पारोळा – झाशीच्या राणीचे गाव (Parola – A town with history and Mythology)

7
149

पारोळा हेमेरी झांसी नही दुंगी असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या मणिकर्णिकाचित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला. पारोळेकरांना ती माहेरवाशीण म्हणून त्या राणीचा अभिमान आहे. मराठी कवी भा.रा. तांबे यांनी 1939 साली लिहिलेली त्या मर्दानीची प्रतिमा मन:चक्षुसमोर उभी करणारी कविता रे हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी । ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।ही लिहिली. त्या मणिकर्णिकेच्या पदस्पर्शाने पावन झालेला, ब्रिटिशकालीन इतिहासाच्या भग्न झालेल्या पण गौरवपूर्ण खुणा मिरवत, खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट किल्ला पडीक अवस्थेत पारोळ्यात उभा आहे. पारोळा हे असे ऐतिहासिक महत्त्वाचे सुंदर शहर आहे. ते जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आहे. जिल्ह्याचे जळगाव हे ठिकाण पंचावन्न किलोमीटर तर धुळे हे नजीकच्या दुसऱ्या जिल्ह्याचे ठिकाण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या सुरुवातीलाच झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा असे दोन सुंदर पुतळे आहेत. भुईकोट किल्ला आणि पुरातन बालाजी मंदिर ही शहरातील मुख्य वैशिष्ट्ये. झपाटी भवानी माता मंदिर, श्रीराम मंदिर, शिवमंदिर व सुंदरजैन मंदिर अशा आणखी काही जुन्या वास्तू पारोळ्यात आहेत.

पारोळा हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. मात्र बोरी धरणामुळे गावाला पाणीपुरवठ्याचा दिलासा काही प्रमाणात मिळाला आहे. हवामान विषम असून तापमान हिवाळ्यात कमीत कमी नऊ सेल्सिअसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात तेच तापमान बऱ्याच वेळा पंचेचाळीस सेल्सिअसच्या पुढे असते ! गावात पर्जन्यमान सरासरी सहाशेनव्वद मिलिमीटरच्या दरम्यान आहे. पारोळ्याच्या आजूबाजूला कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे जिनिंग मिल,सरकीपासून तेल काढणारे कारखाने गावपरिसरात आहेत. तो मोठाच रोजगार उपलब्ध आहे. पारोळा येथील लाल मिरची प्रसिद्ध आहे. मात्र सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे मिरचीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कडधान्ये,मका व पाणी असलेल्या भागात भाजीपाला ही अन्य उत्पादने मोठ्या प्रमाणावर होतात. पारोळ्यात फटाके निर्मितीचा जुना कारखाना आहे. तो तेथे 10 एप्रिल 2009रोजी झालेल्या स्फोटामुळे प्रसिद्धीस आला. त्या दुर्घटनेत सहा मुले, दहा महिला व आठ पुरुष ठार झाले होते, तर सत्तरहून अधिक कामगार जखमी झाले होते.

माझे बालपण पारोळ्यात गेले. पेठेत मोठा चौसोपी वाडा होता. कुटुंब एकत्र असल्याने आणि आईबाबांना गावात मान असल्याने लोकांचा राबता असे. पारोळ्याची नगर परिषद ब्रिटिश काळात स्थापन झालेली आहे. तेथे माझे वडील- नाना ऑक्ट्राय इन्स्पेक्टर होते. माझे आजोबा सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्यावेळी खाजगी शाळा लहान गावात जवळपास नव्हत्याच. आजोबांनी सांगितल्याचे आठवते, की सहस्रबुद्धे म्हणून एक ब्रह्मचारी होते. आम्ही त्यांच्या वाड्यात भाड्याने राहण्यास आलो. सहस्रबुद्धे बुवा एकटेच असल्याने त्यांचे खाणेपिणे आमच्याकडेच होत असे. ते सतत ध्यान धारणा करत असत. आम्ही सहा हजार चौरस फूट जागेवर सात-आठ खोल्या असलेला पूर्ण वाडा वापरत असू. गावातील अनेक पैसेवाले लोक तो वाडा विकत घेण्यासाठी टपलेले होते. पण बुवा कोणालाही प्रतिसाद देत नव्हते. आजोबांवर मात्र त्यांचा जीव होता. एकदा ध्यानात असताना वाडा आजोबांना विकत द्यावा असा त्यांना दृष्टांत झाला व तसे त्यांनी आजोबांना बोलून दाखवले. त्यांनी मृत्यूनंतर माझी समाधी त्या जागेत बांधा व समाधीचा भाग कोणालाही विकू नका अशी अट घातली. आजोबांनी तो वाडा साधारण 1930 साली तीन हजार रुपयांना विकत घेतला. सहस्रबुद्धे बुवांच्या निधनानंतर तेथे समाधी बांधण्यात आली. वाडा पूर्ण पडला असला तरी समाधी मात्र औदुंबराच्या झाडासह व्यवस्थित आहे. आजी, आजोबा, आई व नानांसह कोणीही हयात नाहीत. सहस्रबुद्धे बुवांची आम्हा सर्व भावंडांवर कृपादृष्टी आहे अशी आमची श्रद्धा आहे. हिमालयातील एक ॠषी समाधीच्या दर्शनासाठी माझ्या लहानपणी येत असत. ते घरी फळे, दूध घेत असत.

अनेक शाळा-विद्यालयांमुळे पारोळा शैक्षणिक केंद्र झाले आहे. आमच्या लहानपणी एन.ई.एस. हायस्कूल हे एकमेव माध्यमिक विद्यालय होते. त्याच संस्थेची मुलांसाठी व मुलींसाठी त्या इमारतीत वेगवेगळी विद्यालये होती. मी माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर अंमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये कॉमर्सला ॲडमिशन घेतले. मी तेव्हा कॉमर्स साइडला एकमेव मुलगी होते. माझ्या त्या धाडसाबद्दल आणि मी राणी लक्ष्मीबाईच्या पारोळ्यातून येत असल्याने मला कॉलेजमधील मुले झाशीची राणीम्हणून चिडवत असत. विशेष म्हणजे मी बँकेत असताना माझ्या कडक आणि शिस्तबद्ध वागण्यामुळे मी झाशीची राणी म्हणूनच प्रसिद्धी पावले होते !

पारोळा गावाच्या नावासंबंधी काही आख्यायिका आहेत. गावाचे नाव शिरोळेआडनाव असणाऱ्या लोकांनी शिरोळे असे आरंभी ठेवले होते, त्याचे नंतर पारोळा झाले. आणखी एक आख्यायिका अशी आहे, की गावातील रस्त्यांवर पिंपळाचे अनेकपारठरावीक अंतराने बांधलेले होते. त्या पारांच्या ओळी म्हणजेच पारोळी असे नाव तयार झाले. त्यात सुधारणा होऊन कालांतराने पारोळीचे पारोळे किंवा पारोळा असे झाले. पारोळ्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार चौतीस हजार आठशे आहे. पुरुषांची संख्या बावन्न टक्के आणि महिलांची अठ्ठेचाळीस टक्के. शहराचा साक्षरता दर एकोणसत्तर टक्के; तो राष्ट्रीय सरासरीच्या 59.5 टक्क्यांपेक्षा जवळ जवळ दहा टक्क्यांनी अधिक आहे: पुरुष साक्षरता शहात्तर टक्के आणि महिला साक्षरता एकसष्ट टक्के आहे. पारोळ्यामध्ये तेरा टक्के लोक सहा वर्षांखालील आहेत. पारोळ्यात पूर्वीपासून माळी, तेली आणि खत्री समाजाचे प्राबल्य होते. त्यांतील खत्री समाज हातमाग कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात होता. तो व्यवसाय यंत्रमाग आल्यानंतर गुजरातेतील सुरत शहरात फोफावला. त्या काळी विणकाम करणारी जिल्ह्यातील जवळपास आठशे खत्री कुटुंबे सुरतेला स्थलांतरित झाली व पारोळ्यातील तो व्यवसाय बंद पडला.

पारोळ्याचा भुईकोट किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी 1727 मध्ये बांधला. त्या परिसरात पेंढाऱ्यांची जवळपास पन्नास घरे होती. पारोळ्यातील एका भागाची ओळख ‘पेंढारपुरा’ अशीच आहे. किल्ला पारोळा बस स्थानकापासून पायी पाच-सात मिनिटांच्या अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार बाजारपेठेतील दुकानांच्या रांगेमध्ये आहे. बाजारपेठेतून किल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे. गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. त्या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यांतील पूर्वेकडील दरवाज्यासदिल्ली दरवाजाम्हणून ओळखले जाते, तर अन्य दरवाज्यांची नावे धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अमळनेर दरवाजा अशी आहेत. पूर्वी ती नावे वेगळी असावीत. किल्ल्यामधील मजबूत दगडी बांधकामाला बालेकिल्ला असे म्हटले जाते. तो साधारण चारशेऐंशी फूट लांब व चारशेपन्नास फूट रुंद आहे. त्या बालेकिल्ल्याला पंचवीस फूट उंचीचे चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस अकरा बुरुज आहेत. त्या बुरुजांचे सौंदर्य इंग्रजांनी गुप्त संपत्तीच्या लालसेने खोदकाम केल्याने नष्ट झाले आहे. सध्या त्या ठिकाणी पुरातत्त्व विभागामार्फत अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे सुरू झाली आहेत. किल्ल्याच्या आत काही विहिरी आहेत. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ असून त्या बुरुजाच्या खाली, आतील बाजूला दारु कोठार असावे. पूर्ण किल्ल्याचे दर्शन तटबंदीवरून चोहोबाजूंनी घेता येते.

किल्ल्याच्या चारही बाजूंला, तटबंदीभोवती दगडांनी बांधलेला वीस फुटी खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी व विषारी प्राणी सोडले जात. खंदकांवर अतिक्रमण झाले असून बहुतेक खंदक बुजले गेले आहेत. पूर्वेकडील तटबंदीच्या बाहेरच्या बाजूचा खंदक व्यवस्थित आहे. तेथे एक तलावही आहे. त्या तलावात उतरण्यासाठी तटबंदीत दोन ठिकाणी दरवाजे आहेत. तसेच, दरवाजे तलावाच्या विरुद्ध बाजूस दिसून येतात. तटबंदीसमोर जमिनीच्या खालील पातळीवर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेथे भुयाराचे तोंड आहे. त्या भुयारातून आठ किलोमीटर दूर नागेश्वर मंदिराजवळ निघता येते असे सांगितले जाते. ते भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याच भुयाराचा वापर केला होता, असेही म्हटले जाते. भुयाराचा मागोवा गडावर दोन ठिकाणी दिसतो.

किल्ल्याच्या दक्षिणेला कोपऱ्यात हमामखान्याचे अवशेष असून त्या तटबंदीला लागून तीन कचेऱ्यांचे अवशेष दिसतात. तसेच, त्या कचेऱ्यांच्या समोर हौद व कारंजे असल्याचे अवशेष पाहण्यास मिळतात. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणूनही किल्ल्याकडे पाहिले जाते.

सदाशिवराव नेवाळकर यांनी शहराची स्थापना सतराव्या शतकादरम्यान केली. झांसीच्या राजाचा एक चुलत भाऊ गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच राणी लक्ष्मीबाईंचे पतीगंगाधर यांनी पारोळा शहर सदाशिवराव यांना जहागीर म्हणून भेट दिले होते. राणीच्या माहेरचे वंशज म्हणजेच तांबे यांची काही घरे पारोळा गावात आहेत. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव 1818 मध्ये केला व हिंदवी स्वराज्य लयास गेले. तशा वेळी, 1821 साली पारोळे व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन देशभक्त लोकांनी इंग्रजांच्या विरूद्ध बंड पुकारले. कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज ही पहिली इंग्रज व्यक्ती होती, जिने तिच्या डोळ्यांनी राणी लक्ष्मीबाईला रणांगणात प्रत्यक्ष लढताना पाहिले होते. लक्ष्मीबाई ब्रिग्जच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याशी लढताना शहीद झाली. पुढे, त्याच कॅप्टन ब्रिग्जच्या खुनाचा प्रयत्न झाला. त्याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे, 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच, इंग्रजांनी अनेक जहागीरदारांची सर्व संपत्ती झाशीच्या राणीला मदत केल्याच्या आरोपावरुन जप्त केली. इंग्रजांनी राणीचे नातलग म्हणून लालभाऊ झाशीकर यांच्या ताब्यातून किल्ला व पारोळा शहर 1859 साली ताब्यात घेतले आणि 1860 मध्ये जहागिरी खालसा केली ! दरम्यान, इंग्रजांनी या भुईकोट किल्ल्याची धनलालसेपायी मोडतोडही केली. त्या घटनांच्या खुणा भग्न अवशेषांच्या स्वरूपात किल्ल्यात आढळतात.

बालाजी मंदिर

श्रीबालाजी हे पारोळ्याचे वेगळेच श्रद्धादालन आहे. बालाजी साडेतीनशे वर्षांपूर्वी पारोळा येथे आले होते म्हणे ! त्याबाबतची दंतकथा अशी – भक्त गिरीधरशेठ शिंपी वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते पंच्याऐंशी वयापर्यंत पायी तिरुपती बालाजीची वारी साडेतीनशे वर्षांपूर्वी करत असत. ते थकले तेव्हा त्यांनी बालाजींना पारोळ्याला येण्यासाठी साकडे घातले व बालाजी खरेच पारोळ्याला आलेतेवढा काळ बालाजीची मूर्ती तिरुपतीच्या देवळात नव्हती. त्यामुळे तेथील पुजारी बालाजीला शोधत पारोळ्यापर्यंत पोचले. गिरीधरशेठ शिंपी यांच्या निर्वाणाच्या दिवशी म्हणचे सप्तमीला बालाजींची मिरवणूक काढण्यात येते व ती गिरीधरशेठ शिंपी यांना भेटण्यासाठी स्मशानभूमीत जाते. भक्ताला भेटण्यासाठी स्मशानभूमीत देव वाजत गाजत जातो याचे ते एकमेव उदाहरण असावे. त्यांच्या मंदिराला मोठे दगडी प्रवेशद्वार होते. त्याला नगारखाना म्हणत असत. मंदिराच्या समोरगरुडध्वज’ आहे. दरवर्षीनवरात्रात तेथे बालाजीची मोठी यात्रा भरते. वेगवेगळ्या देवतांच्या सुंदर मूर्तींची मिरवणूक काढली जाते. त्यांना ‘वहने’ असे म्हणतात. यात्रेचे महत्त्वाचे दिवस म्हणजे अश्विन शुद्ध द्वादशी व त्रयोदशी हे आहेत. त्या दिवशी आरती म्हणून दीड किलो वजनाची बालाजींची मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला जातो. ती उचलली गेली की आरती म्हणणे बंद केले जाते. पण मूर्ती लवकर उचलली जात नाही. त्यासाठी अनेक आरत्या एकापाठोपाठ एक म्हटल्या जातात. कित्येक वेळा शंभरावर आरत्या म्हटल्यावर मूर्ती उचलली गेल्याच्या घटना सांगितल्या जातात.

नुतन बालाजी मंदिर

सरकारने बालाजी मंदिराला पुरातन वास्तूचा दर्जा देऊन पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याने पुरातन बालाजी मंदिर जीर्णोद्धारानंतर आणखी भव्य व सुंदर झाले आहे. मंदिराच्या ट्रस्टींनी आजूबाजूच्या परिसरातील काही जागा खरेदी केल्या असून मंदिराची व गावाच्या गौरवशाली इतिहासाची शास्त्रीय माहिती देण्यासाठी संग्रहालय बांधण्याचे ठरवले आहे. पाच कोटी रुपयांच्या विकास निधीच्या माध्यमातून भव्य असे म्युझियम, प्रसादालय, अभिषेक कक्ष अशी तीन मजली वास्तू उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळते. संस्थानचे पारंपरिक एकशेपासष्ट बाहुले म्युझियममध्ये ठेवण्यात येतील. ब्रह्मोत्सवात दररोज निघणारी वहने त्यांच्या क्रमांनुसार म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत.

असेच एक प्राचीन भव्य राम मंदिरही पारोळ्यात आहे. ते किती जुने आहे याची माहिती मिळत नाही. ते बालाजी मंदिराच्या अगोदरचे असावे. कारण कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे बालाजींच्या वार्षिक उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बालाजींची मूर्ती त्या राममंदिरात नेण्यात येते. तेथे अभिषेक करून तेथे असलेल्या विहिरीत बालाजी स्नान करतात व नंतर मूर्ती मूळ मंदिरात आणण्यात येते. पेशवेकालीनझपट भवानी मातामंदिरही सुंदर आहे. त्या मंदिराचे आणि जवळच असलेल्या प्राचीन शिवमंदिराचे सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार राणी लक्ष्मीबार्इंचे वंशज आणि सध्या नगरसेवक असलेले मंगेश तांबे यांच्या प्रयत्नातून झाला आहे. पारोळ्यामध्ये जुने जैन मंदिरहीआहे. त्यात सोळावे तीर्थंकर श्री शांतिनाथ भगवान यांची पंधराशे वर्षांपूर्वीची जुनी मूर्ती आहे.

कादंबरीकार हरी नारायण आपटे हे पारोळा येथे जन्मलेले प्रसिद्ध मराठी लेखक. ते पुढे पुणे येथे स्थायिक झाले. महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री त्र्यंबक पाठक हे पारोळ्याचे राहणारे. त्यांचे चिरंजीव बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. श्रीधरशास्त्री यांचे शिक्षण इंदूर व काशी येथे झाले. त्यांचा व्यासंग व्याकरण, वेदान्त, धर्मशास्त्र वगैरे विषयांचा होता. ते शास्त्री म्हणून सरकारी हायस्कूलमध्ये व कॉलेजमध्ये काम करून सेवानिवृत्त झाले. त्यांनी उत्तरायुष्यात संन्यास घेऊन शंकरानंद असे नाव धारण केले होते. ते धुळ्याच्या सरस्वती संस्कृत पाठशाळेचे संस्थापक. श्रीधरशास्त्री धर्मपरिवर्तनवादी होते. त्यांचे मत अस्पृश्यतेला शास्त्रात आधार नाही असे होते म्हणून गांधीजींनी येरवडा तुरुंगातून काढलेल्या पत्रकाला त्यांची मान्यता होती. त्यांनी पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभा व भांडारकरओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांतर्फे व्याख्याने दिली. ते प्रयाग येथे 1924 साली भरलेल्या व सोनगीर येथे भरलेल्या भारतीय पंडित परिषदेस उपस्थित होते. त्यांनी साडेतीनशे ग्रंथ वाचूनअस्पृश्यता निवारण्याचा शास्त्रार्थहे पुस्तक लिहिले व गांधीजींना पटवून दिले की अस्पृश्यतेला शास्त्रीय ग्रंथात कोठेही आधार नाही. त्यांची अन्य ग्रंथसंपदा संस्कृत 1. ईश, केन, कठ व मुण्डक या उपनिषदांवर बालबोधिनी टीका, 2. महाभाष्यशब्दकोश आणि मराठी – शुक्ल यजुर्वेदाचे मराठी भाषान्तर, नित्यविधि, अस्पृश्यता निवारण्याचा शास्त्रार्थ. त्याशिवाय त्यांनी अनेक निबंध लिहिले व भाषांतरे केली आहेत. श्रीनिवास चुनीलाल अग्रवाल हे पारोळ्यातील एक गर्भश्रीमंत गृहस्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक होते. त्यांनी पारोळा व परिसरात संघाचे काम घराघरात व बहुजन समाजात पोचवले. त्यांनी एका मोठ्या दुष्काळात त्यांची पूर्ण संपत्ती पारोळा व तालुक्यातील जनतेसाठी वापरली. या त्यांच्या मदतीबद्दल त्यांच्याबद्दल आदराने बोलले जाते. अविनाश कुमार झा हे पारोळ्यातील गरिबांना मदत करणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. ते जानेवारी 2001 मध्ये आजारपणाने मृत्यू पावले. कृष्णाकांत जीवननलाल गुजराती यांनी शिक्षण व्यवस्थेत खूप चांगले कार्य केले होते. त्यांना त्यांच्या कामामुळे सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. ते बालाजी शिक्षण प्रतिष्ठानमध्ये उपाध्यक्ष होते.

पारोळा शहरात जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. पारोळ्यात गोड पदार्थांमध्ये मस्त खीर चाखण्यास आणि तिखटामध्ये पातोड्याची काळ्या मसाल्याची भाजी आवर्जून खाण्यास हवी. पारोळ्याला जवळचे रेल्वे स्टेशन अंमळनेर हे असून ते एकोणचाळीस किलोमीटर तर धुळे स्टेशन पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. पाचोरा स्टेशन पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे.

– वृषाली पंढरी 9561090286 vrushali_pandhari@yahoo.com

————————————————————————————-

भा.रा. तांबे यांची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील कविता                 

रे हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली।रे हिंदबांधवा ।।१।।

घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवार खणखणा करित ती वार
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।

कडकडा कडाडे बिजली
शत्रुंची लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।

मिळतील इथे शाहीर
लववितील माना वीर
तरू, झरे ढाळतील नीर
ह्या दगडा फुटतील जिभा
कथाया कथा सकळ काळी
रे हिंद बांधवा ।।४।।

——————————————————————————————————————————————————–

About Post Author

7 COMMENTS

  1. सातारा जिल्ह्यात धावडशी नावाचं गाव आहे. ब्रम्हेंद्रस्वामींचं समाधीस्थळ आहे. एक ऐतिहासिक विहीरही प्रसिद्ध आहे.

  2. नमस्कार. धावडशी संदर्भातील लेख 'थिंक महाराष्ट्र'वर आहे. http://thinkmaharashtra.com/node/2179पण हे राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्याचा उल्लेख कोठेही नाही.- नितेश शिंदे

  3. पारोळा या गांवाची अत्यंत जिवंत असे वर्णन करून डोळयासमोर ऊभे राहते. लेखकाला योग्य अशी झाशीची राणी हि उपमा स्टेट बँकेतील अधीकारांनी दिली आहे ति सार्थक आहे असे माझे मत आहे.पारोळा हे गांव ऐतिहासि व पौराणिक आहे हे या लेखामुळे माहित झाले.

  4. प्रख्यात इतिहासकार द. ब.पारसनीस ह्यांनी लिहिलेल्या राणी लक्ष्मी बाईंच्या चरित्रात मोरोपंत तांबे व भागीरथी बाई ह्यांना काशी ीइथे १९ नोव्हेंबर १८३५ रोजी कन्या रत्न झाले.१२ व्या दिवशी नामकरण समारंभ होऊन कन्येचे नाव ' मनुबाई ' असे ठेवण्यात आले,असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here