शांतीचा कल्पवृक्ष श्री संत रामजी महाराज (Ramji Maharaj- Saint from Vidarbha)

0
326
श्री रामजी महाराज समाधी, बग्गी

शांतीसागर श्री संत रामजी महाराज नावाचे साधू पुरुष अमरावती जिल्ह्यात बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. त्यांना शांतीचा कल्पवृक्ष म्हणत. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची शिकवण दिली, त्यांनी आमलोकांमध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बीजे रोवली हे त्यांचे खास वैशिष्ट्य. बग्गी हे गाव चांदुर (रेल्वे) तालुक्यात, अमरावती जिल्ह्यात साधारण चार हजार लोकसंख्येचे आहे. सुतारकाम हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. रामजी महाराजही तो करू लागले. त्यांची सुतारकाम करण्याची जागा ‘कामठा’ ही होती. कामठ्याला लागूनच रामजी महाराजांचे घर आहे. त्यांची आणि सच्चिदानंद मनिराम महाराज यांची भेट तेथेच झाली. असे सांगतात, की त्या दोघांनी परस्परांना अंतरंगाने ओळखले. मनिराम महाराजांनी राहण्यास जागा मागितली आणि रामजी महाराजांनी ती दिली ! मनिराम महाराजांची प्रथम भेट व अखेरपर्यंत वास्तव्य हे कामठा या जागीच झाले. कामठ्यामध्येही धुनी पाहण्यास मिळतो. धुनी म्हणजे शेणाची गोवरी, लाकूड वगैरे पेटवतात आणि त्यातून तयार होणारी रक्षा किंवा राख. त्याला संतपरंपरेत अंगारा किंवा विभुती असे म्हणतात. जळत्या निखाऱ्यावर उद अथवा गळ टाकली जाते. त्यांचा सुगंध आणि सुवास खूप दूरवर पसरतो. तशाच प्रकारची धुनी शिर्डीला पाहण्यास मिळते.

मनिराम महाराजांची समाधी

सच्चिदानंद मनिराम महाराज यांनी रामजी महाराजांची धार्मिक वृत्ती व त्यांच्या अंतःकरणातील भाव ओळखला. मनिराम महाराज नदीवर आंघोळीला रोज जात. रामजी महाराज त्यांच्या सोबत असत. ते आंघोळीनंतर कामठा येथे ध्यान करत. ती त्यांची नित्य सेवा सुरू झाली.

रामजी महाराजांनी स्वच्छतेचा संदेश देऊन गावामध्ये प्रभात फेरीला सुरुवात केली. स्वच्छतेबाबत जनजागृती केली. स्वच्छतेला अध्यात्माची जोड देऊन दिंडीचे आयोजन केले. त्याच दिंडीचा मोठा वटवृक्ष झाला आहे. ती दिंडी अखंड, निरंतर चालू आहे. दिंडी रामजी बाबांनी दाभा या गावामध्येसुद्धा चालू केली. ती ‘चाळीस दिवसांची दिंडी’ या नावाने ओळखली जाते. दाभा या ठिकाणी संत मोहन महाराज होऊन गेले. ते रामजी बाबांचे शिष्य होत.

बग्गी गावातून चंद्रभागा नदी वाहते. नदीमध्ये भक्त पुंडलिकाचे मंदिर असून काठावर मनिराम महाराजांचे समाधी मंदिर आहे. बग्गी गावाबाहेरून नदी वाहते ती चंद्रभागा. पंढरपूर प्रमाणेच वाळवंटामध्ये मातृ-पितृ भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. त्या गावामध्ये लहानमोठे असे एकूण बावन्न ‘काले’ वर्षभर साजरे केले जातात. त्यात मुख्य तीन – 1. भाद्रपद वद्य पंचमी म्हणजेच रामजी महाराज पुण्यतिथी उत्सव आणि चाळीस दिवसीय दिंडीचा समारोप. 2. कार्तिक वद्य नवमी – मनिराम महाराज पुण्यतिथी उत्सव 3. माघ शुद्ध दशमी – सच्चिदानंद मनिराम महाराजांनी स्वत: चालू केलेला अखंड हरिनाम सप्ताह. त्या कार्यक्रमानिमित्त द्वादशीला पुरणपोळीचा महाप्रसाद असतो. सप्ताहभर कथा, हरिपाठ, हरिकिर्तन आणि टाळांचा अखंड गजर असतो. सप्ताहाची सांगता गोपालकाल्याच्या कीर्तनाने होते. ज्वारीच्या कण्या आणि भाजी यांचा महाप्रसाद केला जातो. श्री गजानन महाराज हेसुद्धा बग्गीला येऊन गेल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे. गजानन महाराजांनीच कामठ्यामध्ये गणपती उत्सवाला प्रारंभ केला. तो अव्याहत सुरू आहे.

जोडमोहा येथील खटेश्वर महाराज हेसुद्धा बग्गीला येऊन गेले. ही संत मंडळी मनिराम महाराजांना गुरुबंधू मानत.

रामजी बांबांची कीर्ती दूरवर पसरली होती. त्यामुळे भक्तांचा ओघ वाढला. मणिराम महाराजांना त्यांचे कार्य पूर्ण करायचे होते. त्यांनी रामजी बाबांना कामठ्यात एके दिवशी जवळ बोलावले; ‘आमचे कार्य संपले, आमची जाण्याची वेळ आली’ असे सांगितले. रामजी बाबा व त्यांची पत्नी यशोदा ते ऐकून दु:खी झाले. रामजीबाबांना भास असा झाला, की मनिराम महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती त्यांच्यात (रामजी महाराजांमध्ये) परावर्तित केली. मनिराम महाराजांनी त्यांच्याजवळील ‘काडी’ आणि ‘झोळी’ रामजी बाबांच्या स्वाधीन केली ! त्यांनी ‘यापुढे तुलाच हे सांभाळायचे आहे’ असे म्हणून मनिराम महाराज सच्चिदानंद स्वरूपात निजमग्न झाले ! ती कार्तिक वद्य नवमी होती.

रामजी बाबांनी प्रसाद आणि आज्ञा हेच सत्य मानून त्यांच्या समोरील कार्य सुरू केले. मनिराम महाराजांची ‘काडी आणि झोळी’ यावरच समोरील उत्सव पार पडत असे. रामजी बाबासुद्धा ध्यानयोगामध्ये दिवसेंदिवस मग्न राहत. त्यांनासुद्धा आंतरिक प्रेरणा होई. त्यांना योगीपुरुषांचा आनंद काही वेगळाच असतो हे कळून चुकले होते. त्यांनी आयुष्यभर भजन, कीर्तन, सत्संग या माध्यमांतून जनजागृती घडवून आणली. शांतिसागर श्री रामजी महाराजांनी त्यांचा देह भाद्रपद वद्य पंचमीला ठेवला. भाद्रपद वद्य पंचमीला । रामजी बाबा गेले वैकुंठाला । समाधी बांधली मठाला । बग्गी या गावात ॥

अमोल विनोदराव कावलकर 7588189823, 9767166600 sacchidanand30@gmail.com

———————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here