मराठी नाटकाची पूर्वपरंपरा (Marathi Stage has long tradition)

0
725

नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते. त्या नाविन्याला बळ कोठून मिळाले हे कळले की नवीन कलाकृतीचा व्यापक दृष्टिकोनातून अर्थ लावता येतो. या दृष्टीने संस्कृत नाटके आणि दशावतार, लावण्या, कीर्तन, गोंधळ अशा महाराष्ट्रीय लोककलांची परंपरा यांची माहिती महत्त्वपूर्ण ठरते. या प्रत्येक लोककलेने तिची तिची वैशिष्ट्ये कायम राखून अन्य प्रकारांतील काही घटक स्वत:त सामावून घेतले आहेत. मराठी संगीत नाटकाने लावण्या, कीर्तन यांतील चालींवर पदांची रचना करून पूर्व परंपरेचा वापर प्रभावी करून घेतला आहे. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’चा खेळ 1843 मध्ये उभा केला आणि मराठी रंगभूमीची प्रतिष्ठापना झाली! विष्णुदास भावे यांच्या नाटकात एकटा सूत्रधार पदांचे गायन करत असे. तो सूत्रधार कीर्तनकारांमधून निवडला जात असे. संगीताची जाणकारी, गोड गळा आणि रंजकता हे गुण सूत्रधाराजवळ असणे आवश्यक असे. नाट्यसंगीत भावे यांच्या पौराणिक आख्यानापासून सुरू झाले. त्याचे स्वरूप हे कीर्तनकारांच्या संगीताच्या पद्धतीचे आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’मध्ये साकी, दिंडी, कामदा ही कीर्तनातील जातिवृत्ते वापरली आहेत. उदाहरणार्थ, ‘परक्याचे धन कन्या’ ही साकी आहे. त्याच प्रमाणे, लावणी ढंगाच्या चालीही पदांना दिल्या आहेत. त्यांच्या ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे ‘संगीत सौभद्र’मधील पद लावणीच्या चालीवर आहे. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’मधील ‘सुकांत चंद्रानना पातली’ हे पदही लावणी ढंगाचे आहे.

मराठी नाटकाची पाळेमुळे भरतमुनींचे ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ, संस्कृत नाट्यसंपदा आणि लोकरंगभूमीवरील मनोरंजनाचे प्रकार म्हणजे दशावतार, लळीत, गोंधळ, तमाशा, भारूड यांमध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ-चित्रकथी यांतही नाट्य आहे. महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेमध्येही नाटकाची बीजे आहेत. भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा पायाभूत ग्रंथ आहे. त्या ग्रंथापूर्वी काही संस्कृत नाटके लिहिली गेली, पण ती अनुपलब्ध आहेत. राजेरजवाड्यांच्या पदरी कवी असत. नाटककारांना कवीच म्हणत असत. संस्कृत नाट्यप्रयोग राजदरबारात राजे, सरदार इत्यादी प्रेक्षकांसमोर वसंतोत्सवाच्या प्रसंगी किंवा अन्य उत्सवाच्या, आनंदाच्या प्रसंगी होत असत. संस्कृतमध्ये महत्त्वाचे, प्रसिद्ध नाटककार बरेच आहेत. दंडीचे दशकुमार चरित प्रसिद्ध आहे. भास कवीने तेरा नाटके लिहिली. त्यांपैकी काही नाटके – अविमारक, स्वप्नवासवदत्ता, चारुदत्त, कर्णभार, प्रमदवन, मध्यमव्यायोग ही विशेष प्रसिद्ध आहेत. कालिदासाला तर महाकवी म्हटले गेले आहे. तो कविकुलगुरू आहे. कालिदासाची नाटके – मालविकाग्निमित्रम्, विक्रमौर्वशीयम्, शाकुंतलम ही व शूद्रकाचे मृच्छकटिक हे अतिशय प्रसिद्ध नाटक. दोन संस्कृत नाटकांचे मराठी रंगभूमीवरील ऋण – कालिदासाचे ‘शाकुंतल’ आणि शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ यांचे सर्व परिचयाचे आहे. भवभूतीने ‘उत्तररामचरित’ लिहिले तर भट्ट नारायणाने ‘वेणीसंहार’ लिहिले. विशाखा दत्ताचे ‘मुद्राराक्षस’, श्रीहर्षाची नाटके – ‘प्रियदर्शिका’, ‘रत्नावली’, ‘नागानंद’ ही, तर जयदेवाचे ‘प्रसन्न राघव’ अशी संस्कृतमधील काही प्रसिद्ध आहेत. भरतमुनींचा आणि संस्कृत नाटकांचा प्रभाव सुमारे दोन हजार वर्षांपासून भारताच्या सर्व प्रांतांतील नाटकांवर झाला आहे. संस्कृत नाटकांची ती परंपरा मुसलमानी आक्रमणानंतर खंडित झाली. त्यानंतरचे मध्ययुग हे भक्तियुग होते. त्या काळात समाजावर अध्यात्माचा पगडा पसरला. त्यामधून प्रवृत्तिपर कला – जसे की नाटक, नृत्य, संगीत, चित्रकला अशा उदयाला येणे शक्य नव्हते. समाजाची मनोरंजनाची साधने म्हणजे त्या काळात दशावतार, गोंधळ, भारूड, लळीत इत्यादी लोककलेचे प्रकार. लोककला प्रकारांतील समान सूत्रे ही भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील आणि संस्कृत नाटकांतील आहेत. नांदी, सूत्रधार, विदूषक, नाट्य, नृत्य, गायन, वादन या सगळ्यांचा समावेश त्या प्रकारांमध्ये असतो. लोकनाट्याचे विषय प्रामुख्याने पौराणिक असतात. ऐतिहासिक, सामाजिक विषयही अधूनमधून येतात. लोकपरिचित मिथककथांचाही वापर लोकनाट्यात केला जातो. ती लोकनाट्ये धार्मिक विधींच्या प्रसंगी लोकसंगीत व लोकनृत्य यांच्या सहाय्याने सादर केली जात. साधी सोपी मौखिक भाषा त्यांत वापरली जाते. ती भाषा स्वाभाविक, उत्स्फूर्त, मनाची पकड चटकन घेणारी असते. त्यातील संवादांमध्ये नादमयता, लयबद्धता असते. त्या-त्या प्रदेशातील संस्कृतीचे दर्शन लोककलांमध्ये घडते.

दशावतार हा एक लोककला प्रकार. तो प्रामुख्याने दक्षिण कोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा येथे सादर केला जातो. दक्षिण कोकणात गावोगावी वार्षिक जत्रा असतात. कोठे कार्तिक महिन्यात तर कुठे माघात. दशावताराचे खेळ करणारी मंडळे असतात. त्यांची बांधिलकी एकेका गावच्या विशिष्ट देवालयाशी असते. तेथून त्यांना वार्षिक उत्पन्न दिले जाते. दशावताराचे सादरीकरण म्हणजे विष्णूच्या दहा अवतारांच्या कथानकावर आधारित बोलले जाणारे उत्स्फूर्त संवाद. त्यात नाट्य असते. दशावतारात शंखासूराला फार महत्त्व असते. शंखासूराने ब्रह्मदेवाचे वेद चोरले आणि तो पळून जाऊन समुद्रात लपून बसला. मग विष्णूने मत्स्यावतार घेऊन त्याला ठार मारले. तो कथाभाग म्हणजे दशावतारातील मोठे आकर्षण असते. विष्णू आणि शंखासूर यांचे युद्ध संगीत, नृत्य यांसह होते. सूत्रधारच गद्य-पद्य संवाद म्हणतो. तो खेळ देवालयाच्या प्रांगणात केला जातो. एखादे बाकडे, साध्या कापडाचा एक पडदा एवढे नेपथ्य पुरेसे असते. पात्रांची तोंडे भडक रंगांनी रंगवलेली असतात. पोशाखही भडक रंगांचे असतात. मुकुट, तलवारी, गदा, गळ्यात मोठमोठ्या माळा, कानात मोठाले अलंकार अशी वेशभूषा, रंगभूषा असते. शंखासूर हा दैत्य म्हणून त्याची वेशभूषा काळी-कुळकुळीत, भडक असते. तोंडावरील कपड्यावर पांढऱ्या रंगाने डोळे, भुवया, ओठ, कान, मिशा, नाक रंगवले जातात. तोंडात लालभडक कपड्याची जीभ लवलवत असते. शंखासूर प्रेक्षकांना हसवतो, चेष्टामस्करी करतो, पोराबाळांना गमतीने घाबरवतो. अधून-मधून समकालीन विषयांवर भाष्यही करतो. सूत्रधार व इतर मंडळी प्रथम देवाला आणि प्रेक्षकांना लवून मुजरा करतात. मग गणेशवंदना होते. ती प्रार्थना होताना समोर धोतराचा किंवा गोणपाटाचा पडदा धरला जातो. त्या पडद्याआड सोंडेचा मुखवटा घातलेला गणपती असतो. दोन्ही हातांच्या दंडांवर लाकडी हात बांधून त्याचे दोनाचे चार केलेले असतात. गळ्यात माळा असतात. दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी असतात. त्या भूमिका पुरुषच करतात.

गणेशाचे प्रत्यक्ष आगमन नाट्यमय रीतीने होते. सूत्रधार गणेशस्तवन गात असताना ऋद्धी-सिद्धी हाताने पडद्यावर ढुश्या मारत मारत- नाचत आतून येतात आणि गणेशाच्या आगमनाची वार्ता प्रेक्षकांना देतात. मग पडदा दूर केला जातो. गणपतीला दोन्ही बाजूंनी धरून त्याच्यासह ऋद्धी-सिद्धी नृत्य करतात. गणपती सूत्रधाराला शुभाशीर्वाद देऊन गमन करतो, म्हणजे जातो. मग पडदा धरून मोरावर बसलेली सरस्वती येते. तीही नृत्य करते, आशीर्वाद देते आणि आत जाते. मागे बांधलेला लाकडाचा मोर, मुकूट-दागिने घातलेली, फुलांच्या माळा ल्यालेली सरस्वती आणि तिचे नृत्य हाही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. गणपती आणि सरस्वती यांच्या दर्शनानंतर विष्णूच्या दहा अवतारांपैकी काही अवतारांवर आधारित नाट्यमय संवाद बोलले जातात. दशावतारी नाटकात ‘महादवी’ किंवा ‘म्हादवी’ ही पात्रे लोकांचे मनोरंजन करतात. त्या पात्रांनी डोक्याला झाडांचे डहाळे बांधलेले असतात. विदूषकच ते. ते नृत्य करतात. मत्स्यावताराचे कथानक हे दशावतारात मुख्य कथानक असते. इतर अवतारांचा कथाभाग थोडक्यात आवरतात. तो झाला पूर्वरंग.

उत्तररंगात पौराणिक कथानक घेतात. ते दशावताराचे खरे नाटक असते. ते नाटक पहाट फुटेपर्यंत चालते. लिखित संवाद नसतात. कथानकाच्या अनुषंगाने हजरजबाबीपणे उत्स्फूर्त भाषणे-संभाषणे होतात. सगळ्या खेळात गद्य-पद्यमय संवाद,  नृत्य असते. युद्धातील वीररसही मृदुंगाच्या तालावर नाचत नाचत, पावले टाकत दमदारपणे व्यक्त केला जातो. एकूण, मशालींच्या प्रकाशात, गॅसबत्तीच्या किंवा विजेच्या प्रकाशात रात्री सुरू झालेला तो अद्भुतरम्य खेळ गावातील जनसामान्यांना रिझवतो,  नैतिकतेचे शिक्षण देतो, चमत्कारांची भूक भागवतो. मृदुंग-झांजा-पेटी अशा वाद्यांच्या सुरावटीबरोबर गायननृत्याने, साध्यासुध्या संवादांनी प्रेक्षकांना भारून टाकतो. दशावतार गावोगावी लोकप्रिय आहेत.

लळीतलळीत हा प्रकार पेशवाईच्या आधीपासून प्रचलित आहे. लळिताचा अर्थ ‘उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे’ असा दिला गेला आहे. लळीत हा शब्द विष्णूच्या अवतारातील लीलांचे वर्णन करणारा खेळ या अर्थानेही वापरला गेल्याची शक्यता आहे. लळीत भारूड या लोककलेतून जन्माला आले आणि त्याचा विकास कीर्तनाच्या अंगाने झाला. लळिताने भारूडातील नाट्यमयता आणि कीर्तनातील पूर्वरंग व उत्तररंग ही पद्धत स्वीकारली. लळितामध्ये देव-दानव लौकिक स्वरूपात सादर केले जातात. म्हणजे विष्णूच्या दशावतारातील प्रसंग नाविन्यपूर्ण रीतीने दाखवले जातात. विष्णूचे दशावतार गावचा पाटील, चोपदार, छडीदार यांच्या संवादांमधून सादर केले जातात. रामावतारातील प्रसंगांचा अंतर्भावही लळितात असतो. लळिताचा शेवट काही ठिकाणी रावणवधाने तर काही ठिकाणी वाघ्या-मुरळीच्या सोंगाने केला जातो. सामाजिक विषयही लळितात हळूहळू येत गेले. मनोरंजन आणि लोकप्रबोधन हे दोन्ही हेतू लळिताच्या सादरीकरणातून साध्य करण्याचा प्रयत्न असतो. पद्याची संपादणी करताना म्हणजे पद्याचा अर्थ श्रोत्यांना समजावून सांगताना निवेदन आणि मार्मिक टिप्पणी केली जाते. सोंगे पूर्वरंगानंतर सादर करतात आणि अभिनयासहित गायन केले जाते. कीर्तनाचा उरलेला भाग उत्तररंगात सादर होतो. लळीत हे कीर्तनात मध्येच सादर केले जाते. भक्तगणाचा उल्लेख होताच भालदार पुढे येऊन लळिताला सुरुवात करतो, सोंगे ही लळितामध्ये पाटील, वासुदेव, चोपदार, बैरागी, आंधळा, बहिरा, ज्योतिषी, ब्राह्मण अशी वेगवेगळी घेतली जातात.

गोंधळतुळजापूरच्या अंबा मातेच्या पूजनाची प्रथा महाराष्ट्रात सतराव्या शतकात सुरू झाली. गोंधळी म्हणजे अंबेचे पूजक, सेवक, देवीचे भक्त किंवा पुत्र म्हणजे गण. अशा गणांचे दल म्हणजे समुदाय. गोंधळ हा शब्द ‘गणदल’ या शब्दावरून झाला. गोंधळ घरात लग्न, मुंज, बारसे इत्यादी शुभकार्यानंतर गोंधळ्यांना आमंत्रण देऊन घालण्याची प्रथा आहे. गोंधळात नृत्यासह देवीच्या स्तुतीपर गाणी म्हटली जातात. आरंभी, ‘तुळजापूरच्या भवानी देवी गोंधळाला ये’ असे आवाहन देवीला केले जाते. गोंधळ्यांच्या प्रमुखाला नाईक म्हटले जाते. त्याच्याबरोबर चार-पाच कलावंत असतात. नाईक हा कथेचा अर्थ सांगतो. सगळ्या पात्रांचा अभिनय, संवाद तोच सादर करतो. नायकाचे व्यक्तिमत्त्व उठावदार असते  -मोठ्या झुपकेदार मिशा, डोक्याला शिंदेशाही पगडी, घोळदार झगा, पायाला बांधलेले घुंगरू, कपाळावर भंडारा, कुंकवाचा मळवट असा सजलेला नाईक असतो. तो  चांगला बहुरूपी असतो. तो त्याचे नाव हाताच्या हालचालींवरून सांकेतिक भाषेत सांगतो आणि त्याचा साथीदार त्याच्या इशाऱ्याचा अर्थ लावून नाव उच्चारतो. त्या भाषेला करपावली  किंवा करपल्लवी असे म्हणतात. करपावली या सांकेतिक भाषेत सर्व मुळाक्षरे विशिष्ट खुणांनी दाखवली जातात. ती सांकेतिक भाषासुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने आली आहे.

नाईक प्रेक्षकांसमोर प्रथम चौक किंवा मंडल घालून गोंधळाला प्रारंभ करतो. गोंधळाला अनेक देवता येतात. त्या भूमातेच्या प्रतिनिधी म्हणून येतात. नाईकाचे साथीदार म्हणून संबळ, तुणतुणे, टाळ वाजवणारे लोक असतात. ते नृत्यगायनाची बाजूही सांभाळतात. ज्या घरी गोंधळ असतो त्या घरच्या यजमानांनाही गोंधळात सहभागी करून घेतले जाते. गोंधळ रात्रीच्या जेवणानंतर सुरू होतो. तो रात्रभर असतो, पण आता, तासा-दोन तासांतच गोंधळ आवरतात. गोंधळात पूर्वरंग व उत्तररंग असतो. पूर्वरंगात मंडल, पूजा-अर्चा, गणपती, कुलदेवता यांची पूजा आणि इतर देवदेवतांना आवाहन असते. नंतर गोंधळाची, मूळ देवतांची स्तुतिगीते गायली जातात. उत्तररंगात एखादी लोककथा, दैवतकथा, पुराणकथा, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथा सांगतात. गोंधळ घातला जात असताना डाव्या बाजूला एक दिवट्या बसवलेला असतो. घरच्या यजमानाने त्या दिवटीला सतत तेल पुरवायचे असते. नमन सुरू झाल्यावर गोंधळी शेकडो देवतांना आवाहन करतो, त्यात खूप वेळ जातो. त्यावरूनच ‘नमनाला घडाभर तेल’ अशी म्हण पडली आहे. गोंधळाची प्रथा कोकण, देश या ठिकाणी आणि विदर्भात झाडीपट्टीतही आहे.

तमाशातमाशा कलाप्रकार विशेषतः उत्तर पेशवाईमध्ये अधिक लोकप्रिय झाला. पण त्याचा प्रारंभ उत्तरेकडील रंगेल मुसलमानांकडून झाला. शिवाजी महाराजांचा काळ संपुष्टात आल्यावर मुसलमानी सैनिकांचे तळ महाराष्ट्रामध्ये होते. घरापासून दूर असलेल्या त्या माणसांना नाच-गाण्यातील शृंगारिक करमणुकीची भूक होती. म्हणून त्यांनी स्थानिक महार, मांग, डोंबारी, कोल्हाटी, गोंधळी यांच्या द्वारे तमाशा हा मनोरंजनाचा प्रकार रूढ केला. तमाशा हे नावही त्यांनीच दिले. तमाशा म्हणजे गंमत, मजा असा अर्थ आहे, तमाशा ग्रामीण अशिक्षित रांगड्या जनसंस्कृतीत लोकप्रिय झाला. तमाशाची पाळेमुळे गोंधळ या प्रकारात आहेत. तमाशात घटक गायन, वादन, नृत्य, संवाद हे सगळे आहेत. तमाशात सर्व जातिधर्मांचे, व्यवसायांचे लोक सहभागी असत. शृंगार, वीर, भक्ती या, लोकमानसाला प्रिय असणाऱ्या रसांच्या समावेशामुळे तमाशाला लोकनाट्याचा जबरदस्त आविष्कार असे स्थान समाजात मिळाले.

तमाशाचे फड असतात. फड म्हणजे तमासगीरांचा गट. फडाचा प्रमुख नाईक असतो. स्त्रीवेष धारण करणारा एक नाच्या, स्त्री नाची आणि चतुर, हजरजबाबी सोंगाड्या असतो. वादक आणि सूर ओढणारे सुरते किंवा झिलकरी असतात. आता तमाशा हा लोकरंगभूमीवरील कलाप्रकार मानला जातो. त्याला लोकनाट्य म्हणतात. गण, गवळण, दौलतजादा, कलगीतुऱ्यातील भेदिक म्हणजे आध्यात्मिक कवने, सवालजवाब, मुजरा, रंगबाजी, छक्कड, फार्स असे घटक तमाशात असतात. आरंभी तमाशात लावणी म्हणणारा शाहीर, सूर धरणारी-धृपद गाणारी दोन माणसे आणि लावणीवर नृत्य करणारा नाच्या पोऱ्या ही माणसे असत.

सोंगाड्याचा प्रवेश उत्तर पेशवाईत शाहीर परशुरामाच्या तमाशात प्रथम झाला; तशीच, विनोदी भूमिका करणाऱ्यांची बतावणीही तेव्हा सुरू झाली. तमाशात ढोल, ढोलकी, तुणतुणे, झांज ही वाद्ये असतात. ढोलकी आणि तुणतुणे वाजवणारे कलाकार गणेश सरस्वतीचे स्तवन प्रथम करतात. त्या स्तवनाला गण म्हणतात. नंतर गौळण सादर केली जाते. तीमध्ये देवांचे शृंगार व्यक्त केलेला असतो. गवळणी कृष्णाला उद्देशून जी गाणी म्हणतात त्या गौळणी. मुख्य गवळणीला मावशी असे म्हणतात. गौळण चालू असताना कृष्ण, त्याचे मित्र, सवंगडी राधेची आणि इतर गवळणींची चेष्टा गमतीने करतात, छेड काढतात, वाट अडवतात. त्यावेळचे विनोदी संवाद मनोरंजक खुसखुशीत असतात. त्यात अभिनयाला वाव असतो. संतांनीही गौळणी लिहिल्या आहेत. एकनाथांच्या गौळणी प्रसिद्ध आहेत. त्या नंतरच्या नाट्यभागात लावण्या म्हटल्या जातात. सोंगाड्या समकालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मिस्किल भाष्य करतो. विनोदनिर्मिती त्याच्या द्वयर्थी बोलण्यातून होते. लोकांची दाद चांगली मिळते. तमाशात पोवाडे म्हणणारे शाहीर आणि शृंगारिक अदा करत नृत्य करणारी नर्तिका यांना महत्त्व असते. शाहिरांची वीररस निर्मिती आणि नर्तकींनी लाडिक हावभावांसहित लचकत-मुरडत केलेले नृत्य; त्याला गायनवादनाची साथ… यामुळे लोक तमाशात रंगून जातात. तमाशात दोन पार्टी असतात- कलगीवाले आणि तुरेवाले. कलगीवाले हे शक्तीचे उपासक असतात तर तुरेवाले हे शिवाचे उपासक असतात. कलगीतुऱ्याची मौज काही न्यारी असते. त्यात आध्यात्मिक सवालजबाबांची मनोरंजनात्मक स्पर्धा चालते. तमाशाच्या अखेरीला मुजऱ्याचे गाणे असते. तमासगीरांची सद्दी पेशवाईची अखेर झाल्यावर संपली. मराठी रंगभूमीचा उदय 1843 मध्ये झाला आणि समाजातील वरचा वर्ग नाटक या कलाप्रकाराकडे वळला. तमाशातही नाटकाप्रमाणे संवाद 1860 नंतर सुरू झाले आणि वगनाट्याचा उदय झाला. पठ्ठे बापुरावांच्या काळापासून म्हणजे 1900 शेच्या सुमाराला वगनाट्यात तथाकथित उच्चवर्णीयांचा समावेश झाला.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर तमाशा सुधार समिती स्थापन केली. महाराष्ट्र तमाशा परिषद स्थापन झाली. तमाशा महोत्सव सुरू झाले. तमाशा फडातील कलावंतांना तमासगीर म्हणून मान्यता मिळाली. तमाशाचे फड खेडोपाडी जत्रांच्या प्रसंगी आणि इतर वेळी उभे राहतात. तमाशा शहरांमध्ये थिएटरमध्ये रंगतो.

कीर्तनकीर्तनाची परंपरा प्राचीन आहे. देवर्षी नारद-महर्षी व्यास-शुकमुनी अशी ती परंपरा सांगितली जाते. देवर्षी नारद यांना आद्य कीर्तनकार मानले जाते. त्यांची परंपरा म्हणजे नारदीय कीर्तन परंपरा. कीर्तनाचे स्थान म्हणजे नारदाची गादी. कीर्तने देवालयात केली जातात. कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार किंवा कथेकरी बुवा असे म्हणतात. कीर्तन हे कथा-नाट्य-गायन-वादन या सगळ्यांच्या भक्तिमय आविष्काराने रंगते. कीर्तनकाराजवळ आवश्यक कला म्हणजे कथा निवेदनाची हातोटी, थोडीशी नाट्यमयता, अल्पसे नृत्य, गोड भक्तिरसपूर्ण गायन, अधूनमधून विनोद, समकालीन विषयांवर भाष्य, उत्तम पाठांतर, शुद्ध उच्चार, श्रोत्यांना सामील करून घेऊन रंगत आणण्याची किमया अशा सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. कीर्तनातून भगवद्भक्तीचा प्रसार, सदाचाराची शिकवण, नीतिमूल्यांची जोपासना हे सारे घडवले जाते. सज्जनांचा जय आणि दुर्जनांचा पराभव हे कथेच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनाची पकड घेईल अशा पद्धतीने सांगितले की श्रोत्यांच्या मनावर इष्ट परिणाम होतो. कीर्तन हे सामाजिक, राजकीय जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. जेव्हा समाजात औपचारिक शिक्षण खूप कमी होते, शाळा-महाविद्यालये नव्हती, तेव्हा जनमानसावर संस्कार करणारे विद्यालय म्हणजे देवालयातील कीर्तन होय. रामायण, महाभारत, पुराणकथा यांतून मानवी जीवनातील पावित्र्य, मांगल्य, उदात्तता कशात आहे याची सुंदर जाण माणसांच्या ठिकाणी कीर्तन ऐकून निर्माण होत असे. कीर्तन म्हणजे देवाची, परमात्म्याची आळवणी. प्रत्येक माणसात असणारा ईश्वरी अंश जागा करणे हे कीर्तनाच्या माध्यमातून साधले जात असे. ईश्वराच्या सगुण-साकार रूपातून सत्प्रवृत्तीची आस निर्माण करणे, चांगला माणूस घडवणे हे कार्य कीर्तनाद्वारे केले जात असे.

कीर्तन हा एकपात्री प्रयोग असतो. कीर्तनाचे तीन प्रकार आहेत 1 नाम संकीर्तन, 2 गुणसंकीर्तन, 3 कथा संकीर्तन. नारदीय कीर्तनातून वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, कथा संकीर्तन असे संप्रदाय निर्माण झाले. नारदीय कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असतो. त्या कीर्तनाचे पाच भाग असतात. 1 नमन – त्यात ईशस्तवन असते. 2 पूर्वरंग – त्यात तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक विषयाची हाताळणी होते. 3 मध्यंतर – त्यात नामजप केला जातो. भक्तिगीत गायले जाते. 4 उत्तररंग- त्यात निरुपणाला जी कथा घेतली असेल ती सांगितली जाते. 5 देवाकडे मागणे मागितले जाते, आरती केली जाते आणि शेवटी भैरवी गायली जाते.

कीर्तनाला साथ तबला-पेटीची असते. कीर्तनकाराच्या हातात टाळ-चिपळ्या-झांजा यांपैकी एखादे वाद्य असते. गायनात आर्या, दिंडी, साकी, ओवी, अभंग असे प्रकार असतात. विविध चालींची पदे, अभंग असतात. पोवाडा, फटका, कटाव हे काव्यप्रकारही गायले जातात. संगीत नाटकातील अनेक पदांच्या चाली कीर्तनातून घेतलेल्या आढळतात. कीर्तनातून प्रामुख्याने विशाल धर्मभावना, आस्तिक्यभाव जागवला जातो त्यामुळे भक्तिरसाला प्राधान्य असते, पण वीररस-हास्यरस-करुणरस याही रसांची, कथानिरुपणाच्या अनुषंगाने निर्मिती होते.

वारकरी कीर्तन परंपरा ही महाराष्ट्रातील स्वतंत्र कीर्तन परंपरा आहे. त्या परंपरेचे अध्वर्यू आहेत संत शिरोमणी नामदेव महाराज. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ असे उत्कटतेने गात गात नामदेवांनी चंद्रभागेच्या तीरी हरिकथेचे रोपटे लावले. वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग म्हणजे आख्यान असे दोन विभाग नसतात. संतांच्या अभंगांचे गायन आणि त्यावरील निरूपण असे स्वरूप असते. वारकरी कीर्तनात काही वेळा वीस-पंचवीस माणसांचाही सहभाग असतो. साथीला टाळ-मृदुंग, एकतारी, हार्मोनियम, तबला अशी वाद्ये असतात. कीर्तनाचे आधुनिक प्रकार म्हणजे 1 संयुक्त कीर्तन, 2 राष्ट्रीय कीर्तन, 3 जुगलबंदी कीर्तन. कीर्तने संस्कृत आणि तेलगू भाषांतही रचली गेली आहेत. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, मामासाहेब दांडेकर, विजापूरकर, भगवानबाबा, आफळे बुवा, बाबा महाराज सातारकर, शंकर अभ्यंकर, चारुदत्त आफळे, इंदुरीकर महाराज असे ख्यातनाम कीर्तनकार महाराष्ट्रात होते आणि आहेत. त्यांनी कीर्तन कलेचा प्रभावी वापर समाजोद्धार, राष्ट्रोद्धार यासाठी  केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कीर्तन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही आहेत.

भारूडभारूड गायन आणि सादरीकरण हा महाराष्ट्रातील खेडोपाडी लोकप्रिय असलेला कलाप्रकार आहे. संत एकनाथांचे नाव भारुडांशी जोडलेले आहे. भारूड हे एक रूपक असते. एकनाथांनी भारुडे आध्यात्मिक उपदेश करण्यासाठी जनसामान्यांना समजेल अशा रूपकांतून लिहिली. त्यांचे ‘विंचु चावला विंचु चावला कामक्रोध विंचु चावला’  हे भारुड अतिशय प्रसिद्ध आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे माणसाचे सहा शत्रू. विंचवाचे विष अंगात भिनल्यावर वेदना होतात तशा या गुणांमुळे होतात म्हणून सत्त्वगुण रूपी अंगारा हाच त्यावरील उतारा आहे असा उपदेश एकनाथांनी केला आहे. भारूड ही अशी दोन अर्थ असलेली गेय रचना असते. त्यात सामाजिक दोषांवर, लोक दुखावले जाणार नाहीत अशा पद्धतीने टीका असते. सदाचाराची, ईश्वरभक्तीची शिकवण त्यातून दिली जाते. लोकव्यवसाय, नातीगोती, गाव, देवदेवता, भूतपिशाच्च, पशुपक्षी, सण असे लोकपरिचित विषय भारूडात असतात. भारुडात नाट्य असते. भारूड व लळीत यांचा परस्पर संबंध आहे. दोन्हींमध्ये काही समान वैशिष्ट्ये आहेत. भारुडांचे तीन प्रकार आहेत. 1 सोंगी भारूड, 2 कूट भारूड, 3 भजनी भारूड. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा संतांनीही भारुडे लिहिली आहेत. भारुडे हा मनोरंजनाचा कलात्मक आविष्कार आहे. हरिकीर्तन आणि जीवनचिंतन यांची शिकवण देण्यासाठी ती रचली व सादर केली गेली.

मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com

—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here