एका बंगाली व्यक्तीला उद्देशून उच्चारलेला ‘भद्रलोक’ हा शब्द ऐकला, तेव्हा थोडेसे आश्चर्यच वाटले ! म्हणजे हा माणूस भद्र, तर इतर बाकीचे कोण? अभद्र? पण तसे नाही हे मला पुढे कळले. एक तर भद्रलोक म्हणजे एक माणूससुद्धा असू शकतो किंवा एक पूर्ण समाजवर्ग ! इंग्रजीत ज्याला ‘जेण्टलमन’ म्हणतात किंवा मराठीत ‘सज्जन’ म्हणतात, ते म्हणजे भद्रलोक ! इतक्या साध्या अर्थाचा तो शब्द आहे. मात्र सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या या शब्दाचा नव्याने उदय हा अठराव्या-एकोणिसाव्या शतकात झाला असावा. बंगाली भद्रलोक हे प्रामुख्याने उच्च जातीतील हिंदू-ब्राह्मण किंवा कायस्थ असत. ते उच्चशिक्षित, जमीनदार होते. त्यांची राहणी नीटनेटकी असे. बहुतेक घराणी श्रीमंत असत. त्याच लोकांना ब्रिटिशांच्या अंमलाचा फायदा सगळ्यात जास्त झाला. स्वत:ची जमीनदारी असलेल्या भद्रलोकांचे उद्योग म्हणजे ब्रिटिशांना कर्जे देणे, त्यांचा आदर सत्कार करणे असे असत. अनेक ब्रिटिशधार्जिणे भद्रलोक त्या काळात बंगालात होते. त्यांची पुढे प्रशासन, शिक्षण, कायदा आणि व्यापार यांतील उच्च पदांवर नियुक्ती होई. भद्रलोक संख्यात्मक दृष्ट्या लहान असले तरी त्यांचा प्रभाव बंगालचा समाज- तेथील राजकारण आणि संस्कृती यांवर प्रचंड होता. तो थोड्याफार प्रमाणात आजही टिकून आहे. बंगाली माणसाला ‘बंगाली ओळख’ देण्यात आणि बंगाली संस्कृतीला आकार देण्यात भद्रलोकांचा वाटा फार मोठा आहे.
‘बेंगाल रेनेसाँ’चा काळ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक जागृतीचा काळ; त्या काळातील भद्रलोकांचे योगदान फार महत्त्वाचे असे आहे. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि नंतर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे ही त्या भद्रलोक समाजाची उपज होती. त्या लोकांनी सामाजिक सुधारणा, धार्मिक सहिष्णुता आणि महिला शिक्षण अशा कल्पना पुढे आणल्या. त्यांच्यामार्फत सती, बालविवाह यांसारख्या प्रथांना आव्हान देण्यात आले. तर्कसंगत विचार आणि वैज्ञानिक कुतूहल यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भद्रलोकांनी पूर्ण बंगालमध्ये वर्तमानपत्रे, पत्रके आणि सार्वजनिक वादविवाद यांद्वारे या कल्पनांचा प्रसार करण्यास मदत केली. भद्रलोकांनी बंगाली नाट्य, संगीत आणि कला क्षेत्रांतही क्रांती घडवून आणली. त्यांचा साहित्यातील प्रभाव सर्वश्रुत आहे. युरोपीयन नव्या रोमँटिसिझम, प्रबोधन आणि पुढे समाजवादी विचार यांच्याशी भद्रलोकांच्या संबंधांचा बंगाली सर्जनशील अभिव्यक्तीवर खोलवर प्रभाव पडला. भद्रलोकांमुळेच ब्राह्मो समाजासारख्या चळवळींकडून परंपरा पूर्णपणे सोडून न देता हिंदू धर्मात सुधारणा आणि आधुनिकीकरण साधण्याचा प्रयत्न झाला. भद्रलोकांनी राजकीय दृष्ट्या, सुरुवातीला मध्यम सुधारणावादी राजकारणाला पाठिंबा दिला खरा; पण शेवटी, ते राष्ट्रवादी चळवळीचे केंद्र बनले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि चित्तरंजन दास यांच्यासारखे नेते त्या वर्गातून उदयास आले आणि त्यांनी स्वराज्याचा पुरस्कार केला. भद्रलोकांच्या सुरुवातीच्या राजकारणातील सक्रियतेने बंगालच्या क्रांतिकारी आणि राष्ट्रवादी कारवायांचा पाया घातला.
मात्र ते अनेक बाबतींत रुढीवादीच राहिले. त्यांनी जोपासलेल्या जातिभेद आणि पितृसत्ताक पद्धत यांचा सामना बंगाल आजही करत आहे. भद्रलोकांचा वारसा बंगालच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि राजकीय जीवनात खोलवर रुजलेला आहे. भद्रलोकांच्या मानसिकतेत एक ‘Subtle Elitism’ डोकावतो. त्यामुळे इंग्रजी शिक्षण, शहरी सुसंस्कृतपणा आणि उच्चवर्णीय दर्जा यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते. रोजच्या भाषेत भद्रलोक हाच शब्द होता, जो केवळ पुरुषांसाठी वापरला जात असे. अगदी हल्ली-हल्ली, म्हणजे पन्नास-एक वर्षांपासून ‘भद्र-महिला’ हा शब्ददेखील उदयास आला आणि वापरण्यात येऊ लागला !
काळ बदलला, तशी परिभाषादेखील बदलली आहे. भद्रलोक हा वर्ग पारंपरिक अर्थाने, अस्तित्वात नाही. मात्र सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थाने ‘भद्रलोक’ ही मानसिकता होऊन गेली आहे. आजचा भद्रलोक हा समाज म्हणजे मध्यमवर्गीय लोक; शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, नोकरीपेशातील अधिकारी वर्ग, लेखक, कलाकार इत्यादी. उदाहरणे द्यायची झाली तर अमर्त्य सेन, सत्यजित रे, शौमित्र चटर्जी, सुनील गंगोपाध्याय आणि ज्योती बोससुद्धा भद्रलोकांमध्ये गणले जातात. जुना भद्रलोक ‘वर्ग’ म्हणून लुप्त झाला असला, तरी त्याचा सांस्कृतिक ‘डीएनए’ अनेक प्रमुख बंगाली लोकांमध्ये- विद्वान, लेखक, कलाकार, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक सुधारणा यांना महत्त्व देणाऱ्या सार्वजनिक व्यक्तींमध्ये दिसून येतो.
तरुण वर्ग मात्र नव्या काळात ‘भद्रलोक’च्या व्याख्येलाच आव्हान देतो. इंग्रजीत बोलणे, पण पेहराव मात्र देशी; ह्याच्या उलट वर्तन तरुण वर्ग करतो. तो वर्ग बंगाली भाषा, रोजच्या जीवनातली संस्कृती, हिप-हॉप, स्वदेशी कला यांवर जास्त भर देतो. पाश्चात्य म्हणजे परिष्कृत नसून आणि सभ्यता म्हणजेच सुसंस्कृत भद्र, ह्याला त्यांचा विरोध आहे. अगोदरच्या काळी, भद्रलोक वादविवाद करत, चर्चासत्रे घडवून आणत. आजची पिढी सक्रिय कार्यावर विश्वास ठेवते. रस्त्यावर उतरून निषेध करण्यात भद्रपणा आहे असे मानते. जुन्या जाती आणि वर्ग संरचना यांना आव्हान देते आणि समतावादी वातावरण निर्माण करते. भद्रलोक संस्कृती एकेकाळी महिलांच्या भूमिकांबद्दल अत्यंत रूढीवादी होती; आज, तरुण बंगाली महिला स्वतःला चळवळी, स्टार्टअप्स, कलाक्षेत्र यांमध्ये मुक्तपणे व्यक्त करत आहेत.
बंगाली लोक ‘विचारशील’ असण्याचा अभिमान आजही बाळगून आहेत, परंतु आता तो अधिक गतिमान, जागतिक आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. तरुण पिढी भद्रलोक संस्कृतीच्या मूळ भावनेचा आदर करत असली तरी ते रूढी, परंपरा आणि जातिवाद यांच्या विरोधात आहेत. एक नवीन बंगाल नक्कीच तयार होत आहे, जो प्रगतीशील आणि जगाशी सुसंगत आहे खरा, परंतु तरीही खोलवर कोठेतरी बंगाली माणूस ‘भद्रलोक’ आहे.
महाराष्ट्रात अगदी भद्रलोक असा वर्ग कधीच नव्हता, तथापि, महाराष्ट्रात सुशिक्षित, सुधारणावादी, उच्चभ्रू वर्गाची स्वतःची वेगळी आवृत्ती होती. महाराष्ट्रातदेखील एकोणिसाव्या शतकात, इंग्रजी-शिक्षित, उच्चवर्णीय एक गट उदयास आला- त्यात बहुतेक चित्पावन अथवा देशस्थ ब्राह्मण आणि काही मराठा लोक होते. गोपाळकृष्ण गोखले, टिळक, आगरकर, न्या. रानडे, धोंडो केशव कर्वे आणि अगदी महात्मा फुलेदेखील (जरी फुले यांनी सवर्णीयांना आव्हान दिले) त्या वर्गात मोडतात. ते बंगालच्या भद्रलोकांप्रमाणेच सामाजिक सुधारणा, शिक्षण, पत्रकारिता आणि राष्ट्रवादी राजकारण यांत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. परंतु महत्त्वाचे म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित सक्रियतेमुळे, महाराष्ट्रातील सुधारक, बंगालच्या भद्रलोकांच्या तुलनेत जातीच्या मुद्द्यांवर अधिक उदारमतवादी होत गेले. त्यामुळे तो वर्ग सुशिक्षित ब्राह्मण-मराठा अभिजात वर्ग असला तरी, नंतरच्या जातिविरोधी चळवळींमुळे अधिक संमिश्र वर्ग निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील या वर्गाला ‘Reformist elite’ म्हणता येईल. भद्रलोक संस्कृतीच्या तुलनेत, हा वर्ग राजकीय दृष्ट्या थोडा अधिक आक्रमक, जाती-जागरूक आणि सामाजिक दृष्ट्या गुंतलेला होता. पण भद्रलोक समाजाने बंगालच्या संस्कृतीला जसे वळण लावले, साहित्य-कला-शिक्षण यांवर प्रभाव पाडला, तसा ठसा ‘महाराष्ट्रीय भद्रलोक’ काही उमटवू शकले नाहीत. जेथे बंगाली भद्रलोक सुधारणावादी होते आणि बौद्धिक वादविवादात रस घेणारे होते, तेथे मराठी उच्चशिक्षित थोड्याफार प्रमाणात उग्रवादी होते, जनसंघर्षावर विश्वास ठेवणारे होते. सती निर्मूलन, विधवा पुनर्विवाह आणि महिलांचे शिक्षण यांसाठी भद्रलोक झटले खरे, पण जाती-विरोधी आंदोलने मात्र बंगालात कमीच झाली, जी महाराष्ट्रात झाली. साहित्य, कला आणि शिष्टाचार यांत अभिमान मानणाऱ्या बंगाली भद्रलोकांनी सूक्ष्मपणे जातीचे विशेषाधिकार राखले, स्त्री-पुरुष असमानता कायम ठेवली, तेथे मराठी सुधारणावाद्यांनी इतिहास, विशेषतः शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभिमान राखला आणि जाती रचनेला उघडपणे आव्हान दिले. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांच्यासारख्या महिलांनी शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा केल्या. बुद्धिवादी, मृदुभाषी आणि सुसंस्कृत असण्याचा अभिमान बाळगणारे एकेकाळचे बंगाली भद्रलोक आज मात्र मराठी बुद्धिवाद्यांप्रमाणेच सामाजिक सुधारणा आणि तळागाळातील संबंध यांना अधिक प्राधान्य देताना दिसतात.
बंगालच्या भद्रलोकांनी बौद्धिकता, साहित्यिक intellectualism आणि सामाजिक सुधारणांची उच्चभ्रू संस्कृती यांचे संगोपन केले, तर महाराष्ट्राच्या सुशिक्षित उच्चभ्रूंनी विद्वत्ता, खंबीर जनराजनीती आणि सखोल जातीय सक्रियता एकत्र केली. जेथे भद्रलोकांच्या प्रतिष्ठेला प्राधान्य दिले गेले, तेथे महाराष्ट्राच्या नेत्यांनी लोकांना एकत्र करून चळवळी निर्माण केल्या. दोन्ही समाजांनी शक्तिशाली वारसा निर्माण केला खरा, परंतु आधुनिक भारताचे स्वप्न बाळगणाऱ्यांची कृती मात्र खूपच वेगवेगळी होती.
– सुवर्णा साधू बॅनर्जी 9810209990 suvarna_sadhu@yahoo.com