दोंडाईचा – कला आणि व्यापार यांनी समृद्ध! (Dondaicha town has rich tradition of art, culture and trade)

2
443

अमरावती व भोगावती या दोन नद्यांच्या डाच्यात वसलेले गाव, म्हणून माझ्या गावाचे नाव ‘दोंडाचा’. त्याचा अपभ्रंश ‘दोंडाईचा’. ते माझे माहेर, म्हणजे माझी जन्मभूमी व कर्मभूमीसुद्धा, म्हणून मला माझ्या गावाचा अभिमान खूपच वाटतो. ते ठिकाण शिंदखेडा तालुका आणि धुळे जिल्हा येथील, गजबजलेले व अनेक अंगांनी बहरलेले आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक, कलात्मक उत्कृष्टता, समाजोपयोगी राजकारण, विशेष वैद्यकीय सुविधा, महानगरपालिका, आर्थिक उलाढाल -उत्तम बाजारपेठ -विविध उद्योग कारखानदारी, मका फॅक्टरी, शेती व्यवसाय, दुग्धव्यवसाय, मिरची उत्पादन अशा विविध बाबींनी समृद्ध असे माझे दोंडाईचा गाव.

दोंडाईचा गावाच्या पूर्वेला ‘वरवाडे’ ही जुनी वस्ती आहे. दोंडाईचा गावचे संस्थान, श्रीमंत राजे दादासाहेब रावल यांनी स्वोद्धारक विद्यार्थी गृह, इंग्रजी शाळा लेंढूर नाला काठावर 1 जुलै 1929 रोजी सुरू केली होती. त्या शाळेला महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये; तसेच, साने गुरुजी यांनीही 1947 मध्ये भेट दिली होती. दादासाहेब रावल यांनीच सढळ हातांनी तीस एकर जमीन दान शाळेचा विस्तार व्हावा म्हणून दिली. तसेच, श्रीमंत व्यापारीवर्गानेही जमिनी दान देऊन व आर्थिक रुपातही मदत केली होती. दादासाहेबांचे परममित्र, स्वातंत्र्यसेनानी कै. गोविंदराव साठे यांनीही जमिनी दान दिल्या होत्या. त्यांच्या नावाचा बॅनर शाळेत सन्मानाने झळकत आहे. संस्थेने हळूहळू प्रगती साधत बहूद्देशीय हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालय सुरू केले. स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यासाठी लढा देणारे लढवय्ये यांच्यासाठी तेच ठिकाण स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत होण्यासाठी हक्काचे ठरले होते. दादासाहेब रावल स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिवीर यांना लपण्यासाठी, जेलमधून पळण्यासाठी मदत करत असत ! येथेच स्वातंत्र्यासाठी उठावाची, चळवळींबाबतची खलबते शिजत असत. माझे पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण त्या शाळेत झाले आणि तीच माझी कर्मभूमीसुद्धा ठरली. ती जागा म्हणजे संस्थेचे आर.डी.एम.पी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा.

एखाद्या हिरव्याकंच वटवृक्षास अलगद अंकुर फुटावा अन् तो वृक्ष अजून बहरत राहवा; अगदी तसेच, शाळेच्या पूर्वेला बांगरे, मोहम्मदिया, रमाई, सिद्धार्थ ही नगरे नव्याने वसली आहेत. जुन्या काळच्या रेल्वे रुळास लागून नवा प्रशस्त व भव्य असा चौपदरी रस्ता रेल्वेपूलावरून जातो अन् गावाच्या भौतिक विकासाची शान वाढवतो. ती गावाची समृद्ध पूर्व रेषा आहे ! आर.डी.एम.पी. हायस्कूलच्या डाव्या अंगास मात्र गौसिया नगर, मस्जिद, दलित वस्ती, भंगार गोडाऊन, गोपालपुरा आणि भिलवस्तीतील जनता दोन वेळच्या घासाची सोय करत, यंत्रवत जीवन जगत असते. शाळेच्या समोरच्या रस्त्यावर तिरमली वाडा, राजवाडा, आंबेडकर चौकातील- त्यांचाच भव्य पुतळा, रमाई पुतळा संविधान रक्तात रुजवत, योग्य दिशा दाखवत अभिमानाने उभे आहेत. पुढे, डाव्या हातास दक्षिणेकडे भतवाल चित्रपटगृह, अहिल्याबाई पुतळा, होळी चौक, महादेव मंदिर, हनुमान मंदिर जनमानसास शांतता प्रदान करतात. उत्तरेकडे मस्जिद, बाजारपेठ, सराफ गल्ली, बोहऱ्यांची व्यावसायिक दुकाने, दवाखाने व माझी बालपणीची जिल्हा परिषदेची नूतन मराठी कन्या शाळा नंबर 9 आहे.

शाळेच्या उजव्या हाताला, उत्तरेकडे माझ्या बालपणी अशोक टाकी (सिनेमागृह) होते. चित्रपट पडदा आणि सभोवतालाला गोणपाट, तरट, ताडपत्री किंवा जाडेभरडे कापड टोकरांना गुंडाळून केलेली चौकोनी जागा एवढीच ती वास्तू. ‘जय संतोषी माँ’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘आवारा’, ‘दो आँखे, बारह हाथ’, ‘एक फुल दो माली’, ‘आँखे’, ‘दिवार’, ‘अवतार’, ‘जुदाई’, ‘सरगम’, ‘अनुराग’, ‘माहेरची साडी’ असे अनेकानेक भावनिक, सामाजिक संस्कार घडवणारे चित्रपट पाहण्यास मी व माझी मोठी बहीण, गल्लीतील जाणत्या हौशी महिलांसोबत जायचो. अमिताभ बच्चन, रेखा, जया, धर्मेंद्र, हेमामालिनी, राजेश व विनोद खन्ना, मुमताज, सायरा बानो, जयाप्रदा, शर्मिला टागोर, रिना रॉय, मोसमी चटर्जी यांनी तर आमचं तरुणपणीचं भावविश्व घडवलं ! ‘टाकी’ भूतकाळात जमा झाली आहे; त्या जागी वसलंय गोविंद नगर आणि निर्माण झाले आहेत संगम दूध डेअरी भाग, खोल गल्ली आणि चैनी रोड.

शाळेच्या समोरच्या भागात गोपालपुरा, पुढे भोगावती नदीच्या काठावरील श्रीकृष्णाचे भव्य मंदिर. माझ्या बालपणीच्या आठवणींतील अविस्मरणीय आणि सुसंस्कार घडवणारी एक बाब म्हणजे तेथे होणारा भागवत सप्ताह, कीर्तने-भजने, गोपाळकाला, भंडारा, पारायण, रामायण, भागवत, प्रवचन, सण, व्रते-हरितालिका पूजन, वटपौर्णिमा पूजन, ऋषी पंचमी पूजन, अधिकमास पोथी वाचन अशी व्रतवैकल्ये आम्हा दोंडाईचा निवासींना धर्म, अध्यात्म, सद्विचार, सद्वर्तन, संयम, सहनशीलता, दान हे विचार पेरणारी, माणूस घडवणारी पावनभूमीदेखील होती- परंतु विज्ञान, फॅशन यावर विश्वास ठेवणाऱ्या आधुनिक पिढीत भाविकता वाढली, पण भक्तीचे प्रमाण नगण्य आहे ! भागवत कथा सांगणारे, सद्विचार हृदयात पेरणारे नाना महाराज देवाला प्रिय झाले अन कृष्ण मंदिराला जणू अवकळा आली. पूर्वीची गजबज राहिली नाही. मला बालपणीची आठवण आली, की मी त्या सुन्या मंदिरास भेट देते. भक्तांच्या विरहात उभ्या कृष्ण-राधेचे दर्शन घेते. भूतकाळाच्या पावन आठवणींनी गळा भरून येतो, डोळे ओलावतात. कोरडी ठक्क झालेली माय भोगावती डोळ्यांत साठते अन् अश्रुरूप गालावरून ओघळत मायेने निरोप देते. 

श्रीकृष्ण मंदिराच्या वरच्या अंगाने, भोगावतीच्या काठाकाठाने पहारेकऱ्यांसारखी धडधाकट उभी असलेली झाडे, विस्तीर्ण वृक्ष, घनदाट आमराई हा जणू अमरावती नदीचा केशसंभारच ! सुकेशीनी अशा भोगावतीच्या थंडगार, खोल, निळ्याशार पाण्याचा प्रवाह गाय-माय-गुरे-ढोरे-माणसे-विहिरी-आड-शेती-शेतकरी माणसे… साऱ्यांनाच मोहवत असायचा. पण तो भाग भूतकाळात गेला आहे. त्या आमराईची जागा सिमेंट काँक्रिटच्या जंगलाने काबीज केली आहे. भौतिक विकासाच्या भस्मासुराने गिळल्यामुळे नदीने तिचे पात्र संकोचून-आक्रसून घेतले आहे. बिचारी अशक्त अशी भोगावती गुढघ्यात पाय दुमडून भिकाऱ्यासारखी ओशाळगत पाहत सुकत चालली आहे. दांडगाईखोर काळाचा विकास तिला गिळंकृत करू पाहत आहे.

भोगावतीच्या खांद्यावर, श्रीकृष्ण मंदिराच्या समोरील भलामोठा धोबीघाट, त्यावर सपासप धुणे धुत असलेले धोबी, नदीभर वाळूत भरलेली पांढऱ्याशुभ्र कपड्यांची जत्रा, सासुरवाशिणींची पहाटेपासून धुणे-भांडी-पाणी भरण्याची लगबग, त्यांचे सासू-नणंद-सासुरवास-नवऱ्याचा छळ-मनाची घुसमट-सल-खंत सख्यांच्या आणि नदीच्या कानात कुजबुजणे, गाई-म्हशी-गुराखी-शेतकऱ्यांची लगबग, मोठ्या खडकांमध्ये खोल, गोल, मोठ्ठे नैसर्गिक रीत्या निर्माण झालेले खळगे त्यांचा तगारा म्हणून वापर करता यावा असे… त्याच धोबीघाटावर शेंदुराच्या सात आसरा व एक म्हसोबा जलदैवत म्हणून बसलेले आहेत ! चैत्र-श्रावण-माघ महिन्यांत दहीभाताचे बोहोणे द्यायला, जलदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला गावातील महिला तेथे जात असत; काही प्रमाणात महिला येतातही. मात्र बिचारा श्रीकृष्ण एकटाच उभा आहे काठावर. त्याला त्याच्या भक्तांचा, त्याच्या गोपगोपींचा विरह कदाचित सोसवत नसावा; म्हणून हल्लीदेखील वाजत असते बासरी, पण तेव्हाचे, तसे काळजाला स्पर्श करणारे सूर काही लागत नाहीत हल्ली. आधुनिक काळातील क्षणाक्षणाला बदलणारे बेगडी प्रेम जुन्या काळातील त्या नि:स्वार्थी, निरागस, नि:शंक प्रेमाची बरोबरी करू शकत नाही !

श्रीकृष्ण मंदिराशेजारी व्यायाम शाळा आहे. भोगावतीच्या अंगाखांद्यावर, वाळूत गावातील लहानमोठे मल्ल दंडबैठका घालून, कुस्त्या खेळून पिळदार शरीर कमावत असत. भोगावतीच्या मायेचे साक्षी आहे माझे बालपण. पाण्यात डुंबणे, आई किंवा मोठ्या बहिणींसोबत धुणी-भांड्यात लुडबूड करणे, गौराईचे खेळ, आखाजीच्या फुगड्या, गाणी, टिपऱ्या, गुलाबाईचे विसर्जन… अशा गोड, कडू, आंबट, तुरट -साऱ्या आठवणींचा सप्तरंगी मोरपिसारा डोक्यावर अभिमानाने मिरवणारी, स्वत:च्या हृदयात साठवणारी माय भोगावती जुन्या मंडळींच्या हृदयाच्या एका सुगंधी कोपऱ्यात श्वास घेत आहे. विकासाच्या उंदराने मधुर, मऊसूत मिठाई आवाज न करता, कुरतडत फस्त केली आहे. माय नदी भोगावती भेगाळली आहे, रोडावली आहे, सोकावली आहे. तिचे रूप पार कुरूप झाले आहे ! तिला ह्या अवस्थेत पाहिल्यानंतर वेदनेची तीव्र कळ उठते. माय भोगावतीला पाहून आयुष्यभर दुसऱ्यांकरता चंदनागत झिजलेल्या, खपलेल्या माझ्या मायच्या, आईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आठवतात !

भोगावतीच्या दक्षिणेच्या पुढील कोपऱ्याला, आमराईच्या जागी जुन्या गावची वस्ती वसलेली दिसते. त्यापुढे मुस्लिमांचे कब्रस्तान आहे. पुढे धुळे-नंदुरबार महामार्ग गावाची भौतिक शान दाखवतो. दक्षिणेच्या हाताला, म्हणजे मांडळ रस्त्याला काश्मिऱ्या मारुती गावचे रक्षण इमानेइतबारे करण्यासाठी बसलेला आहे. पोळ्याच्या सणाला व दसऱ्याला मारुतीच्या साक्षीने रावण प्रतिमा, रावण वृत्ती जाळण्यापूर्वी राजे रावल यांनी मारुतीला मान देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. पुढे दक्षिणेकडे 1. राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेज, 2. राणीमाँ मनुबादेवी नर्सिंग स्कूल, 3. जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 4. दादासाहेब रावल नॉलेज सिटी, 5. राणीमाँसाहेब महिला सायन्स कॉलेज, 6. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, 7. साहेबराव कृषी महाविद्यालय, 8. दौलतसिंहजी रावल डी.एड. कॉलेज, 9. सायन्स कॉलेज, 10. आर्ट्स सिनियर कॉलेज, 11. दादासाहेब रावल नॉलेज सिटीची भव्य इमारत ग्रामीण भागातील रंजल्या गांजल्या जिवांची ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी दिमाखात उभी आहे. तेथेच 12. रावल इंजिनीयरिंग महाविद्यालय, 13. रावल कृषी महाविद्यालय गावच्या पुढील पिढ्या घडवत उभ्या आहेत. दोंडाईचा गावाचा प्रवास दक्षिणेच्या मांडळ या छोट्या गावाला स्पर्श करून स्वत:मध्ये सामील करून घेण्यासाठी सुरूच आहे.

माय भोगावतीच्या उत्तरेकडे जाणाऱ्या उजव्या हाताला आसूरी वृत्तीला मारणारी माता सप्तशृंगी ऐटीत बसली आहे. मातेच्या मंदिरात दसऱ्यापूर्वी घटस्थापना होते. विधिवत नवचंडी होम, यज्ञ सांगोपांग विधींनी पूर्ण होतात. सप्तश्रृंगी मंदिराबाबत गोड, अविस्मरणीय आठवण अशी, की गरबा खेळण्याची प्रथा साधारणतः 1975 नंतर आली. आम्ही बालसख्या, महिला-पुरुष, मुले, एवढेच नव्हे तर आख्खे दोंडाईचा गाव झाडूनपुसून गरबा बघायला जायचो. आम्हीही मातेभोवती दोन टाळ्या, तीन टाळ्यांचा गरबा वाकडातिकडा खेळत आनंद घेत असू. गरबे रात्री बारा वाजेपर्यंत होत असत. मुली घोळक्याने घरी निर्धास्तपणे जात. गावगुंड, छेडछाड वगैरे भय नसे. मातेच्या शेजारी, थोड्या अंतरावर माणसातला अहंकार जाळणारा व दुष्कृत्यांचा फळ देणारा शनि महाराज मंदिरात रुबाबात बसला आहे. त्या काठावरच आठवडे बाजार (लाल मिरची थारी) रोज भरतो. दवाखाना, भाजीपाला, फळ विक्रेते, हॉटेले, पुस्तकांची-कपड्यांची दुकाने, लोहार-शिंपी-सोनार-सराफ यांची दुकाने असे विविध व्यावसायिक त्यांचा दिवस याच काठावर घालून रोजच्या दोन घासांची सोय करतात.

पश्चिमेकडून येणारी अमरावती नदी आणि दक्षिणेकडून येणारी भोगावती नदी या दोघा बहिणींचा सुंदर मिलाफ उत्तरेकडे होतो ! त्या दोघी गुंफून घेतात हातात हात आणि रेल्वे पूल ओलांडून एकत्र वाहत, नाचत पुढे जात राहतात -दाऊळ, मंदाने या गावांना स्पर्श करत. त्या दोघींचे ज्या ठिकाणी मिलन होते त्या ठिकाणी सतीमाय व पुढे मरीमाय या दोन देवता गावाचे रक्षण करण्यासाठी बसल्या आहेत. दोन्ही नद्यांच्या कुशीत सतीमायची जत्रा मोठ्या उत्साहात भरते. ती गावच्या व आजूबाजूच्या जनतेसाठी मोठी पर्वणी असते. वर्षासाठी येणाऱ्या कानबाई, रानबाई त्याच ठिकाणी विश्रांती घेतात, निरोप देतात. मुस्लिम बांधवांचे जलसे, उरूस, डोले, सवाऱ्या, ताबूत, वाघ बनून घुमणारी माणसे, पीरबाबा, शिरणी, चादर चढवणे असे पारंपरिक सण साजरे होतात. त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन होते. जत्रेत तमाशे, नाचे, तगतराव, रामलीला, कव्वाली, कठपुतळी अशा अनेक कलासंस्कृती जोपासणारे सण, खेळ, उत्सव तेथे साजरे होतात, पण भावना-श्रद्धा बदललेली दिसते.

दोंडाईचा गावाच्या आजूबाजूला बरीच खेडी, वसाहती विकसित झाल्या आहेत. माणसांच्या त्या प्रचंड ‘जत्रे’त कधी, कोणाला, कसा, कोणता आजार होईल, कोणत्या संकटांचे वादळ घेऊन येईल ते सांगता येत नाही. अशा भयानक वेळी, शारीरिक पीडितांना जगण्याची आस दाखवणारे, रोगमुक्ती करणारे, पीडिताला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून आणण्याचे बळ असलेले प्रशस्त असे निष्णात सर्जन डॉ.रवींद्रनाथ टोणगावकर यांचे हॉस्पिटल रुग्णांनी गजबजत आहे. कै.डॉ. टोणगावकर यांच्या संशोधनाने त्यांचे जगभर नाव झाले आहे. त्याच आवारात ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ, चर्च शांततेत चिंतन करत वसले आहे. विसंगती अशी, की तेथेच काही अंतरावर गावाला, जनतेला संरक्षण देणारे, न्याय देणारे, भांडणतंटा मिटवत कायद्याचे दांडूक दावणारे पोलिस स्टेशन उभे आहे !

गावच्या सुखदुःखाची सागर होणारी नदी, माय भोगावती ईशान्येला पोचते तेव्हा हातात जीवनाचे शाश्वत सत्य दर्शवणारी स्मशानभूमी दाखवते. तेथील स्मशानघाटावर रोज धगधगणाऱ्या चिता ‘राजा व रंक यांचा एकच रस्ता’ दाखवतात.

चैनी रोड-खोल गल्ली-गोविंद नगर या भागात मातंग वस्ती, गारुडी जमात वस्ती, मोची, भिल्ल अशा अनेक जातीजमाती त्यांची वैशिष्ट्ये जपत जगत आहेत.

अमरावती नदी व भोगावती नदी या दोघींचा मेळ जेथे होतो त्याच्या समोरच्या काठावर उभी आहे ती उंच, भव्य अशी गावाची शान वाढवणारी राजे रावल यांची चिरेबंद गढी. त्या गढीचा कळस आकाशाला वंदन करत गावास प्रगतीचे आव्हान देत व आवाहन करत, निर्भयतेचे अभयदान देत डौलात उभा आहे. खेड्यांचा विकास, नाविन्याचा ध्यास, गरिबीचे उच्चाटन, शिक्षण, सिंचन हे उदात्त ध्येय डोळ्यांपुढे ठेवणारी रावल गढी सर्वसामान्यांचे जणू माहेरघरच ! गढीवरही सप्तशृंगीचे मंदिर असून तेथेही, घटस्थापना होते. गरबे खेळले जातात.

प्रशस्त अशा रावल गढीच्या जवळ अश्वारूढ महाराणा प्रताप यांचा पुतळा, दौलतसिंहजी रावल यांचा पुतळा, डी.आर. हायस्कूल, पोस्ट ऑफिस, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे न्यायालय, दादासाहेब रावल स्टेडियम, भव्य-देखणी नगरपालिका बिल्डिंग, शिवरायांचा पुतळा हे गावाच्या वैभवाचे, विकासाचे साक्षीदार दिमाखात उभे आहेत.

उत्तरेकडे सरकत गेल्यास स्वोद्धारक विद्यार्थी गृह संस्थेचे गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा, दाऊळ रस्ता, सिंधी कॉलनी मार्ग, स्टार्च फॅक्टरी मार्ग, दोंडाईचा शहराच्या बसस्थानकाकडे जाणारा भव्य, स्वच्छ, सुंदर राजमार्ग दिसतो. त्यावर बसवलेले शुभ्र लखलखते हायमास्क जणू लाखो चंद्र घेऊन लख्ख आकाशच धरतीवर आले आहे असे सुंदर दृश्य निर्माण करतात ! रस्ता दुभाजकांच्या मध्ये पादचाऱ्यांच्या हृदयात हिरवळ पेरणारी विविध रंगांची फुलझाडे, वीर रस निर्माण करणारा अब्दुल हमीद यांचा पुतळा- त्यात बसलेला भव्य रणगाडा… पुढे चालत गेल्यावर दिसते पवित्र गोधेनू स्मारक, त्यापुढे शिल्प कलाकारीचा उत्कृष्ट नमुना म्हणून शेतकरी व बैलगाडी यांची धातूची प्रतिमा. नंदुरबारकडे चालत गेल्यास अश्वारूढ छत्रपती शिवराय यांचा पुतळा पाहून माणूस नतमस्तक होतो.

रावल गढीकडून दक्षिणेच्या हाताला रस्ता जातो तो गुरव गल्ली, होळीचौक, गणपती मंदिर, राणीपुरा भागाकडे. राणीपुरा भागात माझ्या आईचे घर आहे. मी माझा बालपणीचा काळ तेथे घालवला, तेथे मी खेळले, वाढले. तेथे माझ्यावर संस्कार झाले. राणीपुरा भाग म्हणजे पूर्वीच्या गावाचे शेवटचे टोक. त्या भागाला पूर्वी ‘शेवटची गल्ली’ म्हणूनच ओळखत. तो भाग दोंडाईचा गावाच्या मध्यभागी येऊन गेला आहे. धनगर, मुसलमान, पिंजारी, कोळी, माळी अशा सर्व जातीजमातींचे लोक तेथे एकत्र नांदत आहेत. पण जुनीजाणती, समंजस, समायोजन करून घेणारी, माणुसकी जपणारी आदर्श माणसे देवाला प्रिय झाली आणि शेतातले पीक काढून घेतल्यानंतर दांडगाई करत उगवलेल्या निरुपयोगी तणागत तेथे इकडचीतिकडची स्थलांतरित मंडळी येऊन राहत आहे. जुनी, मातीची गरजेप्रमाणे थंडावा व ऊब देणारी घरे जाऊन त्या जागी सीमेंट-काँक्रिटची घरे झाली आहेत. घरांसारखीच नवी पिढीसुद्धा पक्की, उष्ण, निर्दयी होत आहे.

गल्लीच्या वरच्या भागाला भिलाटी होती व आहे. पण कधीही त्यांचा किंवा कोणालाच कोणाचा त्रास झाला नाही- होत नाही. सर्व जातींचे, धर्मांचे लोक एकमेकांना सुखदुःखात साथ देत होते. तरुण, एकल मुली-स्त्रियांना भय नावाची गोष्ट माहीत नव्हती. संपूर्ण गल्लीत प्रत्येकाच्या अंगणात एकमेकांला लागून, खाटा टाकून आरामात, निश्चिंत झोपायचे. जुनीजाणती माणसे गल्लीतील कोणी चुकल्यास झापून-रागावून जायचे. एकमेकांचा एकमेकांना धाक, दबाव, आधार असायचा. शेजाऱ्यांच्या भरवशावर लेकीबाळी सोडून जात.

हिंदूंच्या सणाला पुरणपोळीचे ताट, दिवाळीचा फराळ, संक्रांतीचे लाडू, आखाजीच्या सांजोऱ्या आणि मुस्लिम सणांचे शीर-खुरमा, काजू-बदाम-खोबरे घातलेले चौंगे, भट्टीत भाजलेले रोट, दलिया, मलिदा, गोश, मांडे, सांजोऱ्या, बिर्याणीचे ताट वाढून एकमेकांना प्रेमाने दिले जाई. तेच लोक नातलगांपूर्वी सुखदुःखाला धावत येत.

आम्ही बालपण जगलो ते नवी पिढी गमावून बसली आहे. आम्ही वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीसुद्धा निष्पाप, निर्मोही, निष्कलंक जीवन जगायचो. गुलाबाई, गाणी, नाच, गौराई, टिपऱ्या, झोके खेळणे, आट्यापाट्या, लगोरी, लुपाछुपी, दोरी उड्या, भातुकलीचा खेळ खेळत आनंद लुटायचो. थोरामोठ्यांचा आदर करायचो. परंतु मोबाईल, टीव्ही, इंटरनेटचे जाळे यांमुळे नवी पिढी बालपण हरवून बसली आहे. वयाच्या आधी ‘शहाणी’ झाली आहे. विकृतीने घर केले आहे. चित्र बदलले आहे. तो अविस्मरणीय भूतकाळ भूतकाळात जमा झालाय. मन खेद-खंत-सल यांनी भरून येते. कालाय तस्मै नमः! पूर्वी गावाची लोकसंख्या जेमतेम हजार-दीड हजार होती. ती आता वाढून एक लाखाच्या आसपास पोचली आहे. त्यामुळे गाव आता शहर बनले आहे. 

अमरावती नदीच्या पश्चिमेचा भाग श्रीमती बागल एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज, स्वामी नारायण मंदिर, तेली समाज कार्यालय, विघ्नहर्ता अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इतर नवीन विविध वसाहती यांनी फुलून गेलेला आहे. दोंडाईचा शहराच्या उत्तरेकडील भागात भव्य असे जैन मंदिर, राम मंदिर, व्यापारी उलाढाली होणारे धान्य मार्केट, गुरांचे मार्केट, मोठमोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढाली, जीवदान देणारे- रोगमुक्त करणारे दवाखाने गावाला समृद्ध, क्रियाशील बनवतात. अंजुम सिनेमा थिएटरच्या जागेवर प्रशस्त असे सुविधा हॉस्पिटल झाले आहे. राणीमाँ प्लाझा, एल.आय.सी.ऑफिस, विविध गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, मॉल, हॉटेले, पुढे भव्य प्रशस्त असे रेल्वे स्टेशन- त्यावर असणारा मोठा दादरा, प्रवाशांची सोय-सुविधा, ताप्ती गंगा एक्सप्रेस-खानदेश एक्सप्रेस अशा रेल्वेगाड्यांनी प्रवाशांचा प्रवास सुकर केला आहे. पुढे भव्य बसस्थानक लालपऱ्यांद्वारे प्रवाशांना इष्ट स्थळी सुरक्षितपणे पोचवण्याचे काम करत राहते. पुढे सिंधी कॉलनी, पटेल कॉलनी अशा विविध वसाहती गुण्यागोविंदाने नांदत आहेत. स्टेशन भागामध्ये दुग्ध व्यवसाय, बँक, पतपेढी, शेती संबंधित व्यवसाय इत्यादी उद्योग हाताला काम देतात. राजे रावल निर्मित स्टार्च फॅक्टरी दोंडाईचा वासींना विविध रोजगार उपलब्ध करून देते. मका फॅक्टरीने मक्यापासून जवळपास दीडशेच्यावर असे विविध घटक पदार्थ बनवत अनेक जिवांची रोजीरोटीची सोय केली आहे. त्या फॅक्टरीने भारतात नव्हे तर जगात सातवा क्रमांक पटकावलेला आहे !

नंदुरबार रस्त्यावर प्रकाशवाट करणारी विद्युत कॉलनी आहे. दोंडाईचा गावाचा दक्षिण भाग नव्याने विकास पावला आहे. तेथे पूर्वी शेती, घनदाट वनराई होती. त्या जागी एकट्याने जाण्याची भीती वाटावी अशी जागा सिमेंट-काँक्रिटच्या जंगलाने व्यापली आहे. दक्षिणेला संतोषी माता मंदिर, धुळे-नंदुरबार महामार्ग, प्रशस्त असे रावल नगर, चुडाने रोडवरील वस्ती, अमरावती कॉलनी, मालपूर रोड असा भाग दिवसेंदिवस त्याची उंची, खोली दोन्ही वाढवत चालला आहे. मालपूरकडे जातानाच्या रस्त्यावर इंग्लिश मीडियम स्कूल, राजे रावल नवनिर्मित पितृछाया ऑक्सिजन पार्क या भौतिक बाबी आहेत आणि त्या दोंडाईचा शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मनाला उभारी, आनंद देतात.

सारा नवा, आधुनिक, उपयुक्त असा बदल स्वीकारणारे, पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे चौफेर बहरलेले माझे गाव, धुळे जिल्ह्यात सर्वच बाबतींत अव्वल आहे. त्याचा मला व माझ्या दोंडाईचा वासींना अभिमान आहे.

– लतिका चौधरी 9326656059 latikachaudhari1910@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय सुरेख लेखन आहे मॅडम जी.. दोंडाईचा गावाचा लेखातून गावाविषयी अतिशय प्रेम, लेखणीतून बुद्धिमत्ता ,चातुर्य तसेच नदी आणि माय यांची सांगड घालून चंदनासारखी झिजणारी मायचं वर्णन डोळ्यांना अश्रू अनावर झाले. तुमच्या लेखणी त सरस्वती विराजमान राहो. ही बाप्पा चरणी प्रार्थना…..

  2. खूपच तपशीलवार आणि उद्बोधक परिचय! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here