, रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेला लहानगा मुलगा अशा विचित्र, अनपेक्षित आणि अचंबित करणाऱ्या केसेस समोर उभ्या ठाकतात. त्यामुळे डॉक्टरला उपचारांच्या ज्ञानाएवढीच सर्वसाधारण माहिती असावी लागते. जोजो पेशंट तपासताना, त्यांच्याशी बोलताना कधीही खुर्चीत बसत नसत. त्यांच्या दवाखान्यात टेबल-खुर्चीच नव्हती ! त्यांनी मुद्दाम त्यांच्या दवाखान्यात त्यांच्यासाठी टेबल-खुर्ची ठेवली नव्हती ! त्यामुळे ते ‘बिनखुर्चीचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. जोजोंना आजाराचे गांभीर्य आणि रुग्णाचे वय यांचे भान राखून दवाखान्यात हलकेफुलके वातावरण ठेवण्यास आवडते. त्यांची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा हे पेशंटचे आरोग्य आणि तक्रारी यांवरील रामबाण उपाय अजूनही आहे. या ‘बिनखुर्चीच्या डॉक्टरां’शी नुसते बोलून, त्यांच्या स्पर्शाने बरे होणाऱ्या-बरे वाटलेल्या पिढ्या दाभोळमध्ये तुम्हाला दिसतील.

एकदा दहा-बारा वर्षांच्या चुणचुणीत मुलाला घेऊन त्याची आई दवाखान्यात आली. “डॉक्टर बघा ना, हा कालपासून काही बोलत नाहीये, बाकी तसा बरा वाटतोय, काय होतंय- कळत नाहीये”. जोजोंनी पोराकडे पाहिले आणि त्यांच्या असिस्टंटला हाक मारली “प्रदीप, जरा त्या गुरांच्या डॉक्टरला फोन लाव आणि बोलावून घे. त्यांना न बोलणाऱ्या पेशंटच्या आजाराचे निदान करता येते.” पोरगं ते ऐकून टरकले आणि पोपटासारखे बोलू लागले ! दवाखान्यात एकच हशा पिकला.

जोजो रोज शे-सव्वाशे पेशंट तपासत असले तरी पैशाचे बाजारीकरण त्यांच्याकडून कधी झाले नाही. त्यांनी व्यवसायात साधेपण आणि माणुसकी या दोन गोष्टी सोडल्या नाहीत. ते दवाखान्यातील त्यांच्या मदतनीसांना योग्य मोबदला, गरजेचे शिक्षण, आदर आणि आवश्यक स्वातंत्र्य नेहमीच देत आले. त्यांनी त्याचबरोबर असंख्य वेळा रुग्णांना मोफत सेवा दिली, अजूनही देतात. मग कधी तेच रुग्ण कधी त्यांच्या शेतातील तांदूळ, काजू, फणस; स्वतः पकडलेले ताजे मासे आणून देत असतात. त्यांचा दवाखाना सोमवार ते शनिवार सकाळी सात ते एक, दुपारी साडेतीन ते साडेसहा आणि ‘होम व्हिझिट’ असा उघडा असतो. रविवारीसुद्धा ते सात ते एक असे काम करतात. माझ्या आजीने, कै. आशा लुकतुके हिने यातूनसुद्धा त्यांचे वर्क-लाईफ बॅलन्स केले ! जोजोंना तिच्यासारखी योग्य आणि आदर्श सहचारिणी लाभली. 1960 ते 2023 अशी सलग त्रेसष्ट वर्ष वैद्यकीय सेवा दाभोळ पंचक्रोशीत देणारा असा हा ‘बिनखुर्चीचा डॉक्टर’ नव्हे ‘देवमाणूस’. त्याने एकोणनव्वदावे वर्ष गाठले आहे. त्यांनी आणि आजीने मिळून दाभोळच्या वणौशी गावी नंदनवन उभारले आहे. वास्तवात तो दहाबारा एकरांचा डोंगर आहे. त्यावर आंबा-काजू-फणस-चिकू यांची भरपूर झाडे लावली आहेत. तेथेच सुंदर घरही आहे. आजीला जाऊन दहा वर्षे लोटली तरी त्यांनी एकत्र कमावलेला आरोग्याचा, उत्साहाचा, स्वावलंबनाचा ठेवा अजूनही जोजोंची साथ देत आहे. ते आता दाभोळला एकटेच राहतात. ‘पॅशनेट अबाऊट वर्क’ या व्याख्येत बसणाऱ्या माझ्या जोजोंचा रिटायरमेंटचा इरादा नाही. ते रोज सकाळी आठ वाजता टापटीप पोशाख, विशीतला उत्साह, आत्मविश्वास आणि जनसेवेची तळमळ परिधान करून रुग्णसेवेसाठी बिनाखुर्चीचे उभे असतात ! त्यांची ही रुग्णसेवा अजून वर्षानुवर्षे अशीच चालू राहील आणि ते अनेकांना प्रेरित करतील याची खात्री वाटते.
– मैत्रेयी पंडित-दांडेकर +1 (248) 924-7997 itsmaitz@gmail.com
———————————————————————————————-
आदरणीय डॉ. लुकतुके ह्यांचं व्यक्तिमत्व अफाट आहे. कार्य प्रेरणादायी आहे. वयाच्या पंचवीशीत दाभोळसारख्या दुर्गम खेड्यात येऊन ते वैद्यकीय सेवा सेवेला सुरुवात करून निस्पृहपणे वयाच्या नव्वदीतही सुरु ठेवली आहे. त्यांच्या सेवेला आणि त्यांना शत शत नमन.
Vandan ashya Doctorana…
६३ वर्षे वैद्यकीय सेवा ?अचंबित आणि अफाट कार्य. लेख वाचून एकदा दाभोळ ला जाऊन डॉक्टरांना भेटावं अशी तीव्र इच्छा झाली.